जातीची घोंगडी बाजूला करून सलोख्याची चादर विणूया


जातीवादाच्या आयचा घो
जाती साठी माती का शेण ?
क्रॉसलाईन
दैनिक लोकाशा 9613331111
आता पुरे झाले म्हणावे जातीच्या नावाने दुकान चालवणारे फोफावले आणि सलोखा गुदमरायला लागला . जातीवर गेल्याने अंगातले रक्त रंग बदलत नाही फक्त बदलतात ते दृष्टीकोण , मग सलोख्याचे षटकोन होतात आणि गावकीच भावकी सारखी वागू लागते . बीड जिल्ह्यात या पेक्ष्या वेगळे काही नाही लोकसभेच्या निमित्ताने जाती आकुंचित झाल्या जातीचा निकष तडीला गेला. गेली 20 वर्षे जे छुप होत ते उघड गुपित झालं . कन्यादानात जात होती ती मतदानात आली , जातीअंतचा लढा टकमक टोकावर आला . सलोख्याचे भाषने स्वराज्याची विन उसवू लागली , बुद्धिजीवी रेट्यापुढे शांत पहुडली आणि जातीवाद केवळ माजला नाही तर बोकाळला आहे .
राम राम ची जागा आता जय ……अमुक तमुक आणि जातीच्या ओळखी देऊ लागली . जातिवादाचा चंचू प्रवेश विंचू बनून सलोख्याला डसु लागला . किराणा दुकान ते अगदी महाराज आपल्याच जातीचा असे ठराव जाहीर होऊ लागले . अरे ज्या वारकरी संप्रदायात समता शिकवली , संत चोखा महार संत सावता माळी संत भगवान बाबा वंजारी संत तुकाराम कुणबी अरे संत कान्होपात्रा तर एका गणिकेची पोर , आम्हाला लाजा कशा वाटत नाहीत संताना जातीत वाटून घेताना . …x.. खाऊन तुमच्या तोंडावर थुकाव जातीवाद्याने जातीवादी छिद्रच्या तोंडावर . सलोख्याचा वाहक आता वाहता झाला पाहिजे नाहीतर चार टकूच्यातला जातीवाद आता समाजाचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही .
हा कमी नाही तो कमी नाही नाव एकाला ठेवायची बिसाद नाही , सब घोडे बारा टके झाले आहे . बहूचे पाय पोटाकडे ओढले गेले मात्र त्यात स्वाभिमान कमी आणि अभिमान अधिक आहे यातून तेढ तणाव वाढतो आहे हे थांबले पाहिजे . एका गावात एका व्यक्तीने घेतलेला ठराव घोषणा म्हणजे त्या समाजाची नसते .महंत नामदेव शाष्ट्री आणि प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी हा समाज उभा केला आहे . नारायणगड आणि भगवानगड एकोप्याने सलोख्याने समाज उभा करण्यात वारकरी विचार पेरतात आणि माझ्या सारख्या लबाड लोकांनी महाराज देखील जातीत वाटून घेतले . महाराजांच्या डोक्यात देखील जातीचे किडे नको तर तुकोबांचे अभंग असावेत याची काळजी करणे निकड आहे .
शिक्षक पत्रकार बुद्धिजीवी उठा कसले झोपला आहात . हे बिनबुडाचे ढोपर सोलली नाहीत तर हे माणसात माणूस ठेवणार नाहीत . आपण आपल्या व्यक्तगत भावना सोशल मीडियात पोष्ट करून समाजावर लादू शकत नाहीत . आणि महत्वाचे समाजात देखील अश्या पोष्टला जास्त भाव देण्याची गरज नाही कारण एका व्यक्तीने पोष्ट केली म्हणजे ते मत काय समाजाचे नसते त्यामुळे त्या व्यक्तीचे पाप समाजाच्या मापात टाकले नाही पाहिजे . वंजारा मराठा हा वाद गावकीतला नाही तो आहे राजकीय जो लावला नेत्यांनी स्वतःच्या लाभासाठी आम्ही तो वाद वाढवण्यात काही अर्थ नाही. उद्या आग लागली तर घागर घेऊन शेजारी पळणार आहे नेता सकाळी सांत्वन करायला . म्हणूनच आम्हाला जातीवाद निजवावा लागेल कारण तो माताळला तर सलोखा मावळला जाईल . जातीची घोंगडी बाजूला करून सलोख्याची चादर विणूया
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत