दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मी जन्मानं एकनाथ दगडू आवाड…

माझे आईबाप मांग. धर्मानं हिंदू. माझ्यावर धाडले गेलेले मारेकरीही मांग. धर्मानं हिंदू . समोर कुणीही असू दे पार्था, हत्यार उचल. मारणं- मरणं हे तुझ्या हाती. पाप-पुण्याचा हिशोब मी करेन.… असं तत्त्वज्ञान सांगणारा हिंदू धर्म. मनुष्य व्यवहारांना अठरा लक्ष योनींच भय घालणारा. गुलामांची कप्पेबंद चळत उभारणारा हिंदू धर्म.

याच धर्मानं माझ्या मायबापाला कष्टात खितपत ठेवलं. याच धर्मानं माझ्या जातीला शिक्षणापासून लांब ठेवलं, गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केलं. मी तो मार्ग नाकारला. माझी वाट चालत इथवर आलो. जातीशी भांडलो, जातीबाहेरच्यांशी भांडलो. कार्यकर्ता झालो, नेता झालो. माझ्यातल्या उर्मीनं मला इथवर आणलं. पण मग माझ्यावर हल्ला करणारे गुन्हेगार का झाले ? माझं आयुष्य घडलं तसं त्यांचं का घडू शकलं नाही ? का त्यांना पैशांची भुरळ पडली ? कारण त्यांना सतत ‘ मांग ‘ ठेवण्यात आलं ? कुणी ठेवलं ? या समाजव्यवस्थेनं. नव बौद्धांनीही मांगांना आपलं मानलं नाही. वेगळं वागवलं म्हणून ते भरकटले. मग आमच्यासाठी खरा मार्ग कोणता ? मुक्ती कोण पंथे ? अर्थात बाबासाहेबांनी दिलेला मार्गच खरा अक्षय मार्ग. ती वाट कुठे जाते ? बुद्धाकडे. मनात विचार येऊ लागला – मी बौद्ध धर्म स्वीकारावा का ???

मी तर आधीपासूनच मनानं बौद्ध आहे. १९७८ साली मी मुलाचं नामकरण ‘ मिलिंद ‘ असं केलं तेव्हा मनानं बौद्धच होतो. पुढं पोतराज वडिलांचे केस कापले, घरातले देव नदीत फेकले, तेव्हा माझा धर्म कोणता होता ? बौद्धच ! मनुष्य बौद्ध होतो म्हणजे काय होतो ? राम- कृष्णाची पूजाअर्चा सोडून भगवान बुद्धाची आराधना करू लागतो ? बुद्ध तसबिरीत, मूर्तीत, लेण्यांमध्ये कुठे असतो ? बुद्धगया हे का बौद्धाचं तीर्थक्षेत्र ? भंतेजी हे बौद्धांचे भटजी ? नाही, असं नाही. बुद्धाला तथागत हि उपाधी आहे. म्हणजे एक विशिष्ट अवस्था सातत्याने धारण केलेला ; राग, लोभ, मोह, मत्सर यांपासून अलिप्त बुद्ध. बुद्ध हा कर्ता विचारवंत. बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला बुद्ध जीवनसंमुख आहे. तो सामाजिक प्रश्नांची उत्तर शोधतो, प्रश्न सोडवण्याचा मध्यममार्ग सांगतो. बुद्ध म्हणजे आपलं पूर्ण उमललेलं रूप. म्हणूनच बुद्धांची प्रतिमा पूर्ण उमललेल्या कमळ पाकळ्यांवर बसलेली असते.

बुद्ध देवळात नसतो, तीर्थक्षेत्रात नसतो, लेण्यांमध्येही नसतो. बुद्ध आपल्या अंतरात असतो. बीजात सुप्त अंकुर असतो त्याप्रमाणे बुद्ध आपल्यात असतो. या अंकुराची रूपं निरनिराळी. आपली मुलंबाळं सांभाळणं, त्यांना सुशिक्षित करणं, योग्य मार्गान उदरनिर्वाहाची वाट दाखवणं, गरिबी असली तरी टुकीचा संसार करणं, दारू- व्यभिचारापासून लांब राहणं, न्यायासाठी लढण, विषमतेला समाजजीवनातून हद्दपार करू पाहणं, आपल्यातील प्रज्ञा – शील – करुणा या जाणीवा हळूहळू विकसित करणं म्हणजे आपल्या आतील बुद्धाला उमलण्याची संधी देणं, बहुसंख्य महार जात या वाटेनच पुढं गेली. उत्कर्ष करती झाली. मांग जातीनं हि वाट का स्वीकारू नये ???
सर्वानीच तथागत व्हावं असं नाही, पण त्याची वाट चालावी, म्हणजे आपण मनुष्यत्वाला तरी गाठू शकतो. मी मनानं बुद्धाची वाट चालत आलोय, म्हणूनच हा विचार मला सुचतोय.

  • एकनाथ आवाड ( ‘ जग बदल घालूनी घाव ‘ या आत्मचरित्रातून )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!