1 ऑक्टोबर 1941 बेळगाव येथे महार रेजिमेंटची स्थापना.⚔⚔
1 ऑक्टोबर 1941 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे बेळगाव येथे पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना झाली.
महार सैनिक हे पराक्रमी होते. त्यांच्या स्वामीनिष्ठेची दखल ब्रिटिशांनी घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ साली महार रेजिमेंटसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बेळगाव येथे १९४१ साली पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना झाली.
आज महार रेजिमेंटच्या एकूण २३ बटालियन आहेत.
१९४७ साली काश्मीर फ्रन्ट, १९६२ चीन-भारत युद्ध, १९६५ नि १९७१ भारत-पाक युद्ध, यामध्ये महार रेजिमेंटने भाग घेतला.
महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांना एक परमवीर चक्र, चार महारवीर चक्र, २९ वीर चक्र, २ कीर्ती चक्र, एक अशोक चक्र, ५ परमविशिष्ट पदक, असे अनेक सन्मान महार रेजिमेंटच्या निरनिराळ्या बटालियनातील सैनिकांना मिळालेले आहेत.
महार सैनिकांचा लढावू इतिहास तसा फार जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात महार ही लढाऊ जात अग्रेसर होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात १३ महार किल्ल्यांचे प्रमुख किल्लेदार होते. आज ढाले नाव लावणार्यांचे पूर्वज सैन्यात ढालीसारखे पुढे असत म्हणून त्यांना ‘ढाले’ असे नाव पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक हा महार होता. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा वाक्प्रचार सुपरिचित आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे महार सैनिकांचे एक दलच होते आणि हे दल आघाडीवर जाऊन लढणार्या सैनिक पथकातील असायचे. या कारणांमुळे पहिला बाजीराव हा त्यांना विशेष मानाने वागवीत असे. महार सैनिक हे हिंमतवाले, पराक्रमी आणि शत्रूवर एल्गार करणारे होते.
महार जातीविषयी सैनिक म्हणून जे गुण वर सांगितले आहेत ते अगदी योग्य आहेत. पण महार जातीत असलेली स्वामीनिष्ठा, इमानदारी, कळकळ या गुणांची दखल तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने घेतली होती. त्यामुळे त्यांना नाशिक व अलिपूर येथील गव्हर्नमेंट सेक्युरिटी प्रेस येथील गार्ड, रेल्वे मध्ये गेटमन, चाबीवाला, खलाशी, पॉईंटमन, पोस्ट खात्यातील रनर म्हणजे पोस्टाचे पत्र मनिऑर्डरचे पैसे घेऊन जाणारा, शेतसारा वसूल करणारा कोतवाल अशा प्रकारच्या नोकर्यांमध्ये महार जातीला समाविष्ट केले जात असे.
१ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज-मराठय़ांच्या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला. हे युद्ध कोरेगाव जि. पुणे येथे झाले. ब्रिटिशांच्या सैन्यात महार सैनिक होते. (२/१ बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फन्ट्री) ह्या लढाई मध्ये पेशवा साम्राज्याचा अंत झाला. या लढाईमध्ये जे २२ महार सैनिक धारातीर्थी पडले त्यांची नावे विजयस्तंभावर (कोरेगाव) कोरली आहेत.
ब्रिटिशांनी महू येथे महार बटालियनची स्थापना केली. तेथे सुभेदार मेजर रामजी सपकाळ शिक्षक म्हणून होते. हे डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचे वडील होते. महुलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. १८९२ मध्ये ही बटालियन विसर्जित करण्यात आली आणि नंतर सुभेदार मेजर रामजी सपकाळ महाराष्ट्रात दापोलीला (रत्नागिरी) परतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार बटालियनची पुनर्स्थापना व्हावी म्हणून १९३९ साली तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर यांची भेट घेतली. हिंदुस्थानच्या कमांडर-इन-चीफ फिलिप्स चेटवूड यांना महार रेजिमेंट निर्माण करण्याची गळ घातली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीला सैनिकी पेशामध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नशील होते. पण त्यांना यश मिळाले ते व्हाईसरॉय लिनलिथगोच्या संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य असताना.
पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना १ ऑक्टोबर १९४१ ला बेळगाव येथे झाली. नंतर १९४२ साली कामठी येथे आणि १९४३ साली नौशेरा येथे (पंजाब आता पाकिस्तानात) झाली. डॉ. बाबासाहेबांनी महार बटालियनचं पुनर्जिवन केले, असे म्हणणे उचित ठरेल. कारण महार बटालियन सुरू व्हावी म्हणून डॉ. आंबेडकरांचे वडील सुभेदार मेजर रामजी मालोजी सपकाळ हे प्रयत्नशील होते. त्यांच्या कार्याला सक्रीय सहाय्य करणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन पहिल्या महायुद्धाच्या काळात जून १९१७ ला १११ महार बटालियन पंजाब रेजिमेंटच्या ७१ बटालियनमध्ये सामील करण्यात आली. नंतर जागतिक मंदी १९२९-३० मध्ये आल्यानंतर ही बटालियन विसर्जित करण्यात आली.
संकलन:-मंगेश नामदेव गायकवाड पुणेशहर
🙏🌹जय❁भिम…नमो❁बुद्धाय🌹🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत