
(सामाजिक अंधश्रद्धा)
आपल्या पृथ्वीवर मानव उत्क्रांतीच्या आधी सृष्टीने सुरवातीला वनस्पतींची निर्मिती केली. वनस्पतींवर अवलंबून राहण्यासाठी प्राणीमात्रांची निर्मिती केली. परंतु आधी जलचर जिवांची निर्मिती झाली. कारण जला शिवाय कोणत्याही सजीवांची निर्मिती होवू शकत नाही हा जीवशास्त्राचा सिद्धांत आहे. त्यानंतर उभयचर प्राण्यांची निर्मिती झाली जसे कासव, मगरी वगैरे नंतर भूचर प्राण्यांची व शेवटी महान ब्रिटिश शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या सिध्दांता प्रमाणे मानवाची उत्क्रांती झाली.
प्रथम वनस्पतींनी आपली अन्न पाण्याची गरज जमीनीच्या पोटातून भागवावी व प्राण्यांच्या अन्नाची गरज ही वनस्पतींवर भागावी. यासाठी सृष्टीने असे चक्र निर्माण केले. वनस्पतीवर जगणारे प्राणी हत्ती, हरणे, रानगायी, घोडे, गाय, बकरी वगैरे प्राणी होत. हे वनस्पतीवर जगतात म्हणून अशा प्राण्यांना शाकाहारी म्हटले जाते. पण त्यातही सृष्टीने दक्षता घेतली. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून काही मांसभक्षी पशू-पक्ष्यांची ही निर्मिती करून ठेवली. वाघ, सिंह, तरस, लांडगे, कोल्हे हे व यासारखे हिंस्र पशू हे मांसभक्षी होत. तर गिधाडे, गरूड, घार, कावळे इत्यादी मांसभक्षी पक्षी आहेत. हे नुसते पक्षी नसून सृष्टीचे स्वच्छता कर्मचारी सुध्दा होत. अशा पशू पक्षांना मांसाहारी म्हटले जाते. सर्वच प्राणी वनस्पतीवर जगले असते तर वनस्पतींचा ऱ्हास झाला असता. आणि सर्वच प्राणी एकमेकांच्या मांसावर जगले असते तर प्राण्यांचा ऱ्हास झाला असता व पृथ्वी विराण झाली असती.
पण या पृथ्वीवर असा एक, एकुलता एक लुच्चा प्राणी आहे की तो याच्याही हिस्स्याचे मटकावतो व त्याच्याही हिस्स्याचे. तो म्हणजे माणूस नावाचा भयंकर प्राणी. हा मांसाहारी व शाकाहारी असा दोन्ही प्रकारचा आहे. तिसरा त्याचा खाण्याचा प्रकार म्हणजे पैसा. (अर्थात अपवाद वगळून) तरीही त्याचे पोट साता जन्माचे उपाशीच असते. (सात जन्म किंवा पुनर्जन्म असे काहीही नसते, लेखातील रंजकतेसाठी असे साहित्यिकातील म्हणी/उपमा/विनोदी शब्द/अलंकाराचा वापर करावा लागतो. वाचकांनी हे लक्षात घेतले पाहिजे) हा मोठा अजब गजब प्राणी आहे . असो.
वाघ, सिंह, बिबटे, काळे चित्ते किंवा ब्लॅक पँथर (हे काळे चित्ते भारतातून नामशेष झाले. ते फक्त आता दक्षिण आफ्रिकेत आढळतात) वाघ सिंहासारखे हिंस्र पशू स्वतःची शिकार स्वतःच करतात. इतर प्राण्यांनी मारलेल्या शिकारींवर ते ताव मारीत नाहीत. स्वतःच्या शिकारींवर मनसोक्त ताव मारून ते त्यावर साधारण ५ ते ७ दिवसापर्यंत जगू शकतात. त्यांना दररोज शिकार करण्याची गरज नसते. आणि हे प्राणी भूक लागल्या शिवाय विनाकारण शिकार ही करत नाहीत. त्यांच्याच उरलेल्या शिकारींवर मात्र कोल्हे, लांडगे यासारखे प्राणी आपली भूक भागवतात. त्याच बरोबर गिधाडे व कावळे त्यावर चोची मारतात. नैसर्गिक आपत्तीत, दुर्घटनेत जसे रेल्वे लाईनवर एखाद्या जनावराला रेल्वेची धडक बसणे किंवा जंगलातील वणव्यात काही प्राणी मृत होणे, किंवा महापूरात पशू मृत होणे किंवा पहाडाच्या दरडी कोसळणे किंवा प्राण्यांच्या आपसातील लढाईत एखादा प्राणी मृत होणे अशा मृत झालेल्या प्रण्यांवर गिधाडे, कावळे किंवा तत्सम पक्षी आपली पोटपूजा करतात. ते मांसाचा एकही तुकडा सोडत नाही किंवा वाया जावू देत नाही. अगदी हाडात अडकलेला मांसाचा तुकडा देखील ते आपल्या चोचीच्या कौशल्याने काढून घेतात. त्यामुळे मांस शिल्लक राहत नसल्याने सडलेल्या मांसाची दुर्गंधी पसरत नाही. म्हणून त्यांना दुर्गंधी निवारक सुद्धा म्हटले जाते.
माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळे आज भरमसाठ जंगलतोड होत चालली आहे. जंगली जनावरांचा जगण्या मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलातील पशू धन कमी होत चालले आहे. काही प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलाची शान असणारे व्याघ्र प्रकल्प, सिंह अभयारण्ये जगवण्यासाठी येत्या काही काळात भारत सरकारला संकरित भाकड गाई, म्हशींची निर्मिती करावी लागणार आहे. कारण गाय, म्हैस, रेडा, बैल हे वाघ सिंहाचे आवडते खाद्य आहे. मात्र माणसाने गोमांस खाल्ले तर मोठा गजहब केला जातो. जित्राबं हे माणसासाठी उपयुक्त पशू धन आहे यात शंका नाही परंतु याच जनावरांसाठी माणसाचा जिव घेणं हे पशूतूल्य निच कर्म आहे. हे जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत त्याची बुद्धी पशुतुल्यच समजायला पाहिजे. असो.
*जिवंतपणी नाही* *गोडी, मेल्यावर पक्वान्नाची* *थाळी. हे भारतातील आजच्या परिस्थितीचे वास्तव आहे.* सद्ध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. हा पंधरवडा म्हणजे आपल्या पित्रांच्या आठवणींना उजाळा देवून अमावस्येला पक्वान्नाचा घास देण्याची परंपरागत चालत आलेली प्रथा. ही प्रथा अतार्किक व कल्पनेवर आधारलेली आहे. भारतात अशा बऱ्याच प्रथा आहेत. त्या अनेक वर्षांपासून चालत आल्या की पुढे त्या परंपरा बनतात. आणि भारतीय समाज देखील अशा परंपरेंचा वाहक ठरतो. पण समाज त्याची चिकित्सा करून त्याला छेद देण्यासाठी धजावत नाही. त्यामागे अनेक प्रकारची भिती दाखवली जाते. या पंधरवड्यात काही लोक चांगले काम करण्याचे टाळतात. कामात शुभ अशुभ असं काही नसते काम हे काम असते. उलट या पंधरवड्यात कोणी त्याचे महत्त्वाचे काम करण्याचे टाळले तर तो पुढे लेटलतीफ ठरून त्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. पितृपक्ष पंधरवड्यात पितरांना जेवू घालण्यासाठी पक्वान्ने बनवले जातात. त्या पक्वान्नाला कावळ्याने शिवल्या शिवाय ते पितरांना पावत नसल्याची भावना इथल्या समाजात आहे. हे किती अतार्किक व वेडेपणाचा विचार आहे हा. यावर चिकित्सक बुद्धीने विचार करून हे नेमके कशासाठी करून ठेवले, का करून ठेवले? व कुणी करून ठेवले? असे तार्किक प्रश्न कुणालाही पडत नाहीत. आणि याचा शोध घ्यायलाही कुणी तयार नसतो. जर कुणी त्यातील तथ्य सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचं कुणी ऐकून घ्यायला तयार नसतो. *याबाबतीत संत गाडगेबाबांना अवश्य वाचा ते उदाहरणा सहित समजून सांगतील.* त्यातील एक संवादरूपी उदाहरण इथे देतो. एकदा एका नदीकाठी कोणीतरी आपल्या पितरांना घास देण्याचा (पिंडदान) विधी करत होते. गाडगेबाबा ते पाहून नदीपात्रात गुडघाभर पाण्यात उतरले आणि आपल्या ओंजळीने नदीचे पाणी नदीच्या काठावर फेकू लागले. ते पाहून विधीत आलेल्या लोकांपैकी दोन-तीन व्यक्ती गाडेबाबांकडे आल्या. बाबांचे आपले काम सुरूच होते. *”बाआजी नदीचं पानी कायले फेकून ऱ्हायले काठावर?”*
गाडगेबाबा: “माह्या वावराले पानी देतो ना बाप्पा!”
व्यक्ती: “इथं कुठीसा वावर दिसत तं नाय बाआजी?”
बाबा: “माह्ये वावर अमरवतीतल्या शेणगावले आहे”
व्यक्ती: “बाआजी वावर शेणगावले, अन् इथून पानी कसं जाईन वावरत?”
बाबा: “बाप्पा! कावून नाय जाईन? जसा इथून अभायातल्या तुमच्या पितरायले घास जाते तसं माह्या वावराले इथून पानी कावून नाय जाईन बापा?” तो व्यक्ती काय समजायचे ते समजला अन् चुपचाप तिथून निघून गेला. तर गाडगेबाबा आपल्या कृतीतून लोकांचे प्रबोधन करत असत. तर ही कावळ्या मार्फत पितरांना घास पोहचवण्याची भावना किंवा समज एकदम मुर्खपणाची आहे. हेच बाबांना आपल्या कृतीतून सांगायचे होते.
मुळात कावळा हा मांसभक्षी पक्षी आहे. पक्वान्नात दूग्धजन्य पदार्थ असतात. आणि दूधात जनावरांच्या चरबीचे अंश असतात. म्हणजेच मांसजन्य अंश असतात. कावळा नेमके तेच अंश आपल्या चोचीने टटोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु पाहणाऱ्याला त्याची ती क्रिया खाण्याची वाटते. त्यासाठी सुद्धा त्याच्या येण्याची वाट पाहत बसावे लागते. मुळात तो शाकाहारी नहीच. मेलेल्या जनावरांचे मांस किंवा जमीनीवरील किडे मकौडे हे त्याचे आवडते खाद्य. जर कावळा हा पक्षी खरोखर शाकाहारी असता तर हज्जारो, लाखो कावळ्यांनी शेतच्या शेत फस्त करून टाकले असते. वाटल्यास हे मी सांगतो ते खरे की खोटे तपासण्यासाठी एक प्रयोग करून बघा. मोकळ्या मैदानात एका पानावर पंच पक्वान्न ठेवा व त्याच्या थोड्या अंतरावर मेलेला उंदीर किंवा घूस किंवा चिकन/मटणाच्या दुकानातून आणलेले वेस्टेज मटेरियल (माणसासाठी खाण्यायोग्य नसलेले मांस) ठेवा. मग बघा कावळा कशावर तुटून पडतो. तोच नाही तेव्हा त्याचे जातभाई ही तत्परतेने गोळा होतात. व कावकाव करत त्या मांसाच्या तुकड्यांवर तुटून पडतात. तेव्हा ते त्या पक्वान्नाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत.
आपण किती अंधश्रद्धेने किंवा अंध विश्वासाने घेरले आहोत हे तेव्हा लक्षात येईल. आजच्या धकाधकीच्या जिवनात अशा प्रथांना कुरवाळत बसणे म्हणजे पैसा, वेळ व उर्जेचा अपव्यय करण्यासारखे असून पुढच्या पिढीला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलण्या सारखेच आहे. काही कुणाचा आत्मा वगैरे भटकत नसतो. तो नसतोच मुळी. *माणूस गेला विषय संपला. इतकं साधं सोपं गणित आहे.* पण आपण विनाकारणच्या भीतीमुळे, प्रथेमुळे, परंपरेमुळे सोपं गणित आपल्यासाठी कठीण करून ठेवतो. खरच जर पूर्वजांचा आत्मा भटकत असता व कोणी अपराध करत असेल तर तो करण्याच्या आधी त्याच्या पूर्वजांचा आत्मा अपराध्याच्या मानगुटीवर बसून त्याला जाब विचारला नसता का? कारे बाबा तू अपराध करून आपल्या खानदानीला का बट्टा लावतो? तर हे असं काही जगात नसते आणि नाही. हे बहुजनांनी लक्षात घेतले पाहिजे.(आत्मा/भूत/पिचास/चेटकिन/भूताटकी/भूतबंगला/भूतबाधा वगैरेवर अनेक टीव्ही सिरियल बनवून त्या माध्यमातून सिरियल निर्मात्यांनी बहुजनांना निव्वळ मूर्ख बनवण्याचे काम केले व आपला गल्ला भरत राहिले) या पंधरवड्यात जर कोणी परदेशात फिरून आले तर तिथं कुणाचे पित्तर नाही, कुणाचा आत्मा भटकत नाही. तिथे कुणी पितरांना घास देत नाहीत हे त्याला कळून येईल. दूर परदेशी तरी कशाला जायला पाहिजे? आपल्या देशात सुद्धा हिंदू सोडून इतर धर्मीयांमध्ये पितरांना घास देण्याची प्रथा किंवा पद्धत नाही. *या महिण्यात अमुक करू नये त्या पंधरवड्यात तमुक करू नये. ह्या दिवशी हे करू नये त्या दिवशी ते करू नये. पौर्णिमा शुभ अमावास्या अशुभ या खुळचट कल्पना भारतीय समाजात हेतुपुरस्सर पेरून ठेवल्या आहेत. खोलवर विचार केल्यावर असे लक्षात येते की त्या प्रथा एसी/एसटी/ओबीसींच्या प्रगतीसाठी एक प्रकारे अदृश्यपणे स्पिड ब्रेकर्स प्रमाणे लावून ठेवल्या आहेत. ही खरी गोम आहे. हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे* दुसरी महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या पृथ्वीवर जर घोर ज्ञान साधना कुणी केली असेल तर ते आहेत फक्त तथागत भगवान बुद्ध. त्यांनी त्यांच्या साधनेच्या बळावरच आत्म्याला नाकारले.
आपले प्रियजन आपल्याला सोडून गेल्यावर त्यांच्या आठवणींची जोपासना करण्यासाठी खूप काही करण्या सारखे आहे. ज्या दिवशी ते आपल्याला सोडून गेले. त्या दिवशी स्मशान भूमीच्या आसपास वृक्षारोपन करता येईल. त्यामुळे आजूबाजूचे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. किंवा त्यांची आठवण म्हणून आपल्या घरी अंगणात एखादे रोपटे लावता येईल. माझ्या आई बाबाच्या नावाने आमच्या वाड्यात एक अशोकाचे व दुसरे पिंपळाचे असे दोन मोठे डेरेदार वृक्ष आहेत. त्यांची सावली आम्हा भावंडावर आई-बाबांची छाया असल्या सारखे वाटते. हा आमचा वाडा रस्त्याच्या बाजूला असल्याने झाडांची सावली वाड्यावर तर पडतेच शिवाय रस्त्यावर सुद्धा पडते. रस्त्याच्या कडेला त्या झाडाखाली मनपाचे दोन बाकडे बसवले आहेत. उन्हाळ्यात येणारा जाणारा वाटसरू, फेरीवाले, थकली भागली वृद्ध माय किंवा वृद्ध बाबा/काका/मामा/ किंवा चिल्यापिल्यांची माय माऊली तिथं घटकाभर झाडांच्या सावलीत बाकड्यावर विश्रांती घेतात. *मोठं समाधान मिळते तेव्हा.* जिथे फ्लॅट संस्कृती असेल तिथे मोठ्या कुंडीत कोणत्याही झाडाचे एक रोपटे लावून वर्षभर त्याची जोपासना केल्यावर ते रोपटे आपले प्रियजन ज्या शाळेत शिकले, ज्या संस्थेत नोकरी केली, किंवा ज्या वृद्धाश्रमात (भरल्या घरातून वृद्धाश्रमात राहायला जाणे हे त्या वृद्धांचे दुर्दैवं म्हणावे लागेल आणि जे त्यांना तेथे राहायला भाग पाडतात त्यांना काय म्हणायचे? हे वाचकांनी ठरवावे) राहिले तिथे तिथे दान करावे. हा उपक्रम दरवर्षीचा असावा यातून वृक्षारोपणाचा एक वेगळा उपक्रम राबवता येईल व वृक्षारोपणाचे समाधान ही मिळेल.
दुसरे असे की ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे. त्यांनी आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून जे आपल्या मुलांना शिक्षण देवू शकत नाही. अशा अत्यंत गरीब घरातील एखादी मुलगी *शैक्षणिक दत्तक* म्हणून घ्यावी. म्हणजे त्या मुलीचा फक्त शिक्षणाचा खर्च त्या व्यक्तीने करावा. कारण गरीब घराण्यातील मुलामुलींचे पालक आर्थिक परिस्थितीमुळे सहसा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देत नाहीत. दिले तरी हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे प्राथमिक शाळेतूनच त्यांना माघार घ्यावी लागते. (यावर जर इमान-ए-ऐतबार सर्वे झाला तर भयान वास्तव समोर येईल) म्हणून मुलींना शक्यतोवर शैक्षणिक दत्तक घ्यावे त्यातून आपोआप स्त्री सक्षमीकरणाचे काम केल्याचे समाधान मिळेल.
याही पुढे जावून आपणास जे काम करण्यासारखे असेल ते म्हणजे आपण ज्याला पुण्य पुण्य म्हणतो ना (वास्तविक पाप पुण्य ही भावनाच चुकीची आहे. बहुजन समाज आपल्या अधिपत्याखाली राहावा त्यासाठी एका ठराविक वर्गाने हे पाप पुण्य शब्दांची निर्मिती केली. त्याला जोडलेली भीती म्हणजे स्वर्ग-नर्क या शब्दांची आहे. पाप-पुण्य या शब्दांचा खरा अर्थ *सत्कर्म व दुष्कर्म असा होतो पण वाचकांना पटकन समजण्यासाठी रूढ झालेले प्रचलित शब्द लेखात घ्यावे लागतात)* ते महा पुण्याचे काम असेल ते म्हणजे आपल्या इतर नातेवाईकांच्या परवानगीने किंवा त्यांच्या खुळ्या कल्पना दूर करून त्यांना समजून सांगून मृतकाचे देहदान किंवा कमीत कमी शरीराचे अवयव दान करणे होय.
मी माझे नाशवंत शरीर आगीत खाक होवून नाश करण्यापेक्षा शरीर दान देणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात पुणे येथे योग्य ती पुर्तता करून फार्म भरून ठेवला आहे. माझ्या शरीरातील डोळे कुणाला तरी हे सुंदर जग दाखवतील, माझे मूत्रपिंड कुणाचे तरी जगणे सुखदायी करतील, माझ्या गुडघ्याच्या वाट्या कुणाला तरी चालायला, पळायला लावतील, माझे यकृत कुणाला तरी जिवदान देईल. माझी त्वचा कुणाच्या तरी जळलेल्या त्वचेवर मलमपट्टी (सायंटिस्ट सर्जरी) करेल. माझ्या मृत शरीरावर शिकाऊ सर्जन शस्त्रक्रियेची प्रात्यक्षिक करतील. उरलेल्या अस्थि पंजरावर (डोक्याच्या कवटी पासून पायाच्या बोटातील हाडापर्यंतचा हाडांचा पिंजरा किंवा सापळा) रासायनिक प्रक्रिया करून तो सापळा शरीर शास्त्र व अस्थि शास्त्र शिकवण्यासाठी विद्यार्थी/विद्यार्थिनींना मदत करेल. जे आपण निसर्गा कडून घेऊन आलो ते सामाजिक कार्यासाठी देवून त्याच्या अनंत उपकारातून उतराई होण्यासाठी यासारखे दुसरे चांगले कर्म असू शकत नाही. *मरावे परी समाजोपयोगी रूपी उरावे* माणूस या जगात खाली हाताने येतो परंतु या जगातून जाताना समाजाला आपल्या शरीराचे अवयव रूपाने दान देवून गेल्यावर तो मृत होवून देखील आपल्या अवयवाच्या रूपाने जिवंतच राहतो.
या लेखाचा शंभरातील दोघांनी जरी गांभीर्यपूर्वक विचार केला तरी ती माझी लाखमोलाची कमाई झाली असे मला समजता येईल.
-अशोक सवाई.
91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत