रा.स्व.संघ – भाजपला पराभूत करू शकेल अशा उमेदवारास धोरणात्मक मतदान करण्याची गरज !
आगामी 18 व्या लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाचे महाराष्ट्रातील तीन टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांपेक्षा ही निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे. या निवडणुकीच्या निकालावर भारत नावाचे राष्ट्र भविष्यात सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य राहील की ब्राह्मण नियंत्रित धर्माधिष्ठित टोळीराज्य असेल याचे भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीत वापरण्यात येत असलले प्रचारतंत्र, `अल्पसंख्यकांची लोकशाही’ या संकल्पनेला गुंडाळून ठेऊन बहुसंख्यकांची दादागिरी हे तत्व अंमलात आणण्याचा खुनशी डाव, देशातील प्रसारमाध्यमांना व धनदांडग्या उद्योगपतींना हाताशी धरुन निर्माण करण्यात आलेली दहशत व या सर्व बाबींचा समाजातील कमकुवत घटक, धार्मिक अल्पसंख्यक मुस्लीम ख्रिश्चन,बौद्ध लोक, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले लोक यांच्यावर दुरगामी परिणाम होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्यांना लोकशाही हवी आहे,ज्यांना समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, व्यक्तिसन्मान, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि कल्याणकारी राज्य या खांबांवर आधारित भारतीय संविधान कायम राहावे असे वाटते. भारत नावाचा देश ब्राह्मणी धर्माच्या पायावर आधारित धर्मराष्ट्रात परिवर्तीत होऊ नये याची आवश्यकता वाटते अशा तमाम लोकांनी अत्यंत विचारपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे.
या निवडणुकांमध्ये आंबेडकरी समुदायाने कोणती भूमिका घेतली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आंबेडकरी समुदायांमध्ये सद्यस्थितीत कोणत्याही स्थितीत संविधान विरोधी शक्तींना म्हणजेच रा.स्व-संघ-भाजप प्रणीत आघाडीला पराभूत केले पाहिजे असे मानणारा व त्यानुरूप मतदान करण्याचा आग्रह धरणारा प्रवाह मजबूत आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक असणारा अल्पसंख्यक प्रवाह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच भाजप-शिवसेना या दोन्हीही आघाड्या बौद्धांच्या हितसंबंधाच्या विरोधी आहेत. कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या सत्ताकाळात दलित बौद्धांवर प्रचंड प्रमाणात अन्याय-अत्याचार केले आहेत. कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यामुळे यापैकी कोणालाही जवळ न करता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे असे म्हणतो. या दोन मतप्रवाहाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचे मूल्यांकन केल्यास असे दिसून येते की, आताची निवडणूक भारतीय संविधानाचे व लोकशाहीचे भवितव्य या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर रा,स्व,संघ-भाजपचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले तर या देशातील लोकशाही टिकेल की नाही ? आणि पुन्हा निवडणुका होतील की नाही ? याची खात्री देता येत नाही. म्हणून तात्पुरते या सरकारला सत्तेत येऊ न देणे हे महत्वाचे समजून जो कोणी भाजपच्या उमेदवाराला हरवू शकेल अशा उमेदवारास मतदान केले पाहिजे हा दृष्टीकोण अधिक तर्कसंगत वाटतो. तरीही, या दोन्ही दृष्टिकोनाचे फायदे तोटे समजून घेतले पाहिजेत.
या दोन मुद्द्यापैकी महत्वाचा मुद्दा बौद्धांच्या स्वतंत्र राजकीय शक्ती निर्माण करण्याचा आहे. बौद्धांची स्वतंत्र राजकीय शक्ती केवळ लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्यानेच निर्माण होईल हा भ्रम आहे. राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. एखाद्या पक्षाने निवडणूक लढविली म्हणजे त्या पक्षाला यश मिळेलच आणि त्या पक्षाचे सरकार स्थापन होईलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. तरीही जिंकून येण्याचा आपला दावा पोकळ नाही हे सांगण्यासाठी किमान काही बाबींची पूर्तता होणे आवश्यक असते. या किमान बाबी कोणत्या ? तर यामध्ये मजबूत पक्ष बांधणी व तरंगत्या मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता या त्या किमान बाबी आहेत. निवडणुकीत हमखास यश मिळण्यासाठी पक्षबांधणी कशी करावी यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `रानडे, गांधी आणि जीना’ या प्रसिद्ध भाषणात पेंडलिटन हॅरिंग या अमेरिकन विचारवंताच्या ‘ पाॅलिटिक्स ऑफ डेमाॅक्रेसी ‘ या ग्रंथाचा हवाला देउन मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष हा तीन स्तरांचा मिळून बनतो, यातील पहिला स्तर म्हणजे पक्षाचे हाय कमांड होय. हाय कमांड हे निवडक लोकांचे वर्तुळ असते. ते पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट निर्धारित करते. या ध्येय व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते धोरण व कार्यपद्धती ठरविते.या केंद्रीय वर्तुळाच्या बाहेर पक्षांची ध्येय्य-धोरणे, उद्दिष्ट्ये,प्रतीके,कार्यक्रम यांच्याशी भावनात्मक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांचे एक वर्तुळ असते, कार्यकर्त्यांचे हे वर्तुळ आपल्या जीवन यापनासाठी पूर्णतः पक्षावर अवलंबून असते. हे कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे पूर्णवेळ कॅडर्स असतात. हे कार्यकर्ते म्हणजे पक्षाला जिवंत ठेवणारे पक्षाचे मशीन होय. पक्षाचे हाय कमांड व पक्षाचे कॅडर यांच्या बाह्य वर्तुळात एक विशाल जनसमुदाय असतो.हा जनसमुदाय पक्षाचा संभाव्य जनाधार असतो. पक्षाचे हायकमांड व पक्षाचे कॅडर कितीही मजबूत असले तरी केवळ यांच्या भरवशावर निवडणुका जिंकता येत नाही. हायकमांड व कार्यकर्ते यांच्याशिवाय बाह्य वर्तुळात असलेला तरंगता मतदार (फ्लोटिंग व्होटर) जो कोणत्याही पक्षाशी बांधिलकी ठेऊन नसतो त्यास आपल्याकडे आकर्षित करणे निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते. हा तरंगता मतदार ध्येयहिन, विचारहिन असतो किंवा तात्कालिक हितसंबंधाला महत्व देणारा असतो. हा जनसमुदाय कोणत्याही राजकीय पक्षासाठी एखादी बक्षीसी असतो. या जनसमुदायात चेतना निर्माण करण्याच्या कार्याला राजकीय पक्षाने सर्वपथम महत्व दिले पाहिजे अशी चेतना निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षाने दोन गोष्टी करणे आवश्यक असते. 1) तरंगत्या जनसमुदायाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे. 2) या जनसमुदायामध्ये पक्षाचे नेतृत्व, सिद्धांत, धोरण आणि उमेदवार यांचा प्रचार करणे.
आंबेडकरी म्हणविणाऱ्या पक्षांनी या तरंगत्या जनसमुदायाला आकर्षित करण्यासाठी पक्षाचा कोणताही कार्यकम आतापर्यंत राबविल्याचे दिसत नाही. हा तरंगता मतदार केवळ एकाच जातीचा किंवा एकाच हितसंबंध असलेला राहील असे नाही. या समुदायाला आकर्षित करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असे आर्थिक बळ जमविण्यासाठी पक्षाची किमान तालुका स्तरापर्यंत संघटन बांधणी आवश्यक असते. याशिवाय या तरंगत्या जनसमुदायामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक तेथे स्वतःच्या तत्वांना मुरड घालून मैत्री करण्याची लवचिकता दाखवावी लागते. या दृष्टीने पाहू जाता आज घडीला असे सर्वदूर पोहोचलेले मजबूत संघटन आंबेडकरी म्हणविणाऱ्या पक्षाकडे नाही हे मान्य केले पाहिजे.त्याच प्रमाणे आंबेडकरी म्हणविणारे पक्ष आपला अहंकार आणि ताठरपणा यास मुरड घालून विभिन्न मतांच्या व भिन्न धर्माच्या लोकांशी मैत्रीभाव वाढविण्यासाठी आवश्यक ती लवचिकता दाखवीत नाहीत असेही दिसून येते. या किमान बाबींची पूर्तता न करता अचानक निवडणुकीपूर्वी ६ महिन्याच्या आधी जागे व्हायचे आणि आम्ही आता सत्ताधारी बनणार अशा वल्गना करायच्या हे गंभीर राजकारण्याचे लक्षण नाही. बौद्ध समाजाला सत्ताधारी बनविण्याची स्वप्ने दाखविणारे नेते असे राजकारणाप्रती गंभीर नसलेले नेते आहेत असे खेदाने म्हणावे लागते. म्हणून या नेत्यांवर विसंबून राहून बौद्धांचे स्वतंत्र राजकारण उभे राहील हा केवळ भ्रम ठरतो.
दुसरा महत्वाचा मुद्दा कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सारख्याच वृत्तीचे असताना त्यांना बौद्धांनी का मतदान करावे? हा आहे. हे खरे आहे की, भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे वर्गचरित्र सारखे आहे. मात्र यामध्ये मुख्य फरक असा आहे की, रा.स्व.संघ/भाजपचे उद्दिष्ट राजकीय सत्तेच्या माध्यमातून भारताच्या संविधानाशी निर्णायक युद्ध करून भारतीय संविधानावर निर्णायक विजय मिळविणे हे आहे. 2024 च्या निवडणुकीत रा. स्व. संघ/भाजपच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर एखादा मोर्चा काढायलाच नव्हे तर दु:ख व्यक्त करण्यासाठी तोंड उघडायला देखील अनुसूचित जाती/बौद्ध, मागासवर्गीय लोक शिल्लक राहणार नाहीत अशी स्थिती आहे.कॉंग्रेस पक्ष जरी ब्राह्मण व उच्च जातीयांचा पक्ष म्हणून ओळखला जात असला तरी पत्यक्ष हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा काँग्रेसचा अजेंडा नाही.आपल्या सत्ताकाळात कॉंग्रेस पक्षाने संविधानाची योग्य अशी अमलबजावणी करून त्यांना मतदान करणाऱ्या दलित,आदिवासी,अल्पसंख्यक समुदायाचे जीवनमान फारसे उंचावले नाही ही वस्तुस्थिती आहे.मात्र कॉंग्रेसच्या सत्ताकाळात संविधान नष्ट होण्याचा व लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला नव्हता.यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या कितीही चुका आणि कमतरता असल्या तरी संविधान विरोधी, हिंदूराष्ट्रवादी रा.स्व.संघ/भाजप विरुद्धच्या युद्धात काँग्रेस पक्ष हा एक महत्वाचा घटक आहे. एकदा का रा.स्व.संघ/भाजप सत्तेबाहेर घालविले तर आपले हक्क व अधिकार मिळविण्यासाठी संवैधानिक मार्गाने संघर्ष करण्यास किमान अवकाश तरी उपलब्ध राहू शकतो. कॉंग्रेस पक्षाने आपले पूर्वीचेच धोरण पुन्हा सुरु ठेवले तर या पक्षाचे शोषक चरित्र उघडे पाडून आपली स्वतंत्र शक्ती निर्माण करण्यासाठी डावपेच आखण्यास, आवश्यक ती पावले उचलण्यास, संघटन बांधणी करण्यास वेळ उपलब्ध होतो. या दृष्टीने 2024 च्या निवडणुकीत धोरणात्मक मतदान करण्याची गरज बौद्ध मतदारांनी ओळखली पाहिजे.यानुसार प्रथम रा.स्व.संघ भाजपला पराभूत करण्याच्या दृष्टीने त्या उमेदवाराविरुद्ध जो सक्षम उमेदवार रिंगणात आहे त्याचा पक्ष विचारात न घेता मतदान करणे हेच शहाणपणाचे राहील
सुनील खोब्रागडे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत