
महेंद्र गांजरे
नागपूर
7385914445
पी डब्ल्यू एस महाविद्यालयाचे प्राचार्य आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दिक्षा भूमीचे प्राध्यापक म्हणून काम केलेले
प्रा मा. फ. गाजरे यांचा 28 ऑगस्ट हा स्मृतिदिन होता.त्या निमित्ताने दोन शब्द लिहत आहे.
आदरणीय प्रा. मा. फ. गांजरे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका देवाळा या गावी दिनांक १/७/१९३० साली झाला. वडील फक्रूजी गांजरे व आई पार्वतीबाई शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत. त्यांचे प्राथमिक शिक्षण मार्डी येथे झाले त्यानंतर 1947 ला मुकुटबन येथे शिक्षकाचा पेशा पत्करला. काही काळानंतर त्यांची बदली वेळा बाई मानकर येथे झाली. या काळात त्यांनी एबीसीडी पासून घरी अभ्यास करून खाजगीरित्या मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यास औरंगाबाद येथे गेले. त्याकाळात त्यांच्या पत्नी मंजुळाबाई यांनी स्वतः मोलमजुरी करून मुलांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. प्रि.युनिव्हर्सिटी चा अभ्यास करताना मान.म.ना.वानखेडे यांच्या शिफारसीने मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथील वसतीगृहात नोकरी मिळाली. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सांभाळून त्यांनी प्रि. युनिव्हर्सिटी ची परीक्षा दिली व मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये प्रथम क्रमांकाने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचा नांदापूरकर पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर बी.ए. चा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन 1965 साली एम.ए.ची परीक्षा ही प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली. शिक्षण घेतानाच काही काळा त्यांनी बिडकीन येथे शिक्षकी पेशा पत्करला. त्यानंतर 1966 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. हा व्यवसाय स्विकारतांना आपल्याला मुलांची मने घडवण्याची सुसंधी लाभत आहे अशा विचारांनी ते खूष होते. पण दहा वर्षाच्या काळानंतर युनिव्हर्सिटीने नेमून दिलेली तीच ती ज्ञानेश्वरी, मोरोपंत शिकवितच आपले आयुष्य वाया जाणार की काय अशी जबरदस्त अस्वस्थता त्यांच्या मनात निर्माण झाली. सतत मनात अस्वस्थता वाढत जात असल्यामुळे आपल्या जीवनाचे काहीतरी चीज कसे करता येईल यासाठी त्यांचे मन तळमळून मार्ग शोधू लागले. त्यावेळी बाबासाहेबांनी विभिन्न क्षेत्रात बांधलेल्या सामाजिक संघटना दुभंगून गेल्यामुळे व सामाजिक दृष्ट्या होत असलेली पीछेहाट पाहून या अस्वस्थतेत अधिकच भर पडली. म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांनी चालवलेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या चळवळीत कशाचीही पर्वा न करता भाग घेतला. ही चळवळ काही रिपब्लिकन पुढाऱ्यांच्या स्वार्थाच्या आड येणे स्वाभाविक होते. आणि त्यामुळे संचालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या नोकरीतून त्यांना मुक्त केले. अर्थात त्यांना या परिणामांची जाणीव होतीच. लौकिक आपत्तींना फारसे न घाबरता त्यांनी त्या परिस्थितीतही डॉ. बाबासाहेबांचे सर्व साहित्य व लिखाण मराठीत आणण्याचा मनाशी संकल्प केला. डॉ. बाबासाहेबांचे वाङमय मराठीतून प्रसिद्ध करून लोकांपर्यंत पोचवण्याचा उदात्त हेतू समोर ठेवून प्रा गांजरे यांनी प्रज्ञा प्रकाशन संस्था काढून या उपक्रमाला सुरुवात केली. तेव्हा आंबेडकरी साहित्त्याच्या दृष्टीने पाहता निदान महाराष्ट्रात तरी शून्यवत परिस्थिती होती. तत्पूर्वी लखनऊ वरून हिंदी मध्ये चंद्रिका प्रसाद जिज्ञासू यांचे बहुजन कल्याण प्रकाशन व जालंदर वरून एल. आर. बाली यांचे भीमपत्रिका प्रकाशन अत्यंत जिद्दीने व चिकाटीने या क्षेत्रात काम करीत होते. परंतु महाराष्ट्रात या कामाला गती व उत्साह नव्हता. डॉ. बाबासाहेबांचे साहित्य व विचार मराठीत प्रसारित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सर्वप्रथम प्रा. गांजरे यांनी प्रारंभ केले. त्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित साहित्य, जनता, मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुध्द भारत या वर्तमानपत्रांचे अंक, पत्रके, वेगवेगळ्या परिषदांचे अहवाल, तसेच बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित मौलिक अशी कागदपत्रे मिळविण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणे खंड 1 हे पहिले ‘प्रज्ञा प्रकाशन’ चे पहिले पुस्तक 1968 साली प्रकाशित झाले. त्यावेळी विक्री व्यवस्थेच्या अभावामुळे खूप गमतीचे (तेव्हाचे तापदायक )अनुभव आम्हाला मिळाले. आई जेवू घालीना व बाप भीक मागू देईना अशी विचित्र परिस्थिती झाली होती. त्या वेळी दिक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमात एकाच पुस्तकाचे एकच दुकान लावून ते बसले. हातात लाऊड स्पीकर चा माईक घेतला व लोकांना उद्देशून बांधवांनो, तुम्ही या पावन दिक्षाभूमीवर आलात, तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी काय खाऊ घेणार?, हे बाबासाहेबांच्या विचारांचे अमृत न्या ! यानेच तुमच्या भावी पिढ्यांचा उद्धार होईल. आदी स्वरूपाचे रात्रभर बोलत राहिले. त्या दिवशी पहिल्या खंडाच्या केवळ 40 प्रती विकल्या गेल्या ८ रु. मुल्य असतांना ६ रु.प्रति प्रमाणे 240 रुपयांची पुस्तके विकली गेली. हि सुरुवात होती. 1972 साली ‘अशोक प्रकाशन’ नावाची प्रकाशन संस्था स्थापून ‘मिलिंद प्रश्न’ हे भंते नागसेन व मिलिंद राजाचे प्रश्नोत्तर रुपी परिसंवादाचे भंते जगदीश कश्यप यांचे हिंदी ग्रंथाचा मराठीतून अनुवाद प्रकाशित केला. त्यानंतर बाबासाहेबांच्या भाषणाचे सात खंड, ‘अ्नहिलेशन ऑफ कास्ट’ या व इतरही बाबासाहेबांच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर केले. जसे ‘जातीभेद निर्मूलन’, भारतातील जाती, अस्पृश्य मूळचे कोण, मनुस्मृती कां जाळली गेली ?, जातींची राजकीय समस्या आणि ती सोडवण्याचे उपाय, रानडे गांधी जिना, अस्पृश्यांची मुक्ती आणि गांधीजी, महार वतन, डॉ.भदंत आनंद कौसल्यायन यांच्या हिंदी आवृत्तीचे मराठी भाषांतर भगवद्गीता आणि धम्मपद, अनात्मवाद ही पुस्तके प्रकाशित केली तसेच डॉ.भाऊ लोखंडे यांचा पी.एच.डी.चा प्रबंध मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव तसेच दि.मा.खैरकर गुरुजींचे बुद्ध विचार विवेचन, भगवान बुद्धाचे निसर्गविषयक विचार इत्यादी ग्रंथ अशोक प्रकाशन द्वारे प्रकाशित केले. 1982 साली महेंद्र प्रिंटर्स नावाची प्रिंटिंग प्रेस काढून प्रकाशनाचे कार्य चालू ठेवले. प्रा. मा.फ.गांजरे यांनी स्वतःचे स्वतंत्र लिखाणही केले. परंतु लेखक म्हणून त्यांनी स्वतःला कधीही मिरवले नाही. बुद्ध धर्म व नीतिशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहावयास सुरुवात केली होती परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांचे ते कार्य अपूर्णच राहिले. २८ ऑगस्ट १९८६ रोजी प्रकाशनाची जबाबदारी आमच्यावर सोपवून ते निर्वाणस्थ झाले. प्रा. या.वा. वडस्कर यांनी चालवलेल्या ‘अभिजात’ या साप्ताहिकातून त्यांनी काही लेखन केले होते. तसेच डॉ.मधुकर वासनिक व डॉ.भाऊ लोखंडे यांनी चालवलेल्या ‘निकाय’ या मासिकासाठी त्यांनी ‘कलावादाची फलश्रुती’हा लेख लिहिला होता. हे सर्व लेख एकत्र करून एखादे पुस्तक छापावे असा विचारही त्यांनी बोलून दाखवला होता. त्यांच्या पश्चात ‘प्रा. मा. फ. गांजरे यांचे स्फुट लेख’ हे त्यांचे लेख असलेले पुस्तक आम्ही प्रकाशित केले. त्यांचे सर्व लेख व इतरही साहित्य वाचून पाहिल्यावर त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप लक्षात येते. त्यांनी ‘मिलिंद प्रश्न’ या ग्रंथात दिलेली अर्पण पत्रिका आठवते. त्यात ते म्हणतात, आई ! माझा मुलगा मोठा पंडित होईल म्हणून तू माझे लाड करीत होतीस, मी पंडित तर झालो नाही पण पंडित या शब्दाचा अर्थ तेवढा कळला’. डॉ.भाऊ लोखंडे त्यांच्या स्फुट लेखाच्या प्रस्तावनेत लिहितात. माझे अगदी मनापासून असे मत आहे की प्रा गांजरे सर खऱ्या अर्थाने पंडित होते. दुर्दैवाने त्यांची व्हावी तेवढी कदर या समाजाकडून झालेली नाही एवढेच. भगवंत म्हणतात, जो आपले अज्ञान जाणतो तोच खरा पंडित होय ‘बोलो यो मञ्जति बाल्यं पंडितं चप्पितेन सो’ आमच्या या वाटचालीत इंगोले प्रिंटिंग प्रेस चे मालक श्री. एल. एन. इंगोले यांच्या बंधूवत स्नेहसंबंधामुळे त्यांनी प्रकाशनाच्या कार्यात बरीच मदत केली. श्री वसंतराव मून यांनी डॉ. बाबासाहेबांचे ‘जनता’ साप्ताहिकाचे अंक देऊन मदत केली. याशिवाय भंते मेेघंकर तसेच डाॅ.भदंत आनंद कौसल्यायन यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांचे मित्रपरिवारात डाॅ. भाऊ लोखंडे आणि प्रा. या.वा.वडस्कर, प्रा. मा. म. देशमुख यांचे सोबतही वेळोवेळी चर्चा मार्गदर्शन होत असे.
आज आंबेडकरी साहित्य क्षेत्रात खूपच मोठी वाटचाल झाली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एकाच दिवशी पुस्तकाच्या खरेदी-विक्रीची जेवढी उलाढाल होते, एवढी जगात अन्यत्र कोठे एका दिवशी होत असेल अशी शंकाच वाटते. आमच्या प्रकाशनाच्या सोबती पुढे सुगत प्रकाशन नागपूर, रत्नमित्रा प्रकाशन भुसावळ, बुद्धिस्ट पब्लिकेशन नागपुर, त्रिरत्न पब्लिकेशन पुणे आणि अनेक लहान मोठे प्रकाशक आलेे. अनेक प्रथितयश दुकानदारही संपूर्ण देशभर निर्माण झाले. त्या छोट्याशा रोपट्याचे आता मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले पाहून निश्चितच गांजरे सरांनी केलेले कार्य फळाला आल्याचे समाधान वाटते. आज ही महाराष्ट्र भर असलेल्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या आठवणी फार आदरपूर्वक जपलेल्या आहेत. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादान
महेंद्र गांजरे
पुणे
73859 14445
👍👍👍
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत