सांग!मी देवु कश्या तुला, शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या….?

तुझ्या हक्काचा दिवस म्हणून
तु आज झालीयस सज्ज
जागतिक महिला दिन साजरा करायला.
जगभरात होतोय जल्लोष
जागतिक महिला दिनाचा.
वाट्सप,फेसबुक,ट्विटर,इन्स्टाग्राम
साय्रा सोशल मिडियावरुन
चाललीय उधळण
शुभेच्छांच्या वर्षावांची.
किती बरं गौरवांचे शब्दफुगे
तरंगतायत आभाळभर?
इत्का सन्मान भेटत असतांना
का बरं दुखावं माझ्या पोटात?
का बरं आठवावी मला?
तुझ्यात कोंबलेली देवता
अन् देवीत्वाचे साखळदंड
करकचुन आवळता आवळता
तुला त्याच दैवी अधिकारात
देवाची दासी म्हणत म्हणत
चीपाड होईपर्यंतचं
तुझं केलेलं शोषण?
का बरं आठवतंय?
त्या धर्मयुद्धाचा झेंडा
तुझ्याच खांद्यावर देवून
तिकडच्या छावणीतुन
अन्
इकडच्या छावणीतुनही
का बरं केलं जातय
तुलाचं नि:र्वस्र?
आता तर त्यांनी तुला वाचवायचा
वीडाच उचललाय म्हणे;
“बेटी बचाव!बेटी पढाव!!”म्हणत.
त्यासाठी ते राष्र्टध्वज खांद्यावर घेवून
अत्याचार्यांच्या समर्थनार्थ
मोर्चेबीर्चे काढु लागलेत.
अन्..
तुझ्यावरच्या अत्याचारांसाठी
देवीचे गाभारेही शोधु लागलेत.
झालंच तर…..
तुला त्या गुलामीत
जखडबंद करण्यासाठी
मंदीर प्रवेशाच्या
तुझ्या हक्काच्या गुलामीच्या लढ्याची
सैनिकही तुला बनवु लागलेत.
तुझ्यावरच्या अत्याचारांनाही
त्यांनी जातीधर्मात वाटुन टाकलय.
तु दलित-अल्पसंख्यांक असलीस तर…..
तुझ्यावरच्या अत्याचारांसाठी
गोठलेली आसवं
अन्…
तु असलीस वरच्या जातीतली तर…
तुझ्यावरच्या अत्याचारांच्या आक्रोशाला
आभाळभेदी लय!
अत्याचारी असला दलित-अल्पसंख्यांक तर…..
त्याच्या गुन्ह्याच्या सजेला
गोळ्यांची सलामी.
झट् गुन्हा,चट् सजा.
सारा हिशोब सुटतो कसा?
असला अत्याचारी सवर्ण तर….
न्यायालाही प्रतिक्षा करावी लागते
त्याला फासावर लटकावण्यासाठी.
अन् तु मात्र
तुझ्या स्वातंत्र्याकडे पाठ वळवुन
पुन्हा चालु लागतेस
प्रार्थनास्थळांची वाट.
गुलामीच्या साखळदंडांत
भेजा जखडबंद करण्यासाठी.
सांग!
मी देवु कश्या तुला शुभेच्छा?
जागतिक महिला दिनाच्या.
-जयवंत हिरे.
“क्रांतिकारी जनता”
८मार्च२०१९.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत