कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान

सर्वोच्च न्यायाधीशाचा अवमान म्हणजे संविधानाचा अवमान

7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:35 वाजता दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट क्रमांक एक मध्ये सुनावणीच्या दरम्यान वकील राकेश किशोरे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने आजचा दिवस म्हणजे वकिली पेशाला काळीमा फासणारा ठरला तसेच आजचा दिवस न्यायालयाच्या इतिहासात ‘काळा दिवस’ ठरला.
नवी दिल्लीतील मयुरा येथे वास्तव्यास असणारा 71 वर्षाचा तिवारी हा एम.एस्सी. पीएच.डी (गोल्ड मेडलिस्ट) एल.एल.बी. आहे. वकिली व्यवसायात येण्या आगोदर तो दुसऱ्या नोकरीत होता. तेथून तो 2009 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कोर्टात वकील म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीच्या कुकर्मामुळे केवळ सरन्यायाधीशाचा नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाचा, भारतीय संविधानाचा अवमान झाला आहे. किशोर यांच्या या निंदनीय कृत्यामुळे विश्वगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाच्या प्रधानमंत्र्यालाही दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. या घटनेमुळे भारताची जगातही नामुष्की झाली असे निंदनीय कृत्य या वकिलाने केले आहे.
त्याचप्रमाणे हे कृत्य केवळ सरन्यायाधीशापुरते मर्यादित राहत नाही तर या लोकशाही देशात सर्वोच्च न्यायाधीशाला अशी वागणूक मिळत असेल तर देशातील सामान्य माणूस, दलित, शोषित, बौद्ध अशा समाजातील व्यक्तीची किंमत काय असेल? असाही प्रश्न या घटनेच्या निमित्ताने निर्माण झाला आहे.
दुसरी महत्त्वाची आणि चिंतनीय बाब म्हणजे अशा निंदनीय घटनेनंतर किशोरे यांनी न्यायालयाच्या परिसरातच सनातन धर्माच्या घोषणा दिल्या व त्यानंतर या निर्लज्ज माणसाने निर्लज्जपणे माध्यमापुढे बोलताना असे म्हटले की, “मला या कृत्याचे कोणतेही दुःख नाही, पश्चाताप नाही, मी कुणाची माफी मागणार नाही, हे कृत्य माझ्याकडून परमात्म्याने करून घेतले आहे” आपल्या या कुकर्माचे कारण सांगताना किशोरे असाही म्हणाला की, “राकेश दलाल नावाच्या व्यक्तींनी छतपूर जिल्ह्यातील जावरी मंदिरातील सात फुटी क्षतिग्रस्त मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती बसवून तिची प्राणप्रतिष्ठा करण्याची याचिका सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाकारली व त्याच वेळी “तुम्ही ईश्वराकडे जा” अशी टिप्पणी केली ही टिप्पणी हिंदू धर्माचा अवमान करणारी होती. त्या दिवसापासून मला झोप येत नव्हती, ईश्वर मला झोपू देत नव्हता, शेवटी त्यांनी हे काम माझ्याकडून करून घेतले” (ईश्वर असे करत असेल तर न्यायमूर्ती गवई यांच्या टिप्पणीवर किशोर यांनी संताप व्यक्त करण्याची काय गरज होती)
राकेश किशोरे यांचा आपल्या कृत्याचे समर्थन करणारा युक्तिवाद अत्यंत बालिश आणि हास्यास्पद आहे. त्यातून तो सनातनी धर्माचा अंधभक्त असल्याचे दिसून येते. तसेच यातून हे ही स्पष्ट होते की माणूस वयाने किंवा शिक्षणाने कितीही मोठा झाला तरी त्याच्या डोक्यात धर्मांधतेचे भूत असले तर तो कितीही खालच्या पातळीवर जाऊ शकतो मग तो वकील असला तरी सर्वोच्च न्याय संस्थेला ही जुमानत नाही. किशोरे यांचे कृत्य त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
किशोरे यांनी माध्यमावर दिलेल्या मुलाखतीवरून तो सनातनी विचाराचा अंधभक्त असल्याचे स्पष्ट जाणवते पण त्यांचे सनातनी धर्मावर जेवढे प्रेम आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात त्याच्या मनात मुस्लिम द्वेष भरलेला आहे. त्यामुळे तो योगींच्या “बुलडोझर संस्कृतीचे” समर्थन करताना दिसतो. बुलडोझर सांस्कृतिवर न्यायव्यवस्थेने टाकलेल्या बंधनाचाही त्याला राग आहे. त्याचप्रमाणे अस्पृश्य दलित समाजाबद्दल ही त्याच्या मनात प्रचंड तिरस्कार आहे द्वेष आहे. त्यामुळेच संविधानातील “समान संधी” तत्वामुळे आपल्या गुणवत्तेच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश पदी पोहोचलेल्या सरन्यायाधीश गवई यांच्या विषयी त्याच्या मनात मळमळ होती व या घटनेतून किशोरे यांच्या मनातली मळमळ बाहेर पडलेली दिसते. पण त्यांनी न्यायमूर्ती गवई यांच्या टिप्पणीचे भांडवल केले.
परंतु असे असेल तर मग सरन्यायाधीश पी. बी. गजेंद्र गडकर यांच्या पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाने 14 जानेवारी 1966 रोजी हिंदू हा धर्मच नाही त्यामुळे हिंदुत्व ही संकल्पना सुसंगत नाही असा निकाल दिला होता.
त्यानंतर मोदी सरकार आल्यानंतर या निर्णयाविरुद्ध तिस्ता सेटलवाड यांनी पिटीशन दाखल केले त्यातून सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाची निर्मिती केली त्यावेळी सरन्यायाधीश तिरथ ठाकूर यांच्या सात न्यायमूर्ती पीठाने ही न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांचाच निकाल कायम ठेवत “हिंदू नावाचा धर्मच नाही” असा निकाल दिला टिप्पणी नाही.
त्यावेळी तिवारीसह कोणालाच हा निर्णय आक्षेपार्ह वाटला नाही. या दोन्ही पिठातील न्यायाधीश दलित किंवा बौद्ध नव्हते त्यामुळे तो आक्षेपार्ह वाटला नाही का? त्यावेळी ईश्वरांनी तिवारींना चिर निद्रेत जाण्याचा सल्ला दिला होता का? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या टिप्पणीनंतर मात्र किशोरे याला अवमान वाटला. तसेच या टिप्पणीनंतर सर न्यायाधीश यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अक्कलशून्य, अडाणी बुवा महाराज व धर्मांध प्रवृत्तीने भरलेल्या व्यक्तीने केलेली टीका पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की या मंडळींना कायद्याचे भय उरलेले नाही. संविधानापेक्षा सनातनी धर्मच श्रेष्ठ आहे अशी त्यांची दृढ मानसिकता बनत असलेली दिसून येते. अशांना सरकारचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राकेश किशोरे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. एका मीडियाने तर असे पुराव्यासह दाखवले की किशोर यास पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत एक भाजपाचा पदाधिकारी देखील होता. त्यामुळे पोलिसांनीही किशोर यांना चहा पाणी देऊन त्यांना सोडून दिले असावे.
वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायपिठाचा एका वकिलांनी अवमान करावा ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे किशोरे यास कठोर शिक्षा व्हायला पाहिजे पण एकंदरीत वातावरण पाहता याची शक्यता धूसर वाटते, परंतु किमान या कृत्याचे बक्षीस म्हणून किशोरे याचा “राष्ट्रभूषण” पुरस्कार देऊन सत्कार तरी होणार नाही? अशी अपेक्षा तरी करायला हरकत नाही. कारण कर्नाटकचे भाजप आमदार माजी पोलीस अधीक्षक भास्करराव यांनी वकील किशोरे यांचे कौतुक केले आहे. काही ठिकाणी किशोर यांच्या समर्थनात रॅली काढली आहे. कारण आज सांप्रदायिक शक्ती वनव्याप्रमाणे वाढत आहेत व समाजात तेवढ्याच वेगाने द्वेष भावना पसरवली जात आहे. आणि अशा वनव्यात अडकलेली व्यक्ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राकेश किशोर होय.
वास्तविक पाहता किशोरे वकील होता त्यांना खटकणाऱ्या, अन्यायकारक वाटणाऱ्या गोष्टींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई लढायला हवी होती पण तसे न करता त्यांनी लोकशाही, न्यायालयीन मार्गाने न जाता अ मानवी कृत्य केले. वकील असूनही त्यांनी कायद्याचा अनादर केला, अवमान केला. ज्यांनी कायद्याचे राज्य आणण्यासाठी झटायचे त्यांनीच कायदा मोडला कायद्याच्या रक्षकालाच कायद्याची भीती वाटली नाही.
परंतु किशोरे यांचे हे कृत्य त्याच्या पुरते मर्यादित राहणार नाही. उद्या लोक कायद्याचा अवमान करायला भिणार नाहीत. उद्या धर्मांध लोक संविधान बदलण्याची जाहीरपणे मागणी करू शकतील. कदाचित देशातील लोकशाहीला ही नकार देतील. या दृष्टिकोनातून पाहिल्यास किशोरे यांनी केलेले निंदनीय कृत्य भारतीय लोकशाहीसाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाही ना? याचा सर्व संविधानावर, लोकशाही वर प्रेम, आणि विश्वास असणाऱ्या भारतीयांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे.
त्याचप्रमाणे सरन्यायाधीश यांच्यावरील झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकर यांनी इशारा वजा दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात, “सरन्यायाधीश गवई यांच्यावरील अलीकडच्या हल्ल्यामुळे जातीय द्वेष आता भिंतीमधून बाहेर पडला आहे, याची ही स्पष्ट साक्ष आहे. जर देशातील सर्वोच्च संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीलाही जातीच्या आधारावर लक्ष केले जाऊ शकते; तर दलित आय. ए. एस. अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्याचे काय? पुढची बारी दलित आय. ए. एस. अधिकारी, डॉक्टर, सरकारी अधिकारी असू शकतो! ही फक्त एक घटना नाही हा एक इशारा आहे. त्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत असे वाटणाऱ्या दलित, बौद्ध या सर्व अधिकाऱ्यांनी हा इशारा समजून घेऊन वाटचाल करायला हवी. हिंदू जातीव्यवस्थेचा सनातन यांनी पोसलेला जाती द्वेषाचा भस्मासुर तुमच्या दारावरही उभा राहणार आहे.

डॉ. सुरेश वाघमारे
ज्येष्ठ विचारवंत, लातूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!