
चळवळ आक्रमक आंबेडकरी,
थंडावलीय, निपचित पडलीय,
कमकुवत झालीय,
ऐकतांना इंगळ्या,
डसल्यागत वाटतंय,
मन सुन्न होतय,
कानांना आपसूक, बहिरेपणा येतोय.!
त्याला कारण काय ?
धडाडणार्या तोफा,
काळाच्या पडद्याआड गेल्यात,
बंदुका सत्तेच्या उबदार खुर्चीत, निवांतपणे पहूडल्यात,
बेडर तलवारी,
इतस्ततः विखरून पडल्यात,
अन छोट्या छोट्या पुंजक्याचा,
क्षीण आवाज,
कुणाच्याच कानापर्यंत नाही जात.!
हे सर्व खरं असले तरी ,
अनुयायी निष्ठावान आंबेडकरी,
एकजुटीने भिडतात,
अन्याय, अत्याचार्यांशी,
नेभळट जातीयवाद्यांशी,
पुतळा विटंबना करणार्यांशी,
माय भगिनींवर,
वाकडी नजर ठेवणार्यांशी,
अन संविधान,
बदलू पाहणार्या, प्रवृत्तींशी.!
अरे महाभागांनो,
“तुमचे ठेवता झाकून आणि आमचे पाहता वाकून”
सध्यस्थितीत कोणती,
लोक चळवळ, जिवंत दिसते?
पक्षीय चळवळ, स्वार्थी झालीय,
समाजकारण, लोप पावलय,
कामगार चळवळ उध्वस्त केलीय,
अन राजकारणाचा बाजार मांडलाय,
झाले नाही समाधान एवढ्याने, म्हणुन, ह्या नतद्रष्टांनी ,
महापुरुषांची देखील,
जातीनिहाय,
वाटणी करून टाकलीय.!
आणि काय हो.!
गटबाजीची आमच्या,
टिंगल का करता?
शिवसेना दुभंगली,
द्र. मु. क. ची शकले झाली,
कम्युनिष्ट पक्षाचे तुकडे झाले,
कॉंग्रेस तर अनेक गटात विखुरली,
समाजवादी अखेरचा श्वास घेताहेत,
अंतर्गत लाथाळ्यानी, भाजपा नेते
हैराण झालेत,
हे सर्व घडत असतांना,
तुमच्या डोळ्यांवर पट्टी का ?
पण एक लक्षात असु देत,
नाही करीत आम्ही,
राजकारण सुडाचे, घोटाळ्यांचे,
जमिनी लुटण्याचे, अन आर्थिक भानगडीचे,
आहेत अनेक गट अन तट,
परंतु त्यामागेही दडलंय कपट,
तुमच्या कुटील राजकारणाचे.!
धडधडते छाती भीतीने,
ऐक्याच्या रेट्याने,
डोईजड होण्याची,
सत्ता खेचून घेण्याची,
सुरुंग पेरून,
अन मने कलुषित करून,
दुभंगून ठेवलीय चळवळ,
मतदानाच्या हव्यासापोटी निखळ.!
आहोत आम्ही आशावादी,
अभिमानाने जयभीमचा,
जयघोष करणारे आंबेडकरवादी,
कुणीतरी ऐक्याची मोळी बांधेल,
विखुरलेले मोती एकत्रित गुंफेल,
समजूतदारपणे कवटाळून ठेवेल,
ऐक्याच्या वज्रमूठिने,
झेंडा निळा, अधिक तेजाने,
डौलाने फडकत राहील.!
झेंडा निळा, अधिक तेजाने,
डौलाने फडकत राहील.!!
झेंडा निळा, अधिक तेजाने,
डौलाने फडकत राहील.!!!
अरुण निकम.
9323249487
मुंबई.
दिनांक…04/07/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत