
लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- ७/९/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३६
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ९० वर्षांपूर्वी वर मांडलेले जातीव्यवस्थेचे वास्तव आजही तसेच आहे.तिचे भयंकर रूप उग्रपणा धारण करताना दिसत आहे.आदीवासी व धनगर भांडत आहेत.मराठा व ओबीसी भांडत आहेत.अनुसुचित जातींमध्ये भांडण लावण्याचे काम सुरू आहे. म्हणजे मनुवादी लोकांना मागासवर्गीय हिंदू जातींना गुलाम करण्याचे हिंदू राष्ट्र हवे आहे. तो कार्यक्रम फार जोमाने सुरू आहे.ज्यांना आपल्या आयुष्यात मनुस्मृती माहिती नाही.त्यांना मनुवाद्यांचा हा खेळ लक्षात येणार नाही.कारण मनुवाद्यांनी सकल हिंदू अशी हाक दिल्याने हिंदू जातींचा अहंकाराने उर भरून आला आहे.एकीकडे या देशातील ७५ वर्षांची अवस्था पाहिली तर असे लक्षात येते की; जो मागासवर्गीय हिंदू ओबीसी ;एससी; एसटी; एनटी; एसबीसी व बौद्ध आहेत त्यांच्या समतेच्या आरक्षणाला विरोध करणारा उच्च जातीचा शेटजी व भटजी समुह आहे असे दिसते.यांच्या आरक्षणाला कोणी मुसलमान बौद्ध शीख ख्रिश्चन यांनी विरोध केलेला आपणास दिसत नाही.म्हणजे या देशातील बहुजन समाजाच्या अज्ञानाला खतपाणी घालून लोकांचा बुद्धीभेद केला जात आहे.या षडयंत्राला अज्ञानी लोक सहज बळी पडतांना दिसत आहेत.जल ;जंगलं व जमिन यांच्यावर या देशातील मुठभर मनुवादी भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांना हक्क हवा आहे.आरक्षणामुळे वाटणी होऊन शुद्र समाज प्रगती करत आहे हे शेटजी व भटजी यांना खपत नाही.
खरे तर जातीव्यवस्था हा मानसिक रोग आहे. अनेक संत; महापुरुषांनी या जातीय विषमतेच्या विरूद्ध काम केले.परंतू इथला कर्मठ समाज या महापुरुषांच्या व संतांच्या विचारांपासून कोसो दूर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी समतेचे रयतेचे राज्य केले.त्यांच्या राजवटीत सर्व अठरा पगड जातींना सामावून घेतले होते.महाराजांनी जाती व्यवस्थेला छेद देण्यासाठी सैनिकांना मावळा ही उपाधी दिली.
लोकशाहीचा पाया समता ;स्वातंत्र्य; बंधुत्व व न्याय ही तत्वे असल्याने या देशातील समाज कायद्याच्या भीतीपोटी जातीव्यवस्थेच्या कुप्रथेला मुठमाती देण्याच्या तयारीत असताना.या देशात असा काही वर्ग होता त्याला लोकशाहीची समता; स्वातंत्र्य; बंधुत्व व न्याय ही तत्वे मान्य नव्हती. त्यांना आपले जातीचे श्रेष्ठत्व असलेली विषमतावादी व्यवस्था हवी होती.गेल्या काही वर्षांत या जाती श्रेष्ठत्वाने पछाडलेल्या लोकांनी भारतीय संविधानाला आव्हान देऊन जाती धर्मात भांडण लावून देण्याचा सपाटा लावलेला आहे. सध्या देशात आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे. संविधानिक आरक्षण संपवता येत नाही.म्हणून अनेक जातींना आपापसात भांडणे लावून; लढवत ठेवून विषमतावादी मनुवादी लोकांना जाती जातीच्या वैमनस्यातून सत्तेची पोळी भाजून घेण्याची धडपड सुरू आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतावादी ब्राम्हणी मनुवादी धर्मामुळे अस्पृश्यांना माणूस म्हणून वागणूक नव्हती हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. ही अवस्था फक्त अस्पृश्यांची होती काय? तर कमी जास्त प्रमाणात शुद्र जातींना या विषमतावादी मनुवादी ब्राम्हणी व्यवस्थेचा फटका बसलेला आहे.आजही लोकशाही राज्यात परिस्थिती म्हणावी तशी बदललेली आहे असे म्हणता येणार नाही.
या देशात लोकशाही म्हणजे समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय या तत्त्वांचे पालन करणारा भारतीय बनवायचा असेल तर.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली सल्ला दिला आहे.मनुवादी ब्राम्हणी धर्माच्या या अपमानकारक परिस्थितीला टाळायचे असेल तर या मनुवादी ब्राम्हणी धर्माचा त्याग केला पाहिजे.
याचा अर्थ सरळ आहे की; लोकशाही या देशात रूजवायची असेल तर जो हिंदू धर्म (जी की मनुवादी ब्राम्हणी व्यवस्था आहे) समता; स्वातंत्र्य; बंधुत्व व न्याय या तत्वांना पदोपदी तूडवण्याचे काम करत आहे.तिला लाथाडून आजच्या भारतीयांना समतावादी धर्माचा स्वीकार करणे गरजेचे आहे. याचा अर्थ सरळ आहे की; हिंदू धर्म (मनुवादी ब्राम्हणी व्यवस्था) लोकशाही विरोधी आहे.मग आमच्या समोर कोणता धर्म समतावादी आहे.एकून विचार केला तर बौद्ध धम्माशीवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. भारतीयांना एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदायचे असेल तर मैत्री ;करूणा ; शांती ; शील; प्रज्ञा; समता; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय या तत्वांची शिकवण ज्या धर्मात आहे.तो एकमेव बौद्ध धम्म आहे.
जे जे मागासवर्गीय हिंदू आरक्षणाचा लाभ घेत आहेत.त्यांची ब्राम्हणी मनुवादी धर्मामुळे पाहिजे तेवढी प्रगती झाली नाही.त्यांच्या बरोबर सारखेच आरक्षण घेणारा बौद्ध समाज आचार ; विचार आणि उच्चार या बाबतीत पुढारलाच.परंतू त्यांची शैक्षणिक ;आर्थिक ; सामाजिक; सांस्कृतिक परिस्थिती बदललेली आहे. यापुढे मागासवर्गीय हिंदूंना (ओबीसी ; एससी; एसटी; एनटी; एसबीसी) यांना शैक्षणिक ;आर्थिक; सामाजिक आणि सांस्कृतिक या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर बौद्ध धम्माशीवाय पर्याय नाही.
दिनांक ३ एप्रिल १९५५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध भवन सिद्धार्थ कॉलेज येथे केलेले भाषण आपण वर विचार केला त्याला पुष्टी देते.काय म्हणतात बाबासाहेब
ब्रम्हाच्या तोंडातून ब्राम्हण; बाहूतून क्षत्रिय; पोटातून वैश्य व पायातून शुद्र निर्मिती यावर आधारभूत झालेली हिंदू धर्मरचना ही मानवतेचा अपमान करणारी ; बुद्धीचा भेद करणारी व ईश्वराचा द्रोह करणारी अशीच आहे आणि अशा त-हेच्या धर्मरचनेत समता कधीच नांदू शकत नाही.व्यक्ती विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच संपूर्ण विचारांती मला वाटते की; खालच्या वर्गाने या विचारसरणी विरूद्ध बंड पुकारले पाहिजे.नव्हे ती त्यागली पाहिजे.याचा अर्थ असा की;अशा त-हेचा हा धर्म सोडून सर्व समतेची मानवी ऐक्याची घालून दिलेली बुद्धाची शिकवणूक त्याने अंगिकारली पाहिजे.म्हणून माझ्या सर्व बांधवांना शेवटची हाक देत आहे की; मुक्ती साधावयाची असेल तर बौद्ध धर्माची दीक्षा घ्या. ही हाक सर्व भारतीय नागरिकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे.कारण मानवी कल्याण भगवान बुद्ध यांच्या धम्मातच आहे.ही खात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल.
काही लोक समता व समरसता या मध्ये गोंधळ माजवत आहेत. समरसता म्हणजे काय तर आमच्यात जी विषमता आहे; उच्च निचता आहे; भेदाभेद आहे; आम्ही भ्रष्टाचारी; दुराचारी आहोत त्या सर्व गोष्टी स्वीकारून आमच्यात समरस व्हा.आता जो व्यक्ती सदसद्विवेकबुद्धीचा आहे त्याला या मानवतेच्या विरूद्ध गोष्टी पटतील काय? अशा कंपू मध्ये कोणबर सामिल होईल. जे अज्ञानी लोक आहेत तेच अशा भंपक लोकांच्या नादी लागतील.
तेव्हा मानवजातीला जगात सुखाने जगायचे असेल तर समतेशीवाय पर्याय नाही.आणि ज्या धर्मात समता आहे त्या बौद्ध धर्माशीवाय पर्याय नाही.
***** उर्वरित भाग पुढे *****
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत