रस्त्यावरुन फरफटत नेत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून.
निपाणी येथील मुरगूड रोडवरील बाळूमामानगर परिसरात शुक्रवारी (ता. २०) शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. साकीब समीर पठाण (वय १५, रा. जुने संभाजीनगर, निपाणी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साकीब हा घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नव्हता. शुक्रवारी सकाळी बाळूमामानगर उद्यान परिसरातील चोपडे यांच्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात साकीबचा मृतदेह आढळून आला. जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, चिक्कोडीचे पोलिस उपाधिक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार, पोलिस उपनिरीक्षक उमादेवी गौडा व शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. साकीबचे आई, वडील, भाऊ, नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला. बेळगाव येथील ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.
गुरुवारी (ता. १९) रात्री उशिरा साकीबचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचे कुटुंबीय येथील जुने संभाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. वडील एमआयडीसीत कामावर असून आई गृहिणी आहे. साकीब आठवीत शिकत होता. त्याला दगडाने ठेचत काही अंतर फरफटत नेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
महात्मा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आई सिमरन हिने फिर्याद दिली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद म्हणाले, जुने संभाजीनगरमधील साकीब या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसते. याप्रकरणी संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी चालविला आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर हे शहर पोलिस ठाण्यात थांबून होते. त्यांनी घटनेच्या तपासासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न चालविला आहे. प्राथमिक टप्प्यात पाच संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत