महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ

लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- १२/९/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३७
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये घेतलेल्या महार परिषदेमध्ये समाजाला वर्ग कलहात टिकून रहायचे असेल तर तिन सामर्थ्यांची आवश्यकता आहे असे सांगतात.
ती म्हणजे
१) मनुष्यबल
२) द्रव्यबल
३) मानसिक बल
मनुष्यबलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्याक आहात ही गोष्ट तर उघडच आहे.मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढीच आहे.तीही संघटित नाही.आपसातील जातीभेदामुळे तिच्यात संघशक्तीचा पुर्ण अभाव आहे.संघटीत नाही ती नाहीच पण एकत्रितही नाही.ती खेडोपाडी विखुरली गेली आहे.अशा कारणामुळे असलेल्या अल्पस्वल्प संख्येचा देखील संकटग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्तीस कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या परिषदेत मांडलेले विचार आजही तेवढेच समाजाला व आजच्या परिस्थितीला लागू होतात. त्या परिषदेत बाबासाहेब सांगतात की;आपण अल्पसंख्याक आहोत.या करिता आपण मनुष्य बलाच्या बाबतीत दुसऱ्या कोणाशी तरी ऋणानुबंध जोडले पाहिजेत.म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी धर्माशी ऋणानुबंध जोडले पाहिजेत.ज्या धर्मात समता असेल तोच धर्मच माणसाला माणसा बरोबर समतेने वागणूक देईल.समता असेल तर सम दुःखी लोक एकमेकांना समजून घेऊन मदत करतील.त्यातून त्यांच्यात बंधुत्वाची भावना वाढीस लागेल ज्या धर्मात समता आहे तिथेच मनुष्याची प्रगती होऊ शकते.एकसंघ; संघटित समाज निर्माण करण्यासाठी मानवा मानवातील समता महत्वाची आहे.यामुळे बाबासाहेबांच्या एकुण चळवळीचा कल बघितला तर भगवान बुद्ध यांच्या धम्माकडे होता हे आपल्या लक्षात येईल.भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य यात डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की; बौद्ध राष्ट्रांनी भारतीय बौद्धांना मनुष्य बल व आर्थिक बल देऊन मदत केली पाहिजे. जे की बौद्ध धम्माचे मैत्री व करुणेचे आचरण आहे.या बौद्ध धम्माच्या उदात्त तत्वांमुळे समस्त जगातील मानवाचे दुःख दूर करण्यासाठी मदतच होईल.सर्व जगातील मानव सुखाने; गुण्यागोविंदाने या जगात राहतील.आपण अल्पसंख्याक आहोत म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे केलेले धम्मचक्र परिवर्तन हे जगातील बौद्ध राष्ट्रांशी ऋणानुबंध प्रस्थापित करण्यासाठी;वाढवण्यासाठी व जगातील बौद्ध राष्ट्रांची आपल्या सामाजिक जीवनात निर्माण होणाऱ्या अन्याय; अत्याचार या परिस्थितीत बौद्ध राष्ट्रांची सहानुभूती व मदत निर्माण होईल अशी अपेक्षा होती.तसेच याच परिषदेत बाबासाहेब यांनी मुसलमान समाजाचे उदाहरण दिले आहे.गावात मुसलमानांची दोन घर जरी असली तरी त्यांच्या वाट्याला जाण्याची कोणाची हिम्मत होत नाही.कारण त्यांच्या पाठीशी जगातील मुसलमान असतो.बाबासाहेबांची बौद्ध राष्ट्रांकडून हिच अपेक्षा आहे की त्यांनी भारतीय बौद्धांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.जेणेकरुन बौद्धांवर अन्याय; अत्याचार करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही.भारतातील बौद्धांची ओळख पुसून टाकण्यात दलित या शब्दामुळे मदतच झाली आहे. त्यामुळे फार नुकसान झाले आहे. या चळवळीने जातीयवादाला हादरा दिला.त्या बद्धल आपण त्यांचे ऋणी आहोत.परंतू वर्तमान पत्रात बौद्धांवर अन्याय ; अत्याचार झाला की; बातमी दलितांवर अन्याय अत्याचार झाला म्हणून येते.त्यामुळे जागतिक बौद्ध हे भारतातील बौद्धांना दलित या शब्दामुळे हे लोक हिंदू धर्माचा भाग आहेत असाच समज त्यांचा होतो.त्यामुळे जागतिक पातळीवर बौद्ध राष्ट्रांबरोबर भारतीय बौद्धांचे आजतागायत संबंध म्हणावे तेवढे प्रस्थापित झाले नाहीत. बौद्धांच्या जागतिक परिषदांमध्ये जाणारे एकटे दुकटे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रश्नाला आजतागायत वाचा फोडू शकले नाहीत.तसेच असेही लक्षात येते की; नकली बौद्ध जगातून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी झालेले या परिषदांमध्ये जातात यांच्या मुळे सुद्धा तिथे आवाज उठवण्यात अडचणी येत असतील.आज भारतात बौद्ध संस्कृती व बौद्ध समाज हा मनुवादी व्यवस्थेमुळे एका भयावह परिस्थिती जगत आहे.भारतातिल बौद्धांचा हा आजचा प्रश्न त्या परिषदांमध्ये घेऊन गेले पाहिजे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजावर अन्याय; अत्याचार होऊ नयेत म्हणून समता सैनिक दल स्थापन केले.परंतू बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर ही संघटना नावापुरती राहिली.तिचा उपयोग फक्त सभेचे नियोजन व सहा डिसेंबर रोजी गर्दीचे नियोजन या पलीकडे काही होताना दिसत नाही.खरेतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती की; जे मिलिटरी मध्ये सैनिक सुभेदार मेजर आहेत त्यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून समजाला अन्याया विरूद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे होते.नाहीतर दलित पॅथर निर्माण होण्याची आवश्यकता भासली नसती.दलित पॅंथर ही समाजवादी ब्राम्हणांची व कम्युनिस्ट ब्राम्हणांची देणगी आहे असेच आपणास म्हणावे लागेल.आज ८० ०/० आंबेडकरी चळवळ मनुवादी लोक आंबेडकरी चळवळीतील दलालांना पकडून चालवत आहेत हे दिसेल.या दलित सेलचा वापर निवडणूकीत मत घेण्यापुरता असतो.दलालाला रसद मिळाली; कमिशन मिळाले की दलाल समाज विकायला मोकळा होतो.या दलालांना मदत करणारा अभ्यास नसलेला आंबेडकरी समाज सुद्धा तेवढाच जबाबदार आहे.म्हणजे हे लोक आंबेडकरी चळवळीचे खरे मारेकरी आहेत.अशी भयानक परिस्थिती आहे.
भारतीय बौद्ध महासभेची सुद्धा शकले झाली आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेची अब्रू तरी तथाकथित बौद्धांनी शाबुत ठेवायला हवी होती.परंतू दिवसेंदिवस बौद्ध आपल्या जुन्या जातीयवादी संस्कारामुळे वेगवेगळ्या संस्था; संघटना ; पक्ष काढून आपसात द्वेष; तिरस्कार; दुजाभाव; बदनामी या विकृत मानसिक अवस्थेच्या प्रभावाखाली काम करत आहेत.वेगवेगळया संस्था; संघटना; पक्ष आजचा बौद्ध (महार) काढत आहे.त्या केवळ स्वतःचा स्वार्थ व पद प्रतिष्ठेसाठी काढत आहे असेच वातावरण आपणास आजुबाजुला दिसेल.म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्म क्रांतीला भारतीय बौद्धांनी हरताळ फासून जागतिक बौद्ध राष्ट्रांच्या पातळीवर खीळ बसवली असेच आपण म्हणू शकतो.भारतीय बौद्ध महासभा ही विधी व निधी याच्या पलीकडे जाऊन काम करताना दिसत नाही.भारतीय बौद्ध महासभा ही आपल्या घटनेतील दहा उद्दीष्टांनुसार काम करतांना सुद्धा दिसत नाही. एकुण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माच्या दृष्ठिचा अभाव समाजामध्ये असल्याचे आपणास दिसेल.बौद्ध धम्माच्या आचरणापेक्षा त्यातील पुजा अर्चा याच्यातिल कर्मकांडाला बौद्ध महत्व देत असल्याचे दिसून येईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक; शैक्षणिक व धार्मिक संस्था व संघटना यांच्यावर नीतीभ्रष्ठ राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याने या चळवळी निष्प्रभ झाल्यासारख्या दिसत आहेत.
पुढे बाबासाहेब म्हणतात की; अस्पृश्य समाज संघटित नाही.आपसातील जातीभेदामुळे संघशक्तीचा अभाव आहे.संघटीत नाही ती नाहीच पण एकत्रित सुद्धा नाही. खेडोपाडी विखुरली आहे.
अस्पृश्य समाज संघटित नाही याची कारणे आपणास जातीव्यवस्थेच्या रचणेत दिसतील.कारण उच्च जात कनिष्ठ जातीचा द्वेष व तिरस्कार करते.याच्यातून माणसा माणसांमध्ये द्वेष;कलागती; भांडणे ; तिरस्कार; दुजाभाव; बदनामी या प्रवृत्ती वाढतात.म्हणजे माणसा माणसातील माणुसकी; समता नष्ट होते.आजच्या बौद्धांची अवस्था पाहिली की असे स्पष्ट होते की; अजूनही म्हणावा तसा बौद्ध समाज या जुन्या धर्माच्या जातीयवादी विकृत मानसिकतेतून मुक्त झाला नाही हे दिसते.नाहीतर तो एका छत्राखाली संघटित असता.किंवा वेगवेगळ्या संस्था ;संघटना व पक्ष या मध्ये काम करत जरी असला तरी या सर्व संस्था ;संघटना व पक्ष यांचा एकच परिसंघ निर्माण करून त्याच्या माध्यमातून एकत्र आला असता.एकसंघ काम केले असते.तसेच मागासवर्गीय हिंदू ओबीसी ;एससी ; एसटी ;एनटी; एसबीसी यांच्या कडे पाहिले तर या जातीव्यवस्थेचे जास्त शिकार झाल्याचे दिसून येते.या समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देऊन सुद्धा म्हणावी तशी प्रगती करू शकला नाही.कारण मनुवादी व्यवस्थेची गुलामगिरी हे कारण आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे बौद्ध समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.काही फार थोडे लोक समतेचे आचरण करून बौद्धांना सूधरवण्याचा प्रयत्न करतात.बरेच लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसतील. परंतू मनुवादी व्यवस्थेबरोबर घरोबा करणाऱ्या भ्रष्ट बौद्धांमूळे समाजात बौद्ध धम्माच्या कामाला खीळ बसते असे वातावरण सुद्धा आहे.
उर्वरित भाग पुढे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत