मनुस्मृतीचे दहन-अशोक सवाई

(ऐतिहासि)
२५ डिसेंबर हा बहुजनांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन ऐतिहासिक घटना घडवून आणल्या. त्यापैकी पहिली घटना दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. त्यांनी रायगडच्या पायथ्याशी सार्वजनिकरीत्या ब्राह्मणांच्या वैदिक धर्माची अत्यंत लाडकी, प्यारी व इथल्या बहुजनांसाठी अत्यंत जुलमी असलेल्या ज्या भयंकर कायद्याची आज आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशा मनुस्मृतीचे ज्या काळात ज्या दिवशी डॉ बाबासाहेबांनी आंबेडकरांनी दहन केले. त्या दिवसी बाबासाहेबांचे काळीज खरोखरच एखाद्या शक्तिशाली सिंहाचे असावे असेच वाटते. आणि दुसरी घटना संत तुकोबा रायाच्या पंचक्रोशीतील धम्मभूमी देहूरोड, पुणे. येथे दि. २५ डिसेंबर १९५४ रोजी बाबासाहेबांनी ब्रम्ह देश (आताचे म्यानमार) येथून आणलेली तथागत गौतम बुद्धांच्या शुभ्र मुर्तीची त्यांच्याच हस्ते प्रतिष्ठापना झाली. या घटनेचे फार मोठे महत्त्व आहे. बाबांनी या दिवसी तथागत बुद्धांच्या मुर्तीची केवळ प्रतिष्ठापणाच केली नाही तर एका सांकेतिक अर्थाने जुलमी व्यवस्थेचा अंत करून बुद्धांची समता व्यवस्था प्रस्थापित केली. पहिल्या घटनेला यंदा २५ डिसेंबरला ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. तर दुसऱ्या घटनेला ७१ वर्षे. पहिल्या घटनेचे शताब्दी वर्ष अजून दोन वर्षांनी येईल तर दुसऱ्या घटनेचे अमृत महोत्सव वर्ष चार वर्षांनी साजरे होईल. दुसऱ्या घटनेचे अमृत महोत्सव वर्ष बहुजन मोठ्या उत्साहात साजरे करतील यात शंका नाही.
रायगड हा गड छत्रपती शिवरायांच्या राजकारभाराची राजधानी होती. तेथूनच ते रयतेच्या सुखी समाधानीसाठी राजकारभार चालवत असत. याच मनुस्मृतीने छ. राजेंना शुद्र ठरवून त्यांच्या राज्यभिषेकाला त्यावेळच्या कर्मठ धर्ममार्तंडांनी प्रखर विरोध करून महाराजांचा घोर अपमान केला होता. त्याच रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून महाराजांच्या अपमानाचा पूरेपूर बदला घेतला. तसेच आपले गुरू महात्मा जोतिबा फुले यांची मनुस्मृती जाळण्याची इच्छा देखील पूर्ण केली. जर मनुस्मृती दहनाच्या वेळी राजाधिराज राजर्षी शाहू महाराज जिवंत असते तर त्यांची छाती अभिमानाने फुलून आली असती. कारण करवीर संस्थानात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीला त्यांनी राजाश्रय दिला होता. आणि महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरू होते. पण दुर्दैवाने ते त्याआधीच म्हणजे दि. ६ मे १९२२ रोजी आपल्यातून निघून गेले. बाबासाहेबांनी जेव्हा मनुस्मृतीचे दहन केले तेव्हा वैदिक धर्ममार्तंड व कडवट ब्राह्मणांमध्ये मोठा हाहाकार उडाला होता. काही ब्राह्मण त्या विरोधात कोर्टातही जाणार होते. पण काही सूज्ञ (त्यांंच्या हितासाठी सूज्ञ) ब्राह्मणांनी त्यांना त्यापासून रोखले व सांगितले की डॉ. आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायदेतज्ज्ञ आहेत. तुम्ही जर कोर्टात गेले तर ते आपले वर्चस्ववादी वस्त्र भर कोर्टात खाली उतरवून कोर्टात आपल्या मनुस्मृतीच्या कायद्यांची चिरफाड करून मनुस्मृतीलाच विवस्त्र करतील. व देशात आपलीच निंदा नालस्ती होईल. आणि तिकडे कोर्ट किंवा सरकार मनुस्मृतीवर कायमची बंदी घालतील. त्यामुळे ब्राह्मणांजवळ हात चोळत बसण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. ब्राह्मण मंडळी इंग्रज सरकारल खूप घाबरत होती. म्हणून त्यांची प्यारी असलेली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाळल्यावर सुद्धा कडवट ब्राह्मण कोर्टात गेले नाहीत.
कडवट ब्राह्मण इंग्रज सरकारला का घाबरत होते? याचे उत्तर इतिहासात सापडते. ‘आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने’ या आपल्या पुस्तकात लेखक ओहोळ डी. आर. पानं. नं. २३ वर लिहितात ‘इ. स. १७७४ ला नंदकुमार देव या युरेशियन ब्राह्मणांस इंग्रजांनी ‘कंपनी ॲक्ट’ म्हणजे इंग्रजी कायद्यानुसार फासी दिली. भारताच्या इतिहासात युरेशियन ब्राह्मणाला फासी देण्याची ही पहिलीच घटना. त्यामुळे सर्व ब्राह्मवृंद हादरला. नंदकुमार देव या युरेशियन ब्राह्मणाने कोणाची तरी हत्या केली होती. म्हणून इंग्रजांनी त्यांच्या कायद्यानुसार त्याला फासी दिली’. सावरकर इंग्रजांच्या कैदेत असताना नंदकुमार देव त्यांच्या डोळ्यासमोर येत असवा म्हणून त्यांनी सहा सहा वेळा इंग्रज सरकारची माफी मागून आपली सुटका करून घेतली. कदाचित सावरकरांच्या माफीनाम्या मागे नंदकुमार देवचे कारण असावे. आणि आर एस एस ने सुद्धा इंग्रज सरकार विरोधात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कधी भाग घेतला नाही त्याचेही नंदकुमार देव हेच कारण असावे. सावरकर सोडून इतर कोणत्याही कैद्यांनी इंग्रज सरकारची माफी मागितली नव्हती. असे इतिहास सांगतो.
आपल्या देशात महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणली तर त्यांचेच शिष्य असलेले डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती घडवली. हे सर्व घडले ते इंग्रज सरकारच्या काळात. म्हणून महात्मा फुले म्हणत असत शुद्रांनो जोपर्यंत इंग्रज या देशात आहेत तोपर्यंत आपले भले करून घ्या. इंग्रज त्यांची सत्ता टिकवण्यासाठी व त्या सत्ते विरोधात जाणाऱ्यांसाठी कठोर असले तरी युरेशियन ब्राह्मणांसारखे अमानुष निश्चितच नव्हते. उलट त्यांनी शुद्रांवर ब्राह्मणांनी लादलेल्या अमानुष प्रथा कायदाने बंद केल्या. उदा. सती प्रथा, शुद्रांचे पहिले मूल नदीला वाहणे किंवा अर्पण करणे. अशा अनेक प्रथा इंग्रज सरकारने कायद्याने बंद केल्या. अशा प्रकारचे शुद्रांचा अमानुष छळ करणारे सर्व कायदे मनुने त्याच्या स्मृतीत लिहून ठेवले होते. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृतीच जाळून टाकून एक प्रकारे त्यांनी मनुवादी ब्राह्मणांना इशारा देवून ठेवला होता की, यापुढे मनुचे कायदे चालणार नाहीत. आणि पुढे त्यांनी घटना लिहून ब्राह्मणांना पवित्र असणाऱ्या मनुस्मृती कायद्यांचा अंत केला. ज्या महारांच्या गळ्यात ब्राह्मणांनी गाडगे अडकवले व कमरेला झाडू लटकवला त्याच एका महाराच्या पोराने २५ डिसेंबर १९२७ रोजी कडवट ब्राह्मणांना पवित्र असलेली मनुस्मृती जाळली. व पुढे म्हणजे दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटना लिहून देशाला अर्पण केली. त्याच घटनेच्या अधिन राहून ब्राह्मणांना जगावे लागते. याच गोष्टींची ब्राह्मणांना आजपर्यंत मोठी सल व दुखणे आहे. म्हणून मनुवादी बाबासाहेबांचा राग राग करतात. दिल्लीत जंतरमंतर वर त्यांचे संविधान जाळतात. त्यांच्या मुर्त्यांची नासधूस करतात. त्याचे फोटो त्यांची चित्रे जाळतात. सोशल मीडियावर व उघड उघड त्यांना व त्यांच्या संविधानाला ट्रोल करतात. टिका करतात, संविधान बदलण्याची भाषा करतात. ते हे सर्व जरी करत असले तरी त्यांना दोन गोष्ट करता येणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांना जाळता येणार नाहीत व इतिहासातून मिटवताही येणार नाहीत. जे बहुजनांच्या मनात खोलवर शिरले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनुवाद्यांनी कितीही जीवाचा आटापिटा केला तरी त्यांना संविधान बदलता येणार नाही. कारण संविधान बाबांच्या श्रमाच्या घामातून निघालेला सुंदर आविष्कार आहे. ते बदलतील इतके संविधान लेचेपेपे सुद्धा नाही. समजा त्यांनी ते जबरदस्तीने बदललेच तर बहुजनांचे हात मोकळे होतील. आणि त्यांचे हात मोकळे झाल्यावर मनुवाद्यांनी आपल्या स्वेच्छेने १ जानेवारी १८१८ या दिवसला पुन्हा आवतन दिल्यासारखे होईल. याची त्यांनाही चांगलीच कल्पना आहे. दर वर्षी २५ डिसेंबरला मनुस्मृती दहनाचा दिवस येतो. त्या दिवसी बहजनांना बाबांनी मनुस्मृती जाळण्याच्या आठवणींना उजाळा देऊन जातो. तर दुसरीकडे वैदिक कर्मठ धर्ममार्तंडांना मनुस्मृती जाळल्याचा भास होऊन ते आजही दु खी होत असतील. कुणास ठाऊक त्या दिवशी ते आपल्या घरात शोक दिवसही पाळत असावेत. अशा रितीने बाबासाहेबांनी मनुच्या अमानुष कायद्यापासून बहुजनांना मुक्ती देऊन इतिहासात त्यांनी २५ डिसेंबर हा दिवस सोनेरी पानावर लिहून ठेवला आहे. मनुस्मृतीच्या काळात मनुस्मृतीच्याय नियमाप्रमाणे विधवा एकदाच सती जात होत्या. पण आजच्या आधुनिक काळात मनुस्मृती २५ डिसेंबरला दरवर्षी सती जाते. हा एक प्रकारे काळाने मनुस्मृतीवर उगवलेला सूड होय असेच म्हणावे लागेल.
संदर्भ: आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने. लेखक ओहोळ डी. आर.
– अशोक सवाई
पणे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



