बेट्या, याच आंबेडकरांनी आम्हाला माणसात आणलं, तुझ्या देवानं नव्हे !
दत्तकुमार खंडागळे
संपादक वज्रधारी
मो. 9561551006
सादरकर्ते :
माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव कोल्हापूर
सत्ता डोक्यात गेली की माज येतो असे म्हणतात. ज्याची कुवत नसते असे लोक तर सत्ता हाती आली की खुपच मस्तावतात. माकडानं दारू पिली की काय होतं? हे वेगळं सांगायला नको. सध्या देशात शहा-मोदींची तिच स्थिती आहे. बेलगाम सत्ता हातात आहे. विरोध करणारे सगळेच मोडून काढलेत. सगळ्या पध्दतीची शस्त्रे वापरत लोकांच्यात भय निर्माण केले आहे. हाताशी असलेल्या सत्तेच्या जोरावर लोकांचा आवाज दाबला जात आहे. सगळ्या सरकारी संस्थांना हातचं बाहूलं बनवलं आहे. या संस्थांच्या व हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर हे दोघे सर्वांनाच धाकात ठेवू पाहत आहेत. जे विकत मिळत आहेत त्यांना विकत घेतलं जात आहे. जे घाबरत आहेत त्यांना भिती दाखवून गप्प बसवलं जात आहे. जे घाबरत नाहीत, विकत मिळत नाहीत त्यांचा जस्टीस लोया केला जातो आहे. त्यांना बदनाम केले जात आहे, तुरूंगात टाकले जात आहे. अवघ्या देशात आपलीच निरंकूश सत्ता असल्याचा या लोकांना माज चढला आहे. या माजातूनच परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अमित शहा यांना प्रेम असूच शकत नाही आणि असायचं कारणही नाही. ते बाबासाहेबांचा तिरस्कारच करणार यात नवल ते काय? परवा संसदेत बोलताना त्यांनी, “काही लोक सतत आंबेडकर आंबेडकर करत असतात. ही फँशन झाली आहे, जर इतक्या वेळा त्यांनी देवाचे नाव घेतले तर देव प्रसन्न होईल आणि सात वेळा स्वर्गात जागा मिळेल” असं म्हंटल. खरंतर अमित शहांना आंबेडकरांचे कुणी सतत नाव घेतलेले नाही आवडणार. कारण ते ज्या मातृसंस्थेच्या पोटातून आलेत तिथं बाबासाहेबांचा द्वेषच शिकवला जातो. त्यांना बाबासाहेबांचे नाव कसे चालेल? नथूरामची पुजा करणाऱ्या पिलावळींना आंबेडकरांचे नाव कसे चालेल? ज्यांचा आदर्श नथूराम, गोळवळकर, हेगडेवार असतो त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे पित्त असणारच. नेमकी हिच मळमळ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. त्यांच्या मनातला विखार या निमित्ताने बाहेर आला.
अमित शहांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अडचण असणं साहजिक आहे. कारण एक ना एक दिवस बाबासाहेबांचा विचारच त्यांच्या जातीयवादी पक्षाचे आणि मातृसंस्थेचे थडगे बांधल्या शिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचा विचार आणि त्यांनी लिहीलेले संविधान त्यांच्या मुळावर उठल्या शिवाय राहणार नाही. या धोक्याची त्यांना पुरती जाणीव आहे, म्हणूनच त्यांच्या तोंडातून हे विष बाहेर पडलं. अमित शहा म्हणतात की, “इतक्या वेळा देवाचे नाव घेतले तर देव प्रसन्न होईल आणि स्वर्गात जागा देईल” खरेतर अमित शहांचा देव आणि त्यांचा स्वर्ग त्यांनाच लखलाभ. या निमित्तानं अमित शहाना सांगावे वाटते की, या देशात हजारो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या करोडो लोकांना माणसात आणलं, माणूस म्हणून जगायची संधी दिली ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच. हजारो वर्षे ज्यांना माणूसच समजलं जात नव्हतं, ज्यांचा स्पर्श सुध्दा विटाळ मानला जात होता, ज्यांची सावली सुध्दा वाईट मानली जात होती, ज्यांच्या गळ्यात गाडगं आणि पाठीला काट्याची फांजर बांधली जात होती. कुत्री-मांजरं सन्मानाने घरात घेतली जात होती पण ही माणसं जवळपास आली तर गुरापेक्षा भयंकर मारलं जात होतं अशा लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच माणसात आणलं. त्यांना माणूस म्हणून सन्मानानं जगण्याची संधी आंबेडकरांनीच दिली. जात उतरंडीतल्या प्रत्येक शुद्र जातीला माणूस म्हणून ताठ कण्याने जगण्याची संधी बाबासाहेबांनीच दिली. या देशात तेव्हाही देव होते, देवांचे विविध अवतार होते, या देवांची मंदिरं होती. तेहत्तीस कोटी देवांचे अवतार होते पण यातला एकही देव या करोडो लोकांची गुलामी, दु:ख-दैन्य पाहून जागा झाला नाही. त्याचं काळीज पिळवटून निघाले नाही. या लोकांच्यावर केला जात असलेला अत्यंत क्रुर पध्दतीचा अमानूष अत्याचार पाहून यातल्या एकाही देवाचे काळीज पेटले नाही, द्रवले नाही. त्याला या लोकांचे होणारे शोषण पाहून चिड आली नाही. यातल्या कुठल्याही देवाने या गुलामीत खितपत पडलेल्या लोकांसाठी कधी शस्त्र हाती घेतले नाही. कुणी परशू उचलली नाही, कुणी तलवार उपसली नाही, कुणी सुदर्शन चालवले नाही, कुणी धनुष्य उचलले नाही की कुणी आपल्या शापाने, मंत्राने अत्याचाऱ्यांना भस्मसात केले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, शिकले, मोठे झाले आणि त्यांनीच या करोडो लोकांसाठी संघर्ष केला. या लोकाना माणसात आणण्यासाठी त्यांनीच आपले जीवन समर्पित केले. तमाम स्त्री वर्गासह या देशातल्या सर्वच शुद्रांना बाबासाहेब आंबेडकरांनीच मुक्त केेले. अमित शहांच्या भटी व्यवस्थेने ज्या लोकांच्या प्रत्यक्ष जीवनाचा नरक केला होता त्या लोकांच्या जीवनात पृथ्वीवरतीच आंबेडकरांनी स्वर्ग निर्माण केला. त्यामुळे अमित शहांना ठणकावून सांगावे वाटते की, “बेट्या, याच आंबेडकरांनी आम्हाला माणसात आणलं तुझ्या देवाने नव्हे.”
खरेतर अमित शहा अशी गरळ ओकतायत याचा अर्थ वेगळा असू शकतो. ते हे वाक्य सहजासहजी बोललेले नाहीत. ही लिटमस टेस्ट असावी. कदाचित त्यांचा या मागे काहीतर छुपा अजेंडा किंवा कारस्थान असण्याची शक्यता आहे. आजवर मुस्लिमांना टार्गेट करत राजकारण केले गेले. येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना टार्गेट केले जाईल, बौध्दांना टार्गेट केले जाईल असे वाटते आहे. खरेतर लोकशाही माणणाऱ्या सर्वांनाच ते टार्गेट करत आहेत. पण विशेष करून बाबासाहेब आंबेडकरांचे जे नाव घेतात, त्यांच्या विचारांचे जे पाईक आहेत अशा लोकांना भविष्यात जास्त टार्गेट केले जाण्याची शक्यता अधिक वाटते आहे. कारण त्यांच्या धर्माधिष्टीत राजकारणाला सुरूंग लावण्याची ताकद फक्त महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातच आहे. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंच्या विचारांची वाट पकडत ती अधिक प्रशस्त केली. ती वाट लोकशाहीच्या माध्यातून करोडो लोकांच्या झोपडी पर्यंत नेली. हि “वाट” च एके दिवशी या जातीयवादी सत्तेची ‘वाट’ लावल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच अमित शहा आणि त्यांच्या कारस्थानी संघाला बाबासाहेबांचे प्रचंड पित्त आहे. त्यांचे नाव सुध्दा घेतलेले आवडत नाही. नेमकी याच पित्ताची गरळ अमित शहांनी परवा ओकली. त्यानंतर त्यांनी कांगावा करत कॉंग्रेसच्या विरोधात देशभर आंदोलनही केले. अमित शहांनी व त्यांच्या कारस्थानी टिमने कितीही बुड आपटले तरी त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच त्यांच्या हिटलरशाही व जातीयवादी सत्तेचे थडगे बांधल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे अमित शहांनी सत्ता सोडून स्वर्गाचे बुकींग करण्यासाठी रोज त्यांच्या इष्ट देवतेचे नामस्मरण करायला हरकत नाही. एखाद्या गुहेत जाऊन डोळे मिटत प्रार्थना करत बसावं. आपल्या भूलोकीच्या कारनाम्यांनी स्वर्गात जागा मिळाली नाही, स्वर्गातला प्लॅट हाती लागला नाही तर किमान नरकातला तरी एखादा प्लॅट मिळतोय का? याची चाचपणी करावी. कारण त्यांच्या इथल्या भानगडी पाहता स्वर्गातली जागा मिळणे शक्य वाटत नाही. तेव्हा बघा देवाकडे वशिला लावून. बाकी जे सतत आंबेडकरांचे नाव घेतायत त्यांच्यासाठी दुसऱ्या कुठल्या स्वर्गाची गरज नाही. त्यांचा स्वर्ग इथच आहे. आंबेडकर त्यांच्यासाठी देवापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे त्यांची चिंता अमित शहांनी करू नये. सत्तेच्या माध्यमातून केलेल्या आपल्या पापांचे क्षालन करण्यासाठीच त्यांनी सतत देवाचे नाव घेत बसावे ही विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत