दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

देशाच्या सरन्यायाधीशावर व्यवस्थेने उगारलेले “जोडे”

दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान राकेश किशोर तिवारी या ७१ वर्षीय वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई सर यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त देशभर प्रसारित झाले अन गेल्या दशकभरात केंद्रातील जोडगोळीने अन संघ परिवाराने जे पेरले होते त्याची परिणती देशाने उघड्या डोळ्याने अन सुन्न मनाने पहिली.

विशेष खटकणारी बाब म्हणजे या निंदनीय घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या जगभरात छी थू होत असलेल्या विश्वगुरुला ८ – ९ तासानंतर जाग आली, गृह खाते ज्याच्या अखत्यारीत तडफडत आहे त्या देशपातळीवरील गुंडाची अजूनही दातखीळ उघडलेली नाही, अन संसदेत शंभराच्या वर असलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून निवडून आलेल्या नंदी बैलांची बोबडी वळलेली आहे, यावरून देश कुठल्या गर्तेत सापडला आहे याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

अशा गुन्हेगारी लोकांचे समर्थन करणाऱ्या निर्बुद्ध मेंढरांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढत चालली आहे, उल्लेखनीय म्हणजे हि मेंढरे पोसणारे दोन गुजराती मेंढपाळ अन नागपूरचे जनावरांचे डॉक्टर यांची मिलीभगत आता जगजाहीर झाली आहे कारण त्यांच्याच तंबूतील काही धर्माच्या नशेत बेधुंद झालेले लोक तिवारीच्या समर्थनार्थ उघड पणे मैदानात उतरले आहेत. त्यांच्या समरसतेचा बुरखा या कृत्याने पुरता फाडून ठेवला आहे.

त्या विकृत मनोवृत्तीने पछाडलेल्या वकिलाचे आडनाव तिवारी आहे हे जाणीवपूर्वक लपवण्यात येत आहे, हे अगदी छत्रपती शिवरायांच्या काळापासून चालत आले आहे. शिवरायांवर शस्त्र उगारणारा कृष्णाजी भास्कर हा कुलकर्णी होता हे शतकानुशतके दडवण्यात आले तीच प्रवृत्ती आज मीडिया मध्ये संचार करीत आहे.

देशाच्या सर्वोच्च समजल्या जाण्याऱ्या पवित्र ठिकाणी असा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या पाजी माणसाच्या घरी जाऊन त्याची मुलाखत घेऊन मीडियाने हे सिद्ध केले आहे कि त्यांनी पत्रकारितेच्या खऱ्या धर्माला केव्हाच तिलांजली दिली आहे अन सध्या जे चालू आहे ती सत्तेसोबत, विषारी विचारधारेसोबत दिवसाढवळ्या सुरु असलेली शय्यासोबत आहे. मीडियाने स्वतःचेच वस्त्रहरण केलेले आहे अन स्वतःच्या नग्नतेचं बीभत्स प्रदर्शन ते अशा प्रकारे रोज करत आहेत.

हे सर्व अपघाताने किंवा अचानकपणे घडले असे म्हणणे बाळबोधपणाचे ठरेल कारण २०१४ पासून देशातील सर्व सरकारी यंत्रणांनी या बेदरकार सरकारपुढे लोटांगण घालणारे जे निर्णय घेतले, विरोध करण्याऐवजी सरकारच्या बाजूने उभे राहिले, अगदी न्याय व्यवस्था ही सरकारच्या समोर कणाहीन होऊन निकाल देत राहिली, अन देशातील जनताही या बेलगाम प्रवृत्तींना मूक संमती देत राहिली, त्याचे फळ आज देश पाहात आहे.

देशाचे सर्वोच्च न्यायालयही आपल्या धर्माला जागले नाही, राज्य व केंद्र सरकारांनी घेतलेल्या चुकीच्या, एकतर्फी निर्णयाला विरोध करून वेसण घालण्याऐवजी क्षणिक लोभापायी न्यायव्यवस्थेने सत्तेसोबत समझोता केला त्यामुळे एका विशिष्ट धर्माचे अन जातीचे राजकारण करू पाहणाऱ्या वृत्ती देशात मोकाट सुटल्या, त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण राहिले नाही, उलट अशा जातिद्वेषाचे, धर्मद्वेषाचे फुत्कार सोडणाऱ्या सापांना केंद्रातील अन रेशीम बागेतील गारुडी अन न्यायालये अभय देत राहिले.

उमर खालिद ते सोनम वांगचुक, राफेल प्रकरण,राम मंदिर प्रकरण, ते इलेकट्रोल बॉण्ड, राखीव जागांचे उपवर्गीकरण, क्रिमी लेअर, अशी असंख्य उदाहरणे आहेत जी हेच दर्शवितात कि न्याय व्यवस्था ही देशातील हुकूमशहा अन भांडवलदारांच्या खिशात कैद झाली आहे. त्यांच्यामध्ये न्यायिक चारित्र्य राहिले नाही, सत्तेला प्रश्न विचारण्याचे नैतिक बळ त्यांच्यामध्ये उरलेले नाही हेच खरे. समाजात दुही पेरून, त्यांच्यामध्ये यादवी निर्माण करून लागलेल्या आगीत स्वतःची पोळी भाजणाऱ्या पेशवाई वृत्ती न्याय व्यवस्थेत घट्ट रुजविण्याचे पाप याच व्यवस्थेने केले आहे.

गवई साहेबांच्या अगोदर न्यायमूर्तीनी न्याय व्यवस्थेला जो चुना लावला त्याची परतफेड त्यांना करण्याऐवजी गवई साहेबांच्या वाट्याला आली. ती त्यांच्याच वाट्याला का आली हे वेगळे सांगायला नको कारण ते ब्राह्मणेतर आहेत, विशेष म्हणजे बौद्ध आहेत. विष्णुमूर्ती प्रकरण हे निमित्तमात्र आहे, जे लोक कधी काळी पायलागू पंडित जी म्हणायचे आज त्यांचे पाय धरायची पाळी आली हे दुःख लोकांना अजूनही पचवता येत नाही, मग त्यांचे दुखणे असे तिवारीच्या रूपाने बाहेर पडते. देशाच्या मुख्य न्यायाधीशाला जर अशा जाती विद्वेषाला सामोरे जावे लागत असेल तर मग देशातील तमाम मागासवर्गीय लोक कुठल्या संकटातून जात असतील यावर लक्ख प्रकाश टाकणारा हा प्रकार आहे, आता कुठे राहिला जातीवाद, असे बरळणाऱ्या लोकांच्या पेकाटात मारलेली लाथ आहे ही. या क्रांती प्रतिक्रांतीच्या संघर्षात सध्या तरी प्रतिगामी शक्ती वरचढ होताना दिसत आहे, भविष्यात काय होईल याचा काही नेम नाही.

गवई साहेबानी या कृत्याचा हिशोब एक आंबेडकरवादी या नात्यानं करायला हवा होता पण त्यांनी गांधीवादी बनत या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न का केला हे एक गूढ आहे. कुचकामी गृह खाते अन सुप्रीम कोर्टातील पेशवाई या तिवारीच्या काही बंदोबस्त करेल याची शक्यता फार कमी आहे.

विचारामध्ये जमीन अस्मानाचा फरक असताना, गवई साहेबांचे बंधुराज संघाशी नाते का जोडू पाहत होते ? खरेतर तिवारीने त्यांच्याही श्रीमुखात मारली आहे आपल्या लायकीत राहा म्हणून.

हे केवळ एक उदाहरण नाही, सध्या भोपाळ मध्ये मिश्रा नावाचा एक वकील बाबासाहेबांच्या विरोधात असाच धुडगूस घालत आहे, कालपरवा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वर्धा, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भेट देण्याच्या कारणावरून काही स्वतःला सवर्ण समजणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केला, आंबेडकरवादी विद्यार्थ्यांना मारहाण केली, हरियाणा मध्ये एका IPS अधिकाऱ्याला जातीय द्वेषाला कंटाळून आत्महत्या करावी लागली आहे, संस्थागत अन जातीआधारित व्यक्तिगत हल्ले, अन्याय यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, हे अगदी ठरवून केले जात आहे.

लोकांच्या मनात दबा धरून बसलेली जात अन धर्मद्वेष आजकाल द्वेषाचे नवे रूप घेऊन रस्त्यावर नंगानाच करताना दिसत आहे. बंधुत्वाचे माणुसकीचे, कायद्याचे, भान नसलेल्या झुंडी आज सर्वत्र पशुत्वाचे हिंस्त्र प्रदर्शन करत आहेत कारण त्यांना माहित आहे कि मुस्लिमांच्या अन मागासवर्गीयांच्या रक्ताला चटावलेले लोक आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक सरकारी यंत्रणेमध्ये बसले आहेत, तेच त्यांना पोसत आहेत, अभय देत आहेत.

संघाची शंभरी ही या देशातील लोकशाहीची, संविधानिक मूल्यांची, समतेची, बंधुभावाची शंभरी ठरते कि काय अशी साधार भीती वाटू लागली आहे.

या सर्व बाबी सरळ सरळ इशारा देत आहेत कि प्रतिक्रांती पुन्हा एकदा मैदानात येऊन उभी ठाकली आहे. बुद्ध, कबीर, फुले,शाहू, आंबेडकर यांनी आयुष्याची राखरांगोळी करून जी क्रांती या मातीमध्ये पेरली त्या क्रांतीचे लाभार्थी मात्र विखुरलेले, भेदरलेले, झोपलेले, तर काही शत्रूच्या छावणी सामील झालेले दिसत आहेत ही खरी धोक्याची घंटा आहे.

आंबेडकरी चळवळीचा तेजोभंग झाला कि काय असे वाटू लागले आहे, कारण आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत, सामुदायिक उठाव करण्याची आपली सवय आपण विसरत चाललोय, आपल्या रक्तातील विद्रोह थंड पडला आहे, किरकोळ तुकड्यापायी शत्रूला सलाम करून आपलाच किल्ला पोखरणाऱ्या लोकांची संख्या आपल्या समाजात वाढत आहे. बाबासाहेबानी सांगितल्याप्रमाणे हे काही जिवंत माणसाचे लक्षण नाही.

मागे एका लेखात मी असे लिहिले होते कि अंधार गडद होत आहे, पण आता अंधार दाटलाय, तो घरोघरी पोचलाय, एवढेच काय तो सुप्रीम कोर्टात पसरलाय. सूर्याच्या वारसदारांनो, आता तुम्ही ठरवायचे आहे कि पेटून उठून, अंधाराला भिडायचे आहे कि त्याच्यात सामील व्हायचे आहे. तुमच्या निर्णयावर तुमच्या येणाऱ्या पिढीचे अस्तित्व आणि अस्मिता अवलंबून असणार आहे, आणि अस्तित्वापेक्षा अस्मिता जास्त महत्वाची हे महामानवाचे बोल मात्र विसरू नका….

जयभीम
नागभूषण बनसोडे
९०४९५०३५९८

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!