राजकीय सत्ता कोण पथे ?
प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
भारतात जो एक वंचित घटक आहे यात आपण साधारण 85% लोक आहेत असे गृहीत धरतो.आणि 85% विरुद्ध 15% असे राजकारण आणि समाजकारण पूर्वीच आपल्या अनेक विचारवंतांनी सांगितलेले आहे. आपल्या देशात कोणत्याही निवडणुका आल्या की, आंबेडकरी नेते किंवा आता आपण बहुजन नेते यांच्या तोंडी एक वाक्य नेहमी असते आणि ते म्हणजे “ जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचे आहे.” असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपणास सांगून गेले आहेत असे म्हटले की, त्याठिकाणी जे लोक असतात ते टाळ्या वाजवतात आणि थोडा वेळ भावनिक होतात. काही काळ त्यांना असा भ्रम सुद्धा होतो की, आता आपण यावर्षी सत्ता स्थापन करू शकतो. आणि मला वाटते अशा अनेक वेळा आपल्या जीवनात आल्या आणि गेल्या पण आपण काही शासन कर्ती जमात बनलो नाही. मग याचे कारण काय असेल याचा विचार ना कधी आपल्या राजकीय नेतृत्वाने केला ना आपल्या मतदारांनी केला आहे. आणि असे अनेक वर्ष निघून गेले आणि आपल्या आंबेडकरी समाजाची सत्ता एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सुद्धा एका हाती आली नाही. याचे परीक्षण आपण केले नाही. आपल्या देशातील अनेक महापुरुषांनी सांगितलेल्या अनेक विचार आणि शिकवणुकीचा आपण जास्त खोलवर विचार केला नाही. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या देशात संविधान अंमलबाजवणी होण्याच्या अगोदर वंचित घटकाला आरक्षण दिले होते. आणि त्यामुळे अनेक वर्ष आपल्या भारतीय समाजात शाहू महाराजाबद्दल अनेक गैरसमज होते. आणि आजसुद्धा केवळ आरक्षण या एका गोष्टीमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाचा त्यांच्यावर राग आहे. याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे आपल्या समाजातील उच्च शिक्षित लोकांनी सुद्धा आरक्षण काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे नीट समजूनच घेतले नाही. आणि त्यामुळे आजसुद्धा तो संघर्ष आरक्षण समजून न घेता चालू आहे. आरक्षण हा रोजगार देण्याची योजना नाही तर तो एक वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. आणि असे अनेक विषय आहेत किंवा आपल्या सर्वच महापुरुषांचे विचार आहेत ते आपण नीट समजून न घेतल्यामुळे हा सर्व अनर्थ झाला आहे.
आता आपल्याकडे राजकीय सत्ता याचा विचार करतांना आपण नेहमी सांगतो की, आंबेडकरी समाज हा राजकीय जागृत आहे, त्यांना जास्त पुस्तके वाचण्याची सवय आहे, देशात सर्वात जास्त ग्रंथ विक्रीचे रेकॉर्ड आमचे नागपुर आणि मुंबई येथील कार्यक्रमाचे असते. याची चर्चा आपण सोशल मीडियावर पाहतो. हे सर्व जरी खरे असले तरी एक खंत आहे की, आपला समाज ग्रंथ वाचतो पण राजकीय नेते वाचतात का ? हा प्रश्न आहे. याला चार दोन अपवाद असतील . पण इतरांचे काय ? आणि त्यामुळे आपल्याकडे देशात सुद्धा असेच आहे की, जनता जास्त शिक्षित आणि नेते कमी शिक्षित आहेत. आणि त्यामुळे सत्ता कशी स्थापन करावी आणि त्याचे सूत्र काय आहे हा आपल्या समाजातील नेत्यांना विसर पडला. आणि यात पुन्हा वंचित समाजातील नेत्यांना विसर पडला हे जास्त धोकादायक आहे. आपले आदर्श आणि महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास सत्ता स्थापन करण्याचा सिद्धान्त दिला आहे. पण आपण तो नीट समजून घेत नाहीत, आणि त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आपला प्रत्येक पक्षाचा नेता असा विचार करतो की, आपले आमदार येतील आणि महाराष्ट्रात आपली सत्ता येईल आणि लोकसभेत सुद्धा काही प्रादेशिक पक्ष असा विचार करतात की, आपले खासदार येतील आणि आपला प्रधानमंत्री होईल. आता हे आम्ही मागील 20-30 वर्षापासून ऐकत आहोत पण स्थिती उलट झाली की, आपले लोकप्रतींनिधी कमी होत चालले आहेत आणि आता तर 2024 ला कोणी निवडून आलेच नाही. आता असे का होते याचा अभ्यास आपण आणि विशेषकरून आपल्या नेतृत्वाने केला पाहिजे.
जेंव्हा आपण असे म्हणतो की, “ जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे.” तेंव्हा यात अर्थ असा अपेक्षित आहे की, आपला बहुजन समाज एकत्र आला पाहिजे. आता बहुजन समाज संकल्पना आपणास माहीत असेल की, या देशातील सर्व जाती आणि धर्म फक्त ब्रह्मामण सोडून आता फक्त ब्रह्मामण सोडून म्हटल्यावर काही आपल्याच लोकांना वाईट वाटते. याचे एक कारण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रह्मामणा काय म्हणाले आहेत हे त्यांना माहीत नाही. किंवा ते धूर्तपणे लोकांना सांगत नाहीत आणि दुसरे एक कारण आपल्या अनेक लोकांनी ब्रह्मामण मुलीशी लग्न केले आहे. आता मग घरात विरोध कसा करावा. यामुळे मग बहुजन हिताय ,बहुजन सुखाय असा आपला मुळ नारा असतांना यांनी एक नविन नारा आणला की, सर्वजण हिताय ,सर्वजण सुखाय आणि सर्व अनर्थ इथेच झाला. ही जमात विषारी आहे हे आपणास आपल्या फुले ,शाहू ,आंबेडकर विचारधारेने सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, “ Brahmin is the Poison ,which spoiled Hinduism and India also.” कोल्हापूरचे छ्त्रपती शाहू महाराज म्हणतात, “ जर ब्रह्मामण एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणत असेल तर काहीतरी गडबड आहे समजा.” आदर्श शिक्षक राष्ट्रपिता ज्योतीराव फुले म्हणतात, “ माझ्या मृत्यूनंतर माझ्या मृत्यूशयेवर या भटांची सावली सुद्धा पडू देऊ नका.” आणि शेवटी ज्यांना हे हिंदू धर्माचे रक्षक म्हणतात आता ही एक ब्रह्मामणी चाल आहे. ते स्वामी विवेकानंद म्हणतात की, “ आपले संस्कार ठराविक जातीच्या वा कुलाच्या भटावाचून होवूच शकत नाहीत हा भाबडेपणा सोडून द्यावा, पूजा ,पाठ ,गौरी ,गणपती ,सोयर –सूतक ,संक्रांत ,द्वादशी ,दसरा ,दिवाळी अशा शकडो प्रसंगी भटाला बोलावूच नये. भटावाचून काहीही आडत नाही, हवं असल्यास स्वत: पोथी वाचावी.अथवा शुद्ध मराठीत ते शब्द व भाव व्यक्तवून ज्याची त्याने पूजा करावी उपयुक्त संस्थास दक्षिणा द्यावी. भटास शहाणा म्हणू नका ,की भटशाही संपलीच म्हणून समजा.” (संदर्भ : चित्रलेखा, 19 सप्टेबर 2011). देशाचे दुश्मन या ग्रंथाचे लेखक आणि पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ मा. दिनकरराव जवळकर म्हणतात, ब्रह्मामणाशी सलोखा कसला करता ? यापेक्षा सर्पाशी मिठी मारा ,तो तुमचा प्राण घेईल,पण ब्रह्मामण अनेक पिढया बरबाद करील.” आणि केल्या आहेत आपणास किती पुरावे पाहिजे आहेत आजपर्यंत सर्व यांचा इतिहास आहे. आणि असे असेल तर मग आपले राजकीय नेतृत्व जे स्वत: आंबेडकरी म्हणतात ते कशासाठी या भटाना सोबत घेऊन राजकारण करतात. या देशातील राजकीय ,प्रशासकीय आणि धार्मिक सत्तास्थानाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, हे 3.00 टक्के लोक आपल्या संपूर्ण समाजावर नियंत्रण करतात याचे कारण मला तर वाटते आपली मानसिकता आहे. आपल्याला म्हणजे आपल्या विनाकारण असे वाटते की, हे ब्रह्मामण जास्त विद्वान असतात. आणि याच मानसिकतेमुळे आपले नेते सुद्धा त्यांना डोक्यावर घेतात. पण आपण हे विसरतो की, आपले बहुजन महापुरुष यांच्याबद्दल काय म्हणतात हे आपण वर दिलेच आहे ते आपण आणि आपल्या राजकीय नेत्यांनी विसरता कामा नये. आणि आणखी एक पुरावा त्यांच्या बुद्धिमान नसण्याबद्दल देतो आणि तो सुद्धा साधा पुरावा नाही तर ज्या महामानवाला जगाने मान्यता दिली आहे असा जागतिक विद्वान म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की, “ ब्रह्मामण हुशार असतात ,पण बुद्धिमान नसतात.” आणि पुढे याचे स्पष्टीकरण असे केले आहे की, ब्रह्मामण हुशार असतात म्हणजे त्यांच्या हुशारीचा वापर ते फक्त त्यांच्या समाजासाठीच करतात आणि जे लोक बुद्धिमान असतात ते आपल्या बुद्धीचा वापर संपूर्ण समाजासाठी करतात आणि हाच फरक आहे हुशार आणि बुद्धिमान लोकांचा तसेच आपण पाहिले असेल की, आपले सर्व महापुरुष त्यांच्या बुद्धीचा वापर आपल्या संपूर्ण समाजासाठी करतात. हे बुद्धिमत्तेचे सर्वात चांगले रुप असते. आणि आपण या हुशार म्हणजे धूर्त लोकांनाच विनाकारण आजपर्यन्त बुद्धिमान समजले आहे.
आपण राजकीय सत्ता का प्राप्त करू शकत नाही हा आपला लेखाचा मुख्य विषय आहे. तर आपल्या समाजात म्हणजे विशेषकरून आंबेडकरी समाजात एक मोठा दोष आहे की, आपण संख्येने कमी आहोत आणि राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी संख्या महत्वाची आहे. आणि आपण पुन्हा कहर म्हणजे आपल्याच समाजात अनेक गट आहेत. आणि प्रत्येक गट अशी अपेक्षा करतो की, आम्ही सत्तेत येणार आता कसे येणार ? हा प्रश्न आहे. इथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास सांगितलेला राजकीय सिद्धान्त उलट सिद्ध होतो. आपल्याला राजकीय संघटन करतांना आणि राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी बहुजन समाज एकत्र करावा लागेल आणि त्यासाठी आपणच एकटे मतदान करून सत्ता प्राप्त करू असे होणार नाही . सर्वात जुनी राजकीय पार्टी RPI याचा जरी आपण इतिहास पाहिला तर यात सर्व प्रकारचे लोक असावे अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती आणि तशी तयारी त्यांनी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरकरांच्या महापारिनिर्वणानंतर लगेच पक्ष स्थापन झाला आणि त्याचे तुकडे सुद्धा झाले. तसे ही घटना खूप वेदनादायी आहे. पण त्यानंतर आंबेडकरी समाजाचे संघटन कधीच होऊ शकले नाही. आणि मग जसा काळ पुढे जाईल तसे नविन पक्ष आणि नविन सामाजिक संघटना निर्माण झाल्या आणि यात आपल्याला कोण्या एका पक्षाला दोष देता येणार नाही. पण यात एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे इथे प्रत्येक पक्षप्रमुखाचा स्वार्थ आणि अहंकार आड येतो आहे. या दोन गोष्टी आपणास प्रथम सोडून द्याव्या लागतील आणि मग पुढचा टप्पा आणखी अवघड आहे आणि तो म्हणजे आपल्याला इतर बहुजन समाज यांना आपल्या सोबत आणावे लागेल. याची व्यापकता जेवढी वाढेल तेवढा पक्ष मोठा होत जाईल. आता निवडणूक कोणतीही असेल तरी आपणास उमेदवार देतांना एखाद्या विभागात कोण व्यक्ती कार्यक्षम आहे याचा विचार प्रथम करावा लागेल आणि त्यानुसार सर्व जाती आणि धर्माचे लोक आपल्याला उमेदवार द्यावे लागतील. इथे जात ,धर्म आणि पंथाचा खोटा अभिमान नसावा. कारण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की, “ आपल्या देशात जेवढे नुकसान या जाती व्यवस्थेने केले तेवढे कशानेच केले नाही.” याला बाबासाहेब ब्रह्मामण्याग्रस्त होणे असे म्हणतात आणि एकदा हा रोग समाजाला झाला की, मग आपल्या समाजाचे अध:पतन कोणीच रोखू शकत नाही. मग आपल्याला विनाकारण असे वाटते की, आम्ही कोणातरी पेक्षा श्रेष्ठ आहोत. आपण तसे नसतो पण आपली तशी मानसिकता तयार होते. याचे मुख्य कारण आहे की, आपल्या देशातील वर्णव्यवस्था आणि ती अनेक पिढयापासून चालू ठेवली ते भट लोकांनी आणि आज आपण पाहतो की, आपल्या समाजात अनेक जाती आणि धर्म आहेत अनेक जातीत उप-जाती आहेत. त्याचे प्रकार आणि असमानता याचा अभ्यास केला तर आपले डोके सुन्न होऊन जाते. आणि म्हणून मागे एक सोशल मीडियावर एक मेसेज फिरत होता की, पुरोगामी लोकांनी या बहुजन समाजाला कितीही सांगितले तरी या समाजात असे लोक आहेत की, ते ब्रह्मामणाला अनेक धार्मिक कार्यक्रमात पूजेला बोलवतील आणि अनेक निरर्थक विधी करून घेतील. आणि आज आपण समाजात पाहतो की, हे सत्य होताना दिसत आहे. आपले अनेक समाजबांधव आपल्या कोणत्याही महापुरुषासाठी स्वत:चा जीव देतील आणि अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण आपल्या महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे त्यापेक्षा जास्त अवघड आहे ते करणात नाहीत. आपण भावनिक होऊन काही मिनिटाच्या मानसिक अवस्थेत असतो आणि जीव देण्याची क्रिया घडते पण आपण सावध राहून आणि त्याग करून आपल्या सर्व महापुरुषांनी सांगितलेल्या विचाराचा अभ्यास करून मार्गक्रमण करणे मोठे मुश्किल काम आहे. ते फार थोडया लोकांना जमते. अशा थोडया लोकांनी समाजाचे नेतृत्व करावे आणि इतर समाजाने त्यांच्या मागे जावे लागेल तर आपल्याला आपले उद्दीष्ट साध्य करता येईल. आज आपला प्रत्येक बहुजन नेता आपला झेंडा हातात घेऊन पुढे येत आहे आणि समाजाला एक स्वप्न दाखवत आहे ते कधीच पूर्ण होणार नाही. कारण आपण आपल्या महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गापासून दूर जात आहोत. आणि यामुळे आपली आणि आपल्या समाजाची फसवणूक करीत आहोत. आणि प्रामाणिक नेते कोण आहेत याची एकच खूण आहे आणि ते म्हणजे एखादा नेता मग तो कोणत्याही पक्षाचा असेल तरी त्याची संपती समजा मागील दहा –वीस वर्षात मोठया प्रमाणावर वाढली की, समजा काहीतरी गडबड आहे. पण आता होते काय की, आपल्या अनेक नेत्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे ,अनेक व्यवसाय ,उद्योग आहेत, अनेक मोठया शहरात बंगले आहेत मग हे सर्व असेल तर असा नेता आपल्या समाजाला कधीच पुढे घेऊन जाणार नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी उपदेश करताना सांगतात की, आपला नेता कसा असावा ? तर ते म्हणतात की, “ तुमचे आणि पुढार्याचे हित एक असेल ,जे स्वार्थी नसतील असे पुढारी निवडा. दुसर्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील व दिशाभूल करतील, ते तुम्हास दगा दिल्याशिवाय राहणार नाहीत.” आता जर आपण ही कसोटी आपल्या कोणत्याही नेत्यास लावली तर या कसोटीवर कोणीच उतरणार नाही. मग आता यावर उपाय काय आहे ? तर मला माझ्या छोटयाशा बुद्धीने वाटते की, आपण आपल्या सर्व समाजाने आता राजकारण आपल्या हातात घेतले पाहिजे. आणि जशी 2024 ची लोकसभा जनतेने हातात घेतली होती तसे आपणास करावे लागेल. मतदार जेंव्हा आपला पाठींबा काढतो त्यावेळी नेता कोणताही असेल तर त्याला माघार घ्यावी लागते. आपण 2024 ला पाहिले असेल केंद्रात मंत्री असणार्या नेत्यांना सुद्धा जनतेने घरी पाठवले. हेच आपणास करावे लागेल. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय सिद्धांताविरोधी जर आपले नेते वर्तन करीत असतील तर मग तो नेता आंबेडकरी असो किंवा बहुजन असो त्याला हा एकच मार्ग आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील नगिना मतदार संघातील जनतेने प्रस्थापित पक्षांना नाकारत नविन पक्ष आणि नविन उमेदवार म्हणजेच मा. खासदार चंद्रशेखर आझाद यांचा झालेला विजय आपणास दिसतो आहे. आज बहुजन राजकारण इतके खाली आले आहे की, आता याशिवाय पर्यायच नाही. आता जाती आणि धर्माचे नेते सोडून एक व्यापक राजकीय समीकरण तयार करावे लागेल आणि बहुजन नेता आणि बहुजन मतदार अशी एक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. स्वातंत्र्या नंतरचे 70 वर्ष हेच जाती आणि धर्माचे राजकारण झाले आणि आता 2014 नंतर तर याचा कहर झाला आहे. आता कुठे तरी हे थांबले पाहिजे. कारण आपला देश धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारलेला आहे. आणि आपले संविधान सुद्धा आपल्याला तेच सांगते. आणि म्हणून आपल्या देशात आता जात आणि धर्म सोडून आपणास आम्ही भारताचे लोक याने सुरुवात करावी लागेल. आपल्या अनेक बहुजन नेत्यांना हे कळते पण वळत नाही असेच म्हणावे लागेल. आपले अनेक नेते त्यांच्या भाषणात हिंदुस्तान असा उल्लेख करतात याचे फार आश्चर्य वाटते. आणि यात काही तर कायद्याचे पदवीधर आहेत. जर आपल्या संविधानात हिंदुस्तान शब्द नसेल तर मग आपण का वापरायचा ? हा प्रश्न यांना का समजत नसेल याचे नवल वाटते. आपल्या देशाची ओळख बाहेर India अशीच आहे. या धार्मिक आणि कट्टरवादी संघटना आणि पक्षांनी आपल्या देशाचे फार मोठे नुकसान केले आहे. निदान आता तरी याला आपण जनतेने थांबवले पाहिजे. यासाठी आपणास राजकीय सत्ता कोण पथे ? याचा विचार करावा लागेल. आपला देश धर्मावर आधारित नाही तर संविधानावर आधारित आहे. आपल्या देशातील अनेक शिक्षकांना हे माहीत नाही की, ज्या शिक्षण संस्थेला शासनाचे अनुदान आहे अशा त्याठिकाणी कोणत्याही जाती आणि धर्माचे शिक्षण आपणास देता येत नाही. आणि कोणत्याही धर्माचे सण –उत्सव साजरे करता येत नाहीत. पण हे सर्रास अनेक ठिकाणी चालू आहे. हा जाती आणि धर्माचा संस्कार शाळेत दिला तर पुढे तयार होणारा नागरिक असाच तयार होणार. त्यामुळे इथे आपण जबाबदारीने वागले पाहिजे. लहान मुलातून आपण भारतीय नागरिक तयार केला पाहिजे. अशा नागरिकाचा धर्म त्याच्या घरात असेल आणि बाहेर तो एक जबाबदार भारतीय नागरिक असेल तरच आपला देश जागतिक महासत्ता बनेल, नाही तर या विश्वगूरूच्या संकल्पना काल्पनिक राहतील यात शंका नाही. आणि जे भ्रमात आहेत त्यांना भ्रमनिरास होईल.
प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
नाशिक (9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत