भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये..

नुरखॉं पठाण
जगाच्या पाठीवर २०५ पेक्षा जास्त देश आहेत. पण या सर्व देशांचा आणि त्यांच्या राज्यकारभारांचा अभ्यास जेव्हा तुम्ही-आम्ही करायला सुरुवात करतो, तेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड अभ्यास आणि दूरदृष्टीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं लिखित संविधान ह्या खंडप्राय आणि प्रचंड विविधता असलेल्या आपल्या देशाला लाभलेले आहे. भारतीय राज्यघटनेची महत्वाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, हे आपण सदर पोस्ट मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती पुढीलप्रमाणे...
१) भारतीय राज्यघटना ही लिखित आणि विस्तृत स्वरुपात आहे:-
भारतीय राज्यघटना ही केवळ लिखितच नाही, तर अतिशय विस्तृत स्वरुपात आहे. जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेत केवळ ७ अनुच्छेद आहेत. कॅनडा-१४७, चीन-१३८ तर ऑस्ट्रेलिया-१२८ अनुच्छेद आहेत. ह्या सर्व देशांशी तुलना करता आपल्या राज्यघटनेत सुरवातीला २२ भाग, ३९५ अनुच्छेद आणि ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २५ भाग, ४६१ अनुच्छेद (जानेवारी २०१९ पर्यंत) आणि १२ अनुसूच्या आहेत. आणि म्हणुनच जगातली सर्वात मोठी राज्यघटना म्हणून सन्मान आपल्याच राज्यघटनेला मिळतो.
२) प्रचंड अभ्यास आणि विविध स्रोतांपासून निर्मित :-
भारतीय राज्यघटना ही प्रचंड अभ्यासातून आणि विविध स्रोतांपासून निर्माण करण्यात आलेली आहे. घटनाकारांनी जगातील सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यांतील महत्त्वाच्या तरतुदींचा भारताच्या राज्यघटनेत समावेश केलेला आहे. तसेच घटनाकारांनी भारतीय समाज, जात, धर्म आणि परंपराचा देखील अभ्यास केलेला आहे. राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा प्रभाव दिसून येतो. या कायद्यातील सुमारे २५० च्या आसपास तरतुदी घटनेत घेण्यात आलेल्या आहेत. ह्या भारत सरकार कायदा-१९३५ वर बाबासाहेबांच्या विचारांचा आणि दृष्टिकोनाचा खुप मोठा प्रभाव होता. प्रामुख्याने अमेरिकन राज्यघटनेवरुन मुलभूत हक्क आणि न्यायालयिन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश, आयर्लंडच्या राज्यघटनेवरुन मार्गदर्शन तत्त्वांचा स्विकार करण्यात आला आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या 'भगवान गोतम बुद्धांच्या' शिकवणुकीचा देखील प्रभाव आणि स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या कित्येक सामाजिक चळवळींचाही प्रभाव आपल्या संविधानावर आहे आणि म्हणुनच ते इतके सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आदरास पात्र असे आहे.
३) अंशतः लवचिक आणि अंशतः ताठर:--
काळानुरूप बदलत जाणारी परिस्थिती व गरजेनुसार घटनादुरुस्तीची प्रक्रिया, ही सर्वसामान्य बाबींसाठी पुरेशी लवचिक आणि महत्त्वाच्या बाबींसाठी पुरेशी ताठर आहे. त्याचा योग्य मेळ राज्यघटनेत घालण्यात आलेला आहे. जगाशी तुलना करता अमेरिकन राज्यघटना ही खुप ताठर, तर ब्रिटिश राज्यघटना ही खूप लवचिक आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद-३६८ हे घटनादुरुस्तीचे अनुच्छेद आहे. योग्य ती प्रक्रिया पार पाडून आणि संविधानाच्या मुलभूत गाभ्यात कुठलाही बदल न करण्याचे बंधन पाळून, संविधानात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची तरतूद ह्या अनुच्छेदामध्ये आहे.
हे वैशिष्ट्य खुप महत्वाचे आहे, कारण ब्रिटिशांच्या अगोदर भारतात राजे-रजवाडे, सुलतान, बादशहा, संस्थानिक, वतनदार यांचे राज्य होते. आणि हे सर्व आपापल्या पुरोहितांच्या मान्यतेने राज्यकारभार करत. समाजजीवनावर पुरोहितशाहीतून आलेल्या धर्म संकल्पना आणि परंपराचा प्रभाव होता. त्यामुळे कितीही परिस्थिती वा काळ बदलला, तरी त्यात बदल संभव नव्हता, याचा प्रत्यय आज देखील आपणा सर्वांना येतो. आणि म्हणुनच अनुच्छेद-३६८ हे खुप महत्त्वपूर्ण अनुच्छेद आहे.
क्रमशः...
१) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद-३६८ हे …….चे अनुच्छेद आहे.
२) न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या ……… च्या शिकवणुकीचा प्रभाव आपल्या संविधानावर आहे.
३) आपल्या घटनाकारांनी जगातील सुमारे …… देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यांतील महत्त्वाच्या तरतुदींचा भारताच्या राज्यघटनेत समावेश केलेला आहे.
४) आज भारतीय राज्यघटनेत ….. भाग, ….. अनुच्छेद (जानेवारी २०१९ पर्यंत) आणि ….. अनुसूच्या आहेत.
???????? इच्छुकांनी सदर प्रश्नमंजुषेची उत्तरे 9833001404 (सरस्वती ताई गायकवाड, कल्याण) ह्या नंबर वर पाठवावीत. सदर पोस्ट आपल्या सर्व संपर्कांपर्यंत पोहोचवून संविधान जनजागृतीच्या ह्या जनचळवळीत सहभागी व्हावे, ही विनंती. ????
नुरखॉं पठाण
गोरेगाव रायगड
7276526268
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत