
रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
मा शरद पवार हे आकंठ राजकारणी आहेत. ते राजकारण खेळत असतात. भूमिका , सिध्दांत हे त्यांचेसाठी दुय्यम आहे. ते कोणाला धरतील , कोणाला सोडतील , नेम नसतो. तो त्यांचा मूळ स्वभाव आहे. आता काय बदलायचा ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी केलेली गगनफाड स्तुती , ही तिथूनच !
फडणवीसांचा नुकताच ५५ वा वाढदिवस थाटात झाला. यानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी 'महाराष्ट्र नायक' नावाचे काॅफी टेबल बुक तयार केले. त्यात पवार साहेबांचा लेख आहे. लेखात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे मुक्तकंठाने कौतुक केले. ते करताना आपण विरोधी पक्षात आहोत. इंडिया आघाडीचे घटक आहोत. भारतीय राजकारण कोणत्या वळणावर आहे. कशाची तमा बाळगली नाही.
वाढदिवसाचे निमित्त पवारांनी असे वापरून घेतले.
ते त्यात लिहितात , कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा , जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृध्दी व्हावी असे सांगितले आहे. योगक्षेम या कौटिल्याच्या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्य नाही तर जनहित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वतःला सिद्ध केले आहे.
पूढे शरद पवार लिहितात , फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी व संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुध्दिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतांनाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या गळ्यात तरुण वयात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. मी त्यांच्याकडे विविध विषयांची जाण असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो.
पूढे ते असेही लिहितात , फडणवीसांना पाहून मला माझा पहिला कार्यकाळ आठवतो. फडणवीस यांचा कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की , मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईतो अशीच राहो अशी शुभेच्छाही दिली.
आता हा शुभेच्छा लेख केवळ शुभेच्छा पुरता राहीलेला नाही. त्याचे पडसाद उमटणार आहेत. कदाचित ते पवारांना अपेक्षित असावे. केवळ चारदोन ओळींची शुभेच्छा असती तर लक्षवेधी झाली नसती. आता सर्वबाजूंनी लक्षवेधी झालीय.
नुकतेच त्यांचे आदरणीय पुतणे , जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते म्हणाले , बेरजेचे राजकारण हा माझा आधार आहे. मा शरद पवार हेही बेरजेवरच प्रेम करतात. बेरीज हे तीन शब्द असे आहेत जे .. तत्व .. तात्विकता .. तारतम्य .. तमा .. वगैरेंना सहज गुंडाळून घेते.
राजकारणात असे हे रुढ होत चाललेय. उद्या मान्य होईल की काय ?
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत