लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या मराठी विभागाचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न

मराठी विभागाचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी डॉ.प्रतिभा जाधव यांनी मराठी विभागाची तेजस्वी परंपरा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची माहिती दिली. स्वतःतील उत्तमाचा शोध घ्या, आपली कौशल्य ओळखून करियर घडवा. शिक्षण तर आवश्यक आहेच पण ते घेताना एखादी कलाकौशल्यदेखील आत्मसात केले पाहिजे. कलेमुळे जगणे अधिक सुंदर व उत्साही होते. निरीक्षण, शोधकता, चिंतन महत्वपुर्ण असते. आपल्या अंगभूत कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख संधीही साधता येतात. मराठी विषयात पदवी घेऊन विविध स्पर्धा परीक्षा, कायदा, पत्रकारिता, व्यवसाय व्यवस्थापन इ. उच्चशिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवता येते असे सांगत ‘आयुष्याला द्यावे उत्तर!’ ही कविता सादर केली. प्रा. प्रांजली ढेरे व प्रा.संदीप ठाकरे यांनी स्वतःचा शैक्षणिक प्रवास, जडणघडण व विद्यार्थी दशेतील ध्यास याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील मार्गक्रमण करताना मदत होईल. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी मनोगते व्यक्त करताना मराठी विषयात पदवी मिळवून विविध स्पर्धा परीक्षा व इतर व्यावसायिक शिक्षण घेताना हा विषय उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. २०२५-२६ ह्या शैक्षणिक वर्षातील मराठी विभागाच्या पहिल्यावहिल्या उपक्रमाची सुरुवात ग्रंथभेटीने करण्यात आली. महाविद्यालयातील सुसज्ज अशा ग्रंथालयात प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना विविध विभाग,साहित्य प्रकार, नियकालिके व ग्रंथांची उपयुक्त अशी माहिती डॉ.प्रतिभा जाधव यांनी दिली. यासाठी प्रा.गुरुदेव गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रामेश्वरी लोहरकर हिने केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत