वडेट्टीवारांच्या टिकेला मनावर घेवून शिंदे-फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

विरोधकांच्या टीकेनंतर बाधितांना सरसकट मदत देण्याची ग्वाही अवकाळी, गारपीट आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रू असताना राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री मात्र दुसऱ्या राज्यातील निवडणूक प्रचारात दंग होते, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना वेळच नसल्याची टीका विरोधी पक्षतेने विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सरकारवर केली. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी मंत्र्यांसमवेत नागपूर जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून बाधितांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी स्थगनच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्याच्या व्यथा सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. वडेट्टीवार यांनी विधानसभेत राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, मीचाँग चक्रीवादळामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे सांगत सरकारला धारेवर धरले. देशात शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. कापूस, धान, संत्रा, द्राक्ष, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री व अन्य मंत्री निवडणूक प्रचारात होते अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळताना ४० तालुक्यांना केंद्रांच्या निकषाप्रमाणे जशी मदत दिली जाणार आहे. तशीच मदत राज्य सरकार आपल्या निधीतून १२०० दुष्काळी महसुली मंडळातील शेतकऱ्यांना देणार आहे. तसेच दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी अशा सर्वांचीच नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत