कटाक्ष – शेतकर्याच्या गळ्याला मृत्युचा फासदेव इंद्राच्या गळ्यात ‘माणिक’ मोती

समाज माध्यमातून साभार
गणेश सावंत – 9422742810
महाराष्ट्राचे राजकारण हे भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारे राजकारण आहे. महाराष्ट्राची सामाजीक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक रचना उभ्या देशाला दिशादर्शक मानली जाते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सामाजिक रचनेसाठी, समतेसाठी, एकतेसाठी या देशात सर्वात जास्त प्रयत्न करणारे नरवीरही याच महाराष्ट्रातले. एका वाक्यात महाराष्टाची महती सांगायची झाली, वरून रांगडा, दणकट काळा, मराठमोळा असे महाराष्ट्राचे वर्णन केले जाते. या वर्णनामागचा मतितार्थ समजून घेताना महाराष्ट्र म्हणजे सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानिलेय नाही बहुमता या सिद्धांतावर आणि छत्रपती शिवराय शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्याला मानणारा हा महाराष्ट्र. म्हणूनच या महाराष्ट्रावर जो कोणी राज्य करत असेल त्याने महाराष्ट्राच्या जनमाणसाची काळजी घेण्याबरोबर स्वत:ची वर्णवणूक ही मालकी नव्हे तर सेवकाची ठेवावी. हे शिवरायांच्या स्वराज्याने आणि शिवरायाच्या राज्य कारभाराने आधीच सांगून ठेवले. परंतु
देवेंद्रांच्या राज्यात
जी सत्तेची मस्ती
गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळतेय, ती महाराष्ट्रासाठी प्रचंड संतापजनक म्हणावी लागेल. महाराष्ट्राचा माणूस हा स्वाभिमानी आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाने लोकसभेला ज्या भारतीय जनता पार्टीला अक्षरश: मातीत मिसळून टाकले त्याच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसांनी चार महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांना त्याच महाराष्ट्राच्या मातीत उभे केले. आजपर्यंत कुंच्याही मुख्यमंत्र्यांना एवढे बहुमत मिळाले नसेल तेवढे देवेंद्र फडणविसांच्या नशिबी बहुमत आहे. अशा वेळी देवेंद्र फडणविसांच्या मंत्रिमंडळामध्ये कर्तव्य करणारे माणिक मोती असायला हवेत, मात्र दुर्दैवाने गेल्या चार महिन्यांच्या घटनाक्रमावर लक्ष ठेवले तर मारामार्या करणारे आमदार, डान्सबार चालवणारे मंत्री, सेक्सस्कँडलमध्ये अडकणारे मंत्री, लोकप्रतिनिधींसह अधिकारी, सवाल विचारणार्यांना झोडपून काढणारे पक्षाचे पदाधिकारी अणि माणिक कोकाटेंसारखे शेतकर्यांबाबत सातत्याने नकारात्मक विधान करणारे मंत्री त्यापेक्षाही सभागृहात पत्ते खेळणारा कृषीमंत्री जेव्हा अखंड महाराष्ट्राच्या अणि उभ्या देशाच्या नजरी पडतो तेव्हा होय या सरकारला मस्ती आलीय,
आमदार माजलेत
सरकारला मस्ती हा आमचा शब्दप्रयोग. परंतु आमदार माजलेत हे आम्ही म्हणत नाहीत तर सभागृहात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी म्हटलयं. दुर्दैव याचं वाटतं, देवेंद्र फडणविसांसारखा जो मुख्यमंत्री की त्यांच्या विरोधात कुठल्याही विरोधी पक्षाला थेट लाभाचे, भ्रष्टाचाराचे, व्याभिचाराचे आरोप करता येत नाहीत, मात्र त्याच फडणविसांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे कारनामे पाहिले तर देवेंद्रांचे सरकार हे नागवे झाल्याशिवाय राहत नाहीत. मग गोपीचंद पडळकरसारखा वाच्चाळ, शिवीगाळ करणारा, मारझोड करणारा, गुंडे घेऊन फिरणार्या आमदाराचे कारनामे म्हणा, मित्रपक्षातील आमदार असलेले संजय शिरसट यांचे विधीमंडळ कॅन्टीन परिसरातली मारामारी पहा, अथवा आईच्या नावावर डान्सबार करणारा राज्यमंत्री असलेला कदम यांचा निर्ढावलेलापणा म्हणा, भुंबरेंचे भूमाफियापट आणि
असंवेदनशील कृषीमंत्री
कोकाटेंचे बेजबाबदार वर्तन म्हणा. महाराष्ट्राला देवेंद्र फडणविसांच्या सरकारला अक्षरश: वेशीला टांगणारे म्हणावे लागेल. हा महाराष्ट्र नव्हे तर हा देश कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक शेती करणारा वर्ग पहायला मिळतो. कृषी खातं हे अतिसंवेदनशील खातं आहे. हे खातं अत्यंत जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आमदाराकडे गेलं तर शेतकर्यांचे प्रश्न सुटतात. नसता शेतकर्याची पुरती वाट लागते. माणिक कोकाटे यांच्याकडे कृषीखातं गेल्यापासून ते शेतकर्यांबाबत संवेदनशील कधीच दिसून आले नाहीत. सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणे, शेतकर्यांशी कसपटासारखं वागणं आणि कृषीमंत्री म्हणजे ओसाड गावची पाटील म्हणणं, यावरून कोकाटेंची कातडी किती निबर आहे हे दिसून येते. उभ्या महाराष्ट्रात रोज किमान सात आत्महत्या होतात, शेतकरी आर्थिकदृष्ट्या अक्षरश: पूर्णत: भिकेला लागलेला. अशा स्थितीत श्रम करूनही कधी निसर्ग पिकाची राखरांगोळी करतो तर कधी पिक आलेच तर त्या धानाला बाजारात भाव मिळत नाही. अशा स्थितीत मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांना कृषी विभागाकडून आधाराची गरज असते. मात्र ओसाड गावची पाटीलकी म्हणणार्या
देव इंद्राच्या
गळ्यातल्या माणिक
मोत्यासारखा नकारात्मक ऊर्जेने चमकतो आणि खातं आलं की एक रुपयात पिकविमा योजनेबाबत भिकारीसुद्धा एक रुपाया घेत नाही, असं वक्तव्य करतो. त्यापुढे जात या कृषीमंत्र्याने शेतकरी कर्जमाफीची रक्कम मिळाल्यानंतर त्याचा एक रुपायाही शेतात गुंतवतात का? असास वाल करून त्या पैशातून शेतकरी लग्न, साखरपुडा उरकतात. पैशाची उधळपट्टी करतात, असे म्हणून माणिक कोकाटेंनी शेतकर्यांची अवहेलना नव्हे तर त्यांच्या जखमेवर सातत्याने मीठ चोळण्याचे धोरण आखले. नाशिकच्या एका पाहणीमध्ये हा कृषीमंत्री ढाकळाचे पंचनामे करायचे का? असा उद्धट सवाल करतो. स्वत:बाबत ‘मी भिकारी शेतकरी नाही, दिलदार शेतकरी आहे’, असं म्हणत शेतकर्यांनी कर्ज फेडलेच पाहिजे, असा दम देतो. कदी शेतकर्यांना भिकारी, कधी सरकारला भिकारी म्हणताना हा जुगारी कृषीमंत्री सभागृहामध्ये मोबाईलवर पत्ते खेळतो. खरंतर अशा कृषीमंत्र्याला घरचा रस्ता दाखवायला पाहिजे. देवेंद्र फडणविसांसारख्या जबाबदार मुख्यमंत्र्यांनी गळ्यात जी सत्तेची माणिकमोत्याची माळ घातलीय त्या
माळेतले मोती
वगळण्याची गरज
देवेंद्र फडणविसांना आणि त्यांच्या सरकारला महाराष्ट्राच्या माणसाने सर्वाधिक पसंती दिली. अशा वेळी सरकारमध्ये एकरूप असलेले फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनी सत्तेच्या माळेतले जे माणिकमोती सत्तेच्या मस्तीने काळवंडले आहेत त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. मारझोड करणार्या पदाधिकार्यांवर अजित पवारांनी थेट कारवाई केली. आता मारझोड करणार्या आमदारावर एकनाथ शिंदेंनी करावाई करावी, तिकडे भारतीय जनता पार्टीनेही आपल्या उद्दाम आमदार आणि मंत्र्यांवर कारवाई करावी. अजित पवारांनी बेजबाबदार असणार्या कृषीमंत्र्यावर थेट कारवाई करावी, तेव्हा कुठे लोकशाही आणि महाराष्ट्रात खरचं स्वराज्य धर्म पाळला जातो, याचा सकारात्मक मॅसेज जाईल.
सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 25 जुलै कटाक्ष
00
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत