महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

‘रमाई’ स्वाभिमानी महिलेची संस्कारगाथा


सरिता सातारडे, नागपूर
06/02/2024

असं म्हंटल्या जाते की, जगातील सर्वच पराक्रम आईच्या कुशीतच जन्म घेत असतात. आई हा शब्द कोणी शिकवावा लागत नाही तर तो सहजच मुखातून बाहेर पडतो. चालताना अचानक पायाला ठेच लागली तर मुखातून ‘आई’ हाच शब्द बाहेर पडतो. तर असे हे हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखे दोन शब्द म्हणजे ‘आई’.
आई कुणाचाही असो तिच्या मुठीत अख्ये विश्व सामावलेले असते. आई या शब्दातच वात्सल्याची तहान आहे. मायेची उब आहे.प्रेमाची पाखर आहे. कोमेजलेल्या मनांना जीवन देणारा एक आधारवड आहे. आईची थोरवी सांगण्यासाठी शब्द भांडार ही अपुरेच ठरते. मनात उठणारे वादळ आईच्या मांडीवर डोके ठेवले की अगदी शांत होते. संकटात असतांना आईचा प्रेमाचा हात डोक्यावरून फिरला की मनास अपूर्व शांतता लाभते. आईच्या प्रेमाला व्यवहाराची तुलना माहित नसते. प्रत्येक आई आपल्या मुलांना सुसंस्कारित करित असते. तिची मुलांकडून एकच अपेक्षा असते आपली मूले मनाने, गुणाने व पराक्रमाने मोठी व्हावीत.

आणि म्हणूनच आपण आज आपण आपल्या सर्वांच्या ‘आई’ म्हणजेच ‘रमाई’ यांची महती जाणून घेऊ.रमाई ही केवळ एक व्यक्ती नाही, एखादे पात्र नाही, एक स्त्री ही नाही तर रमाई म्हणजेच ‘मातृत्वाचे महाकाव्य’ होते.
लहानपणी कोणाचेही आईबाप मरू नये असे म्हणतात. त्यामुळे मायेचा किनारा लाभत नाही आणि अशी ही मूले रानोमाळ भटकतात. वणंदगावच्या भिखूजी धोत्रे आणि रूखमा यांच्या पोटी 7 फेब्रुवारी 1998 ला रमाचा जम्म झाला. रमाचे पाळण्यातील नाव भागेरथी. पण सारे तीला रमा च म्हणत. रूखमा तीला रामी म्हणून हाक मारित असे. रामी खूप कष्टाळू.. गौरा आणि शंकर ही रमाची भावंडे. गरीबीत, कष्टात पण समाधानात रमाचे जीवन जगणे सुरू होते. भिकू दाभोळ बंदरात माशाच्या टोपल्या वाहून नेण्याचे काम करित असे. टोपल्या वाहून वाहून त्यांना छातीचे दुखने वाढते. तशातच अर्धांगवायूचा झटका येतो. आणि याच धक्यामूळे रूक्मिनीसुध्दा आजारी पडते. आणि जगाचा निरोप घेते काही दिवसातच भिकू सुध्दा जगाचा निरोप घेतात आणि गौरा, शंकर, रमा ही मूलं आईबापाविणा पोरके होतात. रामी सुन्न होते. तीचे बालपन करपते. आईवडिलांच्या मृत्युनी अंतर्मुख होऊन लहान वयातच ती अजाण बालिका सुजाण बनते. ‘लहानपणी खरचं कुणाचेही आईबाबा मरू नयेत.’धोत्रे काका आणि गोविंदपुरकर मामा रमा आणि तिच्या भावडांना मुंबईला आणण्याचा निर्णय घेतात. आणि वणंदगाव सोडून ते काका मामांकडे मुंबईला येतात.
आईवडीलांच्या मृत्यू नंतर रमा ही बालपण हरविलेली मुलगी असते अवघी 8/9 वर्षाची. आईवडिलांना अंतरलेली मूलं अधिक जबाबदार बनतात असं म्हटलं जातं. रमा जबाबदार बनून तिच्या वृत्तीतील अवखळपणा संपविते आणि एकदम प्रोढपणे जगण्यास प्रारंभ करते.रमाईचे लग्न सुभेदार रामजी यांचे सुपुत्र भिवा यांच्याशी ठरते आणि भायेखेडाच्या भाजीमंडीत रमाई आणि बाबासाहेबांचे लग्न होते आणि एका वणव्यासोबत रमाईचा संसार सुरू होतो. अवघ्या 9 वर्षाच्या रमाईचे लग्न 14 वर्षांच्या बाबासाहेबांसोबत होते. बाबासाहेब रमाला ‘रामू’ म्हणून हाक मारित. रामू तू आता शिकले पाहिजे असे सांगतांना बाबासाहेब रमाईस क्रांतीबा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची महती सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना म्हणत..
जी च्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाला उध्दारी असे आपण म्हणतो तेव्हा हातात दोरी असलेली बाई शिकलेली असली म्हणजे अगदी अचूक दिशेला झोका देऊ शकेल या शब्दात बाबासाहेब शिक्षणाची महती रमाई स पटवून देत असे. माता रमाई च्या जगण्याकडे आपण बघतो तेव्हा आश्चर्य वाटते आपल्या नवऱ्यावरती संपूर्ण श्रध्दा, संपूर्ण विश्वास ठेवून ही स्त्री जगते आहे. जगण्याविषयीची यत्किंचितही तक्रार न करता तुटपुंज्या मिळकतीत आपला संसार सांभाळत आपल्या पतीला अधिकाधिक कशी मदत करता येईल हा विचार करणारी रमाई आपणास भेटते. रमाईच्या संसारात सुख कमी आणि दुःख आणि जबाबदारीची ओझीच जास्त. बाबासाहेबांचे पुस्तकांविषयीचे अगाध प्रेम आणि समाजाविषयीची तळमळ यामुळे त्यांना कौटुंबिक जीवन जगण्यासाठी तसा वेळच मिळालेला नाही.

सिडनहॅम काॅलेजमध्ये प्राध्यापक असतांना बाबासाहेबांचा साडेचारशे रूपये पगार मिळतो आणि ते पैसा रमाई कडे देतात. साहेब आता संसाराकडे लक्ष देतील या कल्पनेने रमाई खुश होते आणि बाजारात जाऊन साहेबांना बसायला पाट, धोतरजोडी, घरचा किराणा, मूलाबाळांना कपडे अशा सर्व वस्तू घेतात. स्वतःसाठी काही नाही तर सर्व पैसा ती कुटूंबासाठी खर्च करते. नंतर बाबासाहेब रमाई विचारतात, ‘रामू पैशाचे काय केले?’ रमाई आनंदाने काय काय खरेदी केले ते सांगतात आणि अक्षरशः बाबासाहेब त्यांना रागवितात. रमाईला ते म्हणतात, ‘रामू मला परत एकदा विदेशात जाऊन शिकायचे आहे. आपल्याला याप्रकारे पैसे नाही खर्च करता येणार.’ मला आपली आपल्या समाजाची परिस्थिती बदलवायची आहे. समाजाचे ऋण मला फेडायचे आहे. तू मला मदत करशील ना रामू? आणि मग 50 रूपये बाबासाहेब दर महिन्याला रमाई खर्च करायला द्यायचे.. मग रमाई आपल्या आयुष्यात सुंदर बॅलन्स करायला शिकतात. काय करतात त्या? तर.. 50 रूपयामधील 5 रूपये आणीबाणीचे म्हणजे काही इमरजन्सी असली तर खर्च करायला वेगळे काढून ठेवत आणि उरलेल्या 45 रूपयाच्या दीड रूपयाप्रकारे वेगवेगळ्या पुड्या बांधून ठेवायच्या आणि रोज एक पुडी याप्रमाणे खर्च करायच्या. खर्च जास्त लागला तर काय? असा कुठल्याही बाबतीत रमाई ला कधी प्रश्नच पडला नाही. गरीबीतही कमी खर्चाने, नेटाने संसार चालविण्याचे ‘अर्थकारण’ निर्माण करणारी रमा त्या वेळी वित्तमंत्र्याच्या भूमिकेत होती.. नाही का?जे काही पैसे आहेत त्यातच आपले जीवनयापन करणाऱ्या रमाई तेव्हा बुध्दांनी सांगितलेल्या मध्यम मार्गाचा अवलंब केला होता.

बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले त्या काळात रमाई फार हाल झाले. 1913 ते 1917 या चार वर्षात संसाराचा गाडा ती एकटी उचलत होती. रमाई त्या काळात माहीम, दादर अशा ठिकाणी पायी जाऊन शेणगोळा जमा करायच्या आणि आपला चरितार्थ चालवायच्या. काही महिला रमाईला टोचून बोलायच्या तू एवढी बॅरिस्टराची बायको आणि शेणगोळा जमा करते. गुंजभर सोनेही नाही तूझ्या अंगावर! रमाई अशावेळी शांत राहायची. तीला माहीत होते तीचा पती कुठले अग्निदिव्य पार पाडत आहे म्हणून आयुष्य भर कष्टाच्या अग्नीकुंडात तीने स्वतःला झोकून दिले होते. रमाईच्या वाट्याला जे दुःख ज्या हाल अपेष्ठा आल्यात त्या कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये. आयुष्य त्या काळात संयम आणि शहाणपणा रमाईला शिकवित होते बाबासाहेब रमाई ला म्हणायचे रमा तू चिंता करू नकोस? तू धीर धर. एकवेळ अशी येईल की लाखो लोकांच्या गळ्यातील दागिना तू बनशील, करोडो लोकांच्या गळ्यातील ताईत तू बनशील.. आणि आज बघा आपण आपली आई रमाईची जयंती साजरी करित आ आहोत ती यासाठीच कारण त्या आपल्या सर्वांच्या गळ्यातील ताईत आहेत म्हणूनच, नाही का!
बाबासाहेब शिकण्यासाठी जेव्हा विदेशात असत तेव्हा रमाई पत्र लिहायची बाबासाहेबांना पण आपल्या जिर्णशिर्ण संसाराची साधी वाच्यताही करायची नाही. स्वतःच्या दोन हातावर अगाढ विश्वास होता तिला आणि तिच्या श्रमाला साथ होती तिच्या नैतिकतेची. परिस्थितीवर मात करण्याचे अचाट बळ रमाई कडे होते.
1923 मध्ये साली बाबासाहेब बॅरिस्टर बनून येतात. खूप लोकं त्यांच्या स्वागताला जातात. रमाई कडे चांगली साडी नसते त्यामुळे काय घालायचे हा प्रश्न तिच्यापुढे निर्माण होतो.. आपल्या जाऊबाई ला वगैरे ती मागू शकली असती पण रमाई स्वाभिमानी. घरची एक ट्रंक त्या उघडतात त्यात शाहूमहाराजांनी सत्कारासाठी दिलेला भरजरी फेटा तीला दिसतो. रमाई तो परिधान करते आणि साहेबांच्या स्वागताला जाते. बाबासाहेब जयजयकार सुरू असतो. हा आनंदोत्सव रमाई कोपर्‍यात उभी राहून बघत असते. बाबासाहेबांची नजर त्यांच्या आवडत्या रामूचा शोध घेते. डोळ्यांनीच रमाई त्या वेळी कृतकृत्य होते. भावनातिरेकाने ‘साहेब’ हा शब्द रमाईच्या मुखातून बाहेर पडतो. रमाईचे अंतःकरण आनंदाच्या आसवांनी भिजून जाते. तिच्या पुढे साक्षात ज्ञानाचे प्रतिक असलेले बाबासाहेब उभे असतात.. तर असे हे आपले जगावेगळे आईबाबा.

शेवटी राजगृहात रमाई आणि बाबासाहेब राहायला जातात. आता आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी पूर्वी चे कष्ट, पूर्वीची झालेली ससेहोलपट, पूर्वीची रमाईच्या शरीराची झालेली झीज यामुळे रमाई ची प्रकृती दिवसेंदिवस खंगत जाते त्यामुळे हवापालट करण्यासाठी धारवाडच्या विद्यार्थी वसतीगृहाचे प्रमुख वराळे कडे रमाई ला पाठविण्यात येते. या काळात बाबासाहेब परत लंडनला पुढील शिक्षणासाठी जातात. धारवाडच्या मोकळ्या हवेत रमाई ला बरं वाटू लागते. एके दिवशी रमाई च्या लक्षात येते की वसतिगृहाचे स्वयंपाकघर शांत आहे. त्या चौकशी करतात तेव्हा वराळे सांगतात की, ‘वसतिगृहाची ग्रॅंट अजून आली नाही. मागची थकबाकी असल्याने वाणी उधार द्यायला ही तयार नाही. स्वयंपाकघरात काहीही शिल्लक नाही. रमाईला खूप वाईट वाटते. आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्या वराळेंकडे देते आणि सांगते बांगड्या गहाण ठेवून सर्व सामान आणायला सांगते. त्या दिवशी रमाई स्वतः स्वयंपाक करून मूलांना खाऊ घालते. तर असे सुपाएवढे काळीज असणाऱ्या आपल्या आई होत्या.
एकदा रमाई बाबासाहेबांकडे पंढरपूर ला चलण्याचा आग्रह करतात तेव्हा बाबासाहेब रमाईला समजावतात.. रमा आपण एक नवे पंढरपूर निर्माण करू.. माणसांचे पंढरपूर.. माणसांना माणूस समजणाऱ्याचे पंढरपूर..बुध्दिवादाचं पंढरपूर आपण निर्माण करू तिथे विज्ञाननिष्ठेचा गजर होईल. तिथून समतेचे विचार गावोगावी जाईल. बंधूत्वाचा सुंगध तिथून देशाला मिळेल अस पंढरपूर आपण निर्माण करू. आणि नागपूर ला इथे दिक्षाभूमी निर्माण होते.. आता कुठल्याही पंढरपूर ची गरज आहे का आपल्याला?

1935 मधील मे महिन्यात शेवटी रमाई आजार खूपच विकोपाला जातो. क्षयरोगाने तिचे अंग अंग पोखरलेले असते आणि चंदनाप्रमाणे जळणारी ही आपली आई सर्वांचा निरोप घेते. बहिष्कृतांचा हृदयसम्राट व्याकूळ नजरेने यावेळी रमाई जवळ बसलेला असतो पण रमाईची जीवनयात्रा इतकीच असते.

रमाई किती दुःखे सहन करावीत? लहानपणी आईवडील सोडून जातात. लग्नानंतर सासरे रामजीबाबा, गंगाधर, इंदू राजरत्न ही मूले मांडीवरच दगावतात.. जगतो कौण? तर फक्त यशवंत. पैशाअभावी ही मूले मरतात. रमाईचे जगणे किती करूण आहे. एका बॅरिस्टराची ही मूले पैशांअभावी मरतात. आज आपल्या समाजातील दृश्य बघतो आपण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते उधळपट्टी करतात. समाजाशी काहीही देणेघेणे नाही. या जगात फुकट काहीच मिळत नाही. आज जे काही उपभोगतोय ना आपण त्याची किंमत रमाई आणि बाबासाहेबांनी तेव्हा मोजलेली आहे. स्वतःच्या आयुष्याला पणाला लावून त्यांनी आपल्यासाठी हे सारे काही निर्माण केलेले आहे. बाबासाहेबांनी जो प्रंचड वटवृक्ष निर्माण केला त्या वटवृक्षाला धरून ठेवण्याची ताकत आहे रमाई.

बाबासाहेब घडतांना जगाने बघितले असले तरीही त्यांना आयुष्य भर शांतीने आणि सयंमाने साथ देणारी आपल्या देहाला चंदनाप्रमाणे झिजवून तिळतिळ जळणारी रमाई आपल्याला बघता यायला हवी. बाबासाहेब वटवृक्ष बनले असले तरी त्या वटवृक्षाला आधारवड बनून तितक्याच ताकदीने खंबीरपणे मूळांना घट्ट पकडून असणारी रमाई आपण सर्वांना बघता यायला हवी. आपला पती जगावेगळे काम करतोय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतोय म्हणून सुभेदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी बाबासाहेबांना घडविण्यासाठी अहोरात्र झटणारी रमाई आपणास बघता यायला हवी हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!