दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

संघ शंभरी !प्रचारक पंचाहत्तरी !!

🌻 प्रा रणजीत मेश्राम

रा. स्व. संघाला या दसऱ्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. याच शंभरीत दोन शक्तिमान प्रचारक , पंचाहत्तीरीचे होताहेत. एक प्रधानमंत्री. दूसरे सरसंघचालक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या १७ सप्टेंबरला तर सरसंघचालक मोहन भागवत हे ११ सप्टेंबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करताहेत.

येणारा सप्टेंबर महिना याअर्थाने फार महत्वाचा झालाय.

     सरसंघचालकांच्या एका वक्तव्याने सप्टेंबर मास पुन्हा चर्चेत आलेय. वक्तव्य अगदी ताजे आहे. सरसंघचालक एका पुस्तक प्रकाशनात बोलत होते. ते म्हणाले , 'एकदा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली की माणसाने निवृत व्हायला हवं' असे मोरोपंत नेहमी सांगायचे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांचे चरीत्र पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक असे म्हणाले. सरसंघचालकानी नेमकी हीच आठवण का सांगावी यावरुन देशभर चर्चा सुरू झाली. चर्चेचा रोख प्रधानमंत्री व सरसंघचालक दोन्हीकडे जोडला गेला.

     काय घडेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. पण एकाच वर्षात , त्यातही एकाच महिन्यात ही घटिका आलीय. एकूण लक्षात घेता , प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पंचाहत्तरीची निवृत्तीशाल अंगावर घ्यायला तयार दिसत नाहीत. याचवेळी सरसंघचालक मोहनराव भागवत हेही तब्येतीने , स्वभावाने ठणठणीत दिसतात. त्यामुळे निवृत्तीचे क्षण धुसर आहेत. हे खरंय , संघात सरसंघचालकाला स्वतः निवृत्ती घ्यावी लागते. नवा सरसंघचालक निवडायची सोय नाही. विद्यमान सरसंघचालकाला आपला उत्तराधिकारी स्वतः निवडावा लागतो. तसा बंद लिफाफा द्यावा लागतो.

आतापर्यंत सहा सरसंघचालक झालेत. डॉ. केशव बळीराम हेडगेवार (१९२५ ते १९४०), मा. स. गोळवलकर गुरुजी (१९४० ते १९७३), बाळासाहेब देवरस (१९७३ ते १९९४), प्रो. रज्जूभय्या (१९९४ ते १९९८), के. सी. सुदर्शन (१९९८ ते २००९) व डॉ. मोहन भागवत (२००९ पासून). सरसंघचालकानंतर दूसरे अग्रस्थान सरकार्यवाह यांचे असते. बहुधा जे सरकार्यवाह असतात तेच सरसंघचालक झालेले दिसतात. सध्या दत्तात्रेय होसाबळे हे सरकार्यवाह आहेत. आजघडीला रा. स्व. संघ सर्वशक्तिमान झाल्याचे स्पष्ट आहे. देशाची , बऱ्याच राज्यांची अप्रत्यक्षपणे सत्ता संघाच्याच हातात आहे. त्यामुळे शासन धोरणांच्या सर्व अंगांवर संघ विचारांची छाप पडत आहे. किंबहुना पाडली जात आहे. या संघटनेची दृश्य नकारात्मकता सुध्दा आहे. ती म्हणजे हे संघटन पंजीबध्द नाही. आज स्थिती अशी आहे की , ते घरबसल्या पंजीबध्द होऊ शकतात. तशी मागणीही उठते. पण ते पंजीबध्द होत नाही. व्हायला तयार नाही. लोकांना चारित्र्याचा सांगावा देणारे संघटन , स्वतः विधी चरित्र पाळत नाही.
याशिवाय हे पहिले संघटन असावे , ज्यावर स्वतंत्र भारतात तीनदा बंदी आणली गेली.

     पहिली बंदी गांधी हत्येनंतर आणली गेली होती. १९४८ ला. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदीचे आदेश काढले होते.देशात हिंसाचार व द्वेष पसरविण्याचा आरोप संघावर होता. दीड वर्षानंतर ही संघबंदी उठवली गेली. दूसरी बंदी आणीबाणी काळात १९७५ ला लावण्यात आली. तिसरी बंदी ही १९९२ ची आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर ही बंदी लावण्यात आली होती.

काळाची महिमा अशी की , स्वतंत्र देशात तीनदा बंदी लागलेले संघटन आज देशावर राज्य करतेय.

असे हे बहुचर्चित संघटन केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केले. तेव्हा ते वय ३५ चे होते. १५ ब्राह्मण सवंगड्यांना सोबत घेऊन ही संघ स्थापना केली. तेव्हा ते नागपुरातील महाल भागात राहत होते. त्यांच्या राहत्या वाड्यात ही निर्मिती झाली. दसरा , १९२५ ची ही घटना आहे. आज देश विदेशात संघ विस्तारलेय. संघ म्हणजे संघटन असे झालेय. इतर सारे तत्वज्ञान , तात्विकता , प्रतिक्रिया यात अडकलेय. संघाने आपल्या विचारांची माणसे व लोकमानस घडवले. शिवाय महत्वाचे म्हणजे संस्था घडविल्या. त्याच माणसे व लोकमानस घडविण्याचा कारखाना होतात. संघ म्हणतोय , माणसे मर्त्य आहेत. संस्था संघटनेला अमरत्व असू शकतेय. माणसाला पुन्हा जन्म नाही. संस्था मात्र कायम असू शकते.

     याचमुळे संघाने संस्था निर्मितीवर भर दिला. राष्ट्र सेविका समिती (१९३६), विद्यार्थी परिषद (१९४८), जनसंघ पूढे भाजप (१९५२), विद्या भारती (१९५२), भारतीय मजदूर संघ (१९५५), भारत विकास परिषद (१९६३), विश्व हिंदू परिषद (१९६४), दीनदयाल शोध संस्थान (१९७२), भारतीय इतिहास संकलन (१९७३), सेवा भारती (१९८०), संस्कार भारती (१९८१), स्वदेशी जागरण मंच (१९९१), भारतीय अधिवक्ता परिषद (१९९२), विज्ञान भारती (१९९२), लघु उद्योग भारती (१९९४), ग्राहक पंचायत (१९७२), सहकार भारती (१९७८), पूर्व सैनिक सेवा परिषद (१९९२), समरसता मंच (१९८३), अ भार साहित्य परिषद (१९६६), वनवासी कल्याण आश्रम (१९६९) , शिक्षण मंच , उत्तर भारतीय संघ , हेडगेवार रक्तपेढी , माधव नेत्रालय , बजरंग दल , दुर्गा वाहिनी .. आदी.

या संघ मुशीतून तयार झालेले दोन संघ प्रचारक आज देशभर चर्चेत आहेत. एक प्रधानमंत्री व दूसरे सरसंघचालक.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मुळचे वडनगर , गुजरातचे. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांची संघाशी ओळख झाली. ते स्वयंसेवक झाले. नंतर संघ संघटनेतील विविध जबाबदाऱ्या घेत राहिले. दीर्घ काळ प्रचारक होते. १९८७ ला त्यांची भाजपत पाठवणी झाली. तिथे ते अंगिकृत गुणांनी चमकले. आधी गुजरातचे राज्य महासचिव, नंतर राष्ट्रीय सचिव झाले. त्यांचे नेतृत्वात २००१ ला गुजरातेत भाजपला बहुमत प्राप्त झाले. नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चारदा मुख्यमंत्री झाले. २०१४ पासून देशाचे प्रधानमंत्री आहेत.
डॉ. मोहन भागवत हे चंद्रपूरचे. त्यांचे वडील मधुकरराव भागवत हे संघ प्रचारक होते. काही काळ ते गुजरातचे प्रांत प्रचारक होते. मोहनरावांनी पशू चिकित्सक (व्हेटरनरी डॉक्टर) ही पदवी घेतलेली आहे. ते बाल वयापासून स्वयंसेवक होते. ते १९७७ पासून पूर्ण प्रचारक झाले. नंतर मागे वळलेच नाहीत. सरसंघचालक व्हायचे आधी सरकार्यवाह होते. इतर सर्व सरसंघचालकाप्रमाणे मोहनराव हेही अविवाहित आहेत.

संघ शंभरी , प्रचारक पंचाहत्तरी ही सांगता इथे संपते. त्याचवेळी ज्यांचेशी आपले पटत नाही , त्यांचा अभ्यास असणे आवश्यक असते !

० रणजित मेश्रामलेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!