मुख्यपानसंपादकीय

“जागृत भारत विशेष” विजय अशोक बनसोडे यांचा डोळ्यात अंजन घालणारा सणसणीत लेख….वाचा..

“लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागते.” मनोजराव,ही भाषा तुमचीच आहे की,काळ्या टोपी खालच्या काळ्या सडक्या मेंदूची !

भावा, सामाजिक मागासले पण आणि मागासलेपणाचा सामाजिक दर्जा नुसता सांगून उपयोग नाही, तर तो सिद्ध ही करावा लागतो! आमच्या पोरांना आरक्षण नसल्यामुळे “लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागते,” असे बालिश विधान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात केलं केलं. म्हणजे तुमचा पोटसूळ नेमका हा आहे का ? तुम्हाला तुमच्या पोरा बाळाचा खरंच विकास करायचा असेल तर, प्रथमता त्यांना मनुस्मृतीच्या जोखडातून बाहेर काढा,त्यासाठी मनोजराव, तुम्ही मनुस्मृती नाकारण्याचा कार्यक्रम हाती घ्या…आमचा उद्धार काय केवळ “आरक्षणामुळे” नाही झाला. तर आम्ही “मनुस्मृती” जाळली, ती सामूहिकपणे आमच्या जीवनातून नाकारली आनं आमचा उद्धार झाला ! आपण खूपच हिमतीच्या बाता मारताना मग बघा जमतय का हे पण करायला.

आज सकल मराठा समाज मग तो 96 कुळी असो की,92 कुळी आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला समर्थन करणारा असो किंवा विरोध करणार असो, “आरक्षणा” साठी जिवाचा आटापिटा करित आहे. पण भूतकाळात आपल्याच गाव आणि शहरात राहणाऱ्या मागासवर्गीय कमकुवत घटकांवर केलेल्या अत्याचाराच्या खुणा पुसण्यात आज ही असमर्थ आहोत. इतकच नाही तर आज ही आरक्षण मागणाऱ्या जरांगे पाटलांना वाटते की,आम्हाला आरक्षण नसल्यामुळे “लायकी” नसणाऱ्या माणसाच्या हाताखाली काम करावे लागते. नेमकं ही “लायकी” नसणारी माणसं कोण ? याचं ही उत्तर जारंगे पाटलांनी दिलं पाहिजे. वास्तविक पाहता आपण खूप लबाड आहात. मागणी तर आरक्षणाची करता परंतु आरक्षणाची बीज पेरणाऱ्या आणि त्याचा वटवृक्ष करणाऱ्या महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि आचारांना नाकारण्याचं काम करता. खरं पाहता महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना शरण गेल्याशिवाय “आरक्षण” नाही, आणि आरक्षणाचा लाभ ही नाही. हे नीटपणे लक्ष्यात घेतले पाहिजे.

बारा बलूतेदारांचा गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य अस्पृश्यांच्या रक्तावर पोसलेला आहे. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यातून तुम्हीच जपले. *पाटलांनों तुमच्या वाड्याच्या देवळीत आज ही ठेवलेला बिनकानाचा कप आनं तडा गेलेली बशी,आणि नोकर, सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास आज ही तुमच्या असुरी वागण्याची साक्ष देतात नां * तुमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठ-मोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्या महारवाडा आणि मांगवाड्यातील माणूस (गुलाम म्हणून) जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक मागासवर्गीयांचे पाय वाकडे झाले. तुमच्या गढी माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारी लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्येक खांद्यांना मरणांतिक कळा लागल्या असतील, तुम्ही त्याच्या बदल्यात शेरभर ज्वारी दिली तर अनंत उपकार केल्याच्या तोऱ्यात अरेरावी करत होता ना. तुम्हाला माणूस म्हणून कधीच कशी काय अस्पृश्यांची दया आली नाही ?

आजपर्यंत शाबूत असलेल्या तुमच्या डौलदार माड्या आणि तिच्यावरून दिसणारे कुडाचे आनं छपराचे महार/मांग वाडे मिशीवर तवा मरत तुम्हीच पाहिलेत ना. आता महारवाड्यांचे बौद्धवाडे आनं साठे नगर झाले, त्यांची कुडाची घरं जाऊन पक्की घरं आली. तवा वेगळा असलेला बौद्धवाडा आत्ता गावात मिसळून गेलेला दिसतो, ते पाहिले की आज ही तुमच्या पोटात कळा येतात. भीमरायाच्या नावाची कमान तुम्हाला आवडत नाही. आमचे शिकणारे पोरं पोरी तुमच्या डोळ्यात आज ही का खूपतात ?

मोठ-मोठे झाडं आणि दगड उकरून याच महारवाड्यातल्या माणसांनी तुमचे शेकडो एकरांचे मळे तळहातासारखे सपाट व सुपीक तयार करून दिले. मोठ-मोठ्या विहिरी खंदून दिल्या, त्याबदल्यात आम्ही त्यांना सडलेल्या बुरशी लागलेल्या डाळींचा चुरा,अन कळणा कोंडा खायला देत होता, हिच तुमची माणुसकी होती का ? . पाच-पन्नास जनावरांच्या,म्हशींच्या शेणाच्या पाट्या वाहून त्यांच्या टाळूचे केस गेले. वासरांनी पायावर पाय देऊन अनेकदा रक्ताचे थर शेणावर आले, नखं उचकटली, त्याबदल्यात फक्त तांब्याभर ताक देऊन तुम्ही पाटीलकी दाखवत त्यांची बोळवण केली.ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं की डोळ्यात रक्तच उतरते.परंतु काय करणार आमच्या महापुरुषाची शिकवण “मानवतावादी” आहे.त्यामुळे सगळं सहन करून ही अगदी हसत मुखाने सगळ्यांना मदतीचा हात आमचाच आहे.

परंतु आज ही तुम्ही काय करता,जुनाट बुरसटलेल्या पाटीलकीच्या अहंकारात तुमच्या विहिरीवर चार दोन नादान पोरं पोहायला आली तर त्यांना नागडं करून जीव जाई पर्यंत मारता. मंदिराच्या पायरीवर आलं तर लहान मुलाला सुद्धा कुत्र्यासारखं मारतात, आमच्या लोकांची घरे पेटवून देताआया बहिणीची अब्रू भर दिवसा लुटता,गावात वस्तीवर बहिष्कार टाकून आमच्या पोटा-पाण्यावर राख फिरवता,पोटाची खळगी भरण्यासाठी तुमच्या बांधावर आमच्या महिला-मुली आल्या तर त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघता. काय आज ही तुमच्यातला अहंकार संपला आहे का ? याचे ही उत्तर जरंगे पाटलांनी द्यायला पाहिजे.एवढं सगळं मागासवर्गीयांनी सहन केलं.आज तुम्ही ही आरक्षण मागतच आहात ? पण आरक्षण पोरांच्या विकासासाठी मागत आहात की ? लायकी असताना ही नालायक लोकांच्या हाताखाली काम करावे लागते म्हणून मागत आहात ? नेमकं तुमचा पोटसुळ आहे तरी काय ? आणि हा तुमच्या नजरेत नेमकं नालायक लोक आहेत तरी कोण ? हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ अस्पृश्यांनाच नाही तर तुमच्यासारख्या लोकशाही आणि संविधान विरोधी सवर्णांना सुद्धा माणसात आणलं. जरा इतिहासाच्या पानात डोकावून पहा काय तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार होता का ? सर्वप्रथम तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार दिला कोणी ? छत्रपती शिवराय,छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक केला नाही. यावरून तर तुम्हाला समजायला पाहिजे की,व्यवस्था तुम्हाला सुद्धा शूद्रच समजते. तरी ही तुम्ही धर्माच्या ठेकेदाराच्या हातचे शस्त्र होऊन देश आणि राज्यातील मागासवर्गीयांचा छळ केला आहे आणि आज ही करत आहात. मूलभूत अधिकारासह अनेक महत्त्वाच्या तरतुदी भारतीय संविधानातून देशातील प्रत्येक नागरिकांसाठी केल्या आहेत.याची थोडी तरी जाणीव असू द्या. आज तुमच्या पोराबाळांचा विकास होत नाही म्हणून आरक्षण मागत आहात चांगली गोष्ट आहे. परंतु आरक्षण मागत असताना “खाजगीकरणाच्या” नावाखाली आरक्षण खतम करणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करत आहात. यातून मात्र आपला आरक्षण मागणीचा उद्देश “स्वच्छ” असल्याचे दिसत नाही. आपण खाजगीकरण करणाऱ्या शासनाचा निषेध का करत नाहीत ? याचं ही उत्तर सर्वसामान्य जनतेला आनं गोर-गरीब मराठ्यांना दिलेच पाहिजे.

सामाजिक दर्जाच्या अहंकाराखाली तुमच्यात हजारो वर्षाच्या कर्मठ सनातनी विचाराची ठासून भरलेली विकृत शिकवण आपल्या मतातून व्यक्त होत आहे. तुमच्या त्या विकृतीतून महारा/मांग लय माजले आहेत त्यांना बघावं लागतं असं म्हणून कित्येक महारवाडे आनं मांगवाडे आपण उभे पेटवून दिल्याची हजारो उदाहरणे आहेत. बाबासाहेबांच्या मिरवणुकीला विरोध करणे, बाबासाहेबांच्या प्रतिमेवर दगडफेक करणे, कुणी जयभीम म्हटलं तर त्याला गावच्या येशीत मारहाण करणे, महार-मांग वाड्यावर बहिष्कार टाकणे. अशा अनेक दुःखदायक घटना सहन करून ही केवळ बुद्ध/भीमाची “मानवतावादी” शिकवण घेतले असल्यामुळे कालचा प्रत्येक शोषित,पिडीत तुमच्या आंदोलनाचं भर-भरून स्वागत करतो आहे आणि तुम्ही मात्र जातीच्या, सवर्णतेच्या अहंकारातून “नालायक लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं” असं नालायक व बालिशपणे सांगता आहात. आपल्या अंगी असलेल्या या नालायकीचे दहन आपण करणार की नाहीत ? हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे.

या पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये SC/ST समाज कधीच सुखाने जीवन जगू शकला नाही, हे विदारक सत्य आहे. राज्यातील हेच बांधव आपल्या नैसर्गिक न्याय हक्क व अधिकारासाठी पोटावर बिबे ठेवून आंदोलन करत असतो, यांच्या सोबत सवर्ण समाजासह सरकार कसे वागते,याची जाणीव आपणाला असणे गरजेचे आहे.नागपुरात भर दिवसा आदिवासीना गोळ्या घातल्या, त्याचे कोणालाच काही वाटले नाही.तसेच बौध्द समाज मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात असताना कोणी विरोध केला ? सरकारी अत्याचारा सोबतच गाव कुसात कोणी आमच्यावर अन्याय अत्याचार केला ? हे सर्व विष विसरून आम्हीच नाहीतर आरक्षणाच्या प्रत्येक लाभार्थी जाती समूहाने तुम्हांला समर्थनं दिले आणि देत आहेत. कारण आमची नाळ जातीशी जुडलेली नसून परिवर्तनवादी विचारांशी जुडलेली आहे. याच पुरोगामी महाराष्ट्रातील मा. म देशमुख,आ. ह साळुंखे, प्रवीण गायकवाड,मराठा सेवा संघ यांनी प्रबोधनातुनं मराठा-बौद्ध हि दरी दूर करण्याचा मोठा प्रयत्न केला. बहुजन समाज एका माळेत ओवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांचे स्वागतआणि समर्थन केले. पण मनोज जा्रांगे तुम्ही एका फटक्यात हि इचारांची वीण उसवून टाकली. त्यामुळं काळातील मराठा बहुजन समाजातील दूरी कमी करण्यासाठी आपणच आपल्या विषारी वक्तव्या पासून माघार घेतली पाहिजे. कारण लायक आणि नालायक हा विषय तुम्हीच मीडियाला दिला आहे.

ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादाचे “शस्त्र” होऊन आज ही जातीच्या अहंकारात आपणच गाव कुसातील गोर-गरीब लोकांना छळता, त्यांच्यावरती एन-केन प्रकारे अन्याय अत्याचार करता,आणि आज मात्र वर्णव्यवस्थेचं खापर ब्राम्हणांवर फोडून मोकळे होतात. मडक्यांच्या उतरंडी सारखी जाती व्यवस्था ब्रम्हणांनी तयार केली असली तरी ती सशक्तपणे राबवली आणि मजबूतपणे उभा कोणी केली ? कधी कोणता ब्राह्मण गावात अस्पृश्यता किंवा जातिव्यवस्था राबवण्याचं ट्रेनिंग द्यायला आल्याचं आठवत नाही, याची सर्वांना जाण आहे. शहर,गाव,वस्तीत लोकसंख्येच्या बळावर तुम्ही तिथल्या मागासवर्गीय तर सोडाच परंतु इतर सवर्ण जनाला सुद्धा छळलं आहे. आणि आज ही गावकुसात छळत असतातच आणि वेळप्रसंगी त्यांना मारत सुद्धा असतातच ना…कदाचित आज तुम्हाला जाणीव होत असेल की,आपला पूर्णतः वापर झाला आहे ? म्हणून आज “आरक्षणाची” मागणी करत,आमची जमात अन्याय-अत्याचार करणारी नसून,सर्वांना सामावून घेणारी आहे.हे बेंबीच्या देठापासून सांगत आहात.परंतु भावा हे नुसतं सांगून जमत नाही,तर सिद्ध पण करावं लागतं.कारण आज ही तुला महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहूजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर परकाच वाटत आहे, म्हणून तर तुमच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनात त्यांचा फोटो किंवा विचार दिसत नाही.

… मित्रा आम्ही स्वाभिमानी आहोत, दयाळू आणि मायाळू सुद्धा आहोत.कारण आम्ही खातो त्या भाकरीवर ज्योतिबा,शाहू बाबासाहेबांची सही हाय रं…!!

विजय अशोक बनसोडे
लेखक / संपादक
भिमनगर (नागेशनगरी) उस्मानाबाद
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!