आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

धर्मशास्त्रापेक्षा अर्थशास्त्र श्रेष्ठ असते.

प्रा. डॉ. आर. जे. इंगोले

 जगातील एक मान्यता पावलेला अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत कार्ल मार्क्स असे म्हणतो की, “ धर्म ही आफुची गोळी आहे.” आणि आपल्या देशात २०१४ ला जे भाजपा सरकार सत्तेत आले आहे त्यांचा सुद्धा सत्तेवर येण्याचा आधार धर्माचे राजकारण आहे. कारण त्यांची मातृसंस्था आर.एस.एस. आहे जे आपल्या देशात लोकांना १९२५ पासून असे सांगतात की, आपल्या लोकांची आर्थिक प्रगती नाही झाली तरी चालेल पण लोकांनी धर्म जपला पाहिजे, धर्मासाठी काहीही केले पाहिजे. आणि त्यामुळे आपले प्रधानमंत्री आपल्याला पाकिस्तान आपला शत्रू आहे ,मुस्लिम आपला शत्रू आहे असे सतत सांगत असतात. आज अनेक अंधभक्तांना रोजगार ,अरोग्य ,शिक्षण ,पाणी ,रस्ते या बाबी महत्वाच्या वाटत नाहीत पण हिंदूधर्म महत्वाचा वाटत आहे. त्यामुळे यांना एखाद्या लहान मुलीवर ,एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर काहीच वाटत नाही पण गाय मारली तर हे आपल्याच बांधवाचा जीव घ्यायला तयार आहेत. आणि आपल्याच देशात एखाद्या मणीपुर सारख्या राज्यात आपल्याच भगिनीची नग्न धिंड काढली जाते तरी, आपल्याला याचे काहीच वाटत नाही. बदलापूर येथील आपल्याच लहान मुलीवर अत्याचार होतात तरी आपल्या सरकारला याचे काहीच वाटत नाही.अयोध्येत राममंदिरात सफाईचे काम करणार्‍या मुलीवर अत्याचार होतो पण याची दखल कोणालाच घ्यावी वाटली नाही याला आपण काय म्हणावे ? मणीपुर आणि बदलापूर येथील अन्याय झालेल्या महिला आणि मुली तर हिंदुच होत्या ना ! मग हिंदू धर्माची यांची व्याख्या आहे तरी काय ? तसे तर आपल्या देशात राहत असणार्‍या कोणत्याच नागरिकावर मग स्त्री असो की पुरुष आणि कोणत्याही धर्माचा असेल तरी त्यावर अन्याय व्हायला नको कारण ते आपल्या देशाचे नागरिक आहेत. पण एवढी उदात्त भावना असायला असे राष्ट्रप्रमुख हे लोकशाही मानणारे असायला पाहिजेत तरच हे शक्य होईल. आणि आपले प्रमुख तर देशात हुकूमशाही विचारसरणी असणारे आहेत मग कसे शक्य होईल. कोणताही देश धर्म पुढे करून देशाला पुढे नेऊ शकत नाही हा आजपर्यंतचा जगाचा इतिहास आहे. जगात अनेक मुस्लिम राष्ट्रे आहेत पण ते सुद्धा आज लोकशाही मार्गावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि लोकशाहीत राष्ट्राला धर्म नसतो तर, व्यक्तीला धर्म असतो. आणि तो सुद्धा खाजगी असतो म्हणजे त्याने त्याच्या घरात धर्म पाळायचा असतो. पण आपल्याकडे तर २०१४ पासून धर्म रस्त्यावर आला आहे. त्यामुळे एखाद्या आखलाखला गाईचे मांस घरात ठेवल्याच्या फक्त संशयावरून ठेचून जमावाने जीव मारले हा लोकशाहीचा नाही तर, आपला पराभव आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. एकदा २०१४ ला जेंव्हा माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, “ राजसत्ते पेक्षा धर्म सत्ता मोठी आहे.” तेंव्हाच यांचा अंदाज आला होता की, पुढे काय होणार आहे. आणि कदाचित नियतीने त्यांना पुन्हा सत्तेवर येण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी पुन्हा संधी दिली नाही. आणि आता २०२४ ला सुद्धा केंद्रात संधी हुकली होती. पण दोन बाबूमुळे  यांना संधी मिळाली त्यांना सुद्धा राजकीय जीवनात पुढील काळात याचा पश्चाताप होईल अशी मला खात्री आहे.

                           जगातील कोणताही धर्म हा जीवन जगण्याचा मार्ग सांगत असतो पण हा मार्ग सांगत असतांना आणि समोर बसलेले लोक ऐकत असतांना एक अट असते की, सांगणार्‍याचे आणि ऐकणार्‍याचे पोट शांत असले पाहिजे. म्हणजे निदान त्याला आवश्यक तेवढे अन्न तरी त्याला मिळाले पाहिजे. बौद्ध धम्मात एक प्रसंग आहे की, एकदा एक बुद्धाचे अनुयायी धम्माचे प्रवचन देण्यास सुरवात करतात आणि त्यांना असे लक्षात येते की, कोणीच त्यांचे विचार लक्षपूर्वक ऐकत नाही. तेंव्हा त्यांना प्रश्न पडतो की, असे का होत आहे पण त्या भंतेंना याचे उत्तर लक्षात येत नाही मग ते भंते तथागत बुद्धाकडे जातात आणि त्यांना असे विचारतात की, “ तथागत मी या लोकांना धम्माचे अनमोल विचार सांगत आहे पण कोणीच माझे ऐकत नाही ,याचे कारण काय आहे ?” यावर तथागत त्या भंतेंना सांगतात की, “ या लोकांना अगोदर अन्नाची गरज आहे ,त्यांना अन्न ग्रहण करून येऊ द्या.” ते सर्व  अनुयायी अन्न ग्रहण करून येतात आणि मग बुद्धाचे प्रवचन लक्षपूर्वक ऐकतात. याचा अर्थ काय आहे तर शारीरीक गरज पूर्ण झाल्यावर मग लोकांचे लक्ष एखाद्या कार्यात लागते. म्हणजे धर्मापेक्षा त्यांना अन्न जी एक प्राथमिक गरज आहे ती अगोदर पूर्ण झाली पाहिजे. मग तुम्ही लोकांना कोणतेही तत्वज्ञान सांगू शकता. पण आपल्या देशात २०१४ पासून सर्वात महत्वाचा धर्म आहे असे लोकांना सांगितले जात आहे. म्हणजे आपण साधे लॉजिक समजू शकतो की, या जगात अगोदर मानव असेल का धर्म असेल तर याचे उत्तर आपण थोडा बुद्धीवर जोर दिला तर लक्षात येईल की, अगोदर मानव आहे. कारण जेंव्हा जगात पहिला मानव जन्माला आला असेल तेंव्हा त्याला प्रथम जीवन जगणे आणि आपले अस्तित्व टिकवणे हे प्रथम काम असेल. आणि जर आपण पाहिले तर मग पुढे मानवाचे बोलणे ,संवाद आणि लिहणे आणि वाचने या तर फार अलीकडील संकल्पना आहेत. आणि मग पुढे धर्म संकल्पना आली आहे. जो डार्विनचा उत्क्रांतीवाद सांगितला आहे त्यामध्ये मानवाची उत्क्रांती म्हणजे मानव विकसित होत गेला आहे. आणि मग आपण डार्विनचे तत्वज्ञान पाहिले तर मग धर्म ही आफुची गोळी हे कार्ल मार्क्सचे वाक्य आपणास सत्य आहे असे लक्षात येईल. आणि आज मानव प्रगती करीत असतांना आपण जर विचार केला तर अनेक देशातील लोक धर्म कल्पना आणि धर्म आचरण यापासून दूर जात आहेत. आज जगात औष्ट्रेलिया ,कॅनडा ,आयलँड ,नेदरलँड , न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंड अशा विकसित राष्ट्रामधून धर्म संकल्पना धूसर होत चालली आहे. अमेरिकेत ५ कोटी ८० लाख लोकांनी असे सांगितले आहे की, आम्ही कोणत्याही धर्माचे पालन करीत नाही आणि विशेष म्हणजे धर्म न मानणार्‍या लोकांनी अमेरिकेत त्यांनी गट आणि संघटना स्थापन केल्या आहेत. अमेरिकेत आता धर्मनिरपेक्ष तत्वावर राज्यव्यवस्थेचा भर आहे. आणि त्यामुळे जगात आज धर्म ही व्यक्तीगत बाब समजली जात आहे. आणि त्यामुळे जग आज कोणत्या दिशेला जात आहे आणि आपल्या देशात जर आपण विचार केला तर आपल्या देशातील राजकारण ,समाजकारण आणि अर्थकारण हे धर्माच्या भोवती फिरतांना दिसत आहे. आणि आज जो देशात कट्टरतावाद वाढला आहे त्याचा परिणाम आपण आर्थिक विकासात मागे जात आहोत. आज लोकांना खायला अन्न नाही पण धर्म वाढला पाहिजे  आणि आपलाच धर्म श्रेष्ठ आहे ही भावना भारतात वाढत आहे. ८० कोटी लोकांना धान्य मोफत मिळत आहे. ही अभिमानाची नाही तर लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा दूरगामी परिणाम पुढील अनेक पिढयावर होणार आहे. म्हणून आपल्या देशात मांदिरे नविन बाधली जात आहेत आणि जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला जात आहे पण आपल्या शाळा मात्र अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. २० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर अशा ग्रामीण भागातील शाळा बंद केल्या जात आहेत. आणि जपान देशाचे एक उदाहरण सांगितले जात आहे की, या देशात एक रेल्वेमार्ग आहे त्या रेल्वेत एकच प्रवासी आहे पण ती रेल्वे जपान देशाने चालू ठेवली आहे. कारण त्या रेल्वेत एक मुलगी शिक्षण घेण्यासाठी रोज जाते. त्या मुलींसाठी ती रेल्वे जपान देशाने सुरू ठेवली आहे. आणि आपला इतिहास आहे की, कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज हे त्यांच्या कोल्हापूर संस्थानाच्या उत्पन्नाच्या २६ टक्के खर्च शिक्षणावर करीत होते आणि ते सुद्धा राजेशाही असतांना आणि आज लोकशाहीत वरचे ६ टक्के सुद्धा खर्च होत नाही. आणि म्हणून म्हटले जात की, “ ये तुम्हे फ्री राशन देंगे लेकीन फ्री शिक्षा नही देंगे क्योंकी शिक्षा सवाल पैदा करती है ” आणि यांना प्रश्न विचारणारे लोक नको आहेत. म्हणून आपल्याला धर्माच्या नादी लावले जात आहे आणि आपल्या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

        पण आज आपल्याला धर्मापेक्षा अर्थशास्त्र महत्वाचे आहे हेच लोकांना सांगावे लागेल. कारण आपल्या जीवनात अर्थ असेल तर जीवनाला अर्थ आहे. आणि जेंव्हा आपण अन्न ,पाणी आणि इतर गरजा यांचा विचार करतो तेंव्हा अर्थशास्त्राचा जन्म होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हिन्दी मध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे की, “ पैसा सबकुछ नही लेकीन बहोत कुछ है ”  याचा अर्थ काय तर मानवाला जीवन जगण्यासाठी अर्थ म्हणजे पैसा अवशयक आहे. आणि आपल्याला आर्थिक कंगाल करून फक्त आज धर्माची नशा दिली जात आहे. आज देशात महागाई किती वाढत आहे. पण आपल्याला सांगितले जात आहे की,  पाकिस्तान आपला शत्रू आहे आणि मुस्लिम या देशातून बाहेर काढले पाहिजे मग आपल्या हिंदू बांधवांना थोडे बरे वाटते. पण हे वास्तव नाही. आपल्याला धर्माच्या नादी लावून यांनी रिजर्व बँक लुटली ज्याचा इतिहासात रेकॉर्ड आहे की, आज आपली रिजर्व बँक दिवाळखोरीत जाण्याच्या मार्गावर आहे म्हणजे आपण व्यापारी बँका दिवाळखोरीत गेलेल्या पाहिल्या आहेत. पण देशाची प्रमुख बँक म्हणजे RBI कधी दिवाळखोरीत गेली असे झाले नाही. पण आज ते झाले आहे. मागील लोकसभेच्या निवडणूक काळात सरकारने RBI कडून १.६५ लाख कोटी काढून घेतले आणि आता RBI ची राखीव रक्कम ३० हजार कोटीवर आली आहे. २०१८ मध्ये ऊर्जित पटेल RBI चे गव्हर्नर होते. तेंव्हा केंन्द्र सरकारने सर्व नफ्याचे पैसे बँकेकडे मागितले आणि पण ऊर्जित पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि मग त्यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असतांना बांग्लादेशाच्या युद्धाप्रसंगी त्यांनी सुद्धा RBI कडे ७० हजार कोटी मागितले होते पण रिजर्व बँकेने स्पष्ट नकार दिला आणि सरकारने ते मान्य केले होते. पण २०१४ नंतर मात्र सर्व नियम आणि कायदे बदलून मागील ५ वर्षात ५० कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. सर्व कर्जे बुडाली आणि ७० हजार कंपन्या नविन कर्जे घेऊन उभ्या राहिल्या कारण यांना अर्थशास्त्र समजत नाही तर धर्मशास्त्र हेच यांचे हत्यार आहे आणि त्याचा वापर करून देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला नेऊन ठेवली आहे.

      समाजजीवनात एक साधा नियम आहे की, व्यक्तीने किंवा समाजाने प्रगती करण्यासाठी एक तर  स्वत:ला समजले पाहिजे किंवा दुसर्‍याचे तरी ऐकले पाहिजे. पण यापैकी यांना दोन्ही जमत नाही. यांना अर्थशास्त्राचे काही कळत नाही आणि हे दुसर्‍याचे ऐकत नाहीत. जे अर्थशास्त्रात विद्वान होते त्यांचे यांनी ऐकले नाही उलट ते लोक बाहेर देशात गेले. म्हणजे आपल्या देशातील अर्थशास्त्रात विद्वान असणारे अमर्त्य सेन , रघुराम राजन ,ऊर्जित पटेल , हे व्यवस्थेच्या बाहेर आहेत आणि यांचे थोडे फार चांगले राजकारणी होते ते सुद्धा यांच्यापासून दूर गेले आहेत ते सुब्रहमण्यम स्वामी ,यशवंत सिन्हा ,शत्रुघ्न सिन्हा , सत्यपाल मलिक आणि मग आता कोण राहिले आहेत तर या सरकारचा एक रेकॉर्ड आहे की, या सरकारमध्ये साधू लोकांचा भरणा फार मोठा आहे. आता ज्यांना संसार नाही ,मुले नाहीत आणि कोणत्याच जबाबदार्‍या नाहीत तर हे लोक देशाचा कारभार कसा चालवणार आहेत ? आणि पुन्हा एक रेकॉर्ड जो आपला विषय आहे की, अर्थशास्त्र याबाद्दल  तर यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले आहे की, इतिहास विषयाचा व्यक्ती RBI चा गव्हर्नर झाला आहे. आणि दुसरे म्हणजे अर्थशास्त्राचे विद्वान लोक या सरकारपासून दूर आहेत. कारण एखाद्याने आपल्या देशाबद्दल सत्य सांगितले की, यांना सहन होत नाही. यांना फक्त जी हुजूर करणारे पाहिजेत. आणि असे जागतिक अर्थशास्त्रातील विद्वान हे जी हुजूर करणारे नसतात आणि मग यांनी त्यांना देशद्रोही करून टाकले. आणि सरकार मध्ये जे आहेत त्यांना धर्म सोडून काहीच सुचत नाही आणि धर्मसुद्धा यांना माहीत नाही. यांना धर्म कोणता माहीत आहे तर जो यांची मातृसंस्था (RSS) सांगते तो धर्म आहे. आणि आर.एस.एस. चा धर्म हा अंधभक्त तयार करतो नागरिक तयार करीत नाही. हे सर्व देशाने आणि जगाने पाहीले आहे. आणि आज आपल्या देशात सामान्य लोक त्यांचे पोट भरण्यात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना ही व्यवस्था काय आहे ? आणि हे कोण चालवते ? त्यांचा अजेंडा काय आहे ? हे माहीत नाही. आपल्या देशातील ७५ ते ८० टक्के लोकांना RSS  काय आहे याचा पत्ताच नाही. कारण त्यांना मोफत रेशन , लाडकी बहीण आणि शेतकरी यांच्या खात्यात वर्षाला एक छोटी रक्कम टाकली की, लोक त्याची वाट पाहतात आणि त्यावर चर्चा करतात आणि ज्यांना थोडे फार समजते त्यांना बेरोजगार केले आहे. आज अनेक उच्च शिक्षित लोक रोजगार नाही म्हणून खूप मोठया तणावात जीवन जगत आहेत. ते विचार करण्याची पात्रता असूनसुद्धा विचार करू शकत नाहीत. त्यांना महात्मा फुले यांच्या भाषेत वित्ता विना शूद्र खचले | या अवस्थेत नेऊन व्यवस्थेने टाकले आहे. कारण मागेच आपण सांगितले आहे की, पोटात अन्न नसेल तर सामान्य माणूस बुद्धाचे तत्वज्ञान ऐकत नाही तर मग आमच्यासारख्या सामान्य लोकांचे कोण ऐकणार आहे ? समाज आणि मानव आर्थिक स्थिर नसेल तर मानसिक स्थिर राहू शकत नाही. मी अनेक विद्वान पाहिले आहेत ते लोक उच्च शिक्षित आणि विद्वान आहेत पण त्यांना व्यवस्थेने रोजगार दिला नाही म्हणून ते आज या व्यवस्थेबद्दल काहीच बोलत नाहीत. मी आज हे लिहत आहे यांचे कारण मी आर्थिक स्थिर आहे मला उद्याचे आपले काय होईल म्हणजे घर कसे चालणार आहे ? याची चिंता नाही आणि त्यामुळे मी लिहत आहे. कारण पहिले माणसाचे मन स्थिर पाहिजे तर तो समाजाचा आणि देशाचा विचार करू शकतो. पण या आर.एस.एस.चे षडयंत्र असे आहे की, लोकांना आर्थिक अस्थिर करायचे आणि त्यामुळे लोक वास्तविक स्थितीचा विचार करू शकत नाहीत. आणि २०१४ ला याची सुरुवात झाली आहे. आज आपल्या देशातील सामान्या माणूस एका अस्थिर स्थितीत आपले जीवन व्यतीत करीत आहे ,आज तरुण वर्ग अस्थिर आहे ,शेतकरी अस्थिर आहे , कर्मचारी सुद्धा अस्थिर आहे ,अनेक कंत्राटी कर्मचारी हे कायम होण्याच्या आशेवर आहेत पण कधी होतील हे सांगता येत नाही. आणि अनेक तरुण या आशेवर आहेत की, आपल्याला नौकरी मिळेल पण मागे एक सरकारचा सर्वे आला आहे की, आज आपल्या देशात जी बेकार लोकांची स्थिती आहे ती मागील चाळीस वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी वाढली आहे.  आणि जागतिक बँक आणि IMF सारख्या संस्थांनी आपल्याला गंभीर इशारा दिला आहे की ,आपल्या देशावर झालेले कर्ज मर्यादेच्या पुढे गेले आहे. म्हणजे मागील दहा वर्षात जे कर्ज सरकारने घेतले आहे ते आजपर्यंत घेतलेल्या कर्जाच्या चारपट आहे आणि ते सुद्धा त्याचा विनिमय दर हा जुना २०११ चा गृहीत धरला आहे जर २०२३ चा नविन विनमयदर धरला तर मग ते सहापट होत आहे. ही माहिती देणारा साधा व्यक्ती नाही तर जो व्यक्ती भारताचा एक अर्थतज्ञ आहे आणि तो अमेरिकेच्या बोष्टन विद्यापीठात प्राध्यापक आहे. त्यांनी World Bank आणि IMF सारख्या जगतील संस्थेत अर्थतज्ञ म्हणून काम केले आहे आणि त्याने India’s Fake Story या नांवाने एक लेख लिहला आहे आणि यात हे सर्व संख्याशास्त्र सांगितलेले आहे.  आता एवढे सत्य बाहेर आले तरी लोकांना हे माहीत नाही आणि ज्यांना माहीत झाले त्यांना हे पटत नाही कारण यांना अर्थशास्त्र महत्वाचे नाही तर धर्मशास्त्र महत्वाचे वाटत आहे. आणि धर्माची नशा दारूच्या नशेपेक्षा जास्त घातक असते याबद्दल आपले प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की,

“ तुम्ही दारूची दुकाने काढा ,पण मंदिरे बांधू नका.

कारण दारूची नशा उतरते पण देवा –धर्माची नशा कधीच उतरत नाही.”

आज आपली अवस्था अशीच झाली आहे. आज वास्तव कोणीच स्वीकारायला तयार नाही. जो तो गळ्यात भगवा रुमाल घेतला की, जय श्रीराम ,वंदे मातरम म्हणत पुढे जात आहे पण यांचा मेंदू इतर लोक कंट्रोल करीत आहेत हेच आपल्या बहुजन समाजाला समजत नाही. कारण नशा धर्माची आहे आणि अर्थशात्र काही समजत नाही. आता जे राज्यकारभार करतात त्यांनाच समजत नाही तर या अंधभक्तांना कधी समजेल ? आणि अर्थशास्त्र काही बाजारातील भाजीपाला नाही की, कोणालाही समजेल त्याला मोठी कठीण तपश्चर्या लागते जी आपल्या देशातील डॉ.अमर्त्य सेन ,डॉ. रघुराम राजन , ,डॉ.भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, या अर्थतज्ञांना समजते पण त्यांना तर व्यस्थेच्या बाहेर काढले आणि साधू – सन्याशी सोबत घेऊन कुठे देश पुढे जाणार आहे का ? जर तुम्हाला आजार झाला असेल तर डॉक्टर कडेच जावे लागेल इतर व्यक्तीकडे जाऊन काहीच उपयोग नाही. आणि जगाचा इतिहास आहे की, आजपर्यंत जे जे देश पुढे गेले आहेत त्यांनी आपल्या देशातील बुद्धिमान लोकांना सोबत घेऊन प्रगती केली आहे. आपण एकमेव देश आहे की, २०१४ नंतर साधू आणि सन्याशी घेऊन संसद उद्घाटन केले आणि पूजा आणि अनेक अनावश्यक विधी केले यामुळे आपला देश १०० वर्ष मागे गेला आहे. आपले मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊन आणि अनेक मंदिरात जाऊन साकडे घालतात की, पाऊस पडू दे, जनतेची प्रगती होऊ दे आणि जनता सुखात राहू दे! एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी आणि शिक्षक असल्यामुळे मला तर वाईट वाटते की, जर हे आपल्या हातात आहे की, या जनतेचा आणि राज्याचा विकास करायचा तर मग देव आणि मंदिरात जाऊन काय होणार आहे ? देशाच्या संविधानात दिलेल्या कायदे आणि योजनांचा वापर करा आणि आपल्या हातात असणार्‍या पेनचा वापर करा आणि समाजाचा विकास करा. इथे देव आणि धर्माचा विचार काय कामाचा ? मी अनेक वेळा सांगितले आहे की,धर्म ही आपली खाजगी बाब आहे ती रस्त्यावर कधीच आणू नका. पण आज एवढा मोठा वापर सुरू आहे की, एका राज्याचा आणि देशाचा प्रमुख असतांना आणि लोकशाहिची ताकद जवळ असतांना इतर काल्पनिक गोष्टीकडे कशाला लक्ष देत आहेत हेच मुळात संविधान विरोधी आहे. आणि आज आपले सर्व प्रमुख राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांनी ज्या लोकांना जगात समाजसुधारक ,विद्वान आणि वैज्ञानिक म्हणून मान्यता आहे यांच्या देव आणि आणि धर्माबद्दल असणार्‍या विचाराचा अभ्यास केला पाहिजे. कारण आपण तर एवढे विद्वान होऊ शकत नाही.  पण निदान त्यांनी आपल्यासाठी काय सांगितलेले आहे याचा विचार तर करू शकतो . यातील कांही जागतिक दर्जाच्या विद्वान लोकांचे विचार पुढीलप्रमाणे आहेत.

“ इस ब्रम्हाण्ड मे कोई ईश्वर नही है    – तथागत बुद्ध. 

“ ईश्वर केवल शोषण का नाम है ”     – सुकरात.

“ ईश्वर का जन्म ही गहरी साजिश मे हूआ है ”  – कार्ल मार्क्स.

“ इस देश मे जो नौजवान ईश्वरवादी है , मेरी नजर मे नामर्द है ”   – शहीद भगतसिंह

“ पुरे विश्व मे अगर कोई यह  साबित करे की, ईश्वर है तो मै आपणा सर्वस्व उसे दे दुंगा”  

  –स्टीफन हॉकिंग.

                                                                                        प्रा. डॉ. आर. जे. इंगोले

                                                                                नाशिक. मोबा: (९४२३१८०८७६ )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!