उप वर्गीकरणाची झलक!
उप वर्गीकरण कसे असेल, त्याची उदाहरणासह झलक पहा. उप वर्गीकरणाचे स्वागत, समर्थन करणाऱ्या तथाकथित नेत्यांच्या डोळ्यांत त्यातून झणझणीत अंजन पडेल, अशी अपेक्षा आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत महार/बौद्ध समाज ६० % आहे. मातंग समाज १८ %, चर्मकार समाज १० % आणि उरलेल्या ५६ जातींचे प्रमाण १२ % आहे.
या अर्थाने, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींना मिळणारे १३ % आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरण केल्यास १३ % आरक्षणातून अ) – महार/बौद्ध समाजाला ७.८ %, ब)- मातंग समाजाला २.३४ %, क)- चर्मकार समाजाला १.३ आणि ड)- उर्वरित ५६ जातींना १.५६ आरक्षण मिळेल.
सध्या महाराष्ट्र विधानसभेत सन २००१ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीसाठी २९ जागा राखीव आहेत. 29 पैकी….
१) चर्मकार समाजाचे १.३ % प्रमाणे ३ आमदार असायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात आजघडीला ११ आमदार आहेत.
२) महार/ बौद्ध समाजाचे ७.८ % प्रमाणे १७ आमदार असायला हवे होते.
पण प्रत्यक्षात सध्या केवळ ८ आमदार आहेत.
३) मातंग समाजाचे २.३४ % प्रमाणे ५ आमदार असायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात सध्या ४ आमदार आहेत.
४) तसेच उर्वरित ५६ जातींचे १.५६ % प्रमाणे साडेतीन आमदार हवे होते. परंतु प्रत्यक्षात ६ आहेत. त्यापैकी बुरड – २, बलाई -१, खाटिक- १, वाल्मिकी-१ आणि कैकाडी-१आमदार निवडून आले आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब,क,ड वर्गीकरण केले तर १३ टक्के आरक्षणातील महार/बौद्ध क्र. ३७ चा वाटा ७.८ % असल्यामुळे त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. उलट त्यांचा फायदाच होणारआहे.
अनुसूचित जातीच्या लिस्ट मध्ये क्र. ४६ वर प्रमुख मातंग व अन्य लहान ७ जाती म्हणजे एकुण ८ जाती आहेत. मातंग जात शिक्षणात पुढारलेली असल्यामुळे २.३४ % आरक्षणातूून मातंग जातीला जास्त फायदा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे बाकीच्या ७ वंचित जाती वेगळे आरक्षण मागतील.
त्याप्रमाणे क्र. ११ वर प्रमुख जात चांभार व अन्य लहान ३३ जाती म्हणजे एकुण ३४ जाती आहेत. चांभार जात शिक्षणात पुढारलेली असल्यामुळे १.३ % आरक्षणातून चांभार जातीलाच जास्त फायदा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे बाकिच्या ३३ वंचित जाती वेगळे आरक्षण मागतील. उर्वरित १.५६ % आरक्षणात ५६ जातींचीही मातंग आणि चर्मकार जातिप्रमाणेच गत होणार हे निश्चित आहे.
थोडक्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरणातून मातंग, चर्मकार किंवा उर्वरित ५६ जातींच्या हाती काहीच लागणार नाही.उलट अशा वाटण्या करून आहे ते ही आरक्षण घालवून बसावे लागेल.
केंद्र व महाराष्ट्रातील भाजप सरकार तर आरक्षण घालवायलाच बसलेले आहे. परंतु प्रश्न असा आहे की चर्मकार आणि मातंग समाजातील तथाकथित नेत्यांचे शहाणपण गेले कुठे? अशा प्रकाराच्या अव्यवहार्य, आत्मघातकी मागण्या करण्याऐवजी या नेत्यांनी समाजातील मुला – मुलींना स्पर्धेसाठी तयार राहा, असे ठणकावून सांगितले पाहिजे आणि एकत्रित १३ टक्के आरक्षणातील जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे. नाहीतर भावी पिढ्या आमच्या फोटोला जोड्याने बडवत म्हणतील की यांच्याच मूर्खपणामुळे आम्ही आरक्षण गमावले हो!!
अच्युत भोईटे (बी.कॉम.एमबीए)
संस्थापक तथा राष्ट्रीय संयोजक,
दि बुध्दिस्ट शेड्युल कास्ट मिशन ऑफ इंडिया.
मो. 9870580728.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत