निवडणूकीनंतर जनता होरपळणारच !
महेंद्र कुंभारे
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी
शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर 2024
मो.नं. 8888182324
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दारात येऊन ठेपली आहे. येत्या आठ दिवसात आदर्श आचारसंहिता लागणार आहे. दिवाळीनंतर साधारणपणे 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होऊ शकते. 26 नोव्हेंबर रोजी नवीन सरकार स्थापन होणे कायद्याने बंधनकारक आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाचे सरकार येणार यात शंका नाही. नेहमीप्रमाणे निवडणूकीत आचारसंहितेचे बंधन असूनही सत्ता मिळविण्यासाठी पैशांचा पाऊस पडणार आहे. 50 ते 60 टक्के जनता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परंतु, मतदान करणाऱ्या मतदारांनी महाविकास आघाडीला, महायुतीला, तिसऱ्या आघाडीला अथवा नोटाला मतदान केले किंवा ज्यांनी मतदान न करता घरी राहणे अथवा पिकनिकचा आनंद घेणे पसंत केले अशा सर्व नागरिकांना भयंकर महागाईत होरपळावे लागणार आहे. महागाईचा आगडोंब उसळणार आहे. सरकार कोणाचेही येवो जनतेची यातून सुटका होणार नाही. कारण, सध्या निवडणूक जिंकण्यासाठी ज्याप्रकारे फुकटची खैरात वाटली जात आहे त्या आगीत सर्वात जास्त लाडक्या बहिणी होरपळणार आहेत यात शंकाच नाही.
सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. वित्तीय तुट फार मोठी आहे. करोडो रुपयांचे व्याज दरमहा भरावे लागत आहे. व्याज भरण्यासाठी अजून कर्ज घ्यावे लागत आहे. राज्यातल्या अनेक कंपन्या एक एक करुन शेजारील गुजरात राज्यात जात आहेत. त्यामुळे इथला तरुण बेरोजगार होण्याबरोबरच सरकारला मिळणारा “कर” ही थांबला आहे. त्यामुळे आर्थिक आवक घटली आहे. विकास कामांसाठी निधी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून अन्नपुर्णा योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, महिला बचत गटांसाठी अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना, फेरीवाल्यांसाठी अनुदान अशा विविध योजना राबविण्याठी हजारो करोड रुपयांचा निधी लागत आहे. त्यातच विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी सरकारने “लाडकी बहिण योजना” आणून सरकारी तिजोरी तर रिकामी केलीच पण, अजून कर्ज उचलायला सुरवात केली आहे. त्यामुळे राज्य भयंकर आर्थिक संकटात सापडले आहे.
कोणतेही आर्थिक नियोजन नसल्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी खाद्यतेलाचे दर, गॅसचे दर, डाळीचे दर, विजेचे युनिट, पेट्रोल डिझेलचे दर वाढवून सरकार लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत आहेत. हे पैसे देऊन कित्येक पटीने ते पुन्हा लाडक्या बहिणीकडूनच वसूल केले जात आहे. विविध सर्व्हेनुसार आपले सरकार जाणार हे माहीत पडल्यामुळे यांनी जाणीवपुर्वक या योजना आणून सरकारी तिजोरीत खडखडाट निर्माण केला आहे. नवीन सरकार आल्यावर या योजना राबविण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्या बंद कराव्या लागणार आहेत. मग हेच सरकार विरोधीपक्षात असल्यामुळे नवीन सरकार कसे नाकर्ते आहेत, आम्ही कसे तुम्हाला पैसे देत होतो, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच केंद्राकडून फंडींग बंद करुन सगळीकडून नवीन सरकारची आर्थिक कोंडी करणार. आणि नवीन सरकारने या योजना चालू ठेवण्यासाठी नवीन कर आकारणी करुन महागाई वाढलीच तर सदाभाऊ, पडळकर, नितेश राणे, नवनीत राणा वगैरे वगैरे नेते थयथयाट करण्यासाठी आहेतच. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे पुन्हा आमदार खरेदी, अस्थिर सरकार, सरकार पाडणे आणि मग पुन्हा निवडणूका असे चक्र फिरणार आहे. काहीही झाले तरी मरण सामान्य नागरीकांचेच होणार आहेत. निवडणूकीनंतर महागाईचा आगडोंब उसळणार असून यात जनता होरपळली जाणार आहे आणि याची जास्त झळ लाडक्या बहिणींनाच बसणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो 1500 रूपये घेऊन “हुरळून” जाऊ नका, तुमचे “होरपळण्याचे” दिवस लवकरच येणार आहेत हे लक्षात ठेवा. तुर्तास इतकेच.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत