दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

“संग्राम भीमा कोरेगावचा,दैदीप्यमान पराक्रम महारांचा.!

1 जानेवारी 2026 च्या दैनिकात छापुन प्रसिद्ध करण्यासाठी.


“संग्राम भीमा कोरेगावचा,
दैदीप्यमान पराक्रम महारांचा.!

             आज 01 जानेवारी 2026   भीमा कोरेगावच्या संग्रामा चा 208 वा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने  महार सैनिकांच्या पराक्रमाला व बलिदानाला   आदरांजली वाहून, त्यांच्या दैदीप्यमान विजयाचे स्मरण करण्याचा दिवस. त्या आपल्या शूर  पूर्वजांना भावपूर्ण कोटी कोटी प्रणाम.!
        असे काय घडले होते की,  इंग्रजांनी येथे "महार सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विजय स्तंभ" उभारला?, या स्तंभाला 01/01/1927 रोजी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन का मानवंदना दिली?, दरवर्षी देशभरातील लाखो लोक  येथे येऊन का नतमस्तक होतात.? 
        त्यासाठी आपल्याला  महारांच्या इतिहासाची थोडक्यात ओळख करून घेणे  आवश्यक आहे. 
         महार हे मूळचे नागवंशीय

असून, त्यांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा इतिहास आर्य पूर्व काळापासूनचा आहे.भारताला प्राचीन काळात राजकिय क्षेत्रातील कीर्ती व गौरव प्राप्त झाले. त्याचे संपूर्ण श्रेय अनार्य नागांना आहे. अलीकडच्या काळाचा विचार केल्यास 1475 च्या दरम्यान, महारांच्या पराक्रमावर खुश होऊन बिदरचा बादशाह तिसरा मोहम्मद शाह ह्याने 52 हक्कांची सनद दिल्याचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी जातीभेदाला तिलांजली देऊन, समस्त सैनिकांना “मावळा” संबोधून, महारांची मोक्याच्या जागी नेमणूक केली होती. त्यांच्यावर अनेक जबाबदारीची कामे सोपविण्यात आली होती. महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये पुरुषांसाठी ” महारठ्ठ” आणि स्त्रियांना “महारठ्ठी” असा उल्लेख सापडतो. शूर महार सेनापतींमध्ये आगीननाक, कफनाक, रामनाक , सिदनाक ह्यांची नावे आहेत.
औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतर त्याचा मराठ्यांबरोबर दीर्घकाळ लढा चालला. या लढ्यात इतरांबरोबर महार सैनिक देखील होते. यापैकी महार समाजातील सीदनाक सरदाराने महारांची पलटण उभारून मोगलांना झुंज दिली. त्याच्या पराक्रमावर खुश होऊन संभाजी पुत्र शाहूने (पहिले) “कळंबी” हे गाव इनाम दिले. वाई प्रांतातील नागेवाडी या गावची पाटिलकी महार घराण्याकडे असल्याचा उल्लेख आहे.
पेशवाईत मात्र जाती व्यवस्थेला ऊत आला होता. त्यांनी मनुस्मृतीतील वर्ण आधारित जातीय समाज रचनेला प्राधान्य देऊन त्याची कडक अंमलबजावणी केली. परंतु महारांची इमानी वृत्ती, कर्तव्यनिष्ठा, पराक्रम, कणखरपणा लक्षात घेऊन त्यांनी शनिवार वाड्यात महार सैनिकांची “रक्षक ” म्हणुन नेमणूक केली. त्यांतील गणपत नावाचा सुंदर, देखणा आणि धिप्पाड महार होता. त्याच्यावर शनिवार वाड्यातील एका स्त्रीचा जीव जडला. ही गोष्ट पेशव्यांना समजली. मुळातच पेशव्यांच्या राजवटीत जातीद्वेषाने चरम सीमा गाठली होती. त्यात एका महाराचे राजवाड्यातील स्त्रीचे संबंध आल्याच्या घटनेमुळे पेशव्यांचे पित्त खवळले नसते तरच नवल. त्यांच्या रागाचा अतिरेक होऊन, ताबडतोब त्या सैनिकाची धिंड काढून त्याला मृत्यूदंड तर दिलाच, परंतु एवढ्याने पेशव्यांचा राग शांत झाला नाही. ह्या प्रकारामुळे त्यांनी संपूर्ण महारांना वेठिस धरले. त्यांनी आज्ञा काढून महार सैनिकांना तातडीने सेवेतून बडतर्फ केले. त्यांच्यावर अनेक बंधने टाकली. पुण्यातील व पुण्यात येणार्‍या महार लोकांना “ढुंगणावर झाडू व गळ्यात मडके” बांधण्याची सक्ती केली. कारण महारांच्या पायाच्या खुणा पुसल्या जाऊन इतरांना विटाळ होऊ नये, तसेच त्यांच्या थुंकीने जमीन बाटते , म्हणुन थुंकण्यासाठी गळ्यात मडके बांधण्याची सक्ती केली. त्याचबरोबर काळा धागा बांधणे, जोहार मायबाप म्हणणे, अशी अनेक बंधने घालण्यात आली. नंतरच्या काळात ही बंधनं संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. ह्या जाचक अटींमुळे महारांचे जिणे मुश्किल झाले. त्यांनी अनेकदा ह्या जाचक अटी रद्द करून, त्यांना पुन्हा सैन्यात घ्यावे यासाठी विनवण्या केल्या. परंतु पेशवे आपल्या निर्णयावर ठाम होते. त्याच काळात पेशव्यांनी इंग्रजांशी तह केल्यामुळे, त्यांच्या सैनिकी वसाहती पुण्याच्या आसपास उभ्या राहिल्या. इंग्रजांना महारांच्या पूर्व पराक्रमाची गोष्ट कळताच, त्यांनी महारांना इंग्रज लष्करात भरती केले.
ह्या अपमानित जिन्याचा राग महारांच्या मनात सतत खदखदत होता. मुळात वर्ण व्यवस्थेमध्ये जातिभेदाचे चटके इतर शूद्रांसह महार जातीला बसत होते. त्यात ह्या सक्तीची अधिकची भर पडली. समाजात वावरताना ह्या अपमानकारक गोष्टींमुळे महारांकडे लगेच लक्ष्य जावून लोक त्यांच्यापासून दूर जात.
दुसरा बाजीराव पेशवा( 1802 ते 1818 ) मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा. सन 1802 ला इंग्रजांशी पेशव्यांचा वसईचा तह झाल्यानंतर, इंग्रजांचा राज्यकारभारातील वाढलेला हस्तक्षेप, अटी ह्यांना कंटाळून नोव्हेंबर 1817 मध्ये पेशव्यांनी इंग्रजांच्या पुण्यातील खडकी वसाहतीवर हल्ला केला. तिथून युद्धाला सुरुवात झाली.
भीमा कोरेगाव येथिल युद्ध 01/01/1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व दुसरा बाजीराव पेशवा ह्यांच्यामध्ये झाले.त्यावेळी सुमारे 25000 ते 28000 पेशव्यांचे सैन्य व इंग्रजांचे दुसर्‍या बॉम्बे नेटीव्ह इन्फ्रट्री बटालियनचे 500 महार सैनिक, व इतर घोडदळ मिळुन एकुण 834 सैनिकांसह मैदानात उतरले होते. त्यांचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉटनने केले. या लढाईत महार सैनिकांनी दैदीप्यमान पराक्रम गाजविला. त्यांच्या मनातील “ढुंगणावर झाडू आणि गळ्यात मडके”
ह्या पेशव्यांच्या सक्तीचा राग उफाळून आला.त्यांनी पेशव्यांच्या सैन्याशी “करो या मरो” या निर्धाराने प्राणाची बाजी लावून झुंज दिली. त्यांच्या पराक्रमाने इंग्रजांना पराभूत होण्यापासून वाचवलेच, त्याचबरोबर इंग्रजांचा होणारा नरसंहार देखील थोपवण्यात ते यशस्वी झाले. या युद्धानंतर पेशव्यांच्या सत्तेचा अस्त झाला. पेशव्यांच्या व इंग्रजांच्या सैन्याची संख्या पाहता, महार सैनिक किती चिवटपणे, तसेच जिवाची बाजी लावून लढले असतील, ह्याची कल्पना येते. मुळातच तो लढा होता, माणसाने माणसाला दिलेल्या जनावरांपेक्षाही हीन वागणूकीच्या विरोधातील उद्रेक बाहेर पडण्याचा, स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा, लादलेल्या अपमानकारक जोखडातून मुक्त होण्याचा, आणि अन्यायाविरुद्ध मानव मुक्तीचा देखील. नाहीतर एवढ्या प्रचंड पेशव्यांच्या सैन्याला पळता भुई थोडी करण्याचा, आश्चर्यचकित करणारा, ” न भूतो, न भविष्यती” पराक्रम त्यांच्याकडून घडलाच नसता. म्हणुन तर येथे इंग्रजांनी महार सैनिकांच्या स्मृती प्रीत्यर्थ “विजय स्तंभ” उभारला.
वास्तविकता अशी आहे की, हे असे श्रद्धास्थान आहे की, इथून आपल्या पूर्वजांच्या पूर्व पराक्रमाची, स्वाभिमानाची, निष्ठेची, अन्याया विरुद्ध चवताळून उठण्याची, प्रेरणा घेऊन भविष्यातील लढ्यासाठी ऊर्जा घेऊन जायचे असते. म्हणुन तर दरवर्षी लाखोंच्या संख्येने भिमानुयायी नतमस्तक होऊन, पुढील लढ्यासाठी ताजेतवाने होऊन
ऊर्जा घेऊन जातात.

जयभीम.

अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…01/01/2026.
1) संदर्भ… नागवंशीयांनो तुमची अस्मिता गेली कुठे?
लेखक..श्री. श्रीनिवास भालेराव.
2) भीमा कोरेगावचे युद्ध.
संकलक..युगसाक्षी प्रकाशन, नागपूर.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!