‘बुद्धं सरणं गच्छामि’ म्हणजे काय?
संजय आवटे
‘बुद्धं सरणं गच्छामि’ म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा, हाच त्याचा अर्थ.
“कोणी काही सांगेल, म्हणून विश्वास ठेऊ नका. उद्या मीही काही सांगेल. म्हणून ते अंतिम मानू नका. पिटकात एखादी गोष्ट आली आहे, म्हणून विश्वास ठेऊ नका”, असं म्हणाले बुद्ध.
जगातला एक धर्म सांगा, एक धर्मसंस्थापक सांगा, की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! चिकित्सेची तयारी दाखवतो! ‘भक्त’ वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि ‘व्हाट्सॲप फॉरवर्ड’ हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो. माणूस बदलतो, यावर बुद्ध विश्वास ठेवतात. कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो, याची हमी देतात. मात्र, स्वतःला शरण जा, हीच पूर्वअट सांगतात.
ज्याला बुद्ध समजला, त्याला ‘सो कॉल्ड सक्सेस’वरची गल्लाभरू पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही. ‘अत्त दीप भव’ म्हणणारे बुद्ध तुमच्या आत असलेला दिवा प्रकाशमान करत असतात. दिवा असतोच आत, पण काजळी एवढी चढते की, आपण आपल्यालाच अंधारकोठडीत ढकलून देतो.
बुद्ध जगात दुःख आहे, हे मान्य करतात. पण दुःखावर मात करण्याचं बळ देतात. दुःख आहे, हे समजायला तर हवंच. मग त्याचं स्वरूप शोधायला हवं, अशा वाटेनं जात तुमच्या आयुष्यात बुद्ध आनंदाची उधळण करतात. जन्मापूर्वी काय आणि मृत्यूनंतर काय, अशा कोणत्याही हुबासक्या न मारता, बुद्ध जीवनाविषयी बोलतात. जगण्याविषयी बोलतात. त्यातला प्रत्येक पदर उलगडून दाखवतात. अगदी झोपेवर बोलतात आणि आहारावरही. मैत्रीवर बोलतात आणि संसारावरही. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनाही बुद्ध थक्क करतात. मनाची गुपितं उघड करतात आणि मानवी मनाचं विश्वरूपदर्शन घडवतात.
बुद्धांनी सगळ्यात महत्त्वाचे काय केले?
एक प्रसंग आहे. बुद्ध कोसल देशात विहार करत होते. झाडाखाली झोपले होते. तेव्हा एक ब्राह्मण तिकडे अग्निहोत्र करत होता. तो ब्राह्मण बुद्धांना प्रसाद देण्यासाठी गेला. पण, आधी त्याने बुद्धांना जात विचारली. तेव्हा, बुद्ध म्हणाले, “जात नको विचारूस. आचरण विचार.” पुढे बुद्ध त्याला म्हणाले, “हे ब्राह्मणा, यज्ञात लाकूड जाळून शुद्धी मिळत नाही. मी लाकूड जाळत नाही. आंतरिक ज्योती उजळवतो. माझा हा अग्नी नित्य प्रज्वलित असतो!” त्यांचे हे विचार ऐकून ब्राह्मण प्रभावित होतो आणि त्यांना भोजनाचा आग्रह करू लागतो. तेव्हा, बुद्ध म्हणतातः
“जेथे मी धम्माचा उपदेश करतो, तेथे भोजन करत नाही.” बुद्ध तपस्वी खरेच, पण तसेच जिप्सीही. ते विलक्षण संघटकही होते. अमोघ वक्ते होते. अभिव्यक्तीची अनेक माध्यमे त्यांनी प्रातिभा शैलीने हाताळलेली दिसतात. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, हातात तलवार न घेता बुद्धांनी जगावर राज्य केले.
अशोकासारखे जगज्जेते सम्राटही बुद्धाच्या वाटेने चालू लागले. तेही त्या काळात. (इ.स.पू ६२३ – ५४३ हा बुद्धांचा काळ मानला जातो. ८० वर्षांचे आयुष्य बुद्ध जगले.) बुद्धांनी संघ स्थापन केला. संघामुळेच धम्म जगभर पोहोचला. बुद्धांचे अपहरण करणा-यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार तर केलेच, पण पुढे ‘संघ’ हा शब्दही चोरला. बुद्धांना ‘भगवान’ म्हणतात, ते ‘भगवा’ यावरून आले आहे. पण, या भगव्या रंगाचेही अपहरण झाले. माणूस मोठा झाला की त्याचे अपहरण करायचे, पण त्याच्या विचारांच्या विपरित वागायचे! हा डाव कळला नाही, म्हणून बुद्धाचेही बोट आपण सोडले. बुद्धांच्या निधनानंतर चारशे वर्षांनी ‘मनुस्मृती’ येते, याची आणखी कारणपरंपरा कोणती सांगणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली. प्रज्ञा, शील, करूणा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारा- ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ सांगणारा बुद्ध बाबासाहेबांना प्रकाशमान करणे अगदीच स्वाभाविक होते. बुद्ध म्हणजे असा प्रकाश आहे, जो अनुभवता येतो. भरून घेता येतो, असे बाबासाहेब सांगतात.
रजनीश म्हणतात त्याप्रमाणे, बुद्धाचे खरे वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. आणि, मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावे लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकात बुद्ध भेटतो.
बुद्ध बाहेर भेटत असला, तरी तो असतो तुझ्या-माझ्या मनात. गोंधळलेल्या अर्जुनाला साक्षात परमेश्वर विश्वरूपदर्शन देतात. परमेश्वराला शरण ये, असे सांगत स्वतःच्या दैवी प्रकाशाने थक्क करतात. मग, युद्धाचा मार्ग सांगतात. इथे मात्र गोंधळलेल्या अर्जुनांना ‘तू स्वतःलाच शरण जा. तुझ्यातला प्रकाश तुला सापडेल’, असे समजावत बुद्ध युद्धाची नव्हे, तर शांतीची- प्रेमाची दिशा दाखवतात.
बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे, संपन्न शेतकरी कुटुंबातला हा सिद्धार्थ. आपल्यासारखाच गोंधळलेला सिद्धार्थ ‘बुद्ध’ होऊ शकतो. तर, तू का नाही? मी का नाही? व्यवस्थेला शरण जाणारे तू नि मी स्वतःला शरण का जात नाही? गृहत्यागानंतर सिद्धार्थला समजले, ते बुद्ध सोबत असताना गृहवासात आपल्याला का समजणार नाही?
- संजय आवटे
(संदर्भः
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः बुद्ध आणि त्यांचा धम्म
२. डॉ. आ. ह. साळुंखेः सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध
३. डॉ. प्रदीप आवटेः धम्मधारा)
संग्राहक : मिलिंद आशा तानाजी धावारे, लातूर.
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत