मानव मुक्ती लढ्यातील आंबेडकरी तत्वमूल्यांच जाज्वल्य प्रतीक ‘तूच दिले मला हे जगणं’ – विद्रोही कवी साहेबराव मोरे

बी.अनिल उर्फ अनिल भालेराव हे परिवर्तन चळवळीतून आलेल्या विचारशृंखलेतील नावारूपाला आलेले चतुरस्त्र साहित्यिक, त्यांच्या नावावर २१ साहित्य कृतीची नोंद आहे.त्यांचे साहित्य माणसाच्या वेदनेचा हुंकार मांडणारे असून दखलपात्र आहे.त्यांचा अलीकडे प्रकाशित झालेला, ‘तूच दिले मला हे जगणं’हा काव्यसंग्रह वाचनात आला.
मुखपृष्ठावर अजींठा लेणीचं सौंदर्य,तथागतांच्या सम्यकदृष्टीचा वारसा सांगणारे देखणे शिल्प , माणुस धर्माची क्रांतीबीज पेरुन सर्वहारा शोषित जनतेला आश्वासित करणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा चित्रित केलेली आहे.
आज जे काय जगणं आहे, ते केवळ अन् केवळ पूर्वसूरींनी केलेल्या विवेकबुद्धीच्या विद्रोहात्मक लढ्यामुळे आहे. हा लढा समता व न्यायाच्या ढाच्यावर उभा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच या लढ्याचे उद्गाते व जनकही आहेत.प्रज्ञासुर्याच्या प्रज्ञाज्वालेच्या शलाका परिवर्तनवादी साहित्यिकांच्या रुपाने समतेचे प्रकाशपर्व प्रज्ज्वलित करीत आहेत.
“व्यवस्थेविरुद्धच्या क्रोधाला आणि द्वेषाला दूर करून
तूच सर्व जणांना दिलेस मूलभूत जगण्याचे हक्क आणि अधिकार
आणि पेरून गेलास बुद्ध हिमाचल ते महासागर “
हा व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश व माणूसपण बहाल करणारा धम्म देणारा बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा उपकार शीर्षक कवितेत व्यक्त केला आहे. जात्यांध धर्माच्या दलालांनी धर्मग्रंथात पेरलेली जात फोफावण्यासाठी धार्मिकतेचा स्तोम माजवून खतपाणी घातले. सत्तापिपासू राजसत्तेच्या ठेकेदारांनी सत्ता राखण्यासाठी धार्मिक सण उत्सव, व्रतवैकल्यांच्या उदात्तीकरणासाठी कोटी रुपये खर्च करून देश जखडून ठेवला. स्वच्छंदी (मोकाट)पणे लोकशाही मूल्यांच्या छाताडावर टिच्चून धर्माचा हत्यार म्हणून वापर केला जातोय. म्हणूनच
जात न बदलणारा अमानवी, कर्मकांडी, बुरसटलेल्या विचारांचे आगार असणारा माणूस गुलाम बनविणारी अधर्म त्यागला व बुद्ध धम्म दिक्षा घेतली.
हा “नवजागर” माणूसपणाचा निर्मीती करणारा आहे. युद्धाला गाडून बंधुभाव,एकात्मतेची कास धरणारा आहे,
“तलवारीचे दिवस आता संपत चाललेत
लेखण्या आता सरसावल्या आहेत
जागर होतोय मानवतेचा
शांती,सत्य, अहिंसेच्या नव्या जगासाठी”
बी.अनिल यांची कविता स्वातंत्र्योत्तर भारतातील बहिष्कृत जनतेच्या उन्नयनासाठी समतासूर्याचा प्रकाश पेरती झाली आहे.
स्री शोषण व दास्याचा जाहिरनामा असणाऱ्या अधर्मात स्रीयांचे स्थान गुलामापेक्षाही नीच दर्जाचे होते. गौतम बुद्धांनी २५०० वर्षो आधीच स्रीसमानतेची शिकवण आचरणात आणली व महिलांना धम्मात मानाचे पान दिले.मात्र आजही महिला कर्मकांड, बुरसटलेल्या चाली रिवाज व पुरुष प्रधान संस्कृतीच्या जंजाळात स्वतः झोकून देत धन्य धन्य होतात.ही वास्तविकता कवी “बाय तूझा धर्म कोणता?” हा उद्विग्न प्रश्न निर्माण करून स्त्रीमुक्ती हक्काची जाणीव करून देतात,
“खरं तर तू पुरुषाच्या धर्माची होत जाते
जरी तूला नसतो स्वतःचा धर्म
तुझ्या रक्तस्रावालाही न सतो धर्म
अंतर्भावालाही लावलेला नसतो धर्म
भाकड सहाव्या इंद्रीयात डोकावतेस तू”?
Bही स्री गुलामीची शृंखला बाबासाहेबांनी तोडली.
पाण्यासाठी सत्याग्रह ही जगातील ऐतिहासिक व अचंबित करणारी घटना होती. आज चवदार तळ्याचे पाणी थंड झाले तरीही अधूनमधून पाण्यावर हक्क सांगणारी मनुवादी सडक्या डोक्याची गिधाडे अत्याचार करतात, लचके तोडतात.
“किती दिवस भीत रहायचं बाजारबुणग्यांना आणि शोषकांना?
फोडावेच लागतील खडक आणि ओंजळीने पाणी प्यावे लागेन”
हा सडेतोड इशारा कवीने दिला आहे .स्वातंत्र्योत्तर दलित, शोषित, बहिष्कृत गावकुसाबाहेरील सर्वहारा समाजातील प्रत्येक घटकाची उन्नती झाली कां?
अधिकार व हक्कांसाठी नव्याने हा लढा द्यावा लागेल ही मुजोर सत्ता उलथवून टाकल्याशिवाय स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळणार नाहीत.
सांगा आमचा धनाचा साठा कुठे आहे हो? असा सवाल टाटा, बाटा , बिर्ला सारख्या मूठभर धार्जिण्या तत्कालीन सरकारला लोककवी वामनदादा कर्डक यांनी विचारला होता.तोच सवाल आज कवी बी.अनिल भांडवलशाही अर्थव्यवस्था पोसणाऱ्या सत्तेला विचारतात.अनेक भ्रष्टाचारी नेते, कर्ज बुडवे, कोटींची भ्रष्टाचारी उड्डाण करणारी भ्रष्ट लाचखोर शासनव्यवस्थेच्या पाठराखण करणाऱ्यांना हा आमचा प्रश्न,
“सांगा आमच्या स्वातंत्र्याचे काय झाले?
हा देश आमचाही आहे
इथल्या प्रत्येक कणाकणावर माणूस म्हणून आमचाही हक्क आहे
हे सरकार
तू जागतिक सावकाराच्या दावणीला बांधून
‘स्वदेशी ‘ चा उद्घोष करीत धूळफेक केली आहेस
भांडवलदारांना स्वातंत्र्य देत
आमचं स्वातंत्र्य लालफितीत गुंडाळत आहे
सांग, आमच्या स्वातंत्र्याचे काय झाले?”
अंबानी, अदानी मित्तल यांच्या घशात देणगी, कर्ज रूपाने देशाची गंगाजळी जात आहे. दुसरीकडे मल्या , ललित मोदींसारखे कर्जबुडवे भगोडे विदेशात अय्याशीत मस्त जगत आहेत.
दीनदलित, आदिवासी, स्रीगुलामी, शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, कर्मचारी, मध्यमवर्गीयांच शोषण करणारी व्यवस्थाच “या वांझ सत्तेला उलथवून टाकले पाहिजे” कवितेतून नेस्तनाबूत करण्याचा उद्धघोष कवी करतो आहे,
“आता उलथावीच लागले ही वांझ सत्ता
ज्योतीबांचा शेतकऱ्यांना आसूड घेऊन
बिरसाचा उलगुलान डोक्यात घेऊन
दंगलीत निडरपणे उभा राहणारा गांधी घेऊन
आणि
आंबेडकरांचे संविधान घेऊन “
डॉ आंबेडकरांनी सर्वहारा समाजोन्नतीसाठी स्वातंत्र्यासह शिक्षण, नोकरी, राजकीय समानतेचे अधिकार घटनेत बहाल केलेत, सामाजिक मूल्य परिवर्तनाचा सत्यशोधन बुद्ध धम्म सोपान दिला.याच अनुषंगाने “बोधी” कवितेचा उल्लेख अटळ ठरतो.
कवितेतील शब्द व अर्थ सौंदर्य तथागतांच्या ‘बोधी’ रूपाच चित्र डोळ्यासमोर हुबेहुब उभे करते.आशयसौदर्यातील वाच्यार्थ स्तंभित करतो
“वाढत जाते सूर्याच तळपणं
उन्हात तूझ्या स्तनाचे दृश्य लेणं
बोधी भरून येतो कणाकणात
ओल्या देठातून “
बी अनिल यांच्या कवितेत शब्दांची अचूक व चपखल निवड असते,शब्दोत्कट भावनांचा सहजोद्रेक असतो,
“माणुसकीचा जाहीर नामा घ्या हातात
विश्वकल्याण आणि बंधुता हृदयात कोरून
समोरचा कदाचित हिंसक होईल
म्हणून त्यांच्यातील करूणेला हाक द्या”
आशयसौदर्य व भाषिक सौंदर्य हे गुणविशेष मनात भरते.मूळात माणुसकीचा जाहीरनामा दरेकाच्या मनात रूजविणारा संदेश देणारी असल्याने दखलपात्र आहे.
‘मानवता,’समाजसत्ता, असावी माणसं माणसासारखी, उलट्या काळजाची माणसे इथे,माणूसपणाचा , सत्यशोधक ,भय वाढत चाललेय इथे,दरवेशी असे आयुष्य,आरक्षणापूर्वी जात होती, नवजागर, आता निवांत बसू कसा? आदी कविता मानवतावादी मूल्यं रूजविणाऱ्या, चिंतनशीलतेची साक्ष देतात.मानवतेचा अखंड एल्गार पुकारणाऱ्या सर्वच कवितांचा समावेश करणे शक्य नाही, त्यासाठी हा काव्यसंग्रह एकदा वाचायलाच हवा.माणसाला गुलाम बनविणारी सर्वकालिक प्रश्नांची उकल शोधणारी ही कविता आहे.
प्रस्तुत काव्यसंग्रहचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तावना, पाठराखण या अलिखीत संकल्पनेला फाटा देऊन कवीने जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविषयीचाअभिप्राय अभ्यासक व वाचकांनी आवर्जून नोंदवावा .
जीवनातील अस्तित्वलढ्याचे वास्तव मलपृष्ठावर मुद्दामहून मुद्रीत केले आहे. शेवटी संविधान निर्माण करून नव्या समाजाची सम्यक जडणघडण करणाऱ्या समाज नायकाला “बा भीमा”कवितेतून बी. अनिल यांनी यथोचित, यथोमती मानवंदना दिली आहे,
“पण कोंबड आवरलं नाही
किंवा डांबून ठेवलं डाल्याखाली
तरी सूर्य थोडाच थांबतो उगवायचा
द्वंद्वात्मक पातळीनूसार दिवस उगवतोच
तसंच झाल बा भीमा
तू आकाश व्यापून टाकलंस
तूझ्या शब्दांनी
इतकं की
Dead Ambedkar is dangerous than Ambedkar alive
बंधुप्रिय बी. अनिल यांना परीवर्तन चळवळीच्या लेखन कार्यास शुभेच्छा!!!
समीक्षण: विद्रोही कवी साहेबराव मोरे
संवाद:९४०४०४८६०१
काव्यसंग्रह :तूच दिले मला हे जगणं
कवी:बी . अनिल
प्रकाशन: आदिती प्रकाशन, बदलापूर
किंमत:२००₹
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
धन्यवाद सर, आपण समीक्षा प्रसिद्ध करून एक प्रकारे सामाजिक चळवळीस हातभार लावत आहात.