
डॉ. अनंत दा. राऊत
राजकारणी, समाजकारणी, इतिहासकार, विचारवंत वगैरे मंडळींनी कबर वगैरे सारख्या अथवा कुठल्याही मुद्द्यावर संतुलितपणे बोलायचे असते. आज काही जबाबदार पदावर बसलेले लोकच मुर्खासारखा वाचाळपणा करतात. हे मूर्ख इतिहासातली मढी उकरून धर्माधर्मात दरी निर्माण करत असतात.
इतिहास काळात सत्तेत राहिलेल्या एका व्यक्तीची क्रूर प्रवृत्ती आठवून त्याच्या कबरीशी क्रूरपणे वागणे हा मूर्खपणा आणि आत्मघातीपणाच असतो. क्रूरता कुणाचीही असो ती सदैव निषेधार्ह असते. क्रूरतेला तशाच क्रूरतेने उत्तर देणे हे हिंसक स्वरूपाच्या सूड सत्राला आमंत्रण देण्यासारखे असते. सूड सत्र हे मानवी समाजाला वारंवार दिनाशाच्या गर्तेत घेऊन जात असते, याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे. वर्तमानातील मूलभूत प्रश्नांवर आपल्या चर्चा केंद्रित केल्या पाहिजेत. आत्ताच्या महाराष्ट्राच्या बजेटमधून महाराष्ट्र राज्यावरचं कर्ज मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आकडा पुढे आला होता. त्यावर हमरीतुमरीवर येऊन कुणीही चर्चा का करत नाही? शासकीय दवाखान्यात पुरेशा सुविधा नसतात म्हणून रोज असंख्य गोरगरीब लोक मरतात.तिथे उत्तम सुविधा द्या यासाठी कोणीच का पुढे येऊन बोलत नाही? गोरगरिबांचे रोजचे मरणे वर्षानुवर्षे दुर्लक्षित करणारा समाज फार सुज्ञ व सुसंस्कृत असतो काय? पैसेवाल्यांच्या मुलांसाठी पंचतारांकित शाळा आणि गोरगरीब मुलांसाठी कुठल्याच सुविधा नसलेल्या जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या शाळा ही शिक्षण व्यवस्थेतील विषमता नष्ट केली पाहिजे यासाठी कोणीच का बोलत नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्याकुळ होऊन वारंवार सरकारला धारेवर का धरले जात नाही? हिंदुत्वाचा वारंवार जप करणारे लोक दलित, आदिवासींवर रोजच अन्याय अत्याचार होतात त्या प्रश्नावर सरकारला का धारेवर धरत नाहीत?
इथल्या माणसाला दलित कोणी बनवलं? मुसलमानांनी बनवलं काय? की ख्रिश्चनांनी बनवलं? आपल्याच धर्मातल्या लोकांना हीन,दीन, दुबळे व दलित बनवणारी व्यवस्था ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू धर्माचीच तर पैदास आहे. असे कितीतरी मूलभूत प्रश्न आहेत ते राहिले बाजूला आणि नको ते प्रश्न उकरून वांझोट्या चर्चा करणे आता आपण थांबवायला हवे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत