दिन विशेषदेशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
मराठी – पाली भाषेला केंद्र शासनाकडून मिळालेला अभिजात दर्जा आणि ब्राह्मण्यीक क्षेत्रातील साहित्यिक आनंद…?
डॉ मिलिन्द जीवने ‘शाक्य’, नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
केंद्र सरकारने अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मागिल १२ वर्षांपासून असणारी जुनी मागणी - "मराठी भाषेला अभिजात दर्जा" ही ३ सप्टेंबर २०२४ रोजी पुर्ण केली आहे. सोबतचं "पाली / प्राकृत / बंगाली / आसामी" अशा ह्या अन्य चार भाषांना ही "अभिजात दर्जा" दर्जा हा दिलेला आहे. ह्यापुर्वी "संस्कृत / तामिळ / तेलगु / कन्नड / मलयालम / उडिया" ह्या भाषेला अभिजात दर्जा हा दिला गेला होता. तेव्हा हा आनंद आपण कशाप्रकारे तो साजरा मानावा ? "निवडणुकीतील राजकारण किंवा राजकारणातील निवडणुक" हा अहं प्रश्न आहे. तसे बघता "अभिजात दर्जा" मिळावा ही न्याय मागणी पूर्ण होण्यासाठी असा कालखंड लागणे, ही मोठी शोकांतिका आहे. ह्या पुर्वी माझ्या काही मराठी / हिंदी साहित्य लिखाणात "अभिजात दर्जा" संदर्भात माझे विचार हे लिहिलेले आहेत. "अभिजीत दर्जा" मिळण्यासाठी काही निकष संदर्भ ही आहेत. सदर निकषांमध्ये बसण्यासाठी मराठी भाषीक मंडळींनी आणि साहित्यिकांनी, कर्नाटक राज्यातील "श्रवणबेलगोळ" ह्या एका गावी सापडलेल्या इसवी १०३९ च्या "मराठी शिलालेख" हा संदर्भ दिला होता. तसेच काही वर्षांनी अक्षी गावातील तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे "मराठी शिलालेख " इसवी १०१२ मध्ये शोध लागला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुंडल ह्या गावात सुध्दा इसवी १०१८ मध्ये "मराठी शिलालेख" आढळुन आला होता. परंतु "राजे शिवछत्रपती" ह्यांच्या कालखंडात (इसवी १६३६ - १६८०) "मराठी शिलालेख" हे कां लिहिण्यात आले नाहीत ? हा अहं प्रश्न उत्पन्न होतो. कारण शिवाजी कालखंडात लिहिलेले सर्व शिलालेख हे "संस्कृत भाषेतील" आहेत. अर्थात "मराठी भाषेवरील ब्राह्मणी अधिपत्य आपण स्वीकारावे वा नाकारावे ?" आता तर हा विषय संशोधनाचा विषय झालेला आहे. महत्वाचे असे की, मराठी भाषेला "अभिजात दर्जा" मिळण्याकरीता राज्य सरकारकडुन मराठी भाषेची प्राचिनता सिध्द करण्यासाठी "सातवाहन काळातील" (बौध्द साम्राज्य) *नाणेघाट शिलालेखाचा" दाखला दिला आहे. शिलालेखात वापरलेली भाषा ही "महाराष्ट्रीय प्राकृत" असुन लेखाची लिपी ही "ब्राम्ही" आहे.
"अभिजात भाषा पाठपुरावा समिती" चे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे असो वा "अभिजात मराठी भाषा समिती" चे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे असो, ह्या महाविद्वतांना उशिरा कां होईनां सुबुद्धी आली ! ही फार मोठी उपलब्धी म्हणायला हवी. "पाली प्राकृत प्राचिन भाषा" ही ब्राह्मणी घे-यातुन "अभिजात भाषा" झाली, त्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद द्यायला हवेचं नां ! सदर निर्णयामुळे पाली - प्राकृत भाषेला "आर्थिक नियोजनात" (अनुदान इत्यादी) किती / कसा फायदा होणार आहे ? प्रतिष्ठा ती काय मिळणार आहे ? भारतातील "समस्त विद्यापीठात" ती भाषा शिकण्याकरीता उपलब्ध होणार वा कसे ? पाली प्राकृत ह्या भाषेचे "आधुनिक ग्रंथालय" उपलब्ध होणार आहे काय ? समस्त राज्यात "पाली प्राकृत विद्यापीठ" निर्मिती होणार आहे वा कसे ? हे काळाच्या ओघात दिसणार आहे. परंतु हे चिरकाल सत्य आहे की, "मराठी भाषा / साहित्य ब्राह्मणवादाला नविन भरारी आलेली आहे." जरी ब्राम्हणवादी वंशावळीने ही "इंग्रजी माध्यमाची" (कान्वेंट) बांधिलकी स्वीकारली असली तरी ! "परदेश गमन, परदेश वास्तव्य" हे "धर्म विरोधी कृत्य" आता कुठे तरी राहिलेले आहे ? आता परदेशात "मराठी भाषा चलन" भावनेला गती मिळणार आहे नां ! नवी दिल्लीत होणा-या "९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला" आता धार येणार आहे. तसेच "विद्रोही साहित्य सम्मेलन" काय निर्णय घेणार आहे ? हे सुध्दा आपण बघु यां. अलिकडे प्रा. रावसाहेब कसबे / डॉ. श्रीपाल सबनीस / ज. वी. पवार / शरणकुमार लिंबाळे / अर्जुन डांगळे / प्रा. डॉ. यशवंत मनोहर सारखी काही इहवादी मोठी साहित्यिक मंडळी ही "जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ" नावाच्या तथाकथित "षद्ममय साहित्य वादाच्या" गळाला लागलेली दिसुन येतात.
मराठी ब्राम्हणी साहित्यिकांनी "शिर्ष अग्रणी कवि" म्हणुन ब्राम्हण धर्मीय - मुकुंदराज (१२ वी शती) / संत ज्ञानेश्वर महाराज (१२/०८/१२७५ - २/१२/१२९६) ह्यांना प्रस्थापित केले. परंतु त्याच कालखंडातील शिंपी ह्या जातीचे असलेले मोठे संत नामदेव महाराज (२६/१०/१२७० - ३/०७/१२५०) / संत नामदेव महाराज ह्यांना वयाने वरिष्ठ असलेल्या संत जनाबाई (१२५८ - १३५०) / महार ह्या जातीचे असलेले मोठे संत चोखामेळा (१२७३ - १३३८) ह्यांना मात्र पुर्णतः दुर्लक्षित केले गेले. ही संत मंडळी संत ज्ञानेश्वर ह्यांचे समकालीनचं नाही तर, वयाने क्वचित मोठे ही दिसुन येतात. संत नामदेव महाराज / संत जनाबाई / संत चोखामेळा ह्यांना दुर्लक्षित करण्याचे कारण काय असावे ? हे आम्हाला समजून घ्यावे लागणार आहे. कारण ही सर्व संत मंडळी "पंढरपुरी विठोबा अर्थात बुद्ध" ह्यांना शरण गेलेली आहेत. तर मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर हे ब्राह्मणी व्यवस्थेला पोषक असल्याने त्यांचा परिपाक केला गेला. ह्यानंतर आलेले संत मंडळी - संत नरहरी सोनार (११९३ - १३१३) / संत चोखामेळा परिवारातील संत सोयराबाई - पत्नी (१४ वे शतक), संत निर्मलाताई - बहिण (१४ वे शतक), संत कर्ममेळा - भाऊ (१४ वे शतक) / ब्राह्मण धर्मीय असलेले संत एकनाथ महाराज (१५३३ - १५९९) / वाणी ह्या जातीचे असलेले संत तुकाराम महाराज (२१/०१/१६०८ - १९/०३/१६५०) / संत तुकाराम महाराज ह्यांचे लेखनिक असलेले आणि तेली समाजाचे संत जगनाडे महाराज (८/१२/१६२४ - १६८८) ह्या सर्व संत महाराज ह्यांना ब्राह्मण मराठी साहित्यिकांनी पुर्ण दुर्लक्षित केले आहे. संत तुकाराम महाराज ह्यांचे तर ब्राह्मणी व्यवस्थेने "वैकुंठ गमन" दाखविले आहे. परंतु ब्राह्मण धर्मीय संत रामदास स्वामी ह्यांचा उदोउदो झालेला दिसुन येतो. परंतु संत रामदास स्वामी ह्यांना वरिष्ठ तसेच त्यांच्याच परिवारातील संत एकनाथ महाराज ह्यांना दुर्लक्षित केले गेले. हे कारण समजुन घ्यावे लागणार आहे. ही सर्व संत मंडळी "पंढरपुरी विठोबा अर्थात बुद्ध" ह्यांच्या चरणी लीन झालेली आहेत. संत तुकाराम महाराज हे नांदुरकी ह्या वृक्षाखाली ध्यानस्थ असतांना, छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराज ह्यांचे आशीर्वाद घेवुन राज्यकारभार चालविण्यास शुरुवात करतात. शिवाजी महाराज हे तुकाराम महाराज ह्यांना आपले गुरू मानतात. परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने संत रामदास स्वामी ह्यांना शिवाजी महाराज ह्यांचे "गुरु" असल्याचा खोटा प्रचार केला. जेव्हा की शिवाजी महाराज - संत रामदास स्वामी ह्यांची भेट कधी झालीच नाही. पंढरपुरी विठोबा अर्थात बुद्ध ह्यांच्यावर अभंग रचणा-या सर्व संतांच्या अभंगावर आपण पुन्हा कधी तरी चर्चा करु या !
"भाषा साहित्य बोध" होण्याकरिता "लिपी" असणे गरजेचे आहे. अत: "लिपीचा उगम" समजुन घ्यावा लागणार आहे. तेव्हा आपल्याला प्राचिन "सिंधु - हडप्पा सभ्यता" ही ओळख आवश्यक आहे. पुर्व हडप्पा सभ्यता कालखंड - इ. पु. ७५०० - ३३०० / हडप्पा सभ्यता वा पहिले नागरिकीकरण कालखंड - इ. पु. ३३०० - १५०० / परिपक्व हडप्पा सभ्यता - इ. पु. २६०० - १९०० असा कालखंड आहे. तसेच प्राचिन "तिन युग" कालखंड सुध्दा समजणे आवश्यक आहे. पाषाण युग - ह्याचे तिन कालखंड आहेत. पुर्व पाषाण युग कालखंड - इ. पु. २५००० - १२००० / मध्य पाषाण युग कालखंड - इ. पु. १२००० - १०००० / नव पाषाण युग कालखंड - १०००० - ३५०० / कांस्य युग कालखंड - इ. पु. ३३०० - १२०० / लौह युग कालखंड - इ. पु. १२०० - ५५० असा आहे. ह्याशिवाय मध्य प्रदेशच्या नर्मदा नदी किनारी हथनोरा गावांमध्ये "५ लाख वर्षांपूर्वीच्या" मानवाचा शोध भुवैज्ञानिक अरुण सोनकिया ह्यांनी सन १९९७ साली लावलेला आहे. सदर मानव हा "होमो इरेक्टस" श्रेणीतील आहे. "नर्मदा मानव" हे नाव त्याला दिले गेले. दक्षिण आफ्रिका ह्या देशातुन सर्व प्राचिन मानवाचे स्थलांतरण हे मानले जाते. सदर प्राचिन मानवाच्या इतिहासावर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. "सिंधु सभ्यता" ही इ. पु. ३३०० असुन येथिल उत्खननात सापडलेल्या "लिपी चे वाचन" अद्यापही शक्य झालेले नाही. "सिंधु घाटी सभ्यता" ही प्रगत नगरीय सभ्यता असल्याचे प्रमाण दिसुन येतात. सदर ठिकाणच्या धोलविरा भागात "सहा आरे असलेला एक चक्राकार स्तुप" सापडलेला आहे. अगदी तसाच स्तुप पंजाबच्या संगोल येथे आढळुन आला. सिंधु घाटी उत्खननात "बसलेला सिंह" दिसुन आला. अगदी तसाच सिंह सम्राट अशोक ह्यांच्या शासन कालात दिसुन येतो. सिंधु घाटी उत्खननात एक "बैल" आढळुन आला. अगदी तसाच बैल हा आंधं प्रदेशच्या अमरावती" येथील उत्खननात सापडलेला आहे. मोहंजोदाडो येथे एक "स्तुप आणि तरणताल" हा आढळून आला. अगदी तसाच स्तुप आणि तरणताल हा "वैशाली" येथे दिसुन आला आहे. सिंधु घाटी उत्खननात "ध्यानस्थ राजा" ची मुद्रा / पहनावा आढळुन आला. तथागत बुद्धाची ध्यानस्थ मुद्रा / पहनावा अगदी तसाच आहे. सिंधु घाटी उत्खननात एक "स्वस्तिक" चिन्ह दिसुन आले. शाक्यमुनी बुध्द काळात अगदी तसेच स्वस्तिक दिसुन आले. अर्थात सिंधु घाटी सभ्यता" ही पहिले बुद्ध - ताम्हणकर बुध्द असल्याचा बोध करुन जातो. तर शाक्यमुनी बुध्द हे २८ वे बुध्द असुन ती परंपरा अव्याहतपणे सुरु असल्याचे प्रमाण सांगुन जातात. शाक्यमुनी बुध्द कालखंडात "ब्राम्ही लिपी - धम्म लिपी" असल्याचे स-प्रमाण चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेख बोलुन जातो. सदर "सिंधु घाटी सभ्यता" उत्खननात कुठेही "वैदिक ब्राह्मण" पुरावा आढळुन आलेला नाही.
."सिंधु घाटी सभ्यता" ह्या संदर्भात अल्प इतिहास सांगण्याचे प्रयोजन असे की, "रामायण / महाभारत" ही दोन महाकाव्ये वा "ऋग्वेद / उपनिषद" ही ग्रंथ ही "संस्कृत" भाषेतील असुन ग्रंथ लिपी ही "देवनागरी " आहे. "देवनागरी लिपी" संदर्भात पुढे चर्चा होणारंचं आहे. सिंधु घाटी सभ्यता "लिपी" ही अजुनही वाचणे हे शक्य झालेले नाही. नंतर बुध्द काळात (इ. पु. ५ वी शती) "धम्म लिपी - ब्राम्ही लिपी" ही अस्तित्वात होती. "चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेख हे ब्राम्ही लिपीमध्ये" आहेत. इंग्रज काळात "ब्राम्ही लिपी" ही समजण्यात सुरुवात झाली. बुध्द काळात "पाली प्राकृत" ही बोली भाषा होती. अर्थात "मागधी ही बोली भाषा" होती. पाली प्राकृत भाषेत १० स्वर / संस्कृत भाषेत १३ स्वर / अपभ्रंश भाषेत ८ स्वर / हिंदी भाषेत ११ स्वर आहेत. पाली भाषेत ऋ, ऐ, औ, श, ष ह्या संस्कृत भाषेतील शब्दांचा प्रयोग नाही. पाली भाषेत "विसर्ग" नाही. पाली प्राकृत भाषेत पुढे संस्कार करण्यात आले. त्या भाषेला "हायब्रीड संस्कृत" (इ.पु. ३ - २ शती) म्हटल्या गेले. अर्थात पाली भाषेची संस्कार अवस्थाचं ही "संस्कृत भाषा" आहे. आजची संस्कृत भाषा ही "क्लासिकल संस्कृत " भाषा आहे. "हायब्रीड संस्कृत" भाषानंतर "अपभ्रंश भाषा" (इसवी पहली शती) हिचा उगम झाला. आणि १४ व्या शतकात अपभ्रंश भाषेला उतरती आली. सिध्द सरहपाद (७६९) हे अपभ्रंश भाषा साहित्यातील पहिले कवि तर रइथु हे (१४०० -१४७९) शेवटचे कवि राहीले आहेत. कालीदास ह्यांच्या "विक्रमोर्वशीयम्" ह्या ग्रंथामध्ये अपभ्रंश भाषेचा प्रभाव दिसुन येतो. अर्थात "पाली भाषा" ही भारतातील "सर्व भाषांचीच जननी" आहे. त्यानंतर "आदी हिंदी" (१२ वी शती) ह्या भाषेचा आविष्कार झाला. "आदि हिंदी" भाषेचे पहिले कवि अब्दुल रहमान (अद्दहमान - १२ वी शती) आहेत. आणि सन १६४५ नंतर "उर्दु भाषेचा" आविष्कार झाला. आणि तदनंतर "आधुनिक हिंदी" ही भाषा जन्माला आली. सन १ में १९५० रोजी "हिंदी राजभाषा हिंदी साहित्य संमेलन" हिची स्थापना झाली.
प्राचिन भारतातील सिंधु घाटी सभ्यता लिपी ही सर्वात प्राचिन अशी लिपी आहे. तिला अद्यापही समजुन घेता आले नाही. त्यानंतरच्या बुध्द कालखंडामध्ये - "ब्राम्ही लिपी - धम्म लिपी" ही उदयास आली. त्यानंतर भारतामध्ये खरोष्टी लिपी" हि सुद्धा दिसुन येते. चक्रवर्ती सम्राट अशोकाचे "शाहबाजगडी / मानसेहरा शिलालेख" (पाकिस्तान) हे खरोष्टी लिपीमध्ये लिहिलेली आहेत. ही लिपी आणि ब्राम्ही लिपी वाचण्याचे श्रेय एसियाटीक सोसायटी ऑफ बंगालचे जेम्स प्रिंसेप (१७९९ - १८४०) ह्यांना जाते. कुटील लिपी / देवनागरी लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / ग्रंथ लिपी / कन्नड आणि तेलुगू लिपी / तामिल आणि मलयालम लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी" ह्या लिपी तदनंतर जन्माला आल्यात. ह्या सर्व लिपी संदर्भात नंतर पुढे कधी तरी चर्चा करु या ! परंतु "देवनागरी लिपी " विषयी चर्चा करणे गरजेचे आहे. ही लिपी "नागवंशीय लोकांची" लिपी आहे. भीमा कोरेगाव स्तंभ" ह्यावर २० नावे ही "नाग / नाक" लोकांची दिसून येतात. "नाग + री" > नाग लिपी आणि "री" हा शब्द संबंधकारक आहे. "मराठी भाषा कालखंड हा इसवी सन १००० - १३००" मानला जातो. कन्नड / तेलगु भाषा ही मराठी भाषेपेक्षा ५०० वर्षे जुनी आहे. दुर्गा भागवत ह्यांनी राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन (?) आधारे "जुनी महाराष्ट्री" भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी (२५०० वर्षापुर्वीची) मानलेली आहे. अर्थात कन्नड / तेलगु पेक्षाही जुनी भाषा मानलेली आहे. विश्वनाथ खरे ह्यांनी "संमत सिध्दांत" आधारे मराठीचे मुळ हे तामिळ भाषेमध्ये शोधलेले आहे. डॉ श्री. ल. कर्वे ह्यांचे ही तसेच मत दिसुन येते. हरी नरके ह्यांनी इसवी सनाच्या पुर्वीपासून असलेली भाषा "अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाठी" हिच्या पासुन "शौरसेनी भाषा" निघाली आहे. कालांतराने "मागधी / पैशाची" या दोन भाषा निघाल्यात. अर्थात ती मराठीचे नातवंडे आहेत, असा अफलातून "जावई शोध" लावला. खरे तर "मागधी भाषेच्या खुना" ह्या मराठी भाषेत दिसुन येतात. मराठी भाषेचे "मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी" असे पोट प्रकार आहेत. राजे शिवछत्रपती महाराज ह्यांच्या काळात "मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव" हा दिसुन येतो. राजकीय पत्रव्यवहार / बखरी लिहिण्यासाठी "मराठी भाषेचा व्यवहार" होत असल्याचे बोलले जाते. परंतु शिवकालीन शिलालेख हे "संस्कृत भाषेत कां लिहिलेली गेलीत ?" हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु हे सत्य असे आहे की, "पाली भाषा अपभ्रंशामधुन पुढे मराठी भाषेचा जन्म झाला." भारत सरकारने "देवनागरी लिपी" हिला आपली "अधिकृत लिपी" म्हणून मान्यता दिलेली आहे. देवनागरी लिपी हिचे "प्रथम स्वरुप इसवी ११००" मध्ये दिसुन येते. तर "इसवी १७९६" मध्ये ह्या देवनागरी लिपीच्या प्रयोगाला प्रारंभ झाला.
"पाली - प्राकृत भाषेला" अभिजात दर्जा देण्यास केंद्र शासनाची राहिलेली उदासिनता (विलंब ?) ही शर्मसार करणारी आहे. "इ.पु. पाचवी शती - इसवी ३५०" हा मोठा कालखंड "ब्राम्ही लिपीचा" प्रयोग काळ राहिलेला आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य ह्यांचा कालखंड हा इ. पु. २६८ - २३२ तर "सर्व मौर्य साम्राज्य कालखंड " हा इ. पु. ३२२ - १८५ असा मोठा राहिलेला आहे. सम्राट अशोक ह्यांचे अधिकतर शिलालेख हे "ब्राम्ही लिपीमध्ये" आहेत. काही शिलालेख हे "खरोष्टी लिपीत" आहेत. तर "सारनाथ शिलालेख/ ज्ञानदेव शिलालेख / गुजरात मधील काही शिलालेख" ह्यामध्ये संस्कृतचा (हायब्रीड संस्कृत) प्रभाव हा दिसून येतो. आजची संस्कृत भाषा ही "क्लासिकल संस्कृत" भाषा आहे. तेव्हा प्राचिन बोलीभाषा ही "पाली प्राकृत - मागधी" भाषा होती. पाली व्याकरण हे बलदेव उपाध्याय ह्यांनी तिन भागात वर्गीकृत केले आहे. "कच्चायन व्याकरण / मोग्गलायन व्याकरण / अग्गवंसस्कृत सद्दनीति." कच्चायन व्याकरण ह्यामध्ये ४३ ध्वनीचा संदर्भ दिसून येतो. मानवी जीवनाची व्यापक आणि खोलवर अनुभुती ही "त्रिपिटक ग्रंथात" दिसुन येते. पाली भाषेतील दोन प्रकारचे काव्य - वर्णनात्मक काव्य / आख्यायनात्मक काव्य. पाली भाषा उगम आणि भावार्थ संदर्भात विद्वानामध्ये काही मतभेद ही आहेत. जर्मन विद्वान मॅक्स बैसलर ह्यांच्या मते - पाली शब्दाचा उगम "पाटलीपुत्र" ह्या शब्दातुन (पाटलीपुत्र > पाटली > पाली) झालेला आहे. दुसरे विद्वान प. विधुशेखर भट्टाचार्य ह्यांच्या मते - पाली शब्दांची उत्पत्ती "पंक्ती" ह्या शब्दातुन झाली आहे. मराठीचा शब्द "पाळी" आणि संस्कृत शब्द "पालन" हे शब्द निगडित आहेत. आचार्य बुध्दघोष ह्यांनी हा उत्पत्ती संदर्भ नाकारला आहे. भिक्खु जगदीश ह्यांच्या मते - "पालि > परिणाम" शब्दापासून उत्पत्ती मानलेली आहे. सिंहली परंपरा नुसार "मागधी > मगध" भाषा पासुन उत्पत्ती मानलेली आहे. प्रा. आर. डेव्हिस ह्यांच्या मते - इ. पु. सहाव्या वा सातव्या शतकातील "कोसल प्रदेश" ची भाषा मानलेली आहे. वेस्टर गार्ड ह्यांनी "उज्जैनी प्रदेशाची" बोली भाषा म्हटलेले आहे. अभिधानप्पदिपिका नुसार पाली भाषा उत्पत्ती - "पालेति रक्खतीति पालि." चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांच्या शिलालेखात (भाब्रु) - "धम्म पलिपाय" हे वर्णन दिसुन येते. अर्थात "बुद्धाचे वचन." "पलिपाय शरण" शब्दातुन पाली शब्दांची उत्पत्ती झालेली आहे. आचार्य बुध्दघोष लिखित 'विशुध्दीमग्ग / महावंश" ह्या ग्रंथामध्ये "मागधी" शब्दाला मुळ भाषा मानलेले आहे. इसा पुर्व १४ व्या शतकातील बुध्दघोष ह्यांच्या अट्टकथा ह्या बौध्द ग्रंथामध्ये पालीचा उल्लेख दिसुन येतो. "दिपवंश" हा ग्रंथ सर्वात प्राचिन ग्रंथ समजला जातो. त्या ग्रंथामध्ये पाली शब्दाचा अर्थ - "बुध्दाचे वचन" असे दिलेले आहे. आचार्य बुध्दघोष ह्यांच्या काळात चार बौध्द रचनाकार झालेले आहेत. बोधिसत्व अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य वसुबंधु / आचार्य दिगनाग. ह्या रचनाकारांच्या साहित्यात "अपभ्रंश भाषा" दिसुन येत नाही. परंतु कालीदास ह्यांच्या साहित्यात "अपभ्रंश भाषा" प्रभाव दिसून येतो. तसेच कालिदास ह्यांच्या साहित्यात "भोगवाद" दिसुन येतो. भदंत अश्वघोष ह्यांच्या साहित्यामध्ये "सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिकवाद / दर्शनशास्त्र / प्रेमभाव" अनुभुती ची जाणिव होते. भदंत अश्वघोष ह्यांचे "सौदरांनद / बुध्द चरित्र" ही प्रसिध्द ग्रंथ आहेत. पुरातत्व विद्वान लार्ड कनिंगहम ह्यांच्या नंतर ओव्हरटेल ह्यांनी उत्खनन करण्यात मोलाची कामगिरी केली. "भारताची राजमुद्रा" बनण्यास त्या विद्वानांचे फार मोठे योगदान आहे. भारतातील "भाषा साहित्य निर्मिती" मध्ये प्राचिन बौध्द साहित्य हे मैलाचा दगड आहे. अगदी "मराठी साहित्यात सुध्दा !"
▪️ डॉ मिलिन्द जीवने ‘शाक्य’
नागपूर, दिनांक ५ आक्टोंबर २०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत