बुद्ध जयंतीचा संदेश..!

दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने सर्वांना बुध्द जयंतीच्या हार्दिक मंगल कामना ..
आशिया खंडातील सर्व देश आणि युरोपमधील तसेच अवघ्या विश्वात वैशाख पोर्णिमा अर्थात बुद्धजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
भारतातील पूर्वीचा प्रांत आणि आताच्या नेपाळ येथील लुम्बिनी वनात सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. बिहार येथील बोधगया येथे त्यांना ज्ञान प्राप्त झाले, बुद्ध झाले आणि कुशीनगर येथे बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. या तीन घटना म्हणजे जन्म, ज्ञानप्राप्ती, आणि महापरिनिर्वाण हे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले होते. म्हणून वैशाख पोर्णीमेला बौद्ध संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
आपण आज जे सुखा-समाधानाचे जिवन जगत आहोत ते आणि ते फक्त बाबासाहेंबांमुळे…! बाबासाहेबांमुळेच आपल्याला बुध्द आणि बुध्दाचा धम्म कळालेला आहे. बाबासाहेंबांनी बुध्दांचा धम्म दिल्यामुळे आज आपण बुध्द पौर्णिमा साजरी करत आहोत. मग बुध्द पौर्णिमा साजरी करायचे म्हणजे नेमके काय करायचे? तर बुध्द जसे सांगतात तसे बुध्दाच्या गुणांचे आपल्या जिवनामध्ये अनुसरण आणि आचरण करणे होय. जो पर्यंत जिवनामध्ये आचरण होत नाही, तो पर्यंत बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होणे अशक्य आहे. धम्माचे संस्कार रुजवले जात नाहीत, तोपर्यंत वैचारीक, विज्ञानवादी, बुध्दिवादी समाज निर्माण होणार नाही. त्यामुळे सर्वांनी बुध्दाचा धम्म धारण करणे गरजेचे आहे.
तथागत बुद्ध हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही सर्वांत श्रेष्ठ व्यक्ती आहेत. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने जगातील ‘टॉप 100’ विश्वमानवांची यादी तयार केली, ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय.
तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी म्हणजे २.३ अब्ज असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक व तत्त्वज्ञ आहेत. जगाच्या पाठीवर अनेक बौद्ध देश आहेत. जगात ही संख्या चाळीसच्या आसपास आहे. बुद्धांचा विचार प्रमाण माणून विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगावर राज्य करता येते, हे काही देशांनी दाखवून दिले आहेच. भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्मविचार हे सार्या जगाला शांतीचा संदेश देणारे आहे.
भगवान बुद्धांनी प्रज्ञा, शील आणि करुणेचा महान संदेश दिला. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित विचारधारा दिली. भगवान बुद्धांच्या शिकवणीची अनित्य, अनात्म, आणि दु:ख असे तीन प्रमुख लक्षणे आहेत. यात अष्टांगिक मार्ग, चार आर्यसत्य, दहा पारमिता व प्रतित्यसमुत्पाद, निर्वाण अशा महान सिद्धांतांचा समावेश आहे.
आपल्या आजूबाजूच्या सामाजिक व राजकीय घडामोडींचा उदय आणि त्यांचा अस्त याकडे पाहण्याची वैज्ञाननिक दृष्टी बुद्ध धम्म आपणास देतो.
बौद्ध धम्म म्हणजे परिवर्तनशीलता. हा धम्म स्थितिशील नसून नित्यनूतन आहे, गतिशील आहे.
बुद्धविचार म्हणजे माणसाचे जीवन प्रकाशमय करणारा मार्ग आहे. त्याला सतत प्रकाशमान ठेवणे म्हणजेच ‘अत्त दीप भव’ आहे..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे १९५६ रोजी केलेल्या भाषणात ‘मला बुद्ध धम्म का आवडतो?’ या बाबतीत सांगतात, “कारण त्यामध्ये इतर कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध धम्म प्रज्ञेची म्हणजेच अंधश्रद्धा आणि दैववाद याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञानाची शिकवण देतो. तो करुणा- प्रेम शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला हेच आवश्यक असते. बुद्ध धम्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन तत्त्वे सर्व जगाला प्रभावित करतील. ईश्वर आणि आत्मा हे समाजाचे संरक्षण करु शकत नाहीत.”
भगवान बुध्दांचा उपदेश सांगतांना नागपूर येथील धम्मदिक्षेच्या वेळी बाबासाहेब म्हणतात की, बौध्द संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी किंवा हे महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य असते. त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात. म्हणून आपण पोटजातीचा विचार सोडून दिला पाहिजे.
- आयु. आर.के.जुमळे
संकलन व धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत