कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ
“संविधानाचे मंदिर” ही मूर्खपणाची संकल्पना; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सर्वधर्मसमभाव अन् धर्मनिरपेक्ष तत्वालाच हरताळ फासण्याची ही सनातनी, मनूवादी चाल!
विक्रांत पाटील
- भाजपने शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान मंदिर बांधण्याची नवी सनातनी टूम आता काढली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात, भारतीय घटनेच्या 25व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्यानुसार, भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे. वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही. त्यामुळेच कोणत्याही शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये अन् आस्थापनांमध्ये कोणतेही धार्मिक स्थळ उभारत येत नाही किंवा कोणतेही धार्मिक आयोजन करता येत नाही.
- भाजपाने “संविधानाचे मंदिर” उभारले तर बौद्ध, शीख, ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू व इतर धर्मीय विद्यार्थ्यांनी काय करायचे? मग संविधानाचे चर्च, संविधानाची मशीद, संविधानाचे गुरुद्वारा आदी सुद्धा उभारणार का? कोणत्याही गोष्टीचे दैवतीकरण करणे आणि त्याला सनातनी कर्मकांडात अडकवून त्याचे महत्त्व संपवून टाकणे, हा कावा यामागे असू शकतो. या मनूवादी सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेसुद्धा दैवतीकरण करण्याचा खेळ चालवला आहे. त्यातच आता संविधान अन् मग संविधानकार बाबासाहेबांचेसुद्धा ही मंडळी दैवतीकरण करू पाहतील. दैवतीकरण म्हणजे सनातनीकरण, कर्मकांडकरण! हा संविधानकार अन् संविधानाच्या आत्म्यावरच हल्ला आहे. हा संविधानात नमूद धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. हा माणसाच्या माणूसपणावर हल्ला आहे.
- देशाचे संविधान, धर्मनिरपेक्षता संपवण्याचे भाजपाचे हे नवे सनातनी षड्यंत्र म्हणायला हवे. करायचेच असेल तर तुर्कमेनिस्तान या मुस्लीम लोकशाही राष्ट्राचा आदर्श घेऊन “संविधान स्मारक” उभारा, “संविधान स्तंभ” उभारा. आजही देशात काही ठिकाणी संविधान प्रस्तावना स्मारक स्तंभ दुर्लक्षित अवस्थेत आहेत, त्यांची स्थिती सुधारा. ही मंडळी तसे करणार नाही. कारण मंदिर बांधून दैवतीकरण केले की, पुढे कर्मकांड करता येतात, घंटा बडवता येतात आणि नंतर बडव्यांची सोयही लावता येते. “मंदिरवाल्या सनातनी” मंडळींकडून बहुजनांना, दलितांना, मागासवर्गीयांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला जात होता म्हणून तर बाबसाहेबांवर आपल्या लाखो अनुयायांना घेऊन धर्मांतर करण्याची वेळ आली होती. त्याच बाबासाहेबांच्या संविधानाला कुणी पुन्हा मंदिराच्या पाशात अडकवू पाहात असेल, तर ही चाल ओळखा.
— विक्रांत पाटील 8007006862 WA
Vikrant@Journalist.Com
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत