डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा – अशोक सवाई

(पेहराव भारतीय व पाश्चात्य)
मागील वर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासोबतच साऱ्या जगभरात मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली. एवढेच नव्हे तर UNO = United Nation Organization म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयात सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते. त्यांच्या जयंती दिवसानिमित्त जगातील राष्ट्रे आपापल्या राष्ट्रात समता दिवस, शिक्षण दिवस, असे उपक्रम राबवत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे भारतीय नेता आहेत की, ज्यांचे जगभर पुतळे आहेत. जगात त्यांच्या नावाने अनेक शिक्षण संस्था, मानवतावादी संघटना आहेत. जगातील विद्यार्थी त्यांच्या संघर्षमय जीवनावर पीएचडी किंवा डाॅक्टरेट करताहेत. आज आपण त्यांच्या वेगवेगळ्या वेषभूषेवर चर्चा करणार आहोत. जी कदाचित आजपर्यंत कधीही झाली नसावी.
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणतेच व्यसन किंवा कोणताच शौक कधी केला नाही. तरीही त्यांना एक जबरदस्त व्यसन जडलं होतं. (व्यसन म्हणजे जे आयुष्यभर सुटत नाही ते) आणि एक जबरदस्त शौक सुध्दा. व्यसन होतं पुस्तक वाचनाचे तर शौक होता चांगल्यात चांगले कपडे परिधान करण्याचा. तसी त्यांना अजूनही काही कलेची आवड होती ती म्हणजे भारतीय संगीत व चित्रकला. त्यांनी व्हायोलिन हे वाद्य शिकण्यासाठी संगीत शिक्षकाची निवड ही केली होती. परंतु त्यांच्या अतिशय व्यस्त जीवनशैली मुळे त्यांना वरील छंद फारसे जोपासता आले नाहीत. पण वाचन आणि चांगल्यात चांगली वेषभूषा परिधान करण्याची आवड त्यांनी शेवटपर्यंत जोपासली. शर्ट, जाकीट, टाय, कोट, पॅंट आणि बूट यातील त्यांचं कलर काॅंम्बिनेशन चाॅइस जबरदस्त होती. कोणत्या ठिकाणी, कोणत्या प्रसंगी, कोणती वेशभूषा परिधान करायची याचे त्यांना सूक्ष्म ज्ञान होते.
डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात एकूण चार प्रकारचे कोट परिधान केलेले आहेत. *१) एस. बी. लॅपल कोट (सिंगल ब्रेस्ट लॅपल कोट) २) डी. बी. लॅपल कोट (डबल ब्रेस्ट लॅपल कोट) ३) जोधपूरी कोट (बंद गळ्याचा कोट) ४) शेरवानी (बंद गळा व गुडघ्याच्या खाली पर्यंत लांब)*
*१) एस. बी. लॅपल कोट:* लॅपल म्हणजे कोटाच्या काॅलरला जाॅइंट होवून व छातीवर दुमडून खाली निमुळता होत गेलेला भाग. आणि त्याच्या खाली कोटाचे दोन किंवा तीन मोठे बटण. बटणाच्या खालच्या भागाला अर्धगोलाकार शेप दिलेला असतो. दोन्ही खांद्यावर बाहीच्या बाजूला व गळ्याकडे निमुळते होत गेलेले कॅनव्हासचे पॅड, बाही व कोटाच्या लायनिंगमध्ये (अस्तर मध्य) जोडलेले असते. यामुळे व्यक्तीचे खांदे ताठ व रुबाबदार दिसतात. कोटाच्या दोन्ही बाजूंना १३ सेंमी चे खाली साइड कट्स असतात किंवा कोटाच्या मागील बाजूस मधोमध १५ सेंमी चा एकच कट असतो. ते कट्स यासाठी की कोट परिधान केलेल्या व्यक्तीची हालचाल सुलभ व्हावी. तसेच समोरील खालच्या दोन बाजूला अर्ध्या सेंटीमीटर जाडीच्या डबल पायपिनचे, कोट व अस्तर च्या मध्ये आतील बाजूस असलेले दोन खिसे. वरच्या डाव्या बाजूला एक इंच जाडीचा पायपिन व आतल्या बाजूस असलेला मध्यम साईज चा खिसा. त्या खिशात कोटाच्या अपोझिट कलरचा रूमाल. त्या रूमालाची त्रिकोणीय घडी, त्या घडीचे दोन टोक खिशात व एक टोक साधारण दीड इंच खिशाच्या बाहेर असते. त्या रूमालाच्या घडीचे बाहेर दिसणारे टोक त्या कोटाची शान वाढवते. खिसा व लॅपलच्या मध्ये एक लुक्स असते. ते लुक्स कोटाच्या कलरचे टेलरने सुईच्या सहाय्याने हाताने बनवले असते गुलाबाचे फूल अडविण्यासाठी. फूल कोटाच्या रुबाबात ‘चार चांद’ लावण्यचे काम करते. या कोटाच्या आतमध्ये जाकीट, जाकीटच्या आतमध्ये कमरेला बेल्ट असलेल्या पॅंटमध्ये इन केलेले फूल बाह्यांचे शर्ट, काॅलरला टाय आणि पायात लेसयुक्त बुट बांधले की किरकोळ व्यक्तीमत्वाला सुध्दा साहेबपण येते. म्हणूनच *’एक नूर आदमी दस नूर कपडा’* ही म्हण प्रसिद्ध पावली.
*२) डी. बी. लॅपल कोट:* या कोटाचे लॅपल मोठे व पसरट असते. या कोटाचा उजवा
भाग व्यक्तीच्या डाव्या छातीवर अर्ध्या भागापर्यंत येतो. तर त्यावर डावा भाग उजव्या छातीवर अर्ध्या भागापर्यंत येतो. त्या भागावर मोठे बटण असतात. म्हणूनच या कोटाला डी. बी. किंवा डबल ब्रेस्ट लॅपल कोट म्हणतात. खालचा भाग काटकोनात असतो. या कोटाचे खिसे बाहेरच्या भागावर खाली असतात. व वरील डाव्या बाजूचा खिसा एस बी लॅपल कोटाप्रमाणेच असतो. या कोटाची उंची एस. बी. लॅपल कोटाएवढी असते. परंतु खास हिवाळ्यात या कोटाची उंची गुडघ्याच्या खाली पायाच्या पोटरी पर्यंत असते. यामुळे कडक थंडीच्या दिवसात व्यक्तीचा थंडीपासून बचाव होतो. (बाबांचा विलायतेला जाताना चा फोटो बघा) या कोटामुळे व्यक्तीचे व्यक्तीमत्व फारच भारदस्त व रुबाबदार दिसते. इंग्लंडचे प्राइम मिनिस्टर किंवा अमेरिकन प्रेसिडेंट किंवा तेथील नागरिक किंवा एकंदरीत पाश्चिमात्य देशांमध्ये हा कोट परिधान करतात. विशेषतः थंडीच्या मौसमात.
*३) जोधपूरी कोट:* हा भारतीय कोट आहे. या कोटाची काॅलर म्हणजे गळ्याभोवती अडीच सेंटीमीटर किंवा एक इंचाची स्टॅंडपट्टी असते. तीला एक मोठा हुक असतो. डाव्या बाजूचा हुक उजव्या बाजूच्या लुक्स मध्ये अडकविला जातो. त्यामुळे गळा बंद होतो. म्हणून याला बंद गळ्याचा कोट म्हणतात. याची बटणे वर पासून खाली पर्यंत शर्टाप्रमाणेच पण मोठे असतात. व खालचा शेप काटकोनी असतो. या कोटाच्या खालच्या बाजूचे खिशे एस बी लॅपल कोट किंवा डी बी लॅपल कोट अशा दोन्ही प्रकारचे असतात. वरचा खिसा वरील दोन्ही कोटाप्रमाणेच असतो. यालाही फूलासाठी लुक्स असते. जेव्हा म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे भारतीय संविधान सोपवून ते देशाला अर्पण केले तेव्हा त्यांनी हाच जोधपूरी कोट परिधान केला होता. (संविधान अर्पण करताना चा फोटो बघा) जर त्यांनी त्यावेळी एस बी लॅपल कोट किंवा डी बी लॅपल कोट परिधान केला असता तर ते बिलकुल संयुक्तिक वाटले नसते. म्हणून त्यांनी भारतीय संविधान भारताला अर्पण करताना भारतीय जोधपूरी कोट प्रसंगानुरूप परिधान केला होता. यावरून प्रसंगानुरूप कोणती वेशभूषा परिधान करायची याचे त्यांना किती सूक्ष्म ज्ञान होते हे लक्षात येते.
*४) शेरवानी:* शेरवानी व सुरवार हा पुर्वी मुख्यतः मुस्लिम नेत्यांचा पेहराव मानला जात होता. ही शेरवानी गुडघ्याच्या खालीपर्यंत लांब असते. बंद गळ्याच्या शेरवानी ला कमरेच्या थोडे खालपर्यंत बटण असतात. याला नेहरू शर्ट प्रमाणे कमरेच्या थोडे वर साईड खिसे असतात. शेरवानीच्या समोरच्या बटणा जवळच्या भागावर उजव्या/डाव्या भागावर कलर काॅंम्बिनेशनचे रेशमी नक्षीकाम केलेले असते. किंवा नसते. शेरवानी ही सुरवार वरच घालतात. बाबासाहेबांचा हाही पेहराव आवडता होता. मुस्लिम नेत्यांशी भेटताना प्रसंगानुरूप बाबासाहेब हा पेहराव परिधान करीत असत. आता हा पेहराव कुणीही परिधान करतात. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू सुरवार आणि त्यावर शेरवानी व डाव्या बाजूला गुलाबाचे फूल ही त्यांची खास आवडती वेशभूषा असायची. आजचे नेते त्यांचे क्वचित अनुकरण (फूल न लावता) करताना दिसतात. आज धन्नासेठ चे लग्नाचे नवरदेव सुरवार त्यावर शेरवानी व डोक्यावर मानाचा फेटा अशा वेशभूषेत लग्न लावताना दिसतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेश दौऱ्यावर असले की डी बी लॅपल कोट व इंग्लिश हॅटचा जास्त वापर करत असत. तेव्हा त्यांचे उंचपूरे भरीव गोरे व्यक्तीमत्व इंग्लिश प्राईम मिनिस्टर किंवा अमेरिकन प्रेसिडेंट यांनाही लाजवणारे असायचे. त्यांची इंग्लिश वेशभूषा व बुद्धीमत्ता पाहून प्राईम मिनिस्टर व प्रेसिडेंट प्रभावित होत असत. म्हणूनच अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट बराक ओबामा यांनी बाबासाहेबांना विद्वत्तेचे प्रतीक मानले. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात त्यांचा अर्धपुतळा बसवून त्याखाली लिहिले *द सिंबाॅल ऑफ नाॅलेज.* विद्वत्तेचे प्रतीक अमेरिकेने मानले म्हणून साऱ्या जगाने ही मानले. भारतात मात्र ते एस बी लॅपल कोट व जोधपूरी कोटाचा जास्त वापर करत असत. कोणत्या सुटावर कोणता बूट सूट होईल यावरही त्यांचे बारीक लक्ष असायचे. परंतु आपल्या दादरच्या राजगृहात किंवा दिल्लीत २६,अलीपूर रोडवरील आपल्या निवासस्थानी मात्र ते बिन काॅलरचा सफेद तलम मलमलचा झब्बा व धोतर असा अस्सल भारतीय पेहरावाचा वापर करत असत. त्यावेळी ढाक्याचे मलमल कापड आशियाई देशांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. ढाका आता बांगला देशाची राजधानी आहे हे वेगळे सांगणे न लगे. बाबासाहेब अशा मलमली पेहरावात आपल्या खास खुर्चीवर बसून पुस्तक किंवा वर्तमान पत्र वाचन करत असत तेव्हा ते स्वतःलाही विसरून जात होते. जेव्हा बाबांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धम्म दीक्षा घेतली म्हणजे दि. १४ आक्टोबर १९५६ रोजी तेव्हा त्यांनी शुभ्र भारतीय वस्त्रे परिधान केले होते. तर असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रूबाबातील भारदस्त व्यक्तीमत्व होते. भारदस्त व्यक्तीमत्व व बुद्धिमत्तेच्या जोरावर ते देश परदेशात अनन्यसाधारण ख्याती प्राप्त ठरले. आणि बहुजनांच्या गळ्यातील विज्ञानवादी ताईत सुध्दा. म्हणूनच दरवर्षी देश परदेशात त्यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असते.
-अशोक सवाई.
पुणे.
91 5617 0699.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत