मोदी आणि राहुल गांधी ! – ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम सर.
कांग्रेसची पार्श्वता सुखदायी नाही. ते खणून मांडण्याची ही वेळ नाही. अशावेळी या पक्षाचे तरुण नेते यांनी ‘चलाखी’ हेच सर्वस्व असे समजू नये.
किमान या तुलनेत विद्यमान देशप्रमुख नरेंद्र मोदी हे कितीतरी स्पष्ट वाटतात. त्यांचे राजकीय पत्ते उघड उघड दिसतात. ते जी राजकीय दिशा घेतात ती लपून नाही. ते तिथे स्पष्ट दिसतात.
याचमुळे ते आमच्या रागाला व टीकेला सामोरे जातात.
हे सर्व त्यांनाही ठाऊक असावे. याचमुळे खुले व श्रीमंत यांची ते ‘व्होट बॅंक’ पक्की करु शकले. २०१४ ला ३१ टक्के व २०१९ ला ३६ टक्के मते घेऊन सत्तेवर आलो हे या महाशयांना चांगले ठाऊक आहे.
मी, माझे सरकार, माझी गॅरंटी हे निकाला आधीच पदासहित हे महाशय घोषित करुन टाकतात. खरेतर हे असंविधानिक आहे.
संघाला हे थेर दिसत नाहीत असे नव्हे. पण संघावरील नेहमीचा बोचरा राग व रोख ‘शिफ्ट’ होऊन या महत्तमावर गेला असल्याने संघ गप्प असावे.
त्यांनाही त्यांच्या शताब्दीच्या तोंडावर हे ‘स्थानांतर’ बरेच आहे.
या तुलनेत तरुण नेते राहुल गांधी हे स्पष्ट नाहीत. चलाखीत गुंतलेले दिसतात. सांगती धोरणे व वागती वागणे यात फारकतता जाणवते. गुडी गुडी सांगून सर्वांना खुष करण्याचा नाद घेऊन ते आहेत.शेवटी नाद हा नाद असतो.
आपण कट्टर हिंदू असण्याचे या तरुण नेत्याने कितीदा दर्शन द्यावे ?
जानवे दाखविले. स्वतःचे भारद्वाज गोत्र सांगितले. इथेच थांबावे ना !
या देशाला जाणीवपूर्वक ‘हिन्दुस्थान’ म्हणण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. हे सहज घडत नाही. ‘भारत’ न म्हणण्याची (चुकूनही) जणू शपथ घेतली असावी. हे पचनी पडत नाही.
भारत हे केवळ नाव नाही. ‘इंडिया दॅट इज भारत’ असे या देशाला संविधानिक नामाभिदान आहे !
राजकारणाच्या वर जीवनाची स्पष्टता असण्याची मजा काही औरच असते. लोकांना काय आवडते हे देत देत आपणाला काय आवडते हेही देत जावे लागते.
राजकारणाच्या सारीपाटात परिस्थितीजन्यता ही कायम मान्यता कधीच नसते. तसा ग्रह कुणी करु नये. नकाराधिकाराचे (veto power) महत्व कधीकधी महत्त्वाचे ठरुन जाते, एव्हढेच !
० ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम सर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत