खैरलांजी: आठवण
स्वातंत्र्योत्तर काळात ‘ब्राह्मणी बडगा’ शूद्र या OBC जातीने हातात घेतल्यावर त्यांनी अतिशूद्र म्हणजेच दलित वा SC या जातीवर अन्याय-अत्याचार-बलात्कार-हत्याकांड करण्याची जणू मालिकाच देशभरात सुरू केली…जी बिनबोभाट आजही तेव्हढ्याच तीव्रतेने सुरू आहे.
1968 किलवेनमनी, तमिलनाडु: 44 दलितांना जिवंत जाळण्यात आलं.
1977 बेलची, बिहार: 14 दलितांना जिवंत जाळण्यात आलं.
1985 करमचेड्डू, आंध्रप्रदेश: 6 दलितांचा खून व तीन महिलांवर सामूहिक बलात्कार.
1987 निरुकोंडा, आंध्रप्रदेश: 4 दलितांची हत्या.
1991 चुंडरु, आंध्रप्रदेश: 9 दलितांना कापून त्यांच्या बॉड्या कालव्यात फेकल्या.
1997 लक्ष्मणपूर-बाथे: 58 दलितांचे निर्घृण हत्याकांड.
1997 मेलावलावू , तमिलनाडु: 6 दलितांची हत्या. यात पंचायती मध्ये निवडून आलेला दलित नेता.
2000 कमबालापल्लि, कर्णाटक: 6 दलितांना जिवंत जाळलं.
2002 झज्जर, हरयाणा: 5 दलितांना पोलीस स्टेशनच्या आवारात मारून टाकण्यात आलं.
2005 गोहाना, हरयाणा: पोलिसांच्या संपूर्ण संगनमताने दलितांची 60 घरं जाळली गेली.
वरील सर्व घटनांचं फारसं काही सोयरसुतक महाराष्ट्रातील दलित/बौद्धांना कधीच नव्हतं…आजही नाहीच म्हणा. सर्वसामान्य खालच्या वर्गातील दलितांना याची माहिती नव्हती तर ज्या मध्यमवर्गीय दलितांना या घटना माहीत झाल्या होत्या त्यांनी मारले गेलेले दलित कुठे ‘बौद्ध’ होते..असे म्हणत या हत्याकांडांची दखल घेण्यास नकार दिला.. त्यांच्या एकूणच डरपोक अन ‘माझं घर अन मी समाधानी’ या वृतिला साजेशी ही भूमिका होय.
29 सप्टेंबर 2006 रोजी मात्र महाराष्ट्रातील शूद्र ओबीसींनी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या गावात महाभीषण दलित हत्याकांड-बलात्कार घडवून महाराष्ट्रातील दलित/बौद्धांना घरचा आहेर दिला.
धम्मदीक्षाच्या सुवर्णमहोत्सवी प्रसंगी खैरलांजीतील ‘कुणबी’ अन ‘कलार’ या ओबीसी जातीनं बौद्ध समाजाच्या कानशीलात ताडकन लगावत जाळ काढला…
मात्र
या घटनेची नीटशी दखल घ्यायला देखील दलित/बौद्ध समाजाला तब्बल एक महिना लागला. धम्मदीक्षा याची सुवर्णमहोत्सवी झिंग व पीडित ‘भोतमांगे’ हे आडनाव ‘बौद्ध’ आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी लागलेला वेळ हे यामागील कारण होय.
भोतमांगे यांच्या घरावर चिकटवलेली बुद्धाच्या हाताची मुद्रा (लग्नपत्रिकातून फाडून घेतलेला) याचा फोटो पाहिल्यानंतर बौद्ध जागे झाले हे विशेष..नाहीतर हे प्रकरण देखील बौद्धेत्तर दलितांचे म्हणून दुर्लक्षिले जाण्याची पूर्ण शक्यता होतीच होती.
२९ सप्टें २००६ रोजी संध्याकाळी खैरलांजीतील कुणबी अन कलार या सवर्णानी भोतमांगे कुटुंबियांवर घाला घातला. पाच जणांच्या कुटुंबातील भैयालाल भोतमांगे हे, हल्ला झाला त्यावेळी घरी नव्हते म्हणून केवळ वाचले.
जवळजवळ दीडदोन तास अक्षरशः नंगानाच करत सवर्ण OBC गावकऱ्यांनी बौद्ध भोतमांगे कुटुंबियांना गुराढोरांसारखं झोडपून झोडपून मारून टाकलं. एव्हढंच नव्हे तर प्रियंका व तीची आई सुरेखाताई यांच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार ही करण्यात आल्याचं, स्वतंत्र fact finding करणाऱ्या विविध संघटनांनी नोंद करून ठेवलंय.
निमीत्त घडलं तें अत्यंत हुशार असलेल्या व सायकलीवर कॉलेजला जाणाऱ्या प्रियंकाला गावातील सवर्ण टवुर मुलांनी छेडण्याचं व त्याचा जाब, सुरेखाताईच्या आतेभाऊ यांनी त्या मुलांना विचारण्याचं.
दलितांची तीनच घरटी (दोन बौद्ध व एक मातंग) असलेल्या या गावांतून 9 महिने आधी आशिष खोब्रागडे नावाचा 20 वर्षांचा बौद्ध विद्यार्थी अचानक गायब झाला होता. त्याचे प्रेत खैरलांजी पासून 25 किलोमीटर दूर कालव्यात सापडले. पोलिसांनी या घटनेचा तपास केलाच नाही अन हे हत्याकांड घडलं. या हत्याकांडात देखील सुरेखाताई (40) यांची अर्धनग्न, सुधीर (21) अर्धनग्न, रोशन (19 व डोळ्याने अल्पसा आंधळा) अर्धनग्न तर प्रियंका (17) पूर्णपणे नग्न यांची प्रेतं कालव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडली. कालव्याच्या झुडपात प्रेतं सापडली म्हणून नाहीतर पोलिसांनी हे हत्याकांड देखील दडपून टाकलंच होतं म्हणून समजा.
अत्यंत मेहनती असलेलं हे भोतमांगे कुटंब त्यांच्या स्वतःच्या अल्पशा शेतजमिनीवर राबराब राबून स्वाभिमानानं जगत होतं. करारी सुरेखाताई शेती सोबतच बिड्या ओळायचा छोटाचा व्यवसाय ही घरात करायच्या. जमलेल्या मिळकतीतून मुलांचं शिक्षण व्यवस्थित चालू होतं. मुलंही कोणाच्या अध्यातमध्यात न राहता आपला अभ्यास बरा अन आपण बरं असे जगत होते अन हेच नेमकं सवर्ण गावकऱ्यांच्या डोळ्यांत खुपत होतं. काही ना काही कुरापती काढून भोतमांगे कुटुंबियांना नाहक त्रास देण्याचा त्यांचा उपद्व्याप वरच्यावर सुरूच होता.
याचाच भाग म्हणून, ग्रामपंचायतीने भोतमांगेंना स्वतःच पक्कं घरही बांधू दिलं नव्हतं तेही स्वतःच्या मालकीची जमीन असतानाही. त्या जमिनीवर गावकऱ्यांचा एव्हढा डोळा होता की त्यांनी याआधी कोर्टकचेऱ्या करून त्या जमिनीचा एक तुकडा गावाच्या नावे केला होता व आता पुन्हा जमिनीच्या मध्याहून गावातील वाट पाहिजे म्हणून भोतमांगे यांना सतत त्रास देणं सुरू होतं. या सर्व प्रकाराची रितसर तक्रार सरकार दरबारी भोतमांगे यांनी करून ठेवली होती. त्यातच हा छेडखानीचा प्रकार घडला. सुरेखाताईचा आतेभाऊ पोलीस पाटील सिद्धार्थ गजभीये यांनी त्या पुंड मुलांना दम दिल्याचा डुख मनात धरून गावकऱ्यांनी सिद्धार्थ गजभीये यांना एकटं गाठून बेदम मारहाण केली. या घटनेची साक्ष सुरेखाताईने पोलिसांना दिल्यामुळे कुणबी अन कलार या OBC सवर्णांचा मिथ्या जातीय अहंभाव अधिकच दुखावला गेला अन त्यांनी दलित भोतमांगे कुटुंबियांना कायमचा धडा शिकवण्यासाठी हे भयानक हत्याकांड घडवलं.
अत्यंत घाणेरड्या जातीवाचक शिव्या देत गावकऱ्यांनी सुरेखाताई, प्रियंका, सुधीर व अल्पसा आंधळा असलेल्या रोशन या चौघांनाही सर्वांसमक्ष उघडं नागडं करुन मारलं …. धिंड काढली ….महिलांवर पाशवी बलात्कार केला अन मग त्यांच्या बॉड्या बैलगाडीत टाकून लांब कालव्यात फेकून दिल्या. दुसर्या दिवशी कालव्याच्या झुडपात प्रियंकाची बॉडी सापडल्यावर या हत्याकांडाला वाचा फुटली व गुन्हा नोंद झाला.
जातीवाचक शिवीगाळ करत OBC सवर्णांनी दलितांना मारून टाकल्याची स्पष्ट नोंद FIR मध्ये असतानाही कोर्टाला यात जातीवाद दिसला नाही…महिलांना उघडं-नागडं करुन मारलं असतानाही कोर्टाला यात स्त्री देहाची विटंबना दिसली नाही कारण जातीवादाने बरबटलेली आपली सामाजिक व्यवस्था. मात्र, जातीवादाने भोतमांगे कुटुंबाचा बळी घेतला असला तरी या घटनेतून जातीवाद काढण्याला हातभार लावला तो आपल्या जातीत पडलेल्या वर्गांनी कारण थोड्या शिक्षणानं अन सरकारी नोकरीनं हुरळून गेलेली ही दलित मंडळी आपलं दलितपण लपविण्यासाठी सवर्णांची हुजरेगिरी करण्यात थोडीही कसर सोडत नाहीत.
याच मुळे भंडाराचा पोलीस सुपरिटेंडंट सुरेश ‘सागर’ (बाबासाहेबांचे सहकारी खोब्रागडे यांच्या या नातेवाईकांनं जात लपविण्यासाठी नाव बदललंय), डेप्युटी सुपरिटेंडंट सुसाटकर, कॉन्स्टेबल बबन मेश्राम, पोस्ट मार्टम करणारा डॉ.अविनाश शेंडे (ज्यानं महिलांच पोस्टमार्टम करताना बंधनकारक असतानाही सुरेखाताई अन प्रियंकाचे पोस्टमार्टम करताना बलात्कार झाल्याच्या खुणा मुद्दामहून दुर्लक्षिल्या), सिविल सर्जन डॉ रामटेके ज्यांच्या सांगण्याहून डॉ शेंडे यानं पोस्टमार्टम मध्ये हयगय केली, सिद्धार्थ गजभिये मारहाण प्रकरणी दलित अट्रोसिटीचा गुन्हा फिट बसत असतांनाही तो लावण्यात कसूर करणाऱ्या लीना गजभिये या सर्व दलितांनी खैरलांजीतील एव्हढ्या मोठ्या निर्घृण दलित हत्याकांडाला एका किरकोळ वादातून झालेली मारहाण अन त्यातनं गेलेले जीव अशी साधी केस करुन टाकलं.
खैरलांजी हत्याकांडातून ‘जातीय दलित अत्याचार’ व ‘स्त्री देहाची विटंबना’ ही खरी कारणं अश्याप्रकारे आपल्यातील बांडगुळांच्या मदतीनंच बिनबोभाट बाजूला सारली गेली याची आठवण रहावी म्हणून तसंच आपल्यातही थोडं थोडं म्हणता आता कायमस्वरूपी ठाण मांडलेल्या षंडपणाची अन अशी हत्याकांडे, अन्याय-अत्याचार निमूटपणे पचवण्याची लागलेली सवय याची जाणीव व्हावी म्हणून हा प्रपंच…. बाकी हा लेख वाचणार्यांकडून तशी अपेक्षा काहीच नाही.
खैरलांजी नंतर असंच एक महाभीषण सामूहिक तिहेरी हत्याकांड घडलं ते नगर जिल्ह्यातील जवखेडे या गावी 2014 साली. खैरलांजी पचवलेल्या समाजाने ‘जवखेडे’ देखील पचवून टाकलंय…मात्र ‘सलाम’ त्या श्यामदादा गायकवाड नावाच्या एकाकी शिलेदाराला ज्याने ‘जवखेडे’ हत्याकांडातील बनावट पोलीस कहाणी पुराव्यानिशी उधळून टाकली अन या हत्याकांडात, सवर्ण आरोपींना वाचविण्यासाठी, पोलिसांनी मुद्दामहून घरच्यांनाच केलेलं ‘दोषी’ यांची निर्दोष मुक्तता केली…पुढची लढाई श्यामदादा लढत आहेतच…
आपण अलिप्तपणे लांबून निवांत बघत राहू आपलं घर-कुटुंब सांभाळत..
जाताजाता: दलित अत्याचारांना जेव्हढे जबाबदार सवर्ण ओबीसी आहेत तेव्हढाच जबाबदार आमचा नाकर्तेपणा आहे हे समाजाला ज्यादिवशी पटेल त्यादिवशी अत्याचारांना प्रतिबंध घालण्याचं पहिलं खरं दमदार पाऊल उचललं जाईल हे मात्र निश्चित.
मिलिंद भवार
पँथर्स
9833830029
29 सप्टेंबर 2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत