
मराठी, हिंदी, इंग्रजी
∆ दिवाकर शेजवळ
‘अन्य भाषा न शिकण्याइतका मराठी माणूस संकुचित नाही.’
‘ इतर भाषांचा तिरस्कार करायचा आणि इंग्रजीसाठी पायघड्या घालायच्या, हे पाहून मला दुःख होते.’
नवी दिल्लीत गुरुवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘ कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रा ‘ चे उदघाटन झाले. त्या समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील दोन परस्परविरोधी विधाने केली आहेत. त्यातले कोणते विधान खरे आणि कोणते खोटे वा चुकीचे आहे?
मुख्यमंत्र्यांचे पाहिले विधान १०० टक्के सत्य असून साक्षात ते स्वतः त्याचे उदाहरण आहेत.फडणवीस हे उच्च शिक्षित असून ते इंग्रजी माध्यमातून शिकलेत,असे विकिपीडिया सांगतो. त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले. फडणवीस यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.
फडणवीस यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी आहे. तसेच व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि DSE-जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन, जर्मनी येथून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा आहे.
त्या पार्श्वभूमीवर, लोकांना खुबीने इंग्रजी भाषेपासून तोडणारे मुख्यमंत्र्यांचे दुसरे विधान हे आत्मविसंगत तर आहेच. शिवाय, ते असत्यानेही भरलेले आहे. कारण त्यांच्या त्रिभाषा सुत्राला, इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याला मराठी जनतेचा असलेला विरोध म्हणजे हिंदीचा तिरस्कार मुळीच नव्हे! तरीही फडणवीस हे मराठी लोक हिंदीचा तिरस्कार करतात, असे कुणाच्या मनात भरवू पाहात आहेत? अन् ते कशासाठी?
मुख्यमंत्र्यांच्या त्याच विधानाचा पुढील अर्धा भाग हा इंग्रजीविरोधी आहे! इंग्रजीसाठी पायघड्या घालायच्या, हे पाहून मला दुःख होते असे ते म्हणतात. स्वतः इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या फडणवीस यांनी अशी आत्मविसंगत भूमिका का घ्यावी? इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा आहे. मराठी मुलांनी ती आत्मसात केल्याशिवाय ग्लोबल नोकऱ्या – उद्योगातील स्पर्धेत त्यांचा टिकाव कसा लागेल? मुख्यमंत्री हे इंग्रजी शिकण्याला ‘ पायघड्या घालणे आहे ‘ असे बिंबवून मराठी मुलांची त्या भाषेपासून फारकत का घडवू मागत आहेत?
∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत