वैचारिक गोंधळामुळे बहूजन गुलाम आहे…!!
भास्कर भोजने.
मुठभर सवर्ण कोणत्याही क्षेत्रात असो.आपल्या हक्क आणि अधिकारासाठी जागरुक आहेत….!!
कर्मठ सनातनी सवर्ण,विवेकवादी सवर्ण,कर्मकांडी सवर्ण,पुरोगामी सवर्ण,सेक्युलर सवर्ण,डाव्या विचारांचा सवर्ण,समाजवादी विचारांचा सवर्ण, कुठल्याही विचारांचा, कुठल्याही पंथाचा,कुठल्याही वर्गाचा सवर्ण असो जेव्हा जेव्हा सवर्णांच्या हक्क आणि अधिकाराची बाब समोर येते तिथं सर्वांचे एकमत असते ही कृती त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष पटवून देते. आणि म्हणूनच मुठभर असुनही सवर्ण सर्वच सत्ता ताब्यात ठेवून आहेत….!!
बहूजन ८५% असुन विभाजित अवस्थेत आहे. त्यांची वैचारिक अवस्था गोंधळलेली आहे. आणि कमालीचे राजकीय अज्ञान आहे आणि म्हणून त्यांची ऐकी नाही..!!
बहुजनांची एकतर धर्माच्या नावाखाली विभागणी करण्यात आली आहे.एका धर्माचा बहूजन दुसऱ्या धर्माच्या बहूजनाला शत्रू समजूनच वागतोय आणि जगतोय.धर्म ही एक तटबंदी आहे…!!
दुसरी तटबंदी म्हणजे बहूजनाला जातीत आणि पोटजातीत विभाजित केले आहे. सात हजारांहून अधिक तुकडे तुकडे तुकडे करून बहूजनाला क्षीण करुन टाकले आहे…!!
एका बहूजनाने दुसऱ्या बहूजनाला दुश्मन समजले पाहिजे अशी तजवीज इथल्या धर्माच्या, पंथाच्या ठेकेदारांनी करुन ठेवली आहे. वैचारिक, सांस्कृतिक,धार्मिक मतभेद कायम रहावे म्हणून सवर्णांचे वर्षभर कार्यक्रम सुरू असतात आणि विष पेरणी केली जाते. मने कलुषित करण्याचा सपाटा सुरू असतो…!!
या तुकड्यांना जोडल्या शिवाय ऐकी होणार नाही. एकत्र आल्याशिवाय सत्ताधारी होता येणार नाही हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हेरले. म्हणून संवैधानिक शस्त्राचा वापर करीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सात हजारांहून अधिक असलेल्या तुकड्यांना जोडण्याचे ऐतिहासिक काम केले….!!
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी, एस. सी. एस. टी. अल्पसंख्याक असे सुटसुटीत आणि मोजके संवर्ग तयार करुन बहुजनांना जोडण्याचे ऐतिहासिक कार्य केले. बहुजनांच्या आपसी ऐकीचा पर्याय निर्माण केला. बहुजनांच्या ऐकीचे पर्यायाने सत्तेचे सुत्र मांडले…!!
ओबीसी जागरूक झाला आणि त्यांचा वैचारिक गोंधळ संपला. राजकीय अज्ञान घालवले.आपणं ओबीसी आहोत धर्म,जात आणि पोटजात चार भिंतीच्या आत ठेवून जन्म,मृत्यृ,आणि लग्न यासाठी वापरतं. आपल्या समान हक्क आणि अधिकारासाठी राजकीय क्षेत्रात एकमेकांना भाऊबंद समजून एकत्र येऊन कार्य करु असे त्याने ठरविले तर तो बहुमताचा हक्कदार होतो. आणि सत्ताधारी होऊ शकतो. परंतु तो गेल्या ७४ वर्षात जागरुक झाला नाही ही दुर्दैवी बाब आहे….!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १३% संख्या असलेल्या एस. सी संवर्गामध्ये महाराष्ट्रात ५९ जाती एकत्र केल्या आहेत. एस. सी. ची १३% संख्या ही सवर्णांच्या पेक्षा अधिक आहे. एस. सी. मधील ५९ जाती एकत्र येण्याऐवजी आपसात भांडून दुही माजविण्यात धन्यता समजू लागले आहेत.त्याचा परिणाम म्हणून कालचा सुप्रीम कोर्टाचा एस. सी. आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय आला आहे…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना ३४० कलमानुसार आरक्षण दिले. आपल्या हक्क आणि अधिकारा प्रती ते जागरुक नसल्याने ओबीसी बांधवांना ते नियमित करता आले नाही. ४० वर्षे उदासिनतेत गेली चाळीस वर्षानंतर मंडल आयोग लागू झाला. आणि सवर्णांनी एकमताने त्यामध्ये अडथळे निर्माण करुन क्रिमिलेअर लावले, राज्यघटनेत उल्लेख नसुनही आरक्षण ५०% असावे असा कोर्टाच्या तोंडून निर्णय करुन घेतला आणि ओबीसी समुहाच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणली…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ३४१ व्या कलमानुसार ५९ जातींना एस. सी. मानुन आरक्षण दिले. ५९ जातींना एका पंगतीत बसविले भाऊबंद बनविले. नवी भावकी तयार केली.मात्र जात आडवी आली अबकड श्रेणी हवी अशी दुहीची भाषा आणि कृती सुरू झाली. सवर्णांनी हेतूपूर्वक सत्तेचा वापर करून कोर्टाच्या तोंडून एस. सी. आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय दिला आहे आणि एस. सी. च्या आरक्षणाला कात्री लावण्याचे षडयंत्र यशस्वी होतांना दिसतं आहे…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिले ते ओबीसी, एस. सी. एस. टी. समूहांना कमालीच्या अज्ञानामुळे आणि वैचारिक गोंधळामुळे टिकवता आले नाही. एकंदरीत आरक्षणचं धोक्यात आले आहे हे ८५% बहूजनांनी लक्षात घेतले पाहिजे…!!
ओबीसी आरक्षणाला क्रिमिलेअर लावले, आणि राज्यघटनेत नमूद नसतांनाही ५०% ची अट घातली गेली. एस. सी. एस. टी. आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा कोर्टाचा निर्णय आला आहे….!!
हा सवर्णांच्या हातात सत्ता असण्याचा परिणाम आहे….!!
सांसदीय लोकशाहीला ७४ वर्षे झाली आहेत तरीही सवर्णांचे राजकीय पक्ष कोणते.? हेही ओबीसी, एस. सी. एस. टी. यांना ठरविता आले नाही ही वस्तुस्थिती आहे….!!
सवर्णांना भारतीय संविधान नको आहे. आणि इथला ओबीसी एस. सी. एस. टी. संविधान वाचविण्याची जबाबदारी सवर्णांच्या कॉंग्रेस सारख्या राजकीय पक्षावर सोपवतो हे कमालीचे राजकीय अज्ञान आणि वैचारिक गोंधळ इथल्या बहुजनांच्या गुलामीला कारणीभूत आहे….!!
बहुजनांनो वेळीच जागृत व्हा.
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत