दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आंबेडकरी जनतेस संदेश…

समाज माध्यमातून साभार

विजयादशमी हा दिवस आंबेडकरी जनतेसाठी केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पुनर्जन्माचा दिवस आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि भारताच्या इतिहासाला नवे वळण दिले. याच घटनेला आपण “धम्मचक्र प्रवर्तन दिन ” म्हणून साजरा करतो. या दिनाचे महत्त्व केवळ आठवणी पुरते नाही, तर तो आपल्याला आत्मपरीक्षण, आत्मभान आणि आत्मोउन्नतीची प्रेरणा देतो.

धम्मदीक्षा म्हणजे काय?
धम्मदीक्षा म्हणजे अन्याय, शोषण, अंधश्रद्धा आणि गुलामगिरी यांना नकार देऊन सम्यक विचार, करुणा, प्रज्ञा व मैत्रीचा स्वीकार करणे. बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील जातिभेद, अस्पृश्यता आणि अमानुष प्रथा नाकारून, समतेवर आधारित बौद्ध धर्माची वाट निवडली. “मी जन्माने हिंदू असेन पण मृत्यूपूर्वी हिंदू राहणार नाही” ही बाबासाहेबांची प्रतिज्ञा १९५६ मध्ये साकार झाली.

धम्मदीक्षेमुळे आपण काय कमावले.?
मानवी सन्मान
धम्मदीक्षेनंतर दलित-बहुजन समाजाला प्रथमच माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व सन्मान मिळाला. अस्पृश्यतेचे ओझे, मंदिर-प्रवेश बंदी, विहिरीचे पाणी न मिळणे, ही अपमानजनक स्थिती धम्मामुळे झुगारून देण्यात आली. समानतेचे अधिष्ठान
बौद्ध धर्म आहे. इथे ‘जातभेद नाही, तर मानवजात,’ यावर भर दिला जातो. त्यामुळे समाजात समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे बीज रोवले गेले. हा बदल केवळ धार्मिक नव्हता, तर सामाजिक क्रांतीच्या बदलाचे स्वरूप होता. आत्मविश्वास आणि शिक्षणाची प्रेरणा
धम्मदीक्षेनंतर आंबेडकरी समाजाने शिक्षणाला जीवनमूल्य मानले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” ही बाबासाहेबांची शिकवण धम्माच्या आधाराने प्रत्यक्षात उतरू लागली. लाखो कुटुंबांनी शिक्षणाच्या बळावर दारिद्र्य व अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर पडले.
राजकीय सजगता,
धम्मामुळेच समाजात राजकीय जाणीव निर्माण झाली. अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध संघटित होण्याचे आणि आपल्या हक्कांसाठी राजकीय क्षेत्रात लढण्याचे धैर्य आले. बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीच्या कार्यात आणि नंतरच्या चळवळींमध्ये ही सजगता दिसून आली.
स्त्री-पुरुष समानता
बौद्ध धर्मात स्त्री-पुरुष भेद नाही. धम्मदीक्षेनंतर महिलांना स्वतःचा सन्मान, शिक्षण आणि नेतृत्व मिळविण्याची दिशा मिळाली. समाजातील स्त्रिया आत्मनिर्भर बनल्या.
आधुनिक जीवनमूल्ये
अंधश्रद्धा, कर्मकांड, देव-दैवतांच्या नावाखाली होणारा छळ, या सर्वातून मुक्ती मिळाली. विज्ञाननिष्ठ, विवेकवादी व तर्कसंगत जीवनपद्धती स्वीकारण्याची ताकद धम्माने आम्हांला दिली. जागतिक ओळख
धम्मामुळे, आंबेडकरी समाज केवळ भारतीय समाजातच नव्हे तर जगभर ओळखला जाऊ लागला. बुद्धाचे करुणामय व प्रज्ञायुक्त विचार जागतिक पातळीवर आदराने पाहिले जातात. त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी आज जागतिक स्तरावर आदराने स्मरले जातात.

आजची गरज काय..?
धम्मदीक्षेला जवळपास सात दशके उलटली. पण आजही आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आपण धम्माच्या शिकवणीला किती प्रमाणात आपल्या जीवनात उतरवले? बाबासाहेबांनी दाखविलेली करुणा, प्रज्ञा, समता, बंधुता आणि सत्याच्या मार्गावर आपण चालतो का? आज समाजात तुटकपणा, अहंकार, मत्सर, हेवेदावे अशी स्पर्धा वाढलेली दिसते. धम्माने आपल्याला जे दिले, ते जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी संघटित प्रयत्न आवश्यक आहेत. फक्त उत्सव, मिरवणुका, आणि बाह्य प्रदर्शन न करता धम्माची खरी साधना आपल्या आचरणात आणणे हीच खरी बाबासाहेबांना आणि बुद्धांना वंदना ठरेल.

आपली पुढची दिशा
शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यावर भर देणे. समाजात समता व बंधुतेचे नवे उदाहरण निर्माण करणे.
तरुण पिढीला व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न आणि संघटित करणे. महिलांना खऱ्या अर्थाने नेतृत्वात आणणे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्ध-आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे. ही आपली दिशा असली पाहिजे.
धम्मदीक्षेमुळे आपण अमानुषतेतून मानवतेकडे, गुलामगिरीतून स्वाभिमानाकडे, अज्ञानातून प्रज्ञेकडे आलो. हे आपल्या अस्तित्वाचे, प्रगतीचे आणि आत्मविश्वासाचे अधिष्ठान आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा आपल्याला वारंवार स्मरण करून देतो की, धम्म हा केवळ धर्म नाही, तर तो जीवनपद्धती आहे, सामाजिक क्रांती आहे, मानवी मुक्तीचा मार्ग आहे.
आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी ठरवूया – धम्माची शिकवण आचरणात आणून समाजाला नव्या युगात नेऊ. हाच खरा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संदेश आहे.!
जयभीम, नमोबुध्दाय

संपादक-
रतनकुमार साळवे,
दैनिक “निळे प्रतिक” छत्रपती संभाजीनगर
9923502320

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!