मातंग नेते, माजी मंत्री मा. प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांना अनावृत पत्र

सर,
आपली व रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर यांची महाराष्ट्रातील अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भाने एन.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीवरील डेबीट ऐकली वास्तविक हा विषय भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून (उपवर्गीकरण, अभ्यास समितीचा अहवाल बाहेर आलेला नसताना ) अनावश्यक बौध्द विरुध्द मातंग हा वाद किमान निवडणुकीपर्यत तरी चर्चेत राहावा, पेटता रहावा व मातंगाची मते भाजपच्या पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले आहे. ही भाजपची तिरकी चाल किमान बौध्द जनता जाणून आहे.
सदर डिबेटमध्ये आपण " प्रशासनातील मातंगाच्या हिस्स्याच्या नौकऱ्या बौध्द लांड ग्यांनी लाटल्या "असे वक्तव्य केला आहात, वास्तविक किमान तुम्ही अभ्यासू प्राध्यापक, आमदार, समाजकल्याण मंत्री म्हणून राहिला आहात, तरीसुध्दा खोटे अवास्तव वक्तव्य करुन तुम्ही तुमची डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौध्द समाजाप्रति किती कृतघ्नता आहे ! हे निदर्शनास आणून दिलात. तसे पाहता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक कार्यात सतत विरोध केलेले तुमचे पूर्वज, मातंग समाजाचे कार्यकर्ते के.के.सकट यांचा व तुमचा डी.एन.ए.एकच आहे हे स्पष्ट होते.तत्कालीन तुमच्या जातीचा,नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा डॉ.आंबेडकरांच्या सामाजिक,राजकीय लढ्यात सहभाग तर नव्हताच उलट हिंदुंच्या, महात्मा गांधींच्या,काँग्रेसच्या आश्रयाला राहून विरोधच केला. हा इतिहास आहे.गावकुसाबाहेर राहणाऱ्या मातंगांना सार्वजनीक जीवनात माणूस म्हणून प्रतिष्ठा, हक्क, अधिकार मिळाल्यामुळे आज मातंग समाजातील शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनीअर, तुम्हासह प्राध्यापक,आमदार,मंत्री,खासदार,कलेक्टर,तहसिलदार,न्यायाधीश इत्यादी सन्मानी त पदे विभूषीत केले व करताहेत हे उपकार कोणाचे आहेत ? आजपर्यंतच्या इतिहासाची पाने चाळता बौध्देतर मातंग,ढोर,चर्मकार,कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मागास वर्गीयांच्या राखीव जागा भरा,पदोन्नतीत आरक्षण लागू करा,बॅकलॉग भरा, आणि खाजगीकरणाला विरोध, दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढ करा या मागण्यासाठी कधी मोर्चा,सत्याग्रह,आंदोलन केले आहे काय ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आंबेडकरवादी संघ – संघटना राजकीय पक्षांनीच तन – मन- धनाने (जातीयवादी सरकार संघ – संघटना, राजकीय पक्षांचा विरोध पत्करुन) लढे दिले आहेत. एवढेच नव्हे तर बौध्देतर लोकप्रतिनिधींनी तरी विधी मंडळात कुठे आक्रोश केला आहे काय ? बौध्देतर मातंगांना, ढोर,चांभारांना जे काही केंद्र व राज्य शासनात, प्रशासनात मिळाले व मिळत आहे ते बौध्दांच्या प्रयत्नामुळेच ना ?
वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते आजतागायत ' जयभिम ' पेक्षा 'राम राम ' बरा या दुष्ट युतीची कटुफळे आंबेडकरवादी समाजाच्याच वाट्याला येतात हे वास्तव आहे. या कूटनितीमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत ' राम राम ' वाले ९-१० मातंग आमदार निवडून आले होते तर जयभिम वाल्यांचा एकही आमदार विधी मंडळात नव्हता. तरीही ज्याप्रमाणे तुम्ही बौध्दांबद्दल जाहीरपणे भेदनितीची वक्तव्ये करता तसे एकाही बौध्दाने केल्याचे एकतरी उदाहरण दाखवाल का ? मराठी भाषेत एक म्हण वापरली जाते गाढव बोंबलण्याऐवजी वर बसलेल्या गोण्याच अधिक कोकलत आहेत अशातला हा प्रकार आहे.
सर, तुमच्यासह मातंग समाजालाही मनुस्मृतीचे, चार्तुवर्ण व्यवस्थेचे,रुढीपरंपरा अस्पृश्यतेचे दाहक चटके बसलेत व अद्यापही बसतात (मातंग समाजाचा नवरदेव सवर्णाच्या पारावर गेल्यामुळे, देवळात प्रवेश केल्यामुळे त्यांना मारझोड झाल्याचे वाचनात येते.) त्या अंधश्रध्दा, रुढी परंपरा, मनुस्मृतीच्या विरोधात कुठे बोललात वा लेखनातून तक्रार मांडलीय हे कधी वाचनात आले नाही.सर,अंधश्रध्दा,रुढी परंपरा,गुलामगिरी आणि प्रगती विकास व आत्मोध्दार एकत्र कधीच नांदत नसतात याची तुम्ही मातंग बांधवांना कधी जाणीव करुन दिली आहे काय ? कदाचित तुमच्या कुटुंबासाठी मान आणि धन मिळविण्याच्या प्रयत्नात मातंग समाजाचा विसर पडला असेल असे वाटते. आपण महाराष्ट्रात शैक्षणिक संस्थांचे उदाहरणार्थ, वस्तीगृहे, आश्रमशाळा, हायस्कूल्स कॉलेज यांचे जाळे निर्माण केला आहात. त्यात किती मातंग तरुणांना सेवेची संधी दिलात ? ते जर जाहीर केलात तर आपली मातंग समाजाबद्दलची तळमळ निदर्शनास व अनुभवास येईल.
बौध्द हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील,राष्ट्रसंत गाडगेबाबा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे, रामस्वामी पेरीयार यांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांना प्रमाण मानून जीवनाची वाटचाल करीत गुणवत्ता सिध्द करताहेत. शासनात,खाजगी शिक्षण संस्था, अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या मुलाखतीत गुणवत्ता असूनही जयभिम ! असल्याने त्यांना तोंडी मुलाखतीत नाकारले जाते व त्याला नैसर्गीक हक्कापासून दूर केले जाते. तर 'राम राम ' वाले म्हणून मातंग,ढोर,चांभार उमेदवारांना निवडतात हे वास्तव आहे. मुलाखत घेणारे व नेमणूका देणारे उच्चवर्णीयच असतात त्यात बौध्दांनी मातंगाच्या हिस्स्याच्या जागा लाटल्या असे म्हणणे किती मूर्खपणाचे ठरते. राजकीय निवडणुकीत सुध्दा उच्चवर्णीय हे मातंग,ढोर,चांभार यांना पसंत करतात,मतदान करतात / निवड करतात हे वास्तव असताना बौध्दांना मातंगाच्या मागासलेपणास जबाबदार धरण्यात काय हशील आहे ? बरे एखादी जात प्रगत की अप्रगत आहे हे जातनिहाय जनगणना केल्याशिवाय कसे सिध्द होणार ? त्या जातीची लोकसंख्या किती ? त्यामध्ये कोणकोणत्या पदावर किती कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत ? त्यांची स्थावर, जंगम मालमत्ता किती ? हे जनगणनेतूनच पुढे येईल ना ? उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीची वेळ येईल तेव्हा महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयापुढे ती माहिती दाखल करावीच लागेल. जातनिहाय जनगणना नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयाने " एस.सी. चे उपवर्गीकरणाबाबत महाराष्ट्र शासनानेच निर्णय घ्यावा "असे निर्देशीत केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयापुढे एस.सी.,एस.टी.ला क्रिमीलेअरची अट लागू करणे बाबत कोणाचीही याचिका नसताना वा मागणी नसताना सर्वोच्च न्यायालयाने मत प्रदर्शित केले आहे हे अनाकलनीय आहे. महाराष्ट्र शासनाला आकाश ढेंगणे वाटू लागले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आनंद गगनात मावेनासा झाला अशा मन:स्थितीत सर्व संबंधीत प्रवर्गाचा, बौध्दांचा प्रतिनिधी न घेता उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणी बाबत निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली तिची वैधता यथायोग्य न्यायालयात तपासली जाऊ शकते.
सर,तुम्ही फुले,शाहु,आंबेडकरांच्या काही अंशी तरी विचारधारेवर आधारीत यशवंतराव चव्हाण,शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून सत्ता उपभोगलात सध्या तुमच्या जातीच्या प्रगतीस, विकासास मूलत: कमालीचा विरोध असणाऱ्या आर.एस.एस. भाजपच्या आश्रयाला गेलात ते केवळ मातंग जातीच्या हितासाठी गेलात असे म्हणणे म्हणजे केवळ समाजाच्या डोळ्यात धुळफेक ठरेल. आयुष्याच्या सायंकाळी आर.एस.एस., भाजपची विचारसरणी मातंग समाजाच्या हिताची, देशहिताची आहे.असे समजून प्रवेश केलात की काही चौकशाचे (ED,CBI,SIT) लचांड , टाळण्यासाठी गेलात हे तुम्हीच सांगु शकता मोदी,शहा,फडवणीस यांनी सत्ता ताब्यात घेण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली शेकडो कोटींची कर्जे देवून, ई.डी.,सी.बी.आय.,ची दहशत दाखवून काँग्रेसही फोडली. मराठा विरुध्द ओ.बी.सी.वादाचा वणवा पेटविला,बंजारा व धनगर समाजही एस.टी.आरक्षण मिळण्या संदर्भात प्रचंड मोर्चे काढत आहेत.तर एस.टी. समाज प्रवर्ग तितक्याच ताकतीचे मोर्चे काढून बंजारा, धनगर समाजाला विरोध करीत आहेत. वरील सर्व आरक्षणवादी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.सुसंस्कृत व समाज सुधारकांच्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल अशा शिवराळ भाषा वापरल्या जात आहेत. हिंसाचारी प्रकार वाढत आहेत. यामुळे महाराष्ट्र भयभीत झाला आहे. या सर्व प्रकारांना केवळ अन केवळ मोदी, शहा आणि फडणवीस यांची बहुजन व मागासवर्गीयांच्या संघ, संघटना, पक्ष फोडा व राज्य करा हीच कुटील निती जबाबदार आहे. सबब मातंग बांधवांनी भाजपचा आश्रय घेणे म्हणजे संरक्षणासाठी शेळीने लांडग्याचा आश्रय घेण्यासारखे आहे. तो लांडगा यथायोग्य वेळी त्या शेळीचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही आणि मातंग बांधवांनी वेळीच समजून घ्यावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतांसाठी मातंगांचा अनुनय करीत आहेत . साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा कम्युनिष्ट रशियात (अण्णा कम्युनिष्ट होते म्हणून ) पुतळा उभा करुन अनावरण करणे हा त्याचाच एक भाग आहे.कॉम्रेड अण्णा भाऊ साठे हे हाडाचे कम्युनिष्ट तर होतेच त्याबरोबर मुंबईसह महाराष्ट्र आंदोलनाचे खंदे समर्थक होते. डाव्या विचारसरणीचे प्रचारक व प्रसारकही होते.तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष हे कम्युनिष्ट विचारसरणीचे कट्टर विरोधक होते व आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.स.गोळवलकर यांनी त्यांच्या 'बंच ऑफ थॉट्स ' मध्ये कम्युनिष्ट व मुस्लिम हे आर.एस.एस.चे शत्रू असल्याचे नमूद केले आहे. हे मातंग बांधवांनी ओळखून घेणे ही काळाची गरज आहे.आर.एस.एस.,जनसंघ,भाजप–देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा भाऊंच्या प्रतिमेला आदरपूर्वक आदरांजली वाहिल्याचे छायाचित्र प्रकाशित करावे. म्हणजे वास्तवता निदर्शनास येईल. केवळ गोड गळ्याची नैसर्गीक देणगी प्राप्त झालेल्या ब्राम्हण समाजाच्या लता मंगेशकरांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान दिला गेला. गोड गळा म्हणजे देशसेवा नव्हे याऊलट भारतावर शेजारच्या शत्रू राष्ट्रांनी आक्रमण केले तेव्हा देशासाठी प्राण धोक्यात घालून भारतीय सैन्यापुढे कार्यक्रम सादर करणाऱ्या कलावंत विठाभाऊ नारायणगावकर या मातंग समाजाच्या कलाकार भगिनीस भारतरत्न का दिला गेला नाही ? अब्जावधीची माया कमावणाऱ्या क्रिकेटर सचिन तेंडुलकरांनाही भारतरत्न देता मग लोकशाहीर साहित्यसम्राट मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे प्रमुख शिल्पकारांपैकी एक ज्यांनी महाराष्ट्राचे नाव रशियामध्ये उजळ केले त्या थोर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मातंगासह महाराष्ट्रातील हजारो विचारवंत व पुरोगामी नेत्यांची, साहित्यीकांची अनेक वर्षाची मागणी लक्षात घेता ती मंजुर का केली जात नाही ? फडणवीस साहेबांना समाजात सतत चिघळत राहणारे प्रश्न निर्माण करुन मते उपटायची हाच त्यांचा अंतस्थ हेतू असतो व आहे हे मातंग बांधवांनी वेळीच लक्षात घ्यावे.
' डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील सर्व अस्पृश्यांचे नेते आहेत ' अशी लंडनच्या गोलमेज परिषदेत सोलापूरला पायी जाऊन तार करणारे ईटकूर ता.कळंब जि.धाराशिव येथील मातंग समाजाचे कार्यकर्ते श्री. श्रीपती शिंदे, शाहीर विठ्ठल उमप, ॲड.एकनाथ आव्हाड, मराठवाडा विद्यापीठ नामांतर विरोधी आंदोलनात धारातिर्थी पडलेले हुतात्मा पोचीराम कांबळे, विद्रोहीशाहीर श्रीमती.शितल साठे,विद्रोही प्राध्यापक – मच्छिंद्र सकटे, शाहीर साहेबराव येरेकर, कोल्हापूरचे प्राध्यापक सुकुमार कांबळे, लातूरचे डी.एस. रणसिंगे, प्रा.डॉ.प्रबुध्द साठे, पँथर हरीश कांबळे इत्यादी मातंग समाजातील पण छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, अण्णा भाऊ साठे, रामस्वामी पेरीयार यांना गुरुस्थानी मानून वाटचाल करणाऱ्या या बुध्दीप्रामाण्यवादी विचारवंत समाज सुधारकांचा आंबेडकरवादी व बौध्द समाजाने नेहमीच अंत:करणपूर्वक आदरच केला आहे.
सर, तुमचे सुध्दा समाजातील व राजकारणातील व्यक्तीमत्त्व उभे करण्यासाठी शेकडो जयभिमवाल्या विद्यार्थ्यांनी आपले तन- मन-धन खर्ची टाकले आहे. कृपा करुन खऱ्या लांडग्यांच्या धुर्तपणाला बळी पडून बौध्द विरुध्द मातंग हा वाद उभा करु नका किंवा त्यावर फुंकर घालु नका.
श्वान स्वपोषकाच्या सदनाच्या आश्रये उभा राहे.
जिकडे वनात गर्जे शार्दूल, तया दिशेकडे पाहे म्हणजे कुत्रा मालकाच्या घराच्या आश्रयाला उभे राहुन आकाशात गडगडाट करणाऱ्या ढगाकडे पाहून जसा भुंकतो, व आपली स्वामीनिष्ठा सिध्द करण्याचा प्रयत्न करतो तसे आपण फडणवीस,आर.एस.एस.व भाजप या आश्रयदात्याप्रति स्वामीनिष्ठा व्यक्त करण्यासाठीच बौध्दांनी मातंगाच्या हक्कांच्या राखीव जागा लाटल्या तसेच बौध्दांना लांडगे अशी उपमा दिली आहात असेच वाटते कृपया आपण सदर पत्राच्या अनुषंगाने आत्म्परीक्षण कराल ही अपेक्षा.
कळावे,
हरीभाऊ साधुराव बनसोडे,
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी,
धाराशिव मो.नं. ८९९९५८६३२२
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत