दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीयविचारपीठ

भारतीय संविधानाने सर्वांनाच घालून दिलेली नैतिकता आपल्या अंगी येवो.

मा. देवेंद्र फडवणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
सप्रेम जय भारत

थोड्याशा उशिराने का होईना, आपणास आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपलं आरोग्य उत्तम राहो. आपल्या हातून देशाची खूप मोठी सेवा घडो. भारतीय संविधानाने सर्वांनाच घालून दिलेली नैतिकता आपणास आपल्या अंगी तंतोतंतपणे बाणता येवो. आपणाला सांविधानिक नैतिकतेचे प्राणपणाने रक्षण करणारा राजकीय नेता होता यावं ही मनापासून शुभेच्छा.

  वर्तमान राजकारणाचा दर्जा अत्यंत घसरलेला आहे. 

निष्ठा हे मूल्य तर कवडीमोल झालेलं आहे. सारी मूल्ये आणि तत्त्वं पायदळी तुडवून आपण सत्तेत गेलं पाहिजे. सत्तेत राहून अव्वाच्या सव्वा पैसा मिळवला पाहिजे. सत्तेखेरीज दुसरं काहीच महत्त्वाचं नाही असे मानून वागणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची संख्या आज अतोनात वाढलेली आहे. अशी स्थिती निर्माण करण्यामध्ये आपलाही फार मोठा वाटा आहे, हे सकृत दर्शनी लक्षात येतंं. माणसाने नैसर्गिक सत्य लक्षात घेतलं पाहिजे. या अनंत कालप्रवाहात आपणाला ‘माणूस’ म्हणून मिळालेला हा छोटासा काळाचा तुकडा मूल्यनिष्ठ वर्तन करत घालवता आला पाहिजे. एक दिवस आपण हे जग सोडून जाणार आहोत याचं भान असलं पाहिजे.
सत्ता संपत्ती ही टेम्पररी असते. सत्ता संपत्ती हे सर्वस्व नसतं, तर तुम्ही माणूस म्हणून किती शीलसंपन्न जीवन जगता हेच महत्त्वाचं असतं. आपल्यातली अंधश्रद्धा, सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची वृत्ती, धर्माचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापर करण्याची वृत्ती, भांडवलदार धारर्जिनी धोरणे राबवणारी वृत्ती गळून पडो.
बुद्धिवाद, विज्ञानवाद, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा या मूल्यांवर आधारलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यात आपणाला काही योगदान देता यावं ही मंगल कामना.

   वर्तमान भारतात विषमतेची दरी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लोकांना संपूर्णपणे स्वावलंबी बनवून स्वाभिमानाने जगण्याची स्थिती निर्माण करण्याऐवजी आज लोकांना भिकेवर जगण्याची सवय लावली जात आहे. अशा अवस्थेत आपल्या वाढदिवसानिमित्त आपलं अनेक जण कौतुक करतील. कुठला स्वार्थ मनामध्ये ठेवून कुणी कौतुक करत असेल तर ते खरंच कौतुक आहे का हेही आपण लक्षात घेत राहावं. भारतात जातविरहित, अंधश्रद्धाविरहित, शोषणविरहित, विषमताविरहित अशी समतावादी व्यवस्था प्रस्थापित करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संविधानाचा ध्येयवाद आहे. हा ध्येयवाद साध्य करण्याचा निश्चय आपण करावा. त्या दिशेने भक्कम पावले टाकावीत.

अशी पावले टाकण्याचं बळ आपल्यात नक्कीच आहे. गरज फक्त इच्छाशक्तीची आहे. आशा पावलांच्यासाठी आपणास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत.
आपला

डॉ. अनंत दा. राऊत
नांदेड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!