१ मे – महाराष्ट्र दिन

गर्जा महाराष्ट्र माझा
संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे धगधगते यज्ञकुंडच.खरं तर,हा लढा मराठी अस्मितेचा हुंकार होता.या पार्श्वभूमीवर
सर्वधर्मीय,सर्वजातीय,
सर्वपक्षीय नेते या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सामील झाले होते.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी,या उद्देशपूर्तीसाठी लेखक,साहित्यकार,संपादक,पक्षीय नेते,समाजसेवक,विचारवंत,कवी,शाहीर यांनी संघटितपणे प्रखर लढा दिला.आंदोलने केली.मोर्चे काढले.याकारणी आंदोलकांना पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले.आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला.काहींना कारावासही भोगला लागला. आंदोलकांच्या दिशेने तत्कालिन मुंबई राज्यातल्या मोरारजी सरकारच्या आदेशान्वये पोलिसांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला.त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एक-दोन नव्हे तर,तब्बल १०६ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.परंतु त्यांचे हौतात्म्य वाया गेेलं नाही.अखेर माजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना
मऱ्हाटमोळ्या शुरवीरांपुढे शरणागती पत्करावी लागली.मित्रहो,त्यांच्या बलिदानाची फलश्रुती म्हणजे १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली अन् हा खऱ्या अर्थाने सोनियाचा दिवस ठरला.हुतात्म्यांना विनम्र अभिवंदन!
भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नव महाराष्ट्राची मुहूर्तमेढ झाली.आणि बघता-बघता,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचं स्वप्न साकार झालं.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे चिरकाल स्मरण रहावे,या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारक उभारले.अशा थोर हुतात्म्यांना आम्ही महाराष्ट्रीय त्रिवार अभिवादन करतो.
नवमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना प्राप्त झाला.राजभवन
येथे नवनिर्मित राज्याच्या उदघाटनप्रसंगी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,माजी मुख्यमंत्री वंदनीय यशवंतराव चव्हाण म्हणाले की,नव महाराष्ट्राच्या निर्मितीनं आपल्याला भरभराटीचे अन् सुखाचे दिवस येतील.मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणं हे राज्य स्थापनेचं मुळ धोरण आहे,हे सर्वांनी ध्यानी ठेवावं.राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान न्याय-समान संधी देणं ही सरकारची मुख्य भूमिका राहील.महाराष्ट्र हे सदैव सर्वधर्मसमभावचं प्रतिक म्हणून देशाला दिशा देईल.जय हिंद-जय महाराष्ट्र!
नवनिर्मित महाराष्ट्राला उद्देशून कविवर्य श्री.कृ.कोल्हटकर म्हणतात,बहु असोत सुंदर संपन्न महा…प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा! आपला महाराष्ट्र हा
प्राणापेक्षाही प्रिय आहे.सर्वदृष्टीने गुणसंपन्न आहे.कवी कुसुमाग्रज आपल्या उत्कट शब्दात म्हणतात,माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा,तिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा! महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. माय मराठीचा गौरव करताना सुरेश भट म्हणतात,लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,धर्म-जात- पंथ एक जाणतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी!
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी माणसाच्यादृष्टीने अस्मितेचा प्रश्न होता.संयुक्त महाराष्ट्रावरील कवणे गाऊन शाहिरांनी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला होता.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९३८ साली मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्या भाषणात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे सूतोवाच केले.त्यानंतर पुढे २८ जानेवारी १९४० रोजी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली.जात-धर्म -पंथ व पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून सारा महाराष्ट्र एकवटला.या लढ्यात सर्वांनी कर्तव्यबुद्धीने सहभाग घेतला.सेनापती बापट,प्रबोधनकार ठाकरे,कॉ.डांगे,आचार्य अत्रे,एस.एम.जोशी,
अहिल्याबाई रांगणेकर,नाना पाटील,कृष्णा देसाई, डॉ.टी.आर.नरवणे, आर.डी.भंडारे,दिनू रणदिवे,शाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमरशेख,शाहीर गव्हाणकर,शाहीर आत्माराम,ग.त्र्य.
माडखोलकर,प्रा.मधू दंडवते,नानासाहेब गोरे,अनुताई लिमये,भाऊसाहेब हिरे,नानासाहेब कुंटे,केशवराव जेधे,मधू लिमये,डॉ.धनंजयराव गाडगीळ,तुळसीदास जाधव,दादासाहेब गायकवाड आदी मान्यवरांनी एकसंध होऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे रणशिंग फुंकले अन् विजयी झाले.या सर्व प्रभृतींना त्रिवार मानाचा मुजरा!
वास्तवात,नव महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर साऱ्या महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली होती.जागोजागी विजयाच्या पताका फडकल्या.नव राज्याच्या निर्मितीमुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झालं होतं.ढोल-ताशे,तुतारींच्या निनादात जयघोष करत हजारोंच्या संख्येनं भूमिपुत्रांनी हा सोनियाचा दिवस नाचत-गात ,गुलाल उधळत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.याप्रसंगी मराठी माणसाचे ऐक्य अन् सामर्थ्याचे खरे दर्शन झाले. त्याची परिणती म्हणजे तत्कालिन केंद्र सरकारसह मुंबई राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना अखेर मराठी भूमिपुत्रांपुढे गुडघे टेकावेच लागले.देशाच्या स्वातंत्र्यासाठी जसं मराठी क्रांतीवीरांनी बलिदान दिलं.त्याप्रमाणेच मराठी भूमिपुत्रांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जणू आपल्या रक्ताचा अभिषेकच केला.अशा महान मराठमोळ्या भूमिपुत्रांना आम्ही शिवरायांचे पाईक त्रिवार मानाचा मुजरा करतो.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून शाहीर साबळे यांच्या गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला
राज्यगीत चा दर्जा मिळाला आहे.याबद्दल राज्यातील सर्वधर्मीय नागरिक राज्यातल्या महायुती सरकारला कोटी कोटी धन्यवाद देते.
संयुक्त महाराष्ट्र चिरायु होवो!
जय महाराष्ट्र !
लेखक – रणवीरसिंह राजपूत,गवर्नमेंट मीडिया, महाराष्ट्र शासन
(मो.न.९९२०६७४२१९)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत