बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ पुरातत्व संशोधक वसंतराव धावरे यांचे निधन!

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी):
बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ पुरातत्व संशोधक वसंतराव म. धावरे यांचे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वसंतराव धावरे हे बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुरू केलेल्या महाविद्यालयाच्या (मिलिंद महाविद्यालय) पहिल्या बॅचचे पदवीधर होते.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर कार्यरत असतानाच वसंतराव धावरे साहेबांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन बौद्ध साहित्य संस्कृतीच्या संशोधनास वाहून घेतले होते. त्यांच्या याच ध्यासातून ‘अयोध्या: बुद्धकालीन साकेत ‘ हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ग्रंथ साकारला आहे. त्रिपिटक साहित्यातील दीघनिकाय ग्रंथाचं मराठी भाषांतर आणि सद्धम्म पत्रिका मासिकात सलग सात वर्षे चाललेली त्यांची ‘ संस्कृतीच्या खाणाखुणा ‘ ही मूलगामी संशोधनास संदर्भ पुरविणारी लेखमाला वाचकप्रिय ठरली होती.
अर्थपूर्ण दीर्घायुष्य लाभलेले कालकथित वसंतराव धावरे अनेक समाजोपयोगी उपक्रमात अग्रेसर राहीले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स इम्प्रुव्हमेट ट्रस्टचेही ते अनेक वर्षे विश्वस्त होते. त्यांचा पुण्यानुमोदन संस्कार विधी व शोकसभा रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘कमलपुष्प’ कॉम्प्लेक्स’ लीलावती हॉस्पिटलच्या बाजुला बांद्रा रिक्लमेशन, मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांचे चिरंजीव डॉ. श्याम धावरे यांनी कळविले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत