भीमा कोरेगाव “विजय दिवस” आणि आंबेडकरी समाजातील भीमसैनिक,एक चिकित्सा !

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक,8600210090
भिमनगर (नागेश नगरी) उस्मानाबाद
आत्मसन्मान आणि स्वाभिमान गहाण ठेवून मानवंदना कशी ? का तिथे ही फक्त व्यवहारवादच !आत्मसन्मान आणि स्वाभिमानासाठी प्राणांतिक संघर्ष करून विजय मिळवणाऱ्या भिमा कोरेगाव युद्धातील स्वाभिमानी शूरवीरांना मनपूर्वक जयभीम ! परंतु हल्ली भिमा कोरेगाव “विजय दिवस” हा सनातनी मनुवादी आणि गांधीवाद्याच्या वाड्यावर,बंगला आणि गढीवर “आत्मसन्मान आणि स्वाभिमान” गहाण ठेवून शौर्य दिवसाच्या नावाखाली “मानवंदना” देण्याचा आघोरी प्रकार सुरू आहे. आमच्या पूर्वजांनी आत्मसन्मान आणि स्वाभिमानासाठी जिवाचे रान केले. प्रस्थापित सनातनी व्यवस्थेने लादलेल्या गुलामीला खतम करण्यासाठी रक्ताचे पाणी करून भिमा नदी मध्ये वाहिले. तर मग आज आम्ही दोनशे वर्षांनंतर आमच्या शूरवीरांना अभिवादन करताना काय आणि कोणते ध्येय उराशी बाळगून आहोत.हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या मनाला त्या शूरवीरांना मानवंदना देताना करावा.
आज डॉ.बाबासाहेबांच्या छावण्या ओसाड पडलेल्या आणि म्हाताऱ्या झालेल्या का दिसत आहेत.डॉ बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या राजकीय संस्था,धार्मिक संस्था, संरक्षण संस्था (SSD) तरुण भीमसैनिका विना अगदी म्हाताऱ्या दिसत आहेत. पूर्वाश्रमीच्या महाराणी आत्ताच्या बौद्ध समाजातील गरिबाला पोट भरणे,पोटासाठी राजकीय गुलामी करणे वाचून वेळ नाही आणि श्रीमंतांना आपली लेकरे फक्त आणि फक्त सेटल करण्याशिवाय दुसरे काम नाही.ही तर कारणे नाहीत ? राजकारणाच्या बाबतीत प्रचंड आणि टोकाचे मतभेद आहेत याची जाण सर्वांनाच आहे.परंतु बाबासाहेबांनी निर्माण केलेली धार्मिक आणि संरक्षण संस्था का ओसाड आहे ? हा प्रश्न आपल्या मनाला का पडत नाही ? गाव आणि शहर तिथल्या भिमनगरातील भीमसैनिक हजारोच्या संख्येने पानपट्टीच्या रांगेने जातात,गावठी आणि विदेशी दारूच्या दुकानावरती चकरा मारतात, विविध कंपन्या आणि जयंती मंडळ काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आर्थिक भ्रष्टाचार करतात,आंबेडकरी समाजामध्ये दुही माजवण्याचं काम करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर मग आपला एक जानेवारीला मानवंदना देण्याचा ढोंगीपणा का व कशासाठी ? आज आमच्या भीमसैनिकाच्या मनामध्ये काय आत्मसन्मान आणि स्वाभिमान जिवंत आहे का ?
आमचा भीमसैनिक आज आपला आत्मसन्मान आणि स्वाभिमान थोडं थोडक्या फायद्यासाठी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्तरावर प्रस्थापितांकडे का गहाण ठेवत आहे ? आत्मसन्मान आणि स्वाभिमान गहाण ठेवून भिमा कोरेगावच्या शूरवीरांना अभिवादन करून काय साध्या होणार आहे ? काय तो “विजय दिवस” केवळ आपल्यासाठी धिंगामस्ती आणि मनोरंजन करण्याचा दिवस आहे का ? का केवळ भीमा कोरेगाव लढ्यातून कोणताही बोध न घेता नुसत्या पोकळ वाऱ्या करण्याचा दिवस आहे का ? एकीकडे भीमा कोरेगावच्या शौर्यगाथा गायच्या आणि दुसरीकडे समाजामध्ये दारू पिऊन,गुंडागर्दी करून,आपल्याच आया बहिणीवर डोळे ठेवून,आत्मसन्मान आणि स्वाभिमान गावच्या नेत्यांकडे,पाटलांकडं गहाण ठेवून आपल्या उद्धारकर्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि चळवळीला विकण्याचा गोरख धंदा करत मानवंदना देण्यात येते,याची आपल्याला थोडी सुद्धा लाज वाटत नाही !
1818 भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये आमच्या पूर्वजांनी आत्मसन्मान आणि स्वाभिमानासाठी प्राणाची बाजी लावली.अशक्य अशक्य असा लढा आपल्या पूर्वजांनी मन,मनगट आणि बुद्धीच्या,आत्मसन्मान व स्वाभिमानाच्या जोरावर जिंकला. यातून आपण नेमका काय बोध घेतला आहे ? याची समीक्षा आणि चिकित्सा करण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना सुद्धा गाव आनं शहराच्या गटारगंगेत मशगुल असलेल्या डुकराप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी बाबासाहेबांच्या आंदोलनाला विकण्याचं काम करत आहोत,यात आपले कोणते शौर्य आणि विजय दडला आहे ? याला तर पोट भरण्यासाठी केलेली गुलामगिरी आणि दलाली म्हणतात !
01 जानेवारी “विजय दिना” दिवशी भीमा कोरेगावच्या त्या शूरवीरांना मानवंदना देताना आपल्याला आठवण का होत नाही की,आज ही महाराष्ट्रामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार “पराजित” आहे.तर दुसऱ्या बाजूला या देशातील आर.एस.एस प्रणित भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाच्या मागासवर्गीय सेल कडून देशातील 60 करोड जनतेला रामाचा प्रसाद वाटण्यासाठी तयार करत आहे.याची लाज आपल्याला का वाटत नाही ? महाराष्ट्रातील बौद्धांच्या लेण्या,प्रतीकं,विहारे सुरक्षित नाहीत ? आपल्याच समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी वाढत आहे.याची आम्हाला लाज वाटत नाही का ? राज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील सुदृढ आणि शक्तिशाली तसेच मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सक्षम अशी बौद्ध समाजातील पिढी निर्माण करण्यापेक्षा आंबेडकरी समाजामध्ये “गरीब आंबेडकरवादी आणि श्रीमंत आंबेडकरवादी” अशी प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे.याची थोडी सुद्धा आम्हाला का लाज वाटत नाही ? केंद्र आणि राज्याची सरकारी आपल्या विद्यार्थ्यांच्या “शिष्यवृत्ती” बंद करते, तर वेळेवर शिष्यवृत्ती देतच नाही.शिक्षणाचे भगवीकरण आणि बाजारीकरण करून संविधानाने दिलेला शिक्षणाचा मूलभूत अधिकार खतम करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई करते.राज्यातील आंबेडकरी समाजाच्या आर्थिक नाड्या बंद करून त्यांना लाचार,बेबस आणि गुलामीचे जीवन जगण्यासाठी भाग पाडत आहेत.याचे आम्हाला काही देणे घेणे नाही का ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक भूमी ओसाड होत आहेत.तर काही ठिकाणी सनातनी मनुवादी लोक ताबा घेत आहेत.आमची बुद्ध विहारे सताड कुलूप बंद असतात,त्या काय शोभेच्या वस्तू आणि वास्तू आहेत का ? तर काही बुद्ध-भीम स्मारक ठिकाणी आयत्या बिळावर नागोबा बसल्याप्रमाणे समाजातील आयतं दूध पिऊन भांडखोर,मुजोर झालेली नेते मंडळी आणि सामाजिक,धार्मिक मंडळे आपल्याच समाजाची आर्थिक पिळवणूक करत आहेत.बुद्ध-बाबासाहेबांच्या नावावर आर्थिक भ्रष्टाचार करत आहेत.याचे ही आम्हाला काही देणे घेणे नाही का ? आता तर स्वतःला बौद्ध भन्ते म्हणवणारे सुद्धा धम्म प्रचार करणं सोडून,आप-आपल्या ट्रस्ट काढून “दानाच्या” नावावर अपार संपत्ती आणि जमिनी गोळा करूण एखाद्या मठाच्या मठाधीपती प्रमाणे वर्तन करत आहेत. आज आपल्या पुरोगामी महाराष्ट्र आणि देशांमध्ये इतिहासाच्या फेरलेखनाच्या नावाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत गौतम बुद्धांच्या विचारधारेला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये किती आणि तारखेचा वाद जाणून बुजून घालून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीला धुळीस मिळवण्यासाठी आहो रात्र विविध लेखन आणि साहित्याच्या माध्यमातून षडयंत्र करत आहेत.त्याचबरोबर सनातन्यांच्या या षडयंत्र मध्ये आपलेच काही लोभी,स्वार्थी आणि नालायक लेखक,साहित्यिक आणि नेते मंडळी यांचा सुद्धा समावेश आहे.तसेच सरकारकडून बाबासाहेबांच्या ग्रंथ प्रकाशन करण्याच्या प्रक्रियेवर अघोषित बंदी आहे.अशा हरामखोरांना सुद्धा आपण ओळखून ओळखून धुतले पाहिजे.हे सगळं आमच्या डोळ्यापुढे घडत आहे.तरी सुद्धा याची आम्हाला का लाज वाटत नाही ? तर दुसऱ्या बाजूला आम्हीच नाव तर बुद्ध आणि बाबासाहेबांचे घेतो,विधी तर बौद्ध पद्धतीने करतो. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही सर्वजण येडाई,यमाई, तुळजाई,आवलिया नावाच्या जत्रा करत फिरतो.आई-बाप,भाऊ-बहीण, मुलं-मुली,मावशी-काका,काकी, आजी-आजोबा मेल्यावर तिसऱ्या दिवशी काळ्या कावळ्याची वाट पाहतो,आपल्या घरातील बौद्ध भगिनी दिवस रात्र टी.व्ही सिरीयल पाहून डोक्याचे भजे करून घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ ला मानवंदना देऊन आणि मनुस्मृतीचे किती ही दहन करून काय उपयोग होणार आहे.
जातीविरहित असणाऱ्या अथांग सागरासारख्या बौद्ध धम्माला अतिशय तोकड्या सवलतीसाठी जातीच्या गटारगंगेत बुडवून आंघोळ घालताना आपल्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचत नाही का ? याचा विचार कोण करणार ? पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील बौद्ध धर्माच्या अधपतनावर आपल्या राज्यातील स्वतःला बुद्धिजीवी, साहित्यिक,बौद्ध भन्ते व इतर धम्म संस्थांचे प्रचारक म्हणवून घेणारे विचारवंत काय भूमिका घेत आहेत ? कोणत्या बाबीवर काम करत आहेत ? याचं सुद्धा चिंतन आणि चिकित्सा व समीक्षा “आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या” लढ्यात शहीद झालेल्या शूरवीरांना अभिवादन करताना आपण करू नये का ? या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि बौद्धांना सरकारी आणि निमसरकारी स्तरावर बदनाम करण्यात केलं जातं.परंतु ही बौद्ध समाजातील “व्हाईट कॉलर” मंडळी जी बाबासाहेबांच्या संघर्षातून मलिदा घेऊन मोठी झाली,ती सगळी बुद्धिजीवी,नोकरदार,अधिकारी कर्मचारी मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावर जीव तोडून भाषणे ठोकतात,प्रतिक्रिया देतात, सरकारचा निषेध करतात. परंतु महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माच्या होणाऱ्या पिछेहाटीवर का बोलत नाहीत? बौद्ध धम्माच्या कायदेशीर मान्यते संबंधी का संघर्ष करत नाहीत ? केवळ “आरक्षणावर” गदा म्हणजे यांच्या मुला-बाळाचं वाईट होईल. त्यांना सवलती मिळणार नाहीत, कदाचित असं वाटत असेल.भले मग आंबेडकरी समाजातील गोर-गरीब लोकांची लेकरं भिकेला लागले तरी चालतील,बुद्ध बाबासाहेबांचे नाव घेत-घेत बौद्ध समाजामध्ये श्रीमंत आणि गरीब दरी निर्माण झाली तरी काही हरकत नाही ! हा मोठा चिंतनाचा विषय आहे.
भीमसैनिकांनो,थोडा विचार करा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी केवळ “इव्हेंट” म्हणून जात नव्हते. तर त्यांनी त्या लढ्यातून “आत्मसन्मान आणि स्वाभिमान” कसा काय आणि तो आपल्यासाठी किती गरजेचा व अत्यावश्यक आहे. याचा ध्यास बाबासाहेबांनी घेतला होता. परंतु आज आम्ही भिमा कोरेगावच्या त्या विजय स्तंभाला मानवंदना देताना कोणते ध्येय उराशी बाळगतो.हेच काही कळत नाही.त्यामुळेच हा लेख प्रपंच आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत