देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

मनुवादी-गांधीवादी राजकारण्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीस (ऍडॉप्ट) स्वीकारण्याचे धोरण,धम्म चळवळीस घातकच !

लेखक,विजय अशोक बनसोडे

प्राचीन बौद्ध धर्माचा इतिहास जर आपण नीटपणे पाहिला,अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल की,ज्या ज्या वेळी बौद्ध धम्माच्या विरोधामध्ये प्रतिक्रांती करण्यात आली,त्या त्या वेळी असेच दिसून आलेले आहे की,तत्कालीन सनातनी वैदिक धर्माच्या अनुयायांनी कधी छळ-कपट करून,तर कधी राजसत्तेच्या बळावर बौद्धांचे मूडदे पडून,कत्तली करून,तर कधी बौद्ध धर्माचा स्वीकार (ऍडॉप्ट) करून बौद्ध धर्माला खतम करण्याचे षडयंत्र राबविलेले आहे आणि ते यशस्वी सुद्धा केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या महत्त्वपूर्ण ग्रंथांमध्ये बौद्ध सम्राट राजा बृहद्रताचा खून कोणी केला ? का केला ? कशासाठी केला ? याचे महत्त्वपूर्ण दाखले दिलेले आहेत.त्यामुळे आपण कधी कोणी तरी प्रस्थापित नेता चार पैसे देत आहे म्हणून किंवा विहारे बांधायला लाखो रुपये,मेळाव्याला,धम्म परिषदेला भोजनदान देतो म्हणुन त्याला आपण बौद्ध धर्माच्या कुशीत बसवून किंवा धम्म चवळीचा पुढारी म्हणून, सहाय्यक म्हणून त्या पैशा,घातकी दानाचा स्वीकार करणे किती घातक ठरू शकते.याचा थोडासा अभ्यास करावा.

प्राचीन भारताच्या हजारो वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये आपण जर बारकाईने प्रत्येक राजा आणि प्रत्येक राजाच्या राजवटीचा जर अभ्यास केला,तर आपणास असे दिसून येईल की,भारतावर राज्य स्वकीयांचे असो किंवा परकीयांचे असो,अशा प्रत्येक राजवटीमध्ये ब्राह्मणवाद्यांनी आणि ब्राह्मणांनी विविध राजे आणि राजेशाहीचे (मुस्लिम,इंग्रज,ब्रिटिश,राजपूत, शिख,डच,पोर्तुगाल इत्यादी….) मांडलिकत्व स्वीकारून,त्यामध्ये मग विचारसरणी असेल,पालकत्व असेल,संस्कार व संस्कृतीचा सुद्धा स्वीकार करून त्या मोबदल्यात मिळणाऱ्या राजकीय अधिकारांच्या बळावर भारतातील बहुजन समाजावर ब्राह्मणी धर्म लादून बौद्ध अनुयायी,प्रचारक-प्रसारक आणि कित्येक संत आणि परिवर्तनवादी समाज सुधारकांचा खून केला,त्यांचा व नागरिकांचा अतोनात छळच केला आहे. याचा साधा आणि सरळ अर्थ असा होतो की, ब्राह्नांनांना किंवा त्यांच्या विचारसरणीला जर कोणत्याही एखाद्या विचारसरणीला परास्त करायचे असेल तर त्यासाठी अंतिम पर्याय म्हणून त्या-त्या विचारधारेचा (ऍडॉप्ट) स्वीकार स्वतः आणि आपल्या हस्तकांकरवी करून त्या विचारधारेला नष्ट करणे,हे त्यांचे अंतिम शस्त्र आहे.

सध्या भारत आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये असेच चित्र दिसून येत आहे की, सुमती भार्गव,हेडगेवार,गोळवळकर, गांधीच्या विचारसरणीला आदर्श मानणाऱ्या ब्राह्मण समाजाने आणि सत्तेतील ब्राह्मण व ब्राह्मण्यग्रस्त राजकारण्यांनी बौद्ध धर्माला हद्दपार करण्यासाठी आता बौद्ध धर्माचा विरोध न करता,डायरेक्ट बुद्ध धम्मप्रती,बौद्धां प्रती सहानुभूती दाखवीत धम्माचा स्वीकार करण्याचेच धोरण अवलंबिले जात आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या नीतीचा वापर राजकारणामध्ये सांभाळण्यात आलेल्या विविध जाती धर्मांच्या नेत्यांना हाताशी धरून करण्यात येत आहे.जसे महाराष्ट्रात मराठ्यांना हाताशी धरून शिवरायांना बदनाम करण्याचे धोरण राबविले जाते,माळ्यांना हाताशी धरून महात्मा फुले यांच्या विचाराची दाहकता कमी केली जाते.तसेच या मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रातल्या दलाल तथाकथित बौद्धांना हाताशी धरून तथागत गौतम बुद्धाच्या विचारसरणीला नष्ट करण्याचे धोरण आणि षडयंत्र सध्या राबवित आहे. याची अनेक उदाहरणे आपण आपल्या गाव,गल्ली,शहरांमध्ये पाहू शकतो.या कामी मग राजकारणामध्ये हाताशी धरलेल्या बौद्धांना पैसा,गाड्या-घोड्या पुरवून महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्म परिषदा,बौद्ध धम्म मिळावे,विविध स्मारक,विहारे,स्तूप,चैत्य,सिंहस्तंभ उभा करण्यासाठी पैसा पुरविणे, त्यांच्या सोबत राहणे,जवळ जाणे ही धोरणे मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

या सर्व बाबीचा जर आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की,ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी सनातनी मनुवादी आणि गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार केला आहे,अशा मनुवादी आणि गांधीवादी ब्राह्मण्यग्रस्त नेत्याच्या आणि पुढाऱ्यांच्या पैशावर जर धम्म चळवळ चालत असेल तर त्या धम्म चळवळीचे आउटफूट कशात मोजावे ? याची चिकित्सा बौद्ध समाजातील सुज्ञ लोकांनी करणे अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा येणारा काळ हा बौद्ध धम्माच्या अस्तित्वासाठी भयान असेल हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे.

फुले,शाहू,आंबेडकर विचारसरणीला मानणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवाद्यांनो आणि 1956 ला बौद्ध झालेल्या तमाम बौद्धांनो, महाराष्ट्राच्या धर्मकारण,समाजकारण आणि राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात अमुलाग्र असे बदल होताना दिसत आहेत.या तीन ही क्षेत्रात होणाऱ्या बदलांकडे जर आज आपण गांभीर्याने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की,महाराष्ट्रामध्ये फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीसह महाराष्ट्रातील बौद्ध धम्म चळवळ सुद्धा मनुवादी आणि गांधीवादी विचारसरणीच्या आपल्याच राजकारण्यांच्या हातून वैदिकांच्या घशात जात आहे की काय असा प्रश्न आणि असे चित्र सध्या दिसत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे बुद्ध विहारे सत्ता आणि शिक्षणाची केंद्र बनली पाहिजे !

परंतु आज जर आपण बहुसंख्यनं असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश विहाराकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी केवळ पर्यटन आणि पर्यटनातून व्यवसाय या नजरेतूनच सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत.महाराष्ट्र आणि देश्यात प्रतीकांची लढाई असली तरी आपण दुसऱ्यांच्या पैश्यावर उभा केलेल्या त्या बौद्ध प्रतीकांवर जर का मनुवादी/गांधीवादी पूर्वाश्रमीच्या महार आणि आत्ताच्या तथाकथित ब्राह्मण्यग्रस्त बौद्धांचा मालकी हक्क असला तरी त्याचा आंबेडकरी तथा बौध्द समाजाला काय उपयोग ? विहारांच्या-मंदिराच्या भिंती बांधण्यासाठी दान करणारी नेते मंडळी,पुढारी,आमदार,खासदार संसद आणि राज्याच्या असेंबली मध्ये एस.सी/एस.टी/ओबीसी च्या शिक्षणावर कधी बोलत नाहीत.हे असे का घडते,याचा विचार आपण करायला पाहिजे.तर अश्या परिस्थितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे बुद्ध विहारे सत्ता आणि शिक्षणाची केंद्र असली पाहिजे ! परंतु ती बनणार तर कशी ?

महाराष्ट्रामध्ये बौद्ध विहाराच्या माध्यमातून पर्यटन आणि व्यवसाय केला जात आहे !

वास्तविक पाहता महाराष्ट्रातील बौद्ध धम्म चळवळीमध्ये मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलेला आपणास दिसून येईल. खरं तर हा हस्तक्षेप राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेला असतो,याकडे आपणही बेगडया बुद्ध प्रेमापोटी डोळे झाक करण्याचा प्रयत्न करत असतो. क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये इ. स 6 व्या आणि 7 व्या शतकात म्हणजे या दोनशे वर्षांमध्ये बौद्ध धम्माच्या अस्तित्वाला संपविण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भिखू,अनुयायी यांच्या हत्या करण्यात आल्या,खरं तर हा दोनशे वर्षांस “रक्तरंजित” काळ बौद्ध धर्म आणि त्याच्या अनुयायी व प्रचारासाठी खूप भयानक होता.तर मग आपण कसे काय हा बौद्धांच्या कत्तलीचा रक्तरंजित कालखंड विसरून जाऊ शकतो ? त्या ही काळामध्ये राजकीय सत्तेचा वापर करून बौद्ध धम्माला नष्ट करण्याच काम करण्यात आलं,तर मग आज ही महात्मा गांधी,गोळवळकर,हेगडेवार आणि सुमती भार्गवाची पिलावळ बौद्ध धर्माला न्याय देतील,अशी अपेक्षा बाळगणे कितपत योग्य आहे ?

अगदी काल-परवाचीच घटना आहे महाराष्ट्रातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित असलेल्या नेते मंडळीवरून आपल्या लक्षात आले पाहिजे की, आपलेच पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी धम्म चळवळीला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत.त्याच बरोबर या बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेला पैसा अर्थात धन हे कुठून आले.याकडे जर आपण गांभीर्याने पाहिले तर काय बौद्ध धर्म “मानवतावादाची” जोपासना भविष्यात करू शकतो का ? या विहारातून कोणत्या प्रकारची क्रांती होईल ? परिस्थिती असेल तर आंबेडकरी समाजाच्या तरुण पिढीवर कोणत्या विचारसरणीचा पगडा निर्माण होऊ शकतो ? कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुद्द म्हणतात की,दुसऱ्यांच्या पैशावरती आपला पक्ष उभा राहू शकत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे मत राजकीय दृष्ट्या जरी असले तरी ते विविध संस्था आणि संघटनांना लागू होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.तर मग इथे तर मनुवादी गांधीवादी राजकारण्यांच्या पैशावर चक्क बुद्ध विहारे निर्माण करून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करण्याच षडयंत्र या ठिकाणी राबविण्यात येत आहे.हे ही आपण समजून घेतले पाहिजे.

महाराष्ट्रातील हेच सरकार एक बाजूला बौद्धांच्या आर्थिक नाड्या छाटण्याचं काम करत आहे.बौद्ध समाजातील मुलं मुली मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रात भरारी घेत असल्यामुळे शिक्षणाची दारे बंद करून शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येत आहे.परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याच भावनेला हात घालून धार्मिक स्तरावर आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं हे षडयंत्र चालू आहे.

कारण आज सिद्धार्थ समुद्राच्या तत्त्वज्ञानाचा कसलाही लवलेश नसलेली राजकारणी माणसं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसा विकून प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बसून कमावलेल्या पैशावर मोठ-मोठी बुद्ध विहारे उभा करत आहेत.भोळ्या भाबड्या बौद्ध समाजाच्या भावणेला हात घालून बुद्धांच्या नावावरती दान धर्म गोळा करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर एक मोठा प्रचंड मोठा असा बिजनेस सुद्धा या विहाराच्या माध्यमातून ते करताना दिसत आहेत.

समता आणि विषमता हा परस्पर विरोधी वैचारिक मत प्रवाह एकत्रित नांदू शकतो का !

कल्याणकारी आणि विज्ञाननिष्ठ बौद्ध धर्म आणि अंधश्रद्धा,कर्मकांड, ईश्वरवाद,आत्मावाद यांना मानणारा सनातनी वैदिक धर्म होय.ह्या दोन्ही धर्माची विचारधारा,ह्या परस्पर विरोधी विचार मतप्रवाह आहेत.त्यामुळे यापैकी कोणतीही एक विचारधारा एकमेकास सहाय्य करू शकत नाही.हे ही आपण लक्षात घ्यावं.काल आणि आजच्या सत्ताधाऱ्यांनी जर बौद्ध धर्माला सहकार्य केलं तर सत्ताधाऱ्यांचा धर्म (वैदिक +हिंदू ) लयाला जाऊ शकतो किंवा बौद्ध धर्म धर्म आणि धर्म यांनी जर सत्ताधाऱ्यांना सहकार्य केले तर बौद्ध धर्माची मूळ वैशिष्ट्ये असलेला विज्ञानवाद,तर्क व चिकित्सा,अनात्मवाद आणि निरीश्वरवाद नष्ट होऊन बौद्ध धर्म सुद्धा नष्ट होऊ शकतो हेही आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे.

वास्तविक पाहता वैदिक प्रणित हिंदू धर्म हा मुळातच कर्मकांड अंधश्रद्धा बौद्धिक फसवणूक आणि जातीभेद व मानवी उच्च-नीचेतेच्या आधारावर उभा असलेला विषमतावादी विचारसरणीचा धर्म आहे.तर दुसऱ्या बाजूला बौद्ध धर्म हा ईश्वर आणि आत्म्याला ना करणारा,विज्ञानवादी आणि मानवतावाद अर्थात समता, स्वातंत्र्य,बंधुत्व व न्याय जोपासणारा,या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन करणारा धर्म अर्थात विचारसरणी आहे.तर मग आपण थोडासा विचार करावा की,अशा परस्पर विरोधी,एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या विचारसरणीचे लोक किंवा पाईक,अनुयायी तथा सत्ताधारी वर्ग एकमेकास साह्य करू शकतो का ? परंतु आज आपण पाहत आहोत की,भारतामध्ये सुमती भार्गव,महात्मा गांधी आणि हेगडेवार,गोळवळकरला मानणारी सत्ताधारी मंडळी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे नाटक करतात,सरकारी बंगल्यावर भिखूनां बोलावून वर्षावास घेतात,तथागत गौतम बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार करण्यासाठी पुढे येतात,या पाठीमागे या विषमतावादी विचारसरणीच्या सत्ताधाऱ्यांचं मनसुबे काय आहेत,याची उलट तपासणी करणं हे सुज्ञ बौद्धांचे काम असून,त्याप्रमाणे बौद्ध समाजाला ही दिशा निर्देश करणे अत्यंत गरजेचे आहे.

महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते कोणत्या विचारसरणीचे आहेत ते पाहावे !

महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बहुतांश सर्वच राजकीय पक्षांचे नेते कोण आहेत ? त्यांची विचारसरणी कोणती आहे ? त्यांचे आदर्श पुरुष कोण आहेत ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर आपण शोधला तर निश्चितपणे आपल्याला असे दिसून येईल की,भारतीय राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या,सत्तेत असलेल्या,विरोधी बाकावर असलेल्या,समाजवादी विचारसरणीचे,मार्क्सवादी विचारसरणीचे,लोहियावादी विचारसरणीचे आणि गांधीवादी व मनुवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या सर्वोच्च स्थानी असणारे नेते हे ब्राह्मण किंवा ब्राह्मण्यग्रस्त सवर्णच असलेले आपणास दिसून येतील.त्यामुळे ब्राह्मण हे ब्राह्मणी व्यवस्था आणि ब्राह्मणी धर्म कधीच खतम होऊ देणार नाहीत.ही बाब आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे.अशा परिस्थितीमध्ये तथागत गौतम बुद्धाच्या विचारसरणीला अर्थात तथा बौद्ध धम्माला मनुवादी/गांधीवादी विचाराचे काम करणारी वैचारिक दलित/दलाल मंडळी यथोचित मानसन्मान आणि निकोपपणे बौद्ध धम्म (धर्म) वाढविण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील का किंवा उपरोक्त विचारसरणीच्या पक्षांकडून सत्ता पदे उपभोगणाऱ्या एस.सी/एस.टी तील किंवा बौद्ध समाजातील नेते पुढारी बौद्ध धम्मला निकोपपणे वाढवू शकतात का ? किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “मी, भारत बौद्धमयी करेन ! या स्वप्नाला पूर्ण करण्यास प्रामाणिपणे सहकार्य करतील का ? याचा विचार आपण सर्वांनी गंभीरपणे करणे गरजेचे आहे.

राजसत्तेतून “धर्मसत्ता” स्थापन करणे आणि धर्म सत्तेतून “राजसत्ता” प्राप्त करणे हा एकमेव अजेंडा असलेल्या ह्या उपरोक्त विचारसरणीची नेते मंडळी बौद्ध धम्माचे मित्र असू शकतात का ? याचा ही विचार आपण करणं अत्यंत गरजेचे आहे.तर मग अशा परिस्थितीमध्ये बौद्ध धर्माचा नायनाट करण्यासाठी जसे ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी फोडा आणि झोडा ही निती वापरली,त्याच प्रमाणे एखादी जन-कल्याणकारी किंवा आपल्या विरोधात असणाऱ्या विचारधारेला नष्ट करता येत नसेल तर त्या विचारसरणीला ऍडॉप्ट करायचे किंवा स्वीकारायचे आणि तिलाच खतम करायचे,ह्याच घातकी शस्त्राचा वापर करत आज ही ब्राह्मण आणि ब्राह्मण्यग्रस्त विचारसरणी व सत्ताधारी मंडळ बौद्ध धम्माचा स्वीकार करत पुन्हा एकदा बौद्ध धर्माला खतम करण्यासाठी सातत्याने हल्ले करत आहेत.

लेखक,विजय अशोक बनसोडे
भारतीय बौद्ध महासभा,धाराशिव (द)
जि.संस्कार उपाध्यक्ष 9881535736
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!