सर्व मराठा कुणबीच -एस. एम मुश्रीफ

'मराठा' या शब्दाच्या उत्पत्तीचा इतिहास पाहिला असता हा शब्द साधारण 1910 ते 1920 च्या दरम्यान प्रचलित झाला असावा असे दिसते. या संबंधीची कारणमीमांसा खालील प्रमाणे आहे:
1) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक: ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, कारण ते कुणबी म्हणजे शूद्र होते.
2) तुकाराम महाराजांचा अभंग: शिवाजी महाराजांचे समकालीन तुकाराम महाराज यांनी म्हटले होते:
‘बरे झाले देवा कुणबी केलो,
नसता दंभेची असतो मेलो.’
या अभंगात तुकाराम महाराजांनी आपल्याला कुणबी म्हणून जन्माला घातले म्हणून देवाचे आभार मानले आहेत. आपल्याला उच्च वर्णात जन्माला घातले असते तर आपण मोठेपणाच्या तोऱ्यात वाया गेलो असतो असे तुकाराम महाराज म्हणतात. त्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेतले नव्हते.
3) महात्मा फुलेंचा पोवाडा : महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचेवर जो पोवाडा लिहिला होता त्यामध्ये त्यांनी
शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘कुळवाडीभूषण’ असा केला होता. ‘मराठा भूषण’ असा नाही.
4) शाहू महाराजांचा बहुजनांना 50 टक्के आरक्षण देण्याचा आदेश : दि. 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांना नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याचा आदेश काढला होता. त्यामध्ये जरी कोणत्या जातीच्या बहुजनांना आरक्षण दिले गेले याचा जरी उल्लेख नसला तरी कोणाला आरक्षण नाही याचा उल्लेख होता. या आदेश प्रमाणे ब्राह्मण, प्रभू (कायस्थ) सेणवी आणि पारसी या जाती-जमातींना सोडून इतरांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण देण्यात आले होते. या आदेशावर टीका करताना टिळकांनी ‘महारांबरोबर कुणब्यानाही राखीव जागा’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. यावरून कुणब्यांना आरक्षण देण्यात आले होते हे स्पष्ट होते. शाहू महाराजांच्या आदेशात कुठेही ‘मराठा’ जातीचा उल्लेख नव्हता.
5) टिळकांचे लेखन व भाषणे : सर्व मराठा कुणबीच होते याचा सर्वात चांगला पुरावा म्हणजे टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रात दिलेले लेख व त्यांची भाषणे. बाळ गंगाधर टिळक हे कुणब्यांचा (आताच्या मराठ्यांचा) कमालीचा द्वेष करीत होते. त्यांच्यावर टीका करण्याची किंवा त्यांची टर उडविण्याची ते एकही संधी सोडत नव्हते. ब्रिटिशांनी जेव्हा बहुजनांना इंग्रजी व इतर उच्च शिक्षण देण्याची सुरुवात केली तेव्हा टिळकांनी त्यांच्या ‘द मराठा’ या इंग्रजी वर्तमान पत्राच्या दिनांक 15 मे 1881 च्या अंकात ‘our education system’ या नावाचा अग्रलेख लिहून ब्रिटिशांच्या शिक्षण विषयक धोरणांवर टीका केली. त्यात ते म्हणतात “सर्वांनाच शिक्षण दिले तर शेतकऱ्यांचा नांगर कोण चालविणार?” त्याचप्रमाणे जेव्हा इंग्रज सरकारने विधिमंडळात बहुजनांचे प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कोल्हापूर संस्थानच्या जवळ अथणी येथील सभेत टिळक म्हणाले होते, “कुणबी विधिमंडळात जाऊन नांगर चालविणार आहेत काय?…” या टिळकांच्या विचारांवरून स्पष्ट होते की कुणबी हे शेतकरी होते, त्यांना शूद्र समजले जात होते व त्याना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. (टिळकांनी आपल्या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेले ‘द मराठा’ हे नाव जातीविषयक नसून प्रांतविषयक होते.)
मग प्रश्न निर्माण होतो की, कुणबी स्वतःला केव्हापासून मराठा म्हणून घेऊ लागले? शाहू महाराजांच्या 1902 च्या आरक्षणाच्या आदेशा पर्यंत तरी हा शब्द प्रचारात नव्हता हे स्पष्ट आहे. मराठा शब्दांच्या उत्पत्ती संबंधी असे अनुमान काढता येईल की 1902 नंतर शाहू महाराजांचे कार्य वाढत जाऊन त्यांचं नाव देशभर पसरले व शाहू महाराजांच्या काळातच शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी दाबून टाकलेला खरा इतिहास उजेडात येऊन शिवाजी महाराजांची महती लोकांना पटू लागली. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य निर्मितीशी संबंधित असलेले कुणबी व कोल्हापूर संस्थान व त्यांच्या शेजारच्या भागातील कुणबी विशेषतः पाटील व देशमुख हे स्वतःला मराठा म्हणून घेऊ लागले. त्यानंतर इतरही कुणबी हळूहळू मराठा झाले. हा काळ साधारण 1910 ते 1920 असावा.
1881 च्या ब्रिटिश काळातील खानेसुमारीमध्ये (सेन्सस मध्ये) मराठा हा उल्लेख नव्हता, फक्त कुणबी असा उल्लेख होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर 1891, 1901, 1911 मध्ये जी खानेसुमारी झाली होती त्यामध्ये सुद्धा मराठा हा उल्लेख अभावानेच आढळेल. त्याशिवाय 1920 पूर्वीचे शाळांचे रजिस्टर उपलब्ध असल्यास त्यातही मराठा या जातीचा उल्लेख आढळणार नाही, तर कुणबी किंवा कुणबी मराठा असा उल्लेख आढळेल. नुकतीच पानिपतकार विश्वास पाटील यांनी एका यू ट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की त्यांचे आजोबा व पणजोबा यांची जात कुणबी मराठा होती पण त्यांची स्वतःची जात मराठा अशी लागल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. विश्वास पाटील यांचे सध्याचे वय 70, 72 असे समजले तर त्यांच्या आजोबांचा व पणजोबांचा काळ 1910, 1920 असा येतो. म्हणजे त्या काळापर्यंत सर्व मराठा कुणबीच होते. 1911 पर्यंत ची खानेसुमारी, त्या काळातील शाळांचे रेकॉर्ड व हैदराबाद, सातारा, औंध किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील त्या वेळेच्या गॅझेट मध्ये मराठा हा उल्लेख मिळणार नाही. हे शासकीय रेकॉर्ड 'मराठा ही जात अस्तित्वात नव्हती' व 'आजच्या मराठ्यांचे सर्व वंशज कुणबी होते' हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे. त्यासाठी इतर कोणत्या पुराव्याची आवश्यकता नाही.
तेव्हा मराठ्यांनी आपला वृथा अभिमान (तुकाराम महाराजांच्या शब्दात 'दंभ') सोडून आपण कुणबी आहोत हे मान्य केले तर त्यांना ओबीसी मध्ये आपोआप आरक्षण मिळेल. सुप्रीम कोर्टाचा किंवा इतर कोणत्याही कोर्टाचा निर्णय त्यांच्या आड येणार नाही. त्यासाठी ओबीसींना तक्रार करण्याचे कारण नाही. कुणबी आपल्यात आल्यामुळे आपली हिस्सेदारी कमी होईल असे त्यांना वाटत असल्यास त्यांनी सुप्रीम कोर्टाने घातलेली 50% ची कमाल मर्यादा वाढवून 70 टक्के करण्यासाठी संसदेत कायदा करण्यासाठी केंद्र शासनावर दबाव आणावा व ओबीसींचे आरक्षण वाढवून घ्यावे.
एस. एम. मुश्रीफ
पुणे, दिनांक 6 सप्टेंबर 2025
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत