समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावरून सचिन सावंत यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना डिवचले

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पावरून काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना डिवचले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पास विरोध करणारे शेलार हे महायुतीच्या काळात महापालिकेकडून या प्रकल्पासाठी निविदा मागविल्या असताना गप्प कसे, असा सवाल सावंत यांनी केला आहे. यावर भूमिकेवर ठाम असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पावरून शेलार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आणि जनतेच्या पैशांची लूट असल्याचे आरोप केले होते. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची गरजच काय, समुद्रात मुंबईचे सुमारे ४०० कोटी लिटर सांडपाणी सोडले जाते, त्यात प्लॅस्टिक, सेंद्रीय पदार्थ व जीवाणूही असतात. उद्धव ठाकरे हे दुर्गंधीयुक्त प्रदूषित पाणी कमिशन मिळविण्यासाठी गोडे करून मुंबईकरांना पाजणार आहेत. आता तुम्हाला पाणी पाजण्याची वेळ जवळ येत आहे, असे शेलार यांनी नमूद केले होते.
मनोरी येथे होणाऱ्या या सुमारे तीन हजार ५२० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. सावंत यांनी शेलार यांच्या आघाडी सरकारच्या काळातील वक्तव्यांचा उल्लेख करून भाजपला असा बदल कसा जमतो? असा प्रश्न केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत