मी नास्तिक का झालो शहीदभगतसिंग (वय अवघे 23 वर्षे)
“त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारांती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहीलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.
‘श्रद्धा’ संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधी पासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?
एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतीम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.
जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतु न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.”
भगतसिंग यांचे विचार –
बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले “मी निरीश्वरवादी का?” हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.
हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता.
. संकलित
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत