दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

राहूल गांधी यांच्या विरूध्द माजलेलागदारोळ ऐकताय / पहातात ना ?

विजय घोरपडे.

राहूल गांधी यांच्या कालच्या पत्रकार परिषद , त्यातील ” प्रेझेंटेशन” आणि मोदींचे हे ” व्होट चोरीचे सरकार ” या आरोपांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूज मधली शाब्दिक नव्हे तर अक्षरशः मोठीच खळबळ उडवून‌ दिली आहे.
राष्ट्रीय स्तरावर तात्काळ कार्पोरेट जगत कामाला लागले . त्यांनी आपापल्या मालकीच्या मिडिया हाऊसेसना ” ऐनकेन मार्गे ” सरकारच्या बचावासाठी उतरवले .मग चर्चासत्रे – सर्वे जाहीर करून जनतेला या विषयी विचार करण्याची संधी न देता जनतेत संभ्रम कसा निर्माण होईल , राहूल गांधी यांचे ते सत्यान्वेषी प्रेझेंटेशन कसं खोटे आहे हे पसरवण्याचा ” राष्ट्रीय” हिताचा प्रयत्न सुरू झाला . एका सभेत अमित शहानेच व्हॉट्स ॲप आणि फेसबुकवर त्यांचे किती लाख / कोटी ग्रुप्स कार्यरत आहेत हे जाहीर केले होते , त्या सर्वांना या एकाच विषयावर ” सक्रिय‌ ” करण्यात आले आहे . अशा प्रकारे चहुबाजूंनी पध्दतशीरपणे जनतेला भरकटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.यात इंडिया टुडे, फ्रन्ट लाइन मिन्ट आदी नियतकालिकांनी तात्काळ राहूल यांच्या आरोपांची शहानिशा आपल्या टिम कडून करून घेतली . राहूल गांधी यांनी आपल्या त्या प्रेझेन्टेशनमध्ये ” सत्यच ” मांडले , याची पुष्टी त्यांनी जाहीरपणे केली . तरी राहूल गांधी यांना खोटं – वेडं ( आता पप्पूही म्हणता येत नाही आणि बापही म्हणवत नाही) ठरविण्याचा युध्दपातळीवर प्रयत्न चालू आहे.
यापूर्वी प्रसिध्द पत्रकार अजित अंजूम हे जेंव्हा बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या ” SIR ” या मतदार छाटणी मोहिमेचे जे धक्कादायक ” ग्राउंड तथा इन्व्हेस्टिगेटीव रिपोर्टिंग ” करत होते तेंव्हाही हा वर्ग ॲक्टीव झाला होता . त्यांच्याही या पत्रकारितेतून आज किंचित प्रमाणात का होईना शोध पत्रकारिता जिवंत आहे हे सिध्द होते . मी जेव्हा पत्रकारितेत होतो तेंव्हा या शोध पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व आणि सन्मान होता . मीही सा.लोकप्रभा – चित्रलेखा आणि सत्यता यात खूपशा कव्हरस्टोरीज ( इन्व्हेस्टिगेटीव रिपोर्टिंग ) केल्या आहेत. मराठी पत्रकारितेत तेंव्हा कव्हर स्टोरीजचे मास्टर माईंड तसे दोनच संपादक ! एक लोकप्रभाचे प्रदीप वर्मा आणि दुसरे चित्रलेखाचे ज्ञानेश महाराव ! दोन‌दोन लाख खपाचे ते किमयागार होते . तिसरे सा. सत्यता चे संपादक अनिकेत जोशी ! पण ते स्वतः राजकीय स्टोरीज करत असत ( आजही करतात ). तथापि ” सत्यता ” हे

साप्ताहिक क्राईम बेस होते व त्याच्या सर्वच स्टोऱ्या गुन्हे अन्वेषण / गुन्हेगारी या शोध पत्रकारितेत मोडतील अशा असायच्या . तिथेही मी अगणित स्टोऱ्या केल्या . मात्र यातून जोपासला गेलेला तो शोध पत्रकारितेचा ” किडा” आजही स्वस्थ बसू देत नाही. म्हणून मग राजकीय – आर्थिक आकडेवारीचे इन्व्हेस्टिगेटीव रिपोर्टिंग कम लेख चालूच आहेत ! असो .
तर आज एअरकंडिशन शोध(?) पत्रकारितेचा जमाना आहे. आणि संपूर्ण मिडिया आज त्यांच्या
” एअर मास्टर्स ” च्या मुठीत सामावलेला आहे. आणि हे
कार्पोरेट एअर मास्टर्स सरकारच्या मुठीत आहेत .
जनतेचं मानसिक सूकाणू आज या ” मास्टर्स ” लोकांनी ताब्यात घेतले आहे. किंवा या सरकारने त्यांना ” मिडिया किंग ” त्यासाठी बनविले असेही म्हणता येईल. ते सर्व आज वास्तव जनमत तयार होऊच देत नाहीत . तर ते सरकारच्या संगनमताने सरकारला हवे तसे अनुकूल वा प्रतिकूल असे जनमत घडवत असतात. दैनिक, न्यूज चॅनल्स, सोशल मिडिया यावर नेहमी हाच धुमाकूळ चालू असतो .म्हणूनच नागरिकांना अतिसावध राहणे फार आवश्यक झाले आहे . दूरदर्शन का जमाना अब इतिहास में चला गया है |
राष्ट्रीय राजकारणात मात्र ही सावधानता आली आहे व त्यातून राजकीय व‌र्तुळात एक फार फार मोठी घबराट पसरली आहे. शशी थरूर हे भाजपात नसले तरी कालपरवा मोदी कॅम्प मध्ये दाखल झाले आहेत हे आपण जाणतोच ! या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. एरव्ही राहूल गांधी यांना खोटं पाडण्याची वा कमी लेखण्याची एकही संधी न सोडणारे शशी थरूर म्हणतात , ” मा.राहूल गांधी यांनी पॉइंट टू पॉइंट आपल्या प्रेझेंटेशनसह जे गंभीर प्रश्न निवडणूक आयोगासमोर उपस्थित केले आहेत त्यांची उत्तरे आयोगाने दिलीच पाहिजेत ! राहूल गांधी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोग कसा काय मागतोय ? ” — इति शशी थरूर. म्हणजे लक्षात घ्या ! सत्तेसाठी भाजपाच्या मार्गावर असलेले शशी थरूर आज अख्खी भाजपा व तिचे चिरपूट नेते , मुख्यमंत्री आदी राहूल गांधी यांनी सार्वजनिक रित्या वेड्यात काढू पहात असताना थरूर आज राहूल यांची बाजू उघडपणे घेत आहेत. ते का याचं गांभीर्य लक्षात घ्या ! हिच गत नितिशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची झाली आहे. यांची नावे यासाठी सांगत आहे की हे तिघेही नेते सध्या मोदी कॅंम्पमधले आहेत .त्यांची हि अवस्था झालीय म्हणताना अन्य सर्व छोट्या मोठ्या पक्षनेत्यांची तर याहून बिकट अवस्था झाली असणार हे उघडच आहे.
आज जनतेला भाजपा – संघाचा हा देशातील अन्य सर्व पक्षांना ” नो व्हेअर करणारा किंवा अक्षरशः पूर्णतः मांडलिक करणारा ” नियोजनबध्द
” निवडणूक चक्रव्यूह ” आज जनतेला समजत नसला तरी देशातील सर्व पक्ष प्रमुखांना राहूल गांधी यांच्या त्या पुरावे – आकडेवारीसह केलेल्या ” प्रेझेंटेशन” ने पुरेसा समजून आला आहे व त्यांच्या पायाखालची जमीनच सरकू लागली आहे. यात मोदींच्या NDA मधील सहकारी पक्षांचाही समावेश आहे हे विशेष! त्यामुळे सगळ्यांच पक्षश्रेष्ठींच्या मनात आज एकच प्रश्न थैमान घालत आहे. ” या अशा चक्रव्यूहातून कोणता पक्ष आणि कसा वाचणार ? ” जनतेचे अज्ञान आणि सत्तेतून आलेली अंमलबजावणीची ताकत तथा हुशारी या समीकरणातून या ” चक्रव्यूहा ” ची रचना करण्यात आली आहे .ज्यामध्ये
लोकशाही असून नसल्यासारखी असणार आहे . म्हणूनच निवडणुकांचे रणशिंग फुंकले रे फुंकले की एक घोषणा हमखास दिली गेली आहे. ” कुछ भी करो आयेगा तो मोदीही ” ही ती घोषणा ! ती मोठ्या धूर्तपणे प्रसारित करण्यात आली. भाजपा पक्षाला आणि त्यात पक्ष प्रवेश करणाऱ्याची तशी खात्री करून देण्यात या घोषणेने मोठी साथ दिली.मोदींच जिंकणार हे षडयंत्री ” सत्य ” जेंव्हा कुठलेही सामाजिक – राजकीय सिध्दांत नसलेले सत्ताकांक्षी , चिरपूट आणि नामवंत नेत्यांना उमजले तसे ते पटापटा भाजपात सामिल होऊ लागले .जे कोणी थोडंफार अनमान करू पहात होते त्यांना ED ,CBI ,IT या घोड – दळाचा उपयोग करून पक्षात आणले गेले हा इतिहास तसा ताजाच आहे .
आता असे षडयंत्र कार्यान्वित करूनही देशात लोकशाही आहे यावर जनतेचा विश्वास कसा निर्माण करायचा ? तर या लोकशाहीला मोठ्या प्रचारकी थाटात थेट निवडणुकांनाच जोडण्यात आले. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका आणि तिचा रिझल्ट हे दुसरे समीकरण उभे करण्यात आले . सर्व‌ प्रश्नांचे उत्तर एकच ! जिंकून येणे ! आणि भाजपाने ते सेट केले ! खो बसला तो २०२४ला ! संविधान बदलणार या वक्तव्याने ! संपूर्ण देश या संविधान मुद्याने ढवळून निघाला. भाजपा ४०० ऐवजी २४० वर‌ येऊन बसली .
२०१४ नंतरचे लोकसभेचे प्रत्येक मतदान पाहिले‌ तर मोदी – भाजपा विरोधात ६५ / ७० टक्के मतदान झाले आहे. पण ” लोकांनी आम्हालाच निवडून दिले ! जनमत आमच्या सोबत आहे ! आम्हीच सर्वोच्च आहोत ” अशी भाजपा – मोदींची दादागिरी अगदी संसदेत सुध्दा होऊ लागली . या धर्मनिरपेक्षता देशाचे पंतप्रधान मोदी खुशाल ” मी १४० कोटी जनतेचा प्रतिनिधी आहे ” असे छातीठोकपणे सांगताना निर्लज्जपणे छातीवर कमळ छाप गमछा मिरवत असत . जनतेला यातली खुबी – अंडरकरंट, सूप्त हेतू नेमका काय आहे हे आजपर्यंत कळलंच नाही . आज कदाचित या चक्रव्यूहाची रचना नेमकी काय व कशी आहे हे समजले तरच कळेल . भाजपा विरोधात मतदान करणारे नागरिकही मग इच्छा असो नसो पण ” मांडलिक ” होतील तेव्हा नीटपणे समजलेले असले .तूर्तास त्यांना ” लाभार्थी ” असे संबोधले जाते आहे .
आता हा ” निवडणूक चक्रव्यूह ” नेमका काय – कसा आहे ? किती प्रभावी आहे ? त्याची रचना काय आहे हे पुढील पोस्टमध्ये …. अर्थात राहूल गांधी यांच्या ” प्रेझेंटेशन ” च्या व्यतिरिक्त !
धन्यवाद !

∆ √ विजय घोरपडे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!